पहिला शहिद शीख
"मी हिंदूंचे उपवास करत नाही,की मुसलमानांचा रमजान पाळत नाही.माझे निधान असलेल्या त्या एकटयाच्याच सेवेत मी रमतो. मी एकाच मालिकची सेवा करतो,जो अल्लाहसुद्धा आहे.मी हिंदू आणि मुसलमान,दोघांशीही संबंध तोडून टाकला आहे.मी हिंदूबरोबर बसून भक्ती करणार नाही,की मुसलमानांप्रमाणे मक्केला जाणार नाही. मी फक्त त्याचीच सेवा करणार.अन्य कुणाचीही नाही मी कुठल्याही मूर्तीची पूजा करणार नाही,की मुसमानांसारखी प्रार्थना म्हणणार नाही. मी त्या एकमेव सर्वशक्तिमान परमेश्वराच्या पायाशी माझे हदय वाहीन,कारण आम्ही ना हिंदू आहोत.ना मुसलमान.'
अशा शब्दात शिखांचे पाचवे गुरू अर्जनदेव यांनी शीख परंपरेला एका वेगळा धर्म म्हणून अधोरेखित केले आहे. शीख म्हणजे आमच्या धर्माचाच संप्रदाय असा दावा हिंदू-मुसलमान यांच्याकडून करण्यात आला आहे आणि करण्यात येतो. परंतु गुरू अर्जनदेवांच्या या कवनात शीख धर्माचे धर्म म्हणून वेगळेपण स्पष्टपणे अधोरेखित केलेले आहे. चौथे गुरू रामदास यांचे सर्वात कनिष्ठ पुत्र 'अर्जनदेव' म्हणजे शीख धर्माच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे व निर्णायक वळण आहे. गुरू रामदास यांनी आपले सर्वात कनिष्ठ पुत्र अर्जनदेव यांना आपल्या पश्च्यात गुरूगादीवर बसवले. यामुळे नकळतपणे गुरूगादी वंशपरंपरागत झाली असे दिसून येते. नानकदेवांनी निर्माण केलेली अंगददेव आणि रामदास यांनी कटाक्षाने पाळलेला नियम येथे बदललेला दिसतो ; परंतु अनेकवेळा भूतकाळातील घटनांचे नेमके धागेदोरे वर्तमानात आपण शोधू शकत नाही. तसे ते शक्य देखील नसते. कारण आपण आज त्या घटनांसंदर्भातील लिखित पुराव्यांवरच अवलंबून असतो. आपण पाहतो आज आपल्या वर्तमानकाळातील घटनांमागे मोठी गुंतागुंत आहे. उद्या हा वर्तमान इतिहास होणार आहे. अशावेळी ही सर्वच गुंतागुंत शब्दात पकडता येईल असे नाही. तसेच लिहिणारा प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून लिहिणार त्यामुळे इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये आणि समाजामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. त्यामुळे गुरू रामदास यांना तोपर्यंतचा नियम मोडून आपल्या पुत्राला गुरूगादीवर का बसवावे लागले ? यासंदर्भात नेमके विवेचन करणे आजच्या काळात शक्य नाही. एक मात्र खरे की रादासजींनी केलेली निवड अत्यंत सार्थ होती. परंतु येथूनच शीख धर्माला भाऊबंदकीने ग्रासण्यास प्रारंभ झाला. गुरू अमरदास यांचे जामात रामदासीजी आणि कन्या भानी यांना पृथ्वीचंद्र,महादेव आणि अर्जनदेव असे तीन पुत्र झाले. १५ एप्रिल १५६३ रोजी जन्मलेले अर्जनदेव रामदासजींचे सर्वात कनिष्ठ पुत्र असले,तरी आपल्यानंतर गुरूगादीवर बसण्यास तेच योग्य आहेत,अशी जाणीव रामदासजींना झालेली होती. यांसंदर्भात त्यांनी अर्जनदेवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. रामदासाजींच्या दुरच्या नात्यातील भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लोहोर येथ जाण्यास सांगितले,मात्र आपला आदेश मिळेपर्यंत गोयंदवालला परतू नये असे बजावले. अत्यंत विनम्रतेने अर्जनदेवांनी पित्याच्या आज्ञाचे स्वीकार केला आणि ते लाहोरला गेले. विवाह सोहळा होऊन अनेक दिवस झाले तरी पित्याचा परतण्याचा संदेश प्राप्त झाला नाही. तो काळ अर्जनदासांनी व्यर्थ घालवला नाही. त्यांनी लाहोरमध्ये शिखांचे संघटन प्रारंभ केले. दरम्यान त्यांनी रामदासजींना तीन पत्रे लिहिली,परंतु त्यांच्याशी कायम स्पर्धा करणारा मोठा भाऊ पृथ्वीचंद्र याने रामदासजींपर्यंत ते पत्र पोहचू दिली नाहीत. अखेर अर्जनदेवांनी चौथे पत्र आपल्या अत्यंत विश्वासू शिष्याकडे दिले आणि पत्र थेट रामदासजींच्या हातातच देण्यास सांगितले. रामदासजींना पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना घडलेला सर्व प्रकार समजला आणि तसेच अर्जनदेवांनी लोहोरमध्ये केलेले कार्य देखील समजले. त्यांनी भाई बुढ्ढासिंग यांना अर्जनदेवांना गोयंदवालला घेऊन येण्यास सांगितले. पृथ्वीचंद्राच्या मनात गुरूगादी आपल्याला मिळावी अशी तीव्र ईच्छा होती. पित्याच्या मनात अर्जनदेवांना बसवण्याची ईच्छा असलेली पाहून तो ईर्ष्या आणि द्वेषाने पेटला होता. दरम्यान अर्जनदेवांचा विवाह जालंधर जिल्हयातील 'मऊ' गावच्या किसनचंद यांची कन्या गंगा हिच्यासोबत करण्यात आला. १४ जून १५९५ रोजी अर्जनदेवांची पत्नी गंगा हिला पुत्ररत्न प्राप्त झाले. ज्याचे नाव 'हरगोविंद' ठेवण्यात आले. पिता रामदासांनी अखेर अर्जनदेवांना गुरŠगादीवर अभिष्कित केले. त्याचवेळेस भारताच्या राजकीय क्षितीजावर देखील गृहकलह प्रारंभ झला होता. बादशहा अकबराचा मृत्यू होऊन त्याचा मुलगा 'जहांगीर' दिल्लीच्या तख्तावर बसला होता. मात्र दिल्लीचे तख्त जहांगीरएवजी आपला नातू 'खुसरो' याला मिळावे अशी ईच्छा अकबराची होती. यामुळे जहागींर आणि खुसरो यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला होता. अकबराच्या काळापासून राजा बिरबलसारख्यांनी शीख धर्माविषयी राजसत्तेच्या डोक्यात गैरसमज निर्माण करण्याचा आणि विविध मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. अकबर आणि गुरू अमरदास-रामदास यांचे वैयक्तिक संबंध आणि धर्माविषयी असणारी त्याची आस्था यामुळे असे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. यावेळी परिस्थिती मात्र वेगळी होती. गुरू रामदासांचा ज्येष्ठ पुत्र पृथ्वीचंद्र गुरू अर्जनदेवांच्या विरोधात उभा ठाकला होता. मुलाचा पंजाबी असलेला जहांगीराचा दिवान अथवा अर्थमंत्री चंदूशहा हा अर्जनदेवांचा व शीख धर्माचा विरोधक होता. अर्जनदेवांशी त्याच्या मुलीचा विवाह करण्याची त्याची ईच्छापूर्ण होऊ शकली नाही,याची देखील किनार त्याच्या शत्रुत्वाला होती. जहांगीर-खुसरो या बाप-लेकांमध्ये सत्तासंघर्ष पेटला तेंव्हा पराभूत खुसरो लाहोरकडे जातांना अर्जनदेवांना भेटला. खुसरोचे आजोबा अकबर यांच्याशी असलेल्या जुन्या स्नेहामुळे अर्जनदेवांनी त्याला काही आर्थिक सहकार्य केले. मात्र त्याला शरण देण्याचे नाकारले. दिवाण चंदूशाह याने जहांगीराचे कान भरले आणि त्याला मदतीला पृथ्वीचंद्र होता. अर्जनदेवांचा मोठा बंधू साक्ष देण्यासाठी असल्यामुळे जहांगीरचा त्यावर त्वरीत विश्वास बसला. आपल्या पित्याला अपशब्द वापरणारा आणि आपले बंधू अर्जनदेव यांच्याविरोधात आणि शीख धर्माविरूद्ध विद्रोह करणारा पृथ्वीचंद्र हा धर्माचा पहिला विश्वासघातकी निघाला. नानकदेवांचे पुत्र श्रीचंद यांची भावना देखील स्वतःला डावलण्याची भावना होती ;परंतु त्यांनी अशी कोणतीही आगळीक केली नाही. ते नाराज देखील होते;परंतु त्यांना जेंव्हा त्यांना नानकदेवांनी केलेले योग्य होते. याची जाणीव झाल्यावर ते पुन्हा शीख धर्माच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. पृथ्वीचंद्राने मात्र अत्यंत अशोभनीय वर्तन केले. त्यामुळे त्याचा उल्लेख 'मीन पृथ्वीचंद्र' किंवा 'मीन प्रिथिया' असा शीख धर्मात केला जातो. मीन याचा अर्थ दुष्ट स्वभावाचा माणूस असा घेतला जातो. दिवाण चंदूशहा आणि पृथ्वीचंद्र यांची कपटी योजना यशस्वी होऊन जहांगीरचा गैरसमज झाला. जहांगीर जेंव्हा पंजाबच्या दौ-यावर आला तेंव्हा त्याने लाहोर मुक्कामी गुरू अर्जनदेवांना भेटण्यासाठी येण्याचे आदेश दिले. गुरू अर्जनदेवांना लाहोरला आपल्यासोबत काय होणार याची कल्पना आली होती. चंदूशहाने जहांगीरासमोर उभ्या अर्जनदेवांवर अनेक असत्य आरोप लावले आणि त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. जहांगीराच्या मनात अर्जनदेवांविषयीची कटूता दृढ झाली त्यांना दोन लक्ष रुपयांचा दंड करण्यात आला आणि निर्माण होत असलेल्या 'गुरूग्रंथ साहिब' मधील चंदूशहाने ठरवलेले आक्षेपहार्य पदे वगळण्यास सांगितले. गुरू अर्जनदेवांनी दोन्ही गोष्टी अमान्य केल्या. बादशहा जहांगीरला हा स्वतःचा घोर अपमान वाटला आणि त्याने अर्जनदेवांना कैद करण्याचे फरमान काढले. कारागृहात त्यांच्यावर विविध अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यांच्या शरीरावर तापलेली वाळू टाकणे,उकळत्या पाण्याने आंघोळ घालणे,जळत्या निखा-यांवर बसवणे; परंतु त्यांच्या मुखातून वेदनेचा एक स्वर निघाला नाही. कारागृहाचे कर्मचारी बादशहाने केलेला दंड स्वीकारण्याची विनंती वारंवार करत होते. नामजप करत अर्जनदेव सर्व यातना सहन करत राहिले. यातनामय पाच दिवसांनंतर त्यांच्या विनंतीनुसार त्यांना रावी नदीवर स्नानाची परवानगी देण्यात आली. तो दिवस होता ३० मे १६०६. आपले पाच शिष्य आणि हत्यारबंद शिपाई यांच्यासोबत एक मोठी चादर ओढलेले अर्जनदेव रावीच्या काठाकडे निघाले. शरीरावर आलेल फोड आणि तळपायांना झालेल्या जखमा सहन करत पाया ओढत ते रावीमायच्या कुशीत शांतता मिळवण्यासाठी चालले होते. त्यांचा शिष्य पीराना याच्या खांदयाचा आधार त्यांनी घेतला होता. असाहय जनतेच्या डोळयातून अर्जनदेवांची वेदना ओघळत होती. ध्यान मग्न अर्जनदेव रावीच्या काठावर पोहचले,त्यांनी स्नान केले आणि 'जपुजी' चा पाठ केला. आपले एकमेव पुत्र हरगोविंद यांना गुरू मानून पुढील वाटचाल करावी,अशी आज्ञा त्यांनी दिली. त्यांच्या अथांग वेदनांनी दग्ध देहाला रावीच्या जलाने कायमचा विसावा दिला. त्यांच्या आज्ञेनुसार कोणतेही संस्कार न करता रावीच्या प्रवाहातच त्यांच्या देहाला जलसमाधी देण्यात आली. गुरू अर्जनदेवांना देण्यात आलेल्या प्रत्येक वेदनेने शीख धर्माच्या सुवर्ण मंदिराचा प्रत्येक चिरा भक्कम झाला होता. ज्याचा कळस गुरू गोविंदसिंग चढवणार होते. गुरू अर्जनदेवांच्या असीम त्यागाने शीखांना त्यांचा पहिला शहिद मिळला होता. भारताला मिळालेल्या शीख शहिदांच्या देदीप्यमान परंपरेचा हा उगम होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(
शीख धर्माचा अतिशय ज्वलंत आणि तितकाच वेदनादायी परिचय आपण करुन देत आहात..आपले व सार्वमत वर्तमानपत्राचे हार्दिक आभार!!
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Deleteशीख धर्माविषयी खूप उपयोगी व सुंदर माहिती आहे
ReplyDeleteखूप छान........
धन्यवाद 🙏
Delete