क्रांतीसेनेचा बौद्धिक सरसेनापती
कोणत्याही युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर सैन्य सरसेनापतीच्या नेतृत्वात लढत असते. अशावेळी सैन्याचा सेनापती लष्करी डावपेच आणि निर्णय घेण्यात गुंतलेला असतो. रणागंणाच्या बाहेर दोन्ही बाजूने बौद्धिक व मुत्सद्दीपनाणाने देखील युद्ध खेळावे लागत असते. दुबळया सैन्याला बौद्धिक युद्धाची अधिक आवश्यकता असते. कांती अथवा स्वातंत्र्ययुद्धात, तर बौद्धिक रणनिती नितांत आवश्यक असते. ज्या जनतेच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष लढा सुरू असतो,तीचे जनमत बनवने आणि टिकवणे महत्वाचे असते. तसेच जगभरातून आपल्या न्यायलढयासाठी जनमत,राजकिय सहकार्य,साधनांपासून संपत्तीची रसद मिळवणे, हे काम क्रांतीसेनेच्या बौद्धिक सरसेनापतीला करावे लागते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात लढयाची बौद्धिक व मुत्सद्दी बाजू सांभाळणा-यांमध्ये सरसेनापती म्हणून ज्यांनी काम पाहिले ते म्हणजे 'बेंजामिन फ्रँकलीन'. ज्ञान-विज्ञान क्षेत्रातील अफाट व्यक्तिमत्व लाभलेला हा माणूस जार्ज वॉशिंग्टन यांच्याप्रमाणेच अमेरिकेचा राष्ट्रपिता म्हणून ओळखला जातो. वॉशिंग्टन रणांगणात लढत असातांना बौद्धिक लढयाची आघाडी बेंजामिन फ्रँकलीन सांभाळत होते. एक प्रतिभावंत व प्रख्यात वैज्ञानिक आपल्या राष्ट्रासाठी प्रयोगशाळेच्या बाहेर पडून, राजदूत म्हणून केवढी मोठी कामगिरी बजावू शकतो. याचे एक वैशिष्टयपूर्ण उदाहरण म्हणून आपल्या अमेरिकन स्वातंत्र्य लढयात बेंजामिन फ्रँकलीन यांच्या योगदानाकडे पहावे लागते. बोस्टन शहरात जोसिया फ्रँकलीन नावाचा मेणबत्ती आणि साबण यांचा एक उद्योजक होता. दोन बायका आणि पंधरा अपत्य असलेला त्याचा प्रपंच पसारा. त्यापैकी एक अपत्य म्हणजे बेजांमिन जन्मजात प्रतिभा व कुशाग्र बुद्धी यांचे वरदान बेंजामिनला लाभले होते. लहानपणापासून आपल्या वडिलांच्या कारखाना हे त्याचे आवडते ठिकाण. त्याच्यात दडलेला वैज्ञानिकाची ती आयती प्रयोगशाळा होती. बोस्टनची लॅटिन शाळेत बेजांमिनच्या प्रतिभेला पेलवण्याची क्षमता नव्हती. वडिलांचा कारखानाचे त्याची शाळा झाली. कल्पनेच्या आकाशात भरारी घेणारी त्याची प्रतिभा पुस्तकाच्या पानांमधून मुक्त होत गेली. यातूनच त्याने आपल्या मोठया भावाच्या मदतीने वयाच्या बाराव्या वर्षी छपाईचा उद्योग सुरू केला. तिरसट स्वभावाच्या भावाशी फार काळ त्याचे पटले नाही. अखेर तो स्वतंत्रपणे राहू लागला आणि व्यवसाय करू लागला. त्याने एका व्यक्तीच्या येथे भाडेकरू म्हणून राहण्यास सुरवात केली. घरासोबत त्याला घरमालकाची 'देबोरा' नावाची मुलगी आयुष्यभराची साथीदार म्हणून मिळाली. वैवाहिक जीवनात सुरवातीला अपरिपक्वतेमुळे चढउतार आले. तरी पुढे सर्व काही सुरळीत झाले. पंतगाच्या माध्यमातून बेंजामिनने अर्थिंगचा शोध लावला. त्याने पावसाळी वातावरणात पंतगाच्या मांज्याच्या शेवटच्या टोकाला लोखंडाची चावी लावली होती. अचानक आकाशात वीज कडाडली आणि चावीमधून ठिणग्या पडल्या. यावरून बेंजामिनने विद्युतप्रवाह आणि त्याला अवरोध करण्याची म्हणजे अर्थिंगची पद्धत शोधली. तसेच उंच इमारतीवर कोसळणा-या वीजेचा प्रवाह रोखण्यासाठी बसवण्यात येणा-या 'लाईटनिंग रॉड' चाही शोध लावला. यानंतर बेंजामिन फ्रँकलीन यांनी 'बायफोकल' चष्मा आणि गाडी किती किलोमिटर चालली? हे बघायचं 'ओडोमीटर' याचा शोध लावला. बेंजामिन फ्रँकलीन यांनी अनेक वर्षे ब्रिटिशशासित टपाल विभागात काम केले होते. त्यामुळे 'अमेरिकन दुरसंचार प्रणाली' चा पाया त्यांना रचता आला. आज रेफ्रिजरेशनचा वापरावर जग चालते असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. हे तंत्रज्ञान बेंजामिन फ्रँकलीन यांनी जगाला दिले. त्यांच्यामुळेच आज आपण फ्रिज आणि एसीचा उपभोग घेऊ शकतो,आईसक्रीम खाऊ शकतो किंवा मोठया प्रमाणात अन्न-भाजीपाला साठवू शकतो किंवा व्हॅक्सिन- विविध औषध जतन करू शकतो. संगिताची जाण आणि रसिकाचा कान लाभलेल्या फ्रँकलीन यांनी 'ग्लास हार्मोनिका' या वाद्याची निर्मिती केली. त्यांचा हा शोध त्यांना सर्वात प्रिय होता. लोकसंख्या आणि अर्थशास्त्र यांचा गाढा अभ्यास व व्यासंग असणा-या फ्रँकलीन यांच्या सिद्धांताचा आधार घेऊन अर्थशास्त्राचा जनम ॲडम स्मिथ याने ब्रिटिश शासनासाठी अनेक धोरणं आखली. आपल्या एकाही शोधाचे पेटंट न घेणारा हा अलौकिक प्रतिभेचा शास्त्रज्ञ होता. पेनसिल्वेनिया याठिकाणी त्यांनी स्वतःचा छापखाना सुरूकेला आणि त्याच्या माध्यमातून 'पेनसिल्वेनिया गॅझेट' ची मुहूर्तमेढ रोवली. एवढंच नाही तर फिलाडेल्फियातून प्रसिद्ध होणा-या एका वृत्तपत्राचे संपादन देखील त्यांनी केले. फिलाडेल्फिया विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. एक उत्कृष्ट बुद्धीबळपटू म्हणून देखील त्यांचा नावलौकिक होता. पूर्णवेळ किंवा व्यासायिक बुद्धीबळपटू नसतांना देखील बुद्धीबळाच्या क्षेत्रात प्रख्यात असलेल्या 'अमेरिकन चेस हॉल ऑफ फेम' मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. मानवी गुलामगीरीची मनस्वी चिड असणा-या या माणसाने गुलामगीरीचा विरोध केवळ बोलण्यातून किंवा लेखनातून केला नाही,तर आपल्या घरातील दोन निग्रो गुलामांना कायमचे मुक्त केले. एवढेंच नाही तर आपल्या मृत्यूपत्रात,'गुलाम बाळगले नाही. तरच संपत्तीत वारसाहक्क मिळेल.' अशी अट आपल्या वारसांसाठी घालून ठेवली. अमेरिकन स्वातंत्र्य लढयाचा उगम असलेली 'बोस्टन टी पार्टी' ला फ्रँकलीन यांनी कायम अमानवी मानले आणि या घटनेत ईस्ट इंडिया कंपनीचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अमेरिकेने करावी असा त्यांचा कायम आग्रह राहिला. एक महान शास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,संगिततज्ञ,मानवतावादी,गुलामगीरीचा कट्टर विरोधक,बुद्धीपळपटू,एक अत्यंत उमदा माणूस असलेले फ्रँकलीन यांनी अमेरिकन क्रांती युद्धात उडी घेतली. कॉटिनेंटल काँग्रेसचे सद्स्य ते क्रांतीसेनेचे बौद्धिक सरसेनापती अशी वाटचाल त्यांनी अत्यंत समरसून केली. स्वातंत्र्ययुद्ध ऐन भरात असतांना त्यांच्यावर राजदूत म्हणून फ्रांस आणि स्वीडनमधून नव्याने जन्माला येऊ घातलेल्या अमेरिकेसाठी आर्थिक-सामरिक खुराक मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्यापूर्वी सायलस डीन याच्यावर ती जबाबदारी देण्यात आली होती. त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे १७७६ ला फ्रँकलीन यांच्यासोबत ऑर्थर ली यांना पाठवण्यात देण्यात आले. मात्र ८ डिसेंबर १७७७ ला ऑर्थर ली यांना देखील परत बोलवण्यात आले आणि एकटया फ्रँकलीन यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. फ्रँकलीन यांनी अतिशय चाणाक्षपणे आणि मुत्सद्दीपणे परराष्ट्र संबंध आणि व्यवहार हाताळले. त्यांचा सरळ स्वभाव,सहनशीलता,विद्वत्ता आणि एक विचारवंत म्हणून त्यांची लोकप्रियता फ्रांसमध्ये झाली. फ्रेंच जनतेच्या मनात प्रति रुसो अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्याचवेळी बरगोईनचा पराभव आणि शरणागती याची वार्ता पॅरिसमध्ये येऊन धडकली. फ्रांसचा नालायक सम्राट 'सोळावा लुई' याने त्यावेळी राज्यकारभाराची सर्व सुत्रे आपला विदेश मंत्री 'काऊंट डि वर्जनिस' याच्याकडे सोपवली होती. वर्जनिसच्या धोरणानुसार अमेरिकेला स्वातंत्र्ययुद्धात सहाकार्य करणे आवश्यक होते. कारण ब्रिटिनचा विजय झाला, तर ब्रिटिन अमेरिकेतील फ्रांस आणि स्पेन यांच्या वसाहती हडप करेल. तसेच हे युद्ध दिर्घकाळ चालले तरी इंग्लंडचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि त्याला आपल्या काही वसाहती गमवाव्या लागतील; परंतु अमेरिकेला आज सहकार्य केल्यास अमेरिकेतील आपल्या वसाहती अबाधित राहतील. आपण सहकार्य न केल्यास अमेरिका स्वतंत्र झाला, तर आपल्या वसाहती त्याच्यात सामावून घेईल. त्यामुळे अमेरिकेला मदत करणे आणि त्याला उपकृत करणे वर्जनिसला अधिक योग्य वाटत होते. परंतु त्याला ब्रिटिनसोबत उघड भूमिका घेणे देखील धोक्याचे वाटत होते. तो गुप्त पद्धतीने साधन-संपत्ती अमेरिकन क्रांतीसेनेला पुरवत होता. वर्जनिसची भूमिका व नियत साफ असली, तरी त्याच्याकडे धाडस आणि दृढ संकल्प यांची कमतरता होती. तसेच नेमके काय होईल याविषयी तो साशंक होता. बरगोईनच्या परभवामुळे आणि फ्रँकलीन यांच्या राजदूत म्हणून शिष्टाईमुळे वर्जनिसचे धैर्य उंचावले. त्याने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अमेरिकेशी ८ फेब्रुवारी १७७८ रोजी दोन करार केले. त्यानुसार फ्रांसने अमेरिकेला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. तसेच सैनिक व नाविक कुमक देण्याचे वचन दिले. दोन्ही पक्ष एकमेकाच्या परवानगीशिवाय इंग्लंडसोबत शांतीवार्ता किंवा संधी करणार नाहीत. उत्तर अमेरिकेतील जो भाग फ्रांसच्या ताब्यातून गेलेला आहे,त्याला अमेरिकेत समाविष्ट करण्यासाठी सहकार्य करेल. याच्या मोबदल्यात फ्रांसला ब्रिटिश वेस्ट इंडीजचा भाग घेता येईल. या संधीमधून फ्रँकलीन यांचे चातुर्य लक्षात येते. त्यांना फ्रांसचे सहकार्य हवे होते;परंतु अमेरिकेच्या हिताला बाधा न येता हवे होते. तसेच अमेरिकेत त्यांना पुन्हा फ्रांसचा हस्तक्षेप नको होता. यामध्ये फ्रँकलीन यांनी दोन हेतू साधले होते. ते म्हणजे अमेरिकेतून त्यांनी फ्रांसचा धोका संपवला होता आणि आपली मातृभूमी इंग्लंडच्या हिताला बाधा येऊ दिली नाही. फ्रँकलीन यांनी स्वातंत्र्ययुद्धात ही आपल्या मातृभूमीचे ऋणानुबंध कायम जोपासले. बेंजामिन फ्रँकलीन यांच्या धोरणांमुळे व मुत्सद्दीपणामुळे अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामाला युरोपिअन देशांचा पाठिंबा मिळाला आणि अमेरिकेचा विजय निश्चित झाला. अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर फ्रँकलीन हे अमेरिकेचे पहिले पोस्ट मास्टर जनरल झाले. टपाल खात्यातील नोकरीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या संपर्क व दुरसंचार प्रणाली त्यांना अधिक बळकट करता आली. बेंजामिन फ्रँकलीन यांना यामुळेच जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर अमेरिकेचा दुस-या राष्ट्रपित्याचा दर्जा दिला जातो. त्यांनी कायम भांडवलशाहीला विरोध केला. भांडवलशाही,त्यासाठी केले जाणारे संशोधन,तंत्रज्ञान विकास आणि त्यातून चंगळवादासाठी मिळवला जाणारा पैसा यांना त्यांनी कायम विरोध केला. मात्र त्यांचे दुर्देव म्हणावे लागेल,ते म्हणजे अमेरिका हा आज जगातील भांडवलदारीचा अग्रदूत आहे आणि त्याच्या शंभर डॉलरच्या नोटेवर बेंजामिन फ्रँकलीन यांचे छायाचित्र राष्ट्रपिता म्हणून झळकतांना दिसते.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
अभ्यास पूर्वक केलेले लेखन.
ReplyDeleteबेंजामीन सारख्या शूर लढवय्या व्यक्तिमत्व व त्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्याचे सखोल विवेचन केले आहे.
धन्यवाद
धन्यवाद 🙏
Deleteसर आपल्या लेखनाचा दर्जा एखाद्या मोठया लेखकाला ही लाजवेल असे आहे
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete