अखेरचा हिंदू सम्राट...
अखेरचा हिंदू सम्राट...
प्राचीन काळापासून भारतीय जनमानस हे पारमार्थिक मानसिकता जोपासत आले आहे. यामुळे लौकिक जीवनाची नोंद ठेवण्याची आश्यकता आपल्याला कधी जाणवलीच नाही. याचा परिणाम आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे जतन केले नाही. यामुळे आपला गौरव वृद्धिंगत करणा-या आपल्या महानायकांचा इतिहास आपण विसरलो. भारताचा असाच एक उपेक्षित महानायक म्हणजे 'भारतेश्वर पृथ्वीराज चौहान'. त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारे तत्कालीन केवळ दोन ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 'पृथ्वीराज रासो' आणि 'पृथ्वीराज विजय' हे दोन काव्य ग्रंथ हेच पृथ्वीराज चौहानाच्या इतिहासाचे प्रमुख स्त्रोत म्हणता येतात. हे काव्यग्रंथ असल्याने कवी कल्पनांमधून सत्य शोधण्याचे काम इतिहासकारांना करावे लागले. यामुळेच भारतीय व परकीय इतिहासकारांना पृथ्वीराजास योग्य न्याय देता आलेला नाही. इतिहासाच्या पटलावर ते एक उपेक्षित चरित्र ठरले. आपल्याला देखील संयोगितेचे हरण करणारा पृथ्वीराजच केवळ माहित असतो. वास्तविक पाहता सम्राट पृथ्वीराज एक महामानव, महान योद्धा, कुशल सेनानायक आणि बहुभाषक व सकल कला मर्मज्ञ व्यक्तिमत्व होते.
भारताच्या राजपूत वंशांमध्ये एक अग्निवंश मानला जातो. त्यात प्रतिहार, सोलंकी, परमार आणि चौहान हे चार कुळं प्रधान आहेत. चौहान कुळाच्या चोवीस प्रमुख शाखा मानल्या गेल्या आहेत. तसेच अनेक उपशाखा देखील सांगितल्या जातात. यामुळेच भारतीय क्षत्रिय वंशात चौहान कुळाचा विस्तार हा सर्वात मोठा समजला जातो. या कुळाचा आद्य पुरुष 'चाहमान' हा होता. ज्याने ईसवीसनाच्या पाचव्या शतकात हूणांशी संघर्ष करत त्यांच्या अत्याचारापासून आणि त्यांच्याकडून होणा-या विद्धवंसातून देशाला वाचवले. यामुळेच या चाहमानावरुन चहुवान किंवा चौहान कुळ ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रात त्याचेच 'चव्हाण' झाले. चौहाण कुळातील चौथा शासक राजा जयराज याने अजयमेरु हे शहर वसवले. यानंतर या वंशातील बलाढय व पराक्रमी राजा अजयदेव याने या शहराला समृद्ध करत, आपल्या राज्याच्या राजधानीचा मान दिला. यालाच आज आपण अजमेर म्हणून ओळखतो. चौहान वंशातील पराक्रमी, महान सेनानायक व विजेता,विद्वान,उत्तम कवी असलेल्या विग्रहराज याने आपल्या राज्याचा विस्तार दक्षिणेत नर्मदेपासून उत्तरेत हिमालयापर्यंत करत एका विशाल साम्राज्याची स्थापना केली. या विग्रहराजचा प्रभाव पृथ्वीराजावर होता. त्याला व त्याच्या कार्याला आदर्श मानतच पृथ्वीराजाने आपला राज्यकारभार केला.
चौहान वंशातील राजा बीसलदेव याच्यानंतर त्याचा मुलगा अमर गांगेय देव हा गादीवर आला, परंतु त्याचा चुलता जगदेव याच्या मुलाने त्याचा पराभव केला आणि स्वतः राजा बनला. त्याच्या मृत्यूनंतर बीसलदेव याचा लहान भाऊ सोमेश्वर याला गादीवर बसविण्यात आले. सोमेश्वर आणि त्याची राणी कर्पूरीदेवी यांच्या पोटी ई.स.११६६ मध्ये ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला पृथ्वीराजाचा जन्म झाला. दुस-या वर्षी त्याचा लहान बंधू हरीराजचा जन्म झाला. इतिहासात अजरामर झालेला हा पृथ्वीराज या वंशातील तिसरा पृथ्वीराज आहे. त्याचा उल्लेख वंशवृक्षात पृथ्वीराज तृतीय असा केला जातो. त्याचा पिता सोमेश्वर हा आपला मोठा भाऊ बीसलदेवाप्रमाणे शुरवीर योद्ध व पराक्रमी होता. पृथ्वीराजाच्या जन्माच्यावेळी ज्योतिष्यांनी सोमेश्वराला सांगितले की,
यह लहै द्रव्य पर हरै भूमि । सुख लहै अंग जब होई झूमि।।
म्हणजेच हे बालक मोठया मोठया राजांना आपल्या पराक्रमाने पराभूत करेल,सिंहासनाची शोभा वाढवेल आणि कलियुगात या पृथ्वीवर सूर्याप्रमाणे याची किर्ती तळपेल,असे वर्णन पृथ्वीराज रासोमध्ये कवी चंदबदराई याने केलं आहे.
यथावकाश बालक पृथ्वीराजाचे विद्यार्जन त्यांच्या कुल पुरोहित आचार्य गुरुराम याच्याकडे प्रारंभ झाले. पृथ्वीराजाने चौसष्ट कला आणि चौदा विद्या यांच्यात प्राविण्यप्राप्त केलं. यात चित्रकला, संगीत,काव्य,वाणिज्य आणि विविध भाषा यांचे ज्ञान त्याने सुयोग्य गुरुंकडून प्राप्त केले. अशा पृथ्वीराजाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतांना कवी चंदबदराई म्हणतो
कमल बदन रवि तेजकर लष्षन संति बतीस । कल नितप्रति सीखत कला आयुध धरन छतीस ।।
म्हणजेच बत्तीस लक्षणांनीयुक्त सूर्याप्रमाणे तेजस्वी,कमलाप्रमाणे मुख आणि छत्तीस अस्त्र धारण करणारा पृथ्वीराज एक आदर्श पुरुष म्हणून घडत गेला. निडर,निर्भीक,चतुर राजनितिज्ञ,कुशल प्रशासक,योद्धा आणि सर्व विद्यासंपन्न असा पृथ्वीराज आपल्या पित्याच्या अकाली निधनाने ई.स.११७७ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी सम्राट म्हणून अजमेरच्या गादीवर स्थानापन्न झाला. त्याच्या बालवयामुळे काही काळ प्रशासनाची धुरा त्याची आई राणी कर्पूरीदेवी यांनी सांभाळली.
ई.स.११८० मध्ये पृथ्वीराजाने साम्राज्याचा कारभार संपूर्णपणे व स्वतंत्रपणे सांभाळला. प्रारंभीच त्याला अनेक युद्धांना आणि बंडांना सामोरं जावं लागलं. यात आपला चुलता नागार्जुन याचे बंड त्याने गुडपुर (आजचे गुडगांव) येथे मोडून काढलं. हत्ती, अश्व आणि बैलगाडी यांनी युक्त युवा सम्राट पृथ्वीराजच्या विजय वाहिनी सेनेने भदानक या मोठया राज्यावर विजयप्राप्त करत,राजस्थान व हरियाणा यांना लागून असलेला हा मोठा प्रदेश आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला. यानंतर पृथ्वीराजाने मंडोरचे प्रतिहार, जम्मूचा विजयराज, गुजरातचा सोलंकी शासक भीम द्वितीय,जैजामुक्तीचा चंदल राजा इत्यादींवर विजय प्राप्त करत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
'संयोगिता हरण' हा पृथ्वीराजाच्या जीवनातील प्रसंग भारतातील अनेक प्रेमकाव्यांचा व कथांचा विषय झाला आहे. संयोगिता ही कन्नोजच्या गढवाल राजा जयचंद याची कन्या. चौहान विग्रहराज चतुर्थ याने विजयचंद्र गढवाल याचा पराभव केला होता, तेंव्हापासून चौहान-गढवाल वंशांचं वैर चालत आलं होतं. पृथ्वीराज व संयोगिता यांनी ऐकमेकांचे चित्र पाहिले आणि त्यांच्या प्रेमकथेला प्रारंभ झाला. जयचंदांने संयोगितेचा स्वयंवर आयोजित केला असता,आपल्या वैरामुळे त्याने पृथ्वीराजाला आमंत्रित केले नाही. उलटपक्षी त्याचा पुतळा स्वयंवर सभामंडपाच्या द्वारावर द्वारपाल म्हणून उभा केला. पराक्रमी पृथ्वीराजाने भर स्वयंवरातून संयोगितेचं हरण केलं आणि तिला अजमेरला आणून तिच्याशी विवाह केला. संयोगितेनं आयुष्यभर पृथ्वीराजला सक्षम साथ तर दिलीच, परंतु त्याच्या तराईनच्या द्वितीय युद्धातील पराभवानंतर तिने जौहर करुन प्रार्णापण केले. यामुळेच पृथ्वीराज संयोगिता यांची कथा तिच्यातील वीर-शृंगार-करुण रसांमुळे आजही आकर्षक ठरते. अजून संजय लीला भन्सालीचे तिच्याकडे लक्ष गेलेले नाही,हा भाग वेगळा.
शाहबुद्दीन गौरी अफगानिस्तानच्या गझनीवरुन एक विशाल सेना घेऊन ई.स.११९१ मध्ये भारतात आला. गाव, नगरं, मंदिरं आणि स्त्रिया यांना भ्रष्ट करत गौरी वाटचाल करत होता. त्याला पराभूत करण्याचे सामर्थ्य त्यावेळी केवळ पृथ्वीराजात होते. त्याच्या कृत्यांनी क्रोधित झालेल्या पृथ्वीराजाने त्याला तराईन येथिल मैदानात धूळ चारली. पराभूत व घायाळ गौरी, पृथ्वीराजाच्या हाती सापडला, त्याच्यावर उपचार करुन, आपल्या मातेच्या आदेशावरुन सहिष्णू पृथ्वीराजाने त्याला मुक्त केले. याचा परिणाम भविष्यात पृथ्वीराजालाच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षाला भोगावा लागला. दुस-या वर्षी याच गौरीने पुन्हा भारतावर आक्रमण केले आणि तराईनच्या मैदानातच पृथ्वीराजाचा पराभव केला. पराभूत पृथ्वीराजला त्याने बंदी करुन गजनीला नेलं. या कामात गौरीला पृथ्वीराजाचा सासरा जयचंद आणि काही हिंदू राजांनी सहकार्य केले. ्थ्जा्थ्जा्थ्जा्थ्जा्् पृथ्वीराजाच्या
पराभवासोबतच भारतावर सातशे वर्षे परकियांच्या गुलामीत जगण्याची वेळ आली. गौरीने गद्दार जयचंदला देखील मारुन टाकले. कारण तो स्वकियांचा होऊ शकला नाही,तर आपला कसा होईल हे चाणाक्ष गौरीने हेरले होते.
पृथ्वीराजाला अखेरच्या श्वासापर्यंत सोबत केली, ती त्याचा बाल मित्र, राजकवी व पृथ्वीराज रासोकार महाकवी चंदबरदाई याने. गजनीला नेऊन पृथ्वीराजाला अंध करण्यात आले. त्याला शब्दभेदी धनुर्विद्या येते याची माहिती, मुहम्मद गौरीला झाली. त्याने अंध पृथ्वीराजाकडून हा तमाशा बघण्याचे ठरवले. कवी चंदबदराई याने योजना आखली. पृथ्वीराजाचे स्थान गौरीच्या समोर व समकक्ष असण्याची मागणी केली. आपल्या काव्यपंक्तीतून पृथ्वीराजाला ईशारा दिला.
चार बॉंस चौबीस गज अंगुल अष्ट प्रमाण । तो ऊपर सुल्तान है, मत चुके चौहान ।।
हे एकताच पृथ्वीराजाने बाण सोडला आणि गौरीच्या छातीत तो आरपार गेला. त्याच्या तेथेच मृत्यू झाला. दुस-याच क्षणी चंदबदराईने आपल्या तलवारीने पृथ्वीराजाचा आणि आपला अंत केला. या घटनेच्या ऐतिहासिक सत्यतेबद्दल नेमके विधान करता येत नाही. पृथ्वीराजावरील काव्य ग्रंथ आणि लोकगीत हाच त्याचा प्रमुख आधार आहे. गजनी येथे आजही गौरीच्या कबरीशेजारी या दोघांच्या समाध्या अस्तित्वात आहे. ज्या पृथ्वीराजाच्या पराक्रमाची आणि चंदबदराईच्या स्वामीनिष्ठेची साक्ष देतात.
हिंदू राजांचा असंघटितपणा,आपसातील वैर, फंदफितुरी,स्वकियांना नष्ट करण्याच्या भावनेतून परकियांना सहकार्य करण्याची विकृती या कारणांनी अखेरचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान पराभूत झाला. तसेच त्याच्यात असलेला मानवेतचा, सहिष्णूतेचा,संवेदनशिलतेचा अतिरेक ही देखील त्याच्या परभवाची कारणं बनली. पृथ्वीराजाचा पराभव भारताचा पराभव ठरला आणि भविष्यात देशाच्या असंख्य पिढयांना गुलामीच्या नरक यातना भोगाव्या लागल्या. पृथ्वीराज चौहानाचा पराक्रम व त्याचे ऐतिहासिक महत्व देशाच्या विस्मरणात गेले असले, तरी आजही राजस्थानच्या लोकगीतांमध्ये आणि लोकसंस्कृतीमध्ये 'राव पिठोरा' या नावाने भारतेश्वर पृथ्वीराज चौहान अजरामर आहे.
प्रा.डॉ. राहुल हांडे भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६
राहुल खुप छान लेख लिहीलास अभिनंदन !आजपर्यंत फक्त नाव ऐकल होत .आज पृथ्वीराज विषयीचा लेख वाचुन आनंद झाला आणि आपला लोकधार्जीनेपणा खूप जुना असल्याची माहिती मिळाली.
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख...आपण जे कथेच्या रुपात सांगता ते अतिशय सुंदर आणि प्रवाही ..
ReplyDeleteअप्रतिम लेख! पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी बरीच माहित नसलेली माहिती मिळाली.
ReplyDelete