विजयापूर्वीचा हलकल्लोळ
बेंजामिन फ्रँकलीन यांच्या मुत्सद्दीपणाने अमेरिकेच्या क्रांतीयुद्धाकडे पाहण्याचा युरोपिअन देशांचा दृष्टिकोन बदलला होता. जगावर प्रभूत्व गाजवणा-या इंग्लंडची खोड मोडण्यासाठी युरोपातील प्रमुख देशांनी मोर्चेबांधणी सुरु केली. यामध्ये सर्वात मोठी भूमिका होती फ्रांसची. ब्रिटन आणि फ्रांस यांच्यातील हाडवैर खूप जुने होते. सारटोगाच्या लढाईत जनरल जॉन बरगोईनच्या पराभवाने युरोपातील देशांना अमेरिकन क्रांतीसेनेच्या विजयाची खात्री वाटू लागली. त्याच सुमारास अमेरिकन क्रांतीसेनेच्या जोरदार हल्ल्यामुळे लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिसच्या ब्रिटिश सैन्याला प्रिस्टनमधून जीव मुठीत धरून पळावे लागले. पुढे हाच लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती होणार होता आणि त्याच्या नेतृत्वातच अमेरिकन क्रांतीसेनेच्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब होणार होते. हया घटनांचे पडसाद युरोपात सकारात्मक उमटले. यानंतरच्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात फ्रांस अमेरिकेचा सर्वात विश्वासू व सक्रिय मित्र म्हणून युद्धाच्या पटलावर अवतरला. बेंजामिन फ्रँकलीन यांची शिष्टाई आणि साराटोगा-प्रिस्टनचा विजय यांचा परिणाम म्हणून फ्रांसने तात्काळ सेना,जहाजे,तोफा,बंदुका,दारुगोळा आणि पैसा यांची मदत अमेरिकेकडे रवाना केली. स्पेन व नेदरलॅड यांनी आर्थिक रसद पुरवली. ब्रिटिशांना भाडोत्री सैन्य पुरवण्यास रशियाने नकार दिला. मदतीचा ओघ सुरू झाला असला, तरी सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टनच्या क्रांतीसेनेला हिवाळाभर स्वतःच्या हिंमतीवर व्हॅलिफोर्जची खिंड लढावी लागणार होती. कारण त्याकाळाच्या दळण-वळणाचा विचार करता,ही सर्व मदत पोहचण्यासाठी काही काळ लोटावा लागणार होता. युद्धातील कोणताही विजय सरसेनापतीच्या नावाने इतिहासात कोरला जात असतो. असे असले तरी साध्या जवानापासून ते विविध स्तरावरील अधिका-यांपर्यंत अनेक जणांचे शौर्य,प्रामाणिक परिश्रम,ध्येयवेडेपणा व कल्पकता या विजयात समाविष्ट असते. एका अर्थाने या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणजे अंतिम विजय. अमेरिकन क्रांतीसेना व्हॅलिफोर्जच्या छावणीत देवीची साथ आणि जीवघेणी थंडी यांच्याशी लढत असतांनाच व्हॅन स्टेडबेन नावाच्या एका अनुभवी लष्करी अधिका-याने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली. अमेरिकन क्रांतीसेनेचे त्याने एका शिस्तबद्ध सैन्यात केले. नियमित कवायत,शस्त्रास्त्रांची देखभाल यांसारख्या कोणत्याही सैन्यासाठी आवश्यक मूलभूत अथवा प्राथमिक गोष्टींचे प्रशिक्षण व्हॅन स्टेडबेन यांनी दिल्यामुळे अमेरिकन क्रांतीसेना एक आधुनिक लष्कराचा दर्जा प्राप्त करू शकली. युद्धाचे पारडे सतत खालीवर होत होते. कधी क्रांतीसेनेची सरशी तर कधी ब्रिटिशांची मुंसडी. अमेरिकेच्या बाजूचे पारडे कायमचे जड होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. असे असले तरी कोणत्याही युद्धाचे अखेरचे पर्व वेगवान घडामोडींचे ठरत असते. सर्व आघाड्यांवर नुसता हलकल्लोळ माजलेला असतो. स्वातंत्र्ययुद्धात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यात निष्ठेचा भेद होता. दक्षिणेतील राज्य ब्रिटिश सत्तेशी निष्ठावंत होती. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला उत्तर अमेरिका धुमसत होता. दक्षिणेतील राज्यांना मात्र गुलामीचे साखळदंड गोंजारण्यात सुख वाटत होते. भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे तटस्थ परीक्षण केल्यास आपल्याला अशीच मानसिकता दिसून येते. भारताला स्वातंत्र्यच मिळू नये याच्यासाठी ब्रिटिश सरकारशी हातमिळवणी केलेल्या आणि स्वातंत्र्यलढयातील नेत्यांना पकडून देण्याची सुपारी घेतलेल्या संघटना व राजघराणे आपल्याला पहायला मिळतील. ब्रिटिशांना प्रत्येक देशातील फितुरांना हाताळण्याचे तंत्र चांगल्या प्रकारे अवगत होते. त्यामुळेच त्यांनी जगावर राज्य केले. आपल्या हुकमी चालीनुसार जॉन बरगोईन याच्यानंतर ब्रिटिश सेनेचा सरसेनापती झालेला जनरल क्लिंटन याने आपल्या फौजांना दक्षिण अमेरिकेतील राज्यांकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संसदेत हीच योजना लॉर्ड जॉर्ज गेरमिन यांनी मांडली होती. ब्रिटिश फौजा दक्षिण अमेरिकेत सरकल्याने दक्षिणेतील फितुरांचे ब्रिटिश फौजांमुळे आणि फौजांचे फितुरांमुळे मनोबल वाढण्यास सहकार्य होणार होते. अमेरिकन क्रांतीसेनेला तेथून पाठिंबा आणि सहाकार्य मिळणार नाही. दक्षिण अमेरिकेत क्रांतीसेनेचा पराभव झाल्यास आपले पारडे कायमचे जड होईल,असा होरा जनरल क्लिंटनचा होता. ब्रिटिशांना जन्मजात गुलामांची व फितुरांची नस चांगली माहित असल्यामुळे क्लिंटनचा अंदाज संपूर्ण चूकणे शक्यच नव्हते. आजही डोनाल्ड ट्रम्पसारख्या विद्वानाला भक्कम पाठिंबा देऊन अमेरिकेचे जगातील एकमेव महासत्ता म्हणून र्निविवाद स्थान धोक्यात आणणा-या जॉर्जिया राज्याने तेंव्हा देखील ब्रिटिश सैन्याला क्रांतीसेनेच्या विरोधात मोठा विजय मिळवून दिला होता. प्रत्येक देशात असे चिरंतन मूर्ख राज्ये असतातच. त्यानुसार जॉर्जियातील चार्ल्सटन आणि सवानाह ही बंदरे ब्रिटिश सैन्याने पुन्हा जिंकून घेतली. तसेच सुमारे ५००० क्रांतीकारकांना कैद केले. हया विजयाने ब्रिटिश सेनेमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला; परंतु तो फाजिल होता. या गोष्टीवर येणा-या काळाने शिक्कामोर्तब केले. विजयाच्या उन्मादात ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मध्य भागात जोरदार मुसंडी मारण्याचे ठरवले. येथे त्यांचा औरंगजेब झाला. त्यांना शिवरायांच्या गनिमीकाव्याच्या अमेरिकन रुपाने तोंडघशी पाडले. तसेच शिवरायांप्रमाणे गनिमी काव्यात हेरगिरीचे महत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ओळखले होते. मेजर बेंजामिन टॉलमँडंग याच्या नेतृत्वात वॉशिंग्टन यांच्या सैन्यासाठी गुप्तहेर खात्याने अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या गुप्तहेर खात्याने न्यूयॉर्क आणि आसपासच्या भागात हेरांचे चांगलेच जाळे विणले होते. पराभवाच्या प्रसंगी क्रांतीसेनेच्या एका जनरलने 'बचेगें तो और लढेगें', अशी घोषणा देऊन आपल्या सैन्यात नवचैतन्य पेरले. तो होता जनरल नाथानेल ग्रीन. पराभवाने हताश आपल्या तुकडीला तो म्हणालो की,' आपण लढूया,हरलो तरी पुन्हा उठूया आणि पुन्हा लढूया'. त्याच्या शब्दांनी त्याची तुकडी पेटून उठली. मग मात्र उत्तर व दक्षिण कॅरोलिनामध्ये त्यांनी ब्रिटिशांना पळता भूई थोडी करून ठेवली. दुस-या बाजूला त्याचा जुना सहकारी मित्र डॅनियल मॉर्गन याने कॉडपेन्सच्या लढाईत लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस याच्या फौजेला धूळ चारली. कॉर्नवालिसच्या सेनेतील दोन हजार सैनिक या लढाईत मारले गेले. मात्र कॉर्नवालिसच्या अंगात महासत्ता ब्रिटिनची मस्ती मुरलेली होती. तसेच ब्रिटनला देखील अमेरिका कायमची गमवायची होती. त्यामुळे त्यांनी पुढे याच कॉर्नवालिसची सरसेनापती म्हणून निवड केली. संपूर्ण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांचा फाजिल आत्मविश्वास आणि अमेरिका म्हणजे आपलेच अपत्य,त्याला सहजपणे वठणीवर आणू शकतो. हा प्रत्येक बापाला असलेला अहंकार चांगलाच नडला. तसेच जनरल होवे किंवा जनरल क्लिंटन यांच्यासारखे पराभवाच्या छायेत समझोता घडवून अमेरिका हातची जाऊ देण्यापासून वाचवणारे सरसेनापती ब्रिटिश सत्तेला नेभळट वाटले. म्हणून जॉन बरगोईन किंवा लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस यांच्यासारखे मस्तवाल आणि मुर्ख सरसेनापती त्यांनी निवडले. कॉडपेन्सच्या पराभवानंतर उचित रणनिती अवलंबण्याऐवजी मस्तवाल लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस याने उरलेल्या सैन्यासह जनरल नाथानेल ग्रीनच्या सैन्यावर जोरदार हल्ला करण्याचा निर्णय घेतला. गनिमी पद्धतीने लढणा-या ग्रीनला त्याच्या योजनेमुळे आयती शिकार मिळाली. उत्तर अमेरिकेच्या गवतालाही आता भाले फुटले होते. कॉर्नवालिस याचा प्रत्यय लवकरच आला. प्रत्येक आघाडीवर लढणा-या अमेरिकन क्रांतीसेनेच्या तुकडयांच्या सेनापतींनी अद्भूत समन्वय,सुनियोजन आणि साहस यांचे प्रदर्शन घडवले. 'गिलफोर्ड कोर्ट हाऊस' म्हणून अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात प्रख्यात झालेल्या उत्तर कॅरोलिनामधील लढाईत कॉर्नवालिसला आपले सुमारे ४० टक्के सैन्य खर्ची पाडावे लागले. लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिसलर यावेळी अतिरिक्त कुमक मिळणे अत्यंत आवश्यक होते; परंतु त्याचा विचार न करता त्याने व्हर्जिनियावर चढाई करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. व्हर्जिनिया म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा बालेकिल्ला. आपल्या सैन्याची दैना झाली असतांना कॉर्नवालिस व्हर्जिनियावर चाल करून गेला. याची चांगलीच किंमत त्याला चूकवावी लागली. त्याचे उरलेसुरले सैन्य येथे जाया झाले. जॉन बरगोईन प्रमाणे स्वतःचा जीव वाचवत पळत सुटावे लागले. त्याने अखेर चार्ल्सटन व सवानाहला जाऊन सुटकेचा श्वास घेतला. फ्रेंच आरमाराच्या मदतीने अमेरिकन क्रांतीसेना ब्रिटिशांना समुद्रावर पाणी पाजत होती. ब्रिटिशांचे भूदल आणि नौदल दोन्ही अत्यंत दयनीय अवस्थेला पोहचले होते. अमेरिकन क्रांतीसेना आणि त्यांच्या मदतीला आलेल्या युरोपिअन राष्ट्रांना आता एका निर्णायक लढाईची प्रतिक्षा होती. सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन देखील अखेरचा घणाघात करण्यासाठी घात लावून बसले होते. अमेरिकेचा अंतिम विजयाचे पर्व नजीक येऊन ठेपले होते. क्रांतीसेनेसमोर महासत्तेचा अहंकार लवकरच गुडघे टेकवणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment