मोल करो तलवार का..

गुरू अर्जनदेवांनी शीखांसाठी वयाच्या अवघ्या ४३ वर्षी हौतात्म्य स्वीकारले; परंतु आपल्या अनयायांवर आणि धर्मावर संकट येऊ दिले नाही.  त्यांच्या मृत्यूने शीख धर्मात तलवारीला मोल प्राप्त करून दिले.  एक लढवय्यी जमात म्हणून शीखांची मानसिकता निर्माण होण्यास अर्जनदेवांचे हौतत्म्य कारणीभूत ठरले.  त्यांचे पुत्र हरगोविंदजी जेंव्हा अवघे १२ वर्षे होते.  भाई बुढ्ढा यांनी अर्जनदेवांवर अंतिम संस्कार केल्यानंतर, त्यांच्या आदेशानुसार हरगोविंद यांना गुरूगादीवर अभिषिक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.  गुरूगादी स्वीकारण्याचा हा कार्यक्रम मात्र पूर्वीपेक्षा वेगळा ठरला.  गुरू अंगददेव ते गुरू अर्जनदेव यांच्यापर्यत बाबा बुढ्ढा यांनी नानकदेवांप्रमाणे पाच पैसे,एक नारळ आणि वस्त्र देऊन हरगोविंदजींना अभिष्कित करण्याचे आयोजन केले असता,हरगोविंदजींनी याला नकार दिला.  पित्याच्या अमानुष हत्येने हरगोविंदजींच्या मनात शीखांनी आता बदलेल पाहिजे,ही भावना प्रबळ झाली होती.  एक अहिंसावादी व शांत समुदाय म्हणून असलेली शीखांची ओळख एक दिवस त्यांची ओळख पुसुन टाकण्यास कारणीभूत ठरेल.  याची तीव्र जाणीव हरगोविंदजींना झाली होती.  त्यांनी गुरूगादीवर अभिष्कित होण्याचे कार्यक्रमाचे आयोजन वेगळया पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी शीखांना आणि अमृतसरमधील प्रतिष्ठित लोकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.  कार्यक्रमात बाबा बुढ्ढा पाच पैसे,एक नारळ आणि वस्त्र घेऊन,पुढे सरसावले त्यावेळी हरगोविंदजींनी त्यांनी दिलेला शेला किंवा दुपट्टा आपल्या खांदयावर घेण्यास नकार दिला. त्या  शेलाच्या जागी तलवार असली पाहिजे आणि आपल्या साप‹यावर काही तरी राजचिन्ह असावे,असे सांगितले.  त्यानुसार त्यांनी तो शेला आपल्या संग्रहालयात सुरक्षित ठेवला आणि स्वतःला युद्धोपयोगी पेहरावाने सुसज्ज केले. एक लष्करी आणि राज शक्ती म्हणून शीख धर्माच्या भावी वाटचालीचा हा आरंभ होता. गुरूगादी ग्रहण कार्यक्रमाला उपस्थित शीख आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत सहभोजन केले.  तसेच सर्व मसंदाना आदेश दिले की भविष्यात भेट म्हणून धनाऐवजी केवळ शस्त्र किंवा घोडयांचा स्वीकार केला जाईल.  सन १६०६ मधील ही घटना होती.  या घटनेने अमृतसरच्या सुवर्णमंदिरातच्या आवारात 'तख्त अकाल वुंगे' चा पाया घातला.  आजही याठिकाण अकाली शीख बसून महत्वपूर्ण शस्त्रांचे रक्षण करतात.  हरगोविंदजींच्या क्रांतीकारी निर्णयाने शीखांच्या क्षात्रतेजास पाणी चढण्यास प्रारंभ झाला.  आता त्यांच्या सेवेत लांबून-लांबून अनेक योद्धे आणि पहिलवान येऊ लागले.  त्यांच्यातील ५२ जणांची निवड त्यांनी आपले अंगरक्षक म्हणून केली.  याच्यातूनच शीख गुरूंच्या सैन्याची निर्मिती होत गेली.  आपला अपूर्व साहस,पराक्रम आणि विरता यांची प्रचिती शीख सैन्याने अनेकवेळा शाही मुगल फौजेला दिली.  शीख सैन्याला नियमित कसरत व युद्ध सरावाची सवय गुरू हरगोविंदजींनी लावली.  सूर्योदयापूर्वी उठणे,कसरत करणे,अस्त्र-शस्त्र सुसज्ज करणे,त्यानंतर हरमंदिरमध्ये(सुवर्ण मंदिर) जाणे,गुरूजींकडून 'जपुजी' व 'असा दी वार' यांचा पाठ ऐकणे असा या सैन्याचा दिनक्रम होता.  हरगोविंदजी स्वतः त्यांच्यासोबत असत.  दुपारपर्यंत आपल्या शीख अनुयायांना प्रवचन देत.  ज्याला शीख परंपरेत 'आनंद' असे संबोधले जाते.  सर्व लोकांसोबत भोजन केल्यानंतर हरगोविंदजी आणि त्यांचे सैन्य 'आखेट' साठी म्हणजेच मृगया किंवा शिकार करण्यासाठी जात.  यामुळे सैन्याला अप्रत्यक्षपणे लष्करी प्रशिक्षण प्राप्त होत असे.  गुरू अर्जनदेवांनी आपल्या कार्यकाळात शीख धर्माच्या तत्त्वज्ञानाला सुव्यवस्थित करण्यासाठी आणि शीखांना त्यांचा धर्मग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी 'गुरूग्रंथ साहेब' चे निर्माण प्रारंभ केले होते.  तसेच सिमावर्ती भागातील पंजाबच्या भूमीचा उपयोग करत शीखांना व्यापार-वाणिज्य यांचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली होती.  यासाठी अश्व व्यापारासाठी त्यांनी शीखांना प्रोत्साहित केले,तुर्कस्थानपर्यंत शीख व्यापारी जाऊ लागले.  व्यापारासोबतच शीख धर्मपरंपरेचाही प्रसार-प्रचार होत होता. आज जगात एक 'व्यापारी-व्यावसायिक' भारतीय जमात म्हणून शिखांकडे पाहिले जाते. त्याचे मूळ येथे दिसते. त्यांच्या कार्याला हरगोविंदजींनी पुढे नेले.  गुरूग्रंथ साहिबची रचना प्रारंभ करणा-या अर्जनदेवांच्या रचना देखील अतिशय सुंदर होत्या.  आज त्यांनी रचलेल्या पदांची संख्या ६००० पेक्षा अधिक असलेली दिसते.  त्यांनी रचलेले 'बाबन अखरी','बारामासा' आणि काही फुटकळ रचनांमध्ये संगिताच्या विविध रागांचा समावेश असलेला दिसतो.  त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना 'सुख मनी' (मनःशांती) चा पाठ शीख परंपरेत प्रातःकाळी 'जपुजी' नंतर केला जातो.  नानकदेवांपासून ते अर्जनदेवांपर्यंत काव्य-संगितमय भक्तीला हरगोविंदजींनी शस्त्र शक्तीची जोड दिली.  ज्या बादशहा जहांगीरचा गैरसमज करून देण्यात आला आणि ज्यामुळे गुरू अर्जनदेवांना बलिदान द्यावे लागले.  त्या जहांगीरची आणि गुरू हरगोविंदजींची चांगली मैत्री झाली.  जहांगीराने त्यांना एकदा शिकार खेळण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना आपल्याला आग-यापर्यंत सोबत करण्याची विनंती केली.  जहांगीरचा अर्थमंत्री चंदूशहा याचे उद्योग अद्याप थांबलेले नव्हते.  त्याने षडयंत्र करून हरगोविंदजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात नजरबंद ठेवले.  शेवटी बादशहाचा सेनापती वजीरखान याने मोठया युक्तीने त्यांची सुटका करवली.  अखेर एक दिवस चंदूशहाचा घडा भरला.  बादशहाला गुरूजींच्या गळयातील एक माळ खूप आवडली.  त्याने मागणी केली असता,गुरूजींनी सांगितले,'यापेक्षा अधिक सुंदर माळ माझे पिता अर्जनदेवांच्या गळयात होती.  त्यांच्या मृत्यूपश्चात चंदूशहाने ती काढून घेतली.  आपण त्याच्याकडून ती मिळवू शकता.' आता बादशहाच्या मनात माळ भरलीच होती.  चंदूशहाकडे बादशहाने चौकशी केली असता,'ती माळ माझ्याकडून कुठे तरी ठेवल्या गेली.  आता शोधून देखील सापडत नाही,'  असे त्याने बादशहाला सांगितले.  बादशहाला संशय आला,चंदूशहा मुददाम आपल्या माळ देत नाही,असे वाटले.  बादशहाची चंदूशहावर खफा मर्जी झाली आणि त्याने चंदूशहाला गुरूजींच्या हवाली केले.  त्याची आग-यातून धिंड काढण्यात आली.  अखेर चंदूशहाला शहरात भीक मागत मरण्याची वेळ आली.  शीखांना गुरू अर्जनदेवांच्या बलीदानाला न्याय मिळाल्याचे समाधान प्राप्त झाले.  गुरू हरगोविंदजींनी बादशहाच्या मैत्रीचा लाभ घेत त्याला अमृतसर,गोयंदवाल,तरनतारन इत्यादी शीख धर्माच्या मुख्य तीर्थस्थानांची यात्रा घडवली आणि त्याला शीख धर्मपरंपरेचा परिचय करून दिला.  बादशहाची प्रेयसी 'बेगम नूरजहाँ' गुरूजींच्या व्यक्तिमत्वाने अत्यंत प्रभावित झाली होती.  बादशहाच्या अनुमतीने ती अन्य बेगमांना सोबत घेऊन अनेक वेळा त्यांच्या दर्शनासाठी गेली.  एका मुस्लिम काजीची मुलगी 'बीबी कौलन' हिने मियॉ मीर यांच्या सल्ल्यानुसार गुरूजींचे शिष्यत्व पत्कारत,त्यांच्या चरणी आपली सर्व संपत्ती समर्पित केली.  हरगोविंदजींनी १६२१ साली या संपत्तीमधून एका तलावाचे काम केले आणि बीबी कौलनच्या नावावरून 'कौलसर' असे त्याचे नामकरण केले.  आता अमृतसर शहर पाच तलावांचे शहर बनले.  अमृतसर,संतोषसर,रामसर,कौलसर आणि विवेकसर हेच ते पाच तलाव.  बादशहा जहांगीरच्या मृत्यूपश्चात त्याचा मुलगा शाहजहाँ बादशहा म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसला.  तेंव्हापासून शीख आणि मुगल सत्तेचे संबंध बिघडत गेले.  ईराणच्या शहाने बादशहा शाहजहाँला एक सुंदर गरुड(बाज) भेट दिला होता.  शाहजहाँ शिकारीच्यावेळी त्याचा वापर करायचा  १६२८ साली एकदा शाहजहाँ लाहोरवरून अमृतसरकडे निघाला असता,त्याने शिकार खेळण्याचे ठरवले.  त्याने एका पक्षावर आपला बाज सोडला,बराच वेळ दोन पक्षांचा खेळा चालल्यानंतर बाज दिसेनासा झाला.  शोध घेतल्यानंतर कळाले की त्या बाजाला गुरू हरगोविंदांच्या शिष्यांनी पकडले.  त्यांनी तो परत करण्यास नकार दिल्यामुळे लढाईचा प्रसंग उभा ठाकला.  अमृतसर जवळ ४ मैलांवर झालेल्या या छोटया युद्धात शीख सैन्याचा विजय झाला.  आजही शीख सैन्याच्या पहिल्या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी वैशाख पोर्णिमेला तेथे यात्रा भरते.  शाहजहाँच्या सैन्याशी शीख सैन्याचा दुसरा संघर्ष १६३१ मध्ये 'श्री हरगोविंदपूर' येथे झाला.  या नव्याने वसवण्यात आलेल्या शहरावर शाहजहाँने आक्रमण केले होते.  अठरा तास हे युद्ध चालले.  गुरू हरगोविंदांनी तत्त्वज्ञानासोबतचे तलवारीचे मोल जाणले होते.  नानकदेवांपासून सर्व गुरूंचे तत्त्वज्ञान 'अहिंसा-मानवता-समता' यांच्यावर आधारित होते; परंतु त्याच्या प्रसार करतांना स्वतःचे प्राण वाचवणे महत्वाचे असते.  तुमची तलवार अन्यायासाठी नाही, तर किमान न्यायासाठी व स्वसंरक्षणासाठी धारदार असली पाहिजे.  याचे महत्व आपल्या पित्याच्या बलिदानावरून गुरू हरगोविंदांना चांगले समजले होते.  धर्म हा मूळात 'पशु' असलेल्या माणसाला 'माणूस' बनवण्यासाठी असतो.  मात्र प्रत्येक धर्मातील धर्मांधता  माणसाला पुन्हा पशु बनवते. यामध्ये कमी-जास्त असा भेद कोणत्याच धर्मात करता येत नाही.  त्यामुळेच अहिंसेचे मूल्य टिकवण्यासाठी कधी-कधी तलवारीचे मोल जाणावे लागते.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

  1. आपल्या लेखणीचे मोल तलवारीइतकेच आहे..अशीच लेखणी चालत राहो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !