विजयापूर्वीचा हलकल्लोळ
बेंजामिन फ्रँकलीन यांच्या मुत्सद्दीपणाने अमेरिकेच्या क्रांतीयुद्धाकडे पाहण्याचा युरोपिअन देशांचा दृष्टिकोन बदलला होता. जगावर प्रभूत्व गाजवणा-या इंग्लंडची खोड मोडण्यासाठी युरोपातील प्रमुख देशांनी मोर्चेबांधणी सुरु केली. यामध्ये सर्वात मोठी भूमिका होती फ्रांसची. ब्रिटन आणि फ्रांस यांच्यातील हाडवैर खूप जुने होते. सारटोगाच्या लढाईत जनरल जॉन बरगोईनच्या पराभवाने युरोपातील देशांना अमेरिकन क्रांतीसेनेच्या विजयाची खात्री वाटू लागली. त्याच सुमारास अमेरिकन क्रांतीसेनेच्या जोरदार हल्ल्यामुळे लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिसच्या ब्रिटिश सैन्याला प्रिस्टनमधून जीव मुठीत धरून पळावे लागले. पुढे हाच लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती होणार होता आणि त्याच्या नेतृत्वातच अमेरिकन क्रांतीसेनेच्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब होणार होते. हया घटनांचे पडसाद युरोपात सकारात्मक उमटले. यानंतरच्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात फ्रांस अमेरिकेचा सर्वात विश्वासू व सक्रिय मित्र म्हणून युद्धाच्या पटलावर अवतरला. बेंजामिन फ्रँकलीन यांची शिष्टाई आणि ...