समतेचा लंगर

एक दिवस अकबर बादशहा गोयंदवाल येथील तिसरे शीख गुरू अमरदास यांच्या दर्शनासाठी त्यांच्या दरबारात आला.  यापूर्वी १५६७ मध्ये अमरदासांची आणि त्याची भेट झालेली होती.  त्यावेळी अकबराने त्यांच्याकडून उपदेश ग्रहण केलेला होता.  अकबर बादशहा अमरदासजींच्या उपदेशाने प्रभावित झालेला होता.  गुरूंजींनी आपल्याकडून काही तरी भेट स्वीकारावी अशी तीव्र ईच्छा बादशहाच्या मनात होती.  त्यानुसार एक जहागीर त्याने अमरदासजींना स्वीकारण्याचा आग्रह केला.  अमरदासांनी अत्यंत विनम्र आणि निस्वार्थ भावाने अकबराची भेट नाकारली.  नानकदेवांपासून प्रारंभ झालेली,अंगददेवांनी अधिक सशक्त केलेली आणि अमरदासांनी अधिक व्यापक केलेली लंगरच्या प्रथेला हातभार लागावा असे बादशहाला वाटत होते.  यासाठी जहागिरीच्या उत्पन्नातून लंगरला सहकार्य होईल अशी त्याची भावना होती.  अमरदास मात्र लंगरचे स्वरूप सार्वजनिक योगदानातून चालवण्यासाठी आग्रही होते.  त्यामुळे त्यांना स्पष्ट नकार दिला.  अकबराने मात्र आपला हट्ट सोडला नाही.  अमरदासांच्या मुलगी 'भानी' हिच्या नावाने त्याने जहागीर करून दिली.  अमरदासांनी विचारणा केली असता, बादशहाने अतिशय भावनिक उत्तर दिले.  तो म्हणाला,'भानी ज्याप्रमाणे आपली पुत्री आहे,तशीच माझीपण आहे.  मी आपणास नाही,तर माझ्या मुलीला ही जहागीर भेट देत आहे.  त्यामुळे आपल्या नकाराचा प्रश्न येतच नाही. ' आता मात्र अमरदासजी निरूत्तर झाले.  अमरदासांनी आपले जामात म्हणजेच भानीचे यजमान जेठाजी यांना जहागीरीच्या गावी जाऊन,कारभार पाहण्यास सांगितले.  जेठाजींचा विवाह भानी सोबत १५५३ मध्ये झाला होता.  जेठाजी हे अमरदासांचे शिष्योत्तम होते.  अनेक मुलांना डावलून अमरदासजींनी जेठांजी निवड भानीसाठी केली होती.  त्यांची ही निवड केवळ जामात म्हणूनच नव्हे, तर शीख धर्माचे चौथे गुरू म्हणून देखील सार्थ ठरली.  कारण अमरदासजींच्या नंतर जेठाजी गुरू रामदास म्हणून गुरूगादीवर अभिषिक्त झाले.  जेठांजींनी आपल्या गुरूंना सोडून जाण्यास स्पष्ट नकार दिला.  मग अमरदासजींनी भाई बुढ्ढा यांना कारभार पाहण्यास सांगितले.  पूर्वाश्रमीचे शाक्तपंथीय गुरू अंगददेव आणि पूर्वाश्रमीचे वैष्णव पंथीय गुरू अमरदास यांच्या रूपाने शीख धर्मात विविध भक्तीसंप्रदायाचा विलय होण्याची प्रक्रिया आणि धर्माचे खुलेपण अधोरेखित होते.  अमरदासांना वयाच्या ७३व्या वर्षी गुरूगादी प्राप्त झाली.  वयाच्या ६२ व्या वर्षी गुरू अंगददेवांचे शिष्यत्व पत्कारणा-या अमरदासांना आपल्या गुरूपुत्राच्या वैराचा सामना करावा लागला.  अंगददेवांचा पुत्र दातूला अमरदास गुरूपदी विराजमान झालेले सहन होऊ शकले नाही.  अमरदासजी 'गोयंदवाल' येथून शीख धर्माचे संचलन करत होते.  अंगददेवांच्या गावी खेडूर येथ दातूने मात्र आपल्या पित्याच्या गादीवर स्वतःचा अधिकार घोषित केला.  तसेच अमरदास आमचा नोकर होता आणि तो आता म्हातारा झाला आहे. त्यामुळे त्याला गुरŠगादीवर बसण्याचा अधिकार नाही  अशी घोषणा केली;परंतु शिखांना ही गोष्ट रूचली नाही.  नानकदेवांचे तत्त्वज्ञान आणि जीवन संस्कार म्हणून त्यांच्या रक्तात वाहत होते.  त्यांना याप्रसंगी गुरू अंगददेवांच्या वचनांची आठवण झाली आणि त्यांनी अमरदासजींकडे जाऊन याविषयी आपले दुःख व्यक्त केले.  शिखांचे समर्थन अमरदासजींना आहे. हे पाहून दातू अत्यंत कुद्ध झाला आणि सुडाग्नीने पेटला आणि गोयंदवाल येथ जाऊन धडकला.  त्याने वयोवृद्ध गुरू अमरदासांना अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरवात केली आणि त्यांना लाथ मारŠन खाली पाडले.  गुरू अमरदास यांनी स्वतःला सावरले आणि दातूचे पाय पकडत ते म्हणाले,'आपल्या पायाला दुखापत ,तर नाही झाली.  मला क्षमा करण्याची कृपा करावी.' असे बोलून अमरदासजी आपल्या जन्मगावी म्हणजे अमृतसर जवळील 'वासरके' येथे निघून गेले.  अमरदासजींच्या वर्तनातून शिखांना नानकदेवांचे व अंगददेवांचे प्रतिबिंब जाणवले.  त्यांनी अमरदासजींना आग्रहपूर्वक पुन्हा गोयंदवालला आणले.  दातू खेडूरला परत असतांना दरोडेखोरांनी त्याला लुटले आणि त्याला जखमी केले.  यामुळे दातू कायमचा अपंग झाला.  क्षमा आणि सहनशिलता यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमरदासजी होते.  बादशहा अकबर अमरदासांचा चाहता होता.  असे असले तरी एकदा काही विघ्नसंतोषी ब्राहमणांनी अकबराचा अमरदासांविषयी आणि शीख धर्माविषयी गैरसमज करून दिला.   गुरू अमरदास यांच्यामुळे हिंदू धर्माचा अपमान होत आहे.  बादशहाने त्यांना दंडित करावे अशी मागणी केली.  बादशहाने तक्रारीची शहानीशा करण्यासाठी अमरदासांना आपल्या दरबारात येण्याचा निरोप दिला.  आपण वृद्ध आहोत त्यामुळे येऊ शकत नाही.  तसेच मोठा मुलगा मोहन सदैव ध्यानाधारणा करत असतो आणि लहान मुलगा मोहरीला दरबाराचे शिष्टाचार माहित नाही,त्यामुळे माझे जामात जेठाजी यांना पाठवतो.  असा निरोप त्यांनी  बादशहाला दिला.  त्यानुसार जेठाजी अकबराच्या भेटीला गेले.  त्यांच्याशी झालेला वार्तालाप आणि सत्संग यामुळे अकबराला सर्व काही स्पष्ट झाले.  बादशहाचे समाधान झाले; परंतु त्याने गुरू अमरदासांनी हरिद्वारसारख्या काही तीर्थस्थळी भेट देऊन,शीख धर्माची भूमिका विषद करावी अशी सूचना केली.  त्यानुसार अमरदासजी हरिद्वारसह विविध तीर्थस्थानी गेले आणि त्यांनी शीख धर्माची मांडणी केली.  त्याचा लाभ शीख धर्माला मोठया प्रमाणात झाला.  शीख धर्माच्या अनुयांयामध्ये यामुळे प्रचंड वाढ झाली आणि धर्माचा अधिक विस्तार झाला.  अमरदासांनी आपल्या कार्यकाळात 'लंगर' प्रथेला अधिक मजबूत केले.  लंगरमधील प्रसादरूपी भोजन घेतल्याशिवाय कोणीही आपल्या दर्शनास येऊ नये. असा आदेश त्यांनी  दिलेला होता.  बादशहा अकबराने लंगरमधील प्रसादाचा लाभ जेंव्हा घेतला तेंव्हा त्याने पाहिले, भेटीला आलेल्या अनुयायांना कोणताही भेदभाव न ठेवता स्वादिष्ट भोजनरूपी प्रसाद देणारे गुरू अमरदास स्वतः अत्यंत साधे भोजन करतात आणि त्यांच्या वस्त्रादी गरजा देखील अत्यंत अल्प आहेत;  परंतु भक्तांनी दिलेले सर्व आर्थिक योगदान  लंगरच्या व्यपस्थापनात संपून जाते.  म्हणूनच त्याने त्यांची पुत्री भानीच्या माध्यमातून लंगरसाठी जहागीरीच्या रूपाने सहकार्य केले.  अमरदासांच्या माध्यमातून एक राज्यकर्ता म्हणून अकबर बादशहाची समज देखील येथे दिसून येते.  काळानुरूप आणि स्वार्थानुरूप इतिहासाची मोडतोड केली जात असते.  अनेकांना जाणीवपूर्वक खलनायक ठरवून वर्तमानात आपले उखळ पांढरे केले जाते.  अकबरासारख्या अल्पसंख्यांक धर्माच्या व्यक्तिने प्रदिर्घ काळ  भारतावर राज्य केले.  याचा तटस्थपणे अन्वयार्थ लावल्यास आपल्या लक्षात येते की सर्वसमावेश भूमिका स्वीकारल्याशिवाय भारतासारख्या बहुढंगी- बहुरंगी-बहुपेढी देशावर कोणीच सुखाने व दीर्घकाळ राज्य करू शकत नाही.  अमरदासांनी त्यांना ज्या वयात गुरूगादी मिळाली आणि त्यानंतर जे आयुष्य मिळाले त्यामध्ये शीख धर्माला आपल्या परीने आकार देण्याचा प्रयत्न केला.  इतिहासकार त्यांच्या कार्याला अधिक महत्व देत नाही असे दिसते.  असे असले तरी गुरूपदी आल्यानंतर मिळालेल्या उण्यापु-या सात वर्षात त्यांनी शीख धर्मपरंपरेला विशुद्ध स्वरूपात ठेवण्याचे आणि विस्तारण्याचे केलेले प्रयत्न नाकारणे योग्य ठरत नाही.  लंगरमधील भोजनरूपी प्रसाद सक्तीचा करणे हे त्यांचे अत्यंत महत्वाचे कार्य ठरते.  कारण नानकदेवांचा समतेचा संदेश यातून अत्यंत सहज व अकृत्रिमपणे शीखांच्या आणि इतर धर्मियांच्या मनात रूजण्यास मदत झाली.  अन्यथा आपल्या देशात सहभोजनाचे स्वार्थ सोहळे आजही चालू असलेले दिसतात.  अमरदासजींच्या प्रेरणेतूनच शीख धर्माच्या अमृतनगरीचा जन्म होणार होता.  अनेक वर्षांच्या दुष्काळामुळे अतोनात हालअपेष्टा सहन करणा-या माणसांसाठी आणि मुक्या पशु-पक्ष्यांसाठी कायमचा पाण्याचा चिरंतन स्त्रोत असणारे एक नगर निर्माण करण्याचा आदेश त्यांनी जेठाजींना दिला.  त्या नगरीच्या निर्माणाची चित्तवेधक कहाणी  स्वतंत्रपणे पाहणे गरजेचे आहे.  गुरू अमरदासांनी आपल्या कार्यकाळात शीख धर्माच्या प्रचारार्थ २२ केंद्र (मंजे) आणि स्त्री शिक्षणासाठी ५२ उपदेश केंद्र विविध ठिकाणी स्थापन केले.  त्यांच्या काव्य रचनांमध्ये  'आनंद' नावाचे काव्य प्रसिद्ध आणि विशेष आहे.  शीखांच्या विविध सण-उत्सवांमध्ये हे काव्य गाण्याची प्रथा आहे.  त्यांनी लिहिलेल्या सर्व पदांचा समावेश गुरूग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला आहे.  १५७४ च्या भाद्रपद शुद्ध १३ ला गुरू अमरदासांनी आपले जामात आणि शिष्योत्तम जेठाजी यांचे नामकरण रामदास असे केले.  नानकदेवांच्या प्रथेनुसार पाच पैसे आणि एक नारळ अर्पण करुन त्यांना शीखांचे चौथे गुरू रामदास म्हणून गुरूगादीवर अभिषिक्त केले.  त्यांनतर दोन दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी ते अनंत निरंकाराच्या यात्रेसाठी मार्गस्थ झाले.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !