ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !
एक दिवस सकाळचे कोवळे उनं खात लाओत्से आपल्या झोपडी बाहेर बसला होता. दूरच्या गावातील एक माणूस त्याला भेटण्यासाठी आला. त्याला जीवनासंदर्भात काही प्रश्न पडले होते. लाओत्सेकडून आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतील,या आशेने तो लाओत्सेकडे आला होता. तो लाओत्सेला म्हणाला,"मला जगण्यात आनंद आणि सार्थक वाटेल,असा काही उपदेश द्या !" लाओत्सेने त्याच्याकडे पाहिले आणि हसला. जीवनाच्या अथांग डोहात गंटागळया खाणारा तो माणूस मोठया आशेने त्याच्याकडे पाहत होता. लाओत्से त्याला म्हणाला,"जो दुस-याच्या ज्ञानावर जगू इच्छितो तो आयुष्यभर भटकत आणि भरकटतच राहतो. मी तुला तसा भटकणारा आणि भरकटणारा बनवू इच्छित नाही." लाओत्सेकडून ज्ञानप्राप्तीसाठी मोठया आशेने लांबवरुन आलेला हा गृहस्थ हिरमुसला झाला. एक मात्र खरे की त्याला जीवनासंदर्भात काही मूलभूत प्रश्न पडले असल्याने, तो नक्कीच जिज्ञासू आणि बुद्धिमान होता. लाओत्सेचे बुचकळयात पाडणारे उत्तर ऐकून देखील तो म्हणाला," मी लांबच्या गावाहून आलो आहे काही तरी ज्ञान मला द्या !" लाओत्सेला त्याच्या ज्ञानतृष्णेची जाणीव झाली. तसेच काही तरी देण्यासारखे याच्यामध्ये याची खात्री झाली. लोओत्से म्हणाला,"मी ज्ञान घेण्याचे काम करीत असतो,ते देण्याचा अपराध करीत नाही. मला ते कठीण वाटते." त्या गृहस्थाला लाओत्सेच्या या एका विधानात ज्ञानाचा नेमका पत्ता मिळाला होता. लाओत्से आणि हा गृहस्थ यांच्यातील हा संवाद सामान्य माणसाला स्वतःच्या आकलन क्षमतेच्या पलिकडे वाटल्यास नवल नाही. लाओत्सेने आपल्या या उत्तरामधून माणसाला अतिप्राचीन काळापासून पडलेल्या आणि आजतागायत कायम असलेल्या प्रश्नाचे उत्तर येथे दिले आहे. प्रख्यात उर्दू शायर 'शहरयार' माणसाच्या या चिरंतन प्रश्नाचा शोध घेतांना म्हणतात," सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है,इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है". जगात प्रत्येक जण अतृप्ता,अस्वस्थता,अशांती यांचे ओझे पाठीवर घेऊन हैराण होऊन फिरतांना दिसतो. माणसातील या अतृप्ता,अस्वस्थता,अशांती इत्यादीचे मूळ दुसरे-तिसरे काही नसून त्याचे स्वतः विषयचे असेलेले अज्ञान आहे. माणूस आपल्या या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी बाहय जगात भटकत असतो. अशावेळी त्याला भरकटवणारे ढोंगी गुरु जागोजागी दबा धरून बसलेले असतात. भगवान बुद्धांना त्यांच्या साधनेच्या सहा वर्षांच्या कालखंडात हा अनुभव आला होता. माझ्या प्रश्नांचे उत्तरं कोणत्या गुरूकडे नसून ते माझ्यातच दडलेले आहे. मला फक्त स्वतःचा शोध घेत,त्यांच्यापर्यंत पोहचावे लागेल. हे बुद्धांच्या लक्षात आल्यानंतरच त्यांना बोधीसत्वाची प्राप्ती झाली. लाओत्से त्याच्याकडे आलेल्या हया जिज्ञासू माणसाला तेच सांगत होता. तुला हवे असलेले ज्ञान तुझ्यातच दडलेले आहे. मी गुरु किंवा ज्ञानदाता बनून तुला भटकवणार व भरकटवणार नाही. जीवनातील आनंद तुझ्या मनात व मानण्यात आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत,"आनंदाचे डोही आनंद तरंग". तसेच तू स्वतःचा शोध घेतल्यास जीवनाचे सार्थक देखील सापडेल. यामुळेच लाओत्से म्हणतो मी ज्ञान देण्याचा अपराध अथवा पाप करत नाही. म्हणजे एकाने गुरु म्हणून दुस-याला ज्ञान देणे ही स्वतःची आणि दुस-याची केलेली शुद्ध फसवणूकच नव्हे तर स्वतःशी केलेला अपराध आहे. गाडगे महाराजांच्या,"मी कुणाचा गुरु नाही आणि कुणी माझा शिष्य नाही." या विधानातून लाओत्सेच आपल्याला भेटतो. गुरु-शिष्य परंपरेचे स्तोम माजवून हजारो वर्षांत उभ्या करण्यात आलेल्या एका भक्कम शोषणकारी व्यवस्थेला छेद देण्याचे साहस बुद्ध,लाओत्से,तुकाराम महाराज,गाडगे बाबा अशा मोजक्या महापुरुषांनाच दाखवता आलेले आहे. कोणाचा गुरु बनणे म्हणजे मोफत जीवन जगण्याची सोय आणि कोणाला गुरु करणे म्हणजे ज्ञानाचा शोध घेण्याचे श्रम व प्रयत्न करण्याऐवजी अज्ञानाच्या धुंदीत आरामात जगणे. त्यामुळे 'गुरु-शिष्य' परंपरा म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची सोयच म्हणावी लागते. अनेकांना ऐहिक सुखांची विनासायास प्राप्ती करायची असते. त्यामुळे त्यांना चमत्कारी गुरु हवे असतात. जगात असे भामटे कायमच उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना शिष्य मिळवण्यासाठी आणि संपत्ती जमवण्यासाठी कष्टच करावे लागत नाही. भक्ती व धर्म यांचा मुळ अर्थ न कळल्यामुळे सामान्य माणसं अशा गुरूंचे चेले होतात. गुरुच्या कृपेने शिष्याच्या जीवनात काही फरक पडतो किंवा नाही हा स्वतंत्रपणे शोध घ्यायचा विषय आहे. मात्र शिष्यांमुळे गुरूचे जीवन 'सुजलाम-सुफलाम' होत असते. यासाठी शोध घ्यावा लागत नाही. त्यासाठी गुरुने दिलेल्या ज्ञानचक्षूंची काहीच आवश्यता नाही. हे आपल्यासारख्या नॉर्मल माणसाला साध्या डोळयांनी किंवा चर्मचक्षुंनी दिसू शकते. शिष्यांना ते दिसतं नाही. कारण त्यांच्या गुरुने त्यांना ज्ञानचक्षु दिलेले असतात. "मी ज्ञान घेण्याचा काम करतो आणि कोणाला ज्ञान देण्याचा अपराध करत नाही." हे लाओत्सेचे वचन देखील अत्यंत महत्वाचे आहे. लाओत्से अत्यंत प्रामाणिक व प्राजंळपणे येथे कबूल करतो की माझाच ज्ञानाचा शोध पूर्ण झालेला नाही. मी स्वतःचा शोध आजही घेत आहे. कारण ही निरंतर प्रक्रिया आहे. तसेच मी स्वतःचा शोध घेऊन मिळवलेले ज्ञान तुझ्या उपयोगाचे नाही. तुला देखील स्वतःचा शोध घेऊन. तुझे ज्ञान प्राप्त करावे लागेल. माझी साधना अथवा प्रवास दुस-याच्या उपयोगाचा नाही. ज्ञानाच्या शोधासाठी प्रत्येकाला स्वतःच प्रयत्न व प्रवास करावा लागतो. हा प्रवास बाहय विश्वाकडून अंतर्विश्वाचा असतो . यामुळे लाओत्सेसारख्या बावळट माणसाला कोणी गुरु मानणे किंवा त्याचे शिष्यत्व स्वीकारणे अशक्यच आहे. बुद्ध,महावीर,लाओत्से,कबीर,नामदेव-तुकाराम,गाडगे बाबा हे सर्व लोक चमत्कारलेस होते. महान 'गुरु-शिष्य' परंपरेवर कलंक होते. काळाच्या ओघात विविध कारणांनी म्हणा किंवा द्वेषाने म्हणा हया लोकांना कायमचे जगाच्या इतिहासातून खोडून टाकण्याचे प्रयत्न झाले. तरी हे लोक नष्टच होत नाही. ते अज्ञानाचा अंधकारात भरकटणा-या माणसासाठी नेहमीच जागोजागी दीप घेऊन उभे असलेले दिसतात. ते उभे असतात,हे म्हणणे देखील तसे योग्य नाही. कारण ते उभेच आहेत. अंधाराची सवय झालेल्या वटवाघळांचा प्रकाशावरचा विश्वास उडालेला असतो किंवा प्रकाश म्हणजे काय? याचे ज्ञानच त्यांना नसते. त्यामुळे लोकांना ते दिसत नाहीत. मात्र प्रत्येक ठरावीक काळानंतर काही वटवाघळांना हया दीपस्तंभांची जाणीव होते. त्यामुळेच आजच्या जगात या महापुरुषांचाच शोध मोठया प्रमाणात घेतला जात आहे. अनेक जण ते गेलेल्या मार्गावरच्या त्यांच्या चिरंतन पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व महापुरुष जेंव्हा हया पार्थिव जगात वावरत होते,तेंव्हा त्यांच्या अपार्थित्वाची जाणीव लोकांना झाली नाही. कारण त्यांना आपण चमत्कारी आहोत किंवा आपल्याला जीवनाच्या अंतिम ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. अशी कोणतीच 'मार्केटिंग पॉलिसी' वापरता आली नाही. आजच नव्हे तर पूर्वीपासूनच मार्केटिंग पॉलिसीच माणसाला विद्वान,ज्ञानी,योगी,आदर्श,महान इत्यादी ठरवत असते. म्हणजे स्वतःचे योग्य मार्केटिंग ज्याला जमले तो उपरोक्त सर्व बिरूदांचा मानकरी होतो. आज तर ही धडपड अत्यंत वाढली आहे. त्यामुळे माणूस दुःखी,निराश,वैफल्यग्रस्त इत्यादी झालेला आहे. सर्व श्रेष्ठ बिरूदं मिळवण्याचा प्रयत्न करणारा असोत की हे सर्व मिळवलेले असोत दोघेही दुःखी,निराश,वैफल्यग्रस्त,हताश असलेले दिसतात. त्यामुळे मार्केटिंग पॉलिसीची अक्कल नसलेले बुद्ध,महावीर,लाओत्से,कबीर,नामदेव-तुकाराम,गाडगे बाबा यांना आठवू लागतात. हया सर्व ख-या लोकशिक्षकांपैकी एक लाओत्सेचे काही वचनांची आठवण येथे झाल्याशिवाय राहत नाही. लाओत्से नेहमी म्हणायचा की,"मला कोणी हरवू शकत नाही." त्याला याचे कारण विचारले की त्याचे उत्तरं असायचे,"मी कधी जिंकण्याची अपेक्षाच बाळगलेली नाही." हरवणे तर सोडा लाओत्से म्हणायचा की,"माझा कोणी साधा अपमान देखील करू शकत नाही." यासाठी रोजच्या जीवनात लाओत्सेच्या एका वर्तनाचे अवलोकन करावे लागते. लाओत्से कोणत्याही सभा-समारंभात गेला की कायम अगदी शेवट बसत असे. जिथे लोक आपली पादत्राणे काढून ठेवत,ती लाओत्सेची बसण्याची ठरलेली जागा असे. त्याच्या म्हणण्यानुसार ही अशी जागा असते की तेथून कोणीच तुम्हांला मागे हटवू शकत नाही. त्यामुळे अपमान होण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. असे असतांना लाओत्सेच्या म्हणण्यानुसार तो कायम पहिल्या क्रमांकावर राहिलो. याचे स्पष्टिकरण देतांना माणसाच्या मनातील पहिल्या क्रमांकाच्या हव्यासाला सणसणीत चपराक देतो. याचे विवेचन करतांना लाओत्से म्हणतो की,"मी सदैव एकाच क्रमांकावर राहिलो. अन्य क्रमांकावर मला कोणी ठेवूच शकत नाही. कारण मी सदैवच अखेरच्या क्रमांकावर उभा राहिलो." अशा लाओत्सेचे विचार जगाला उलटे वाटतील; परंतु त्याचे विचार सरळ साध्या जीवनाचे सूत्रं होती. कारण तो जगाकडे पायावर उभे राहून पाहत होता. आपण मात्र डोक्यावर उभे राहून जगाकडे पाहतो हेच आपल्या सर्व दुःखांचे कारण आहे. माणसाला स्वतःच्या पायावर उभे करून जगाकडे व स्वतःकडे पाहण्यास शिकवणारा लाओत्सेसारखा 'लोकशिक्षक' विराळाच म्हणावा लागेल.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
लाओत्सेच्या जगावेगळ्या पण जागतिक पातळीवर गेलेल्या विचारांचा अद्भुत मागोवा... त्यामुळेच त्यांच्या विचारांचे चिरंतनतेचे महत्व पटते
ReplyDeleteस्वतःचा शोध घेऊन ज्ञान प्राप्ती करावी व यासाठी गुरूने दिलेल्या ज्ञानचक्षूची
ReplyDeleteकाहिही अवशकता नाही हे सांगणारा लेख अत्यंत छान आहे.
खूप सुंदर विवेचन....
ReplyDeleteछान.उपयुक्त.
ReplyDeleteखुप खुप
ReplyDelete👌👌👌👌
👍 छान उपयुक्त माहिती मिळाली.
ReplyDelete