व्हॅलीफोर्जचे अनोखे लसीकरण
सरगोटाच्या लढाईत अमेरिकन क्रांतीसेनेचा निर्णायक विजय झाला. असे असले तरी सर्वच काही आलबेल झाले नव्हते. अंतिम विजय विजेत्यांची सर्वोच्च कसोटी पाहत असतो. अमेरिकन जनतेचा हा स्वातंत्र्यलढा आपल्या मातृभूमीशीच असला, तरी तो तत्कालीन जगातील एका महासत्तेशी देखील होता. सरगोटाचा विजय हे एक स्वातंत्र्यलढयाचे उत्साहवर्धक वळण होते. असे असले तरी यापुढील घटना प्रचंड वेगाने आणि अतर्क्य पद्धतीने घडणार होत्या. अशावेळी महासत्तेच्या सुसज्ज व साधन संपन्न सैन्याशी लढणारी सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांची फाटकी सेना अनेकवेळा पोटाची खळगी भरण्यास ही असमर्थ होती. हिमवर्षावाच्या काळात कोणतीही हालचाल किंवा युद्ध शक्य नसल्याने दोन्ही सैन्यांना तळ ठोकून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. सन १७७७-७८ मधील हिमवर्षावाच्या काळात अमेरिकन क्रांतीसेनेला लढण्यापेक्षा जगण्याचा संघर्ष महत्वाचा ठरत होता. क्रांतीसेनेला त्यांच्या भूमीवरील हिवाळा त्यांचा शत्रुसोबत युती केलेला हितशत्रु वाटत होता. हिवाळयात हिमवर्षाव प्रारंभ झाला आणि दोन्ही सैन्यांच्या हालचाली मंदावत गेल्या. अखेर 'फोर्ज व्हॅली' येथे तळ ठोकून अमेरिकन क्रांतीसेना विसावली होती. फोर्ज व्हॅली येथील क्रांतीसेनेच्या तळाला 'व्हॅलीफोर्ज' म्हणून संबोधले जात होते. व्हॅलीफोर्जचा लष्करी तळ फिलाडेल्फियापासून अवघ्या १४ मैलांवर होता. ब्रिटिश सेनापती होवे याने व्हॅलीफोर्जच्या जवळच आपला लष्करी तळ ठोकला होता. जनरल होवच्या लष्करी तळात स्वाभाविकच सोयीसुविधांची रेलचेल होती. तेथून काही अंतरावर असणा-या जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांचा तळात सगळयाच गोष्टींची अबाळ असणे स्वाभाविक होते. अभावग्रस्त सेनेचा सरसेनापती म्हणून वॉशिंग्टन यांना आपल्या सैन्याची जेवढी चिंता होती,तेवढेच लष्करी डावपेच म्हणून फोर्ज व्हॅलीमध्ये तळ ठोकून बसने देखील महत्वाचे होते. ब्रिटिश सैन्य सर्वार्थाने संपन्न असले, तरी ते परक्या भूमीत होते. त्यांना अन्नधान्याच्या रसदीची व्यवस्था अमेरिकन भूमीवरच करावी लागत होती. अशावेळी पेनसिल्वेनिया येथील समृद्ध शेती जनरल होवेच्या सैन्यासाठी रसदीचे भांडार ठरणार होती. पेनसिल्वेनियामधून ब्रिटिश सैन्याला होऊ शकणा-या संभाव्य रसदीला रोखण्यासाठी वॉशिंग्टन यांना फोर्ज व्हॅलीत तळ ठोकून बसण्याचा डावपेच आखावा लागला. त्यानुसार व्हॅलीफोर्ज हा अमेरिकन क्रांतीसेनेचा लष्करी तळ निर्माण झाला. निवा-यासाठी क्रांतीसेनेने व्हॅलीफोर्जमध्ये सुमारे ९०० खोल्या निर्माण केल्या होत्या. प्रत्येक खोलीत १२ सैनिकांच्या निवा-याची व्यवस्था होती. अवघ्या ४० दिवसात हया खोल्यांचे निर्माण करण्यात आले होते. खोल्या तयार झाल्या;परंतु क्रांतीसेनेच्या सैनिकांकडे अत्यंत अपुरे गरम कपडे होते. तसेच पाच सैनिकांमागे एक बुटांचा जोड होता. अशी अवस्था होती. सैन्याच्या उदरभरणासाठी रोज ३५००० पौंड मांस आणि १६८ पिंप गव्हाचे पीठ आवश्यक होते. ब्रिटिश सैन्याची रसद रोखण्यासाठी व्हॅलीफोर्जचा तळ असला, तरी काँटिनेंटल काँग्रेसकडे आर्थिक टंचाई असल्याने तेथेही पुरेशी रसद मिळत नव्हती. अशावेळी व्हॅलीफोर्जमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि दिवसोंदिवस ही समस्या अधिकाधिक गंभीर होत गेली. क्रांतीसेनेकडील अन्नाचा साठा संपत आला. अखेर उरलेला हिवाळा रोजची गरज असणा-या १६८ ऐवजी २५ पिंप गव्हावर काढावा लागला. अशा परिस्थितीत सैन्याची अवस्था कशी झाली असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. व्हॅलीफोर्ज उपासमारीच्या जात्यात भरडल्या जात होता. शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नव्हती. क्रांतीसेनेसमोर अस्वच्छ पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशुद्ध पाण्यामुळे व्हॅलीफोर्जमध्ये अतिसारासारखे आजार पसरले. त्यामुळे अनेक सैनिक मृत्यूमुखी पडले. अशावेळी सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन हतबल झाले होते. छावणीत फिरून आपल्या सैन्याचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु होते. उपासमारीने अशक्त झालेली आणि आजारांनी गलितगात्र झालेली सेना लढणार कशी याची चिंता वॉशिंग्टन यांना पोखरत होती. क्रांतीसेनेच्या धमण्यांमधून रक्त म्हणून वाहणारी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याची आस आणि तिच्या मनाने घेतलेला ध्यास येथे महत्वाचा ठरला. एवढया प्रचंड अभावात टोकाचे अनुशासन,संयम आणि आज्ञाधारता असणारी सेना त्यावेळी जगाच्या पाठीवर आपल्याला शोधून सापडणार नाही. क्रांतीसेनेचे सैनिक शरीराने दुबळे झाले होते;परंतु मनाने मात्र अत्यंत दृढ होते. अमेरिकेच्या क्षितीजावर स्वातंत्र्याचे तांबडे फुटण्याच्या आशेने झपाटलेल्या या लोकांनी यातनांना पराभूत केले. अशातच १७७८ साली संपूर्ण अमेरिकेला देवीच्या साथीने विळखा घातला. जवळपास एक लक्ष लोकांचा बळी देवीने घेतला. देवीचा रोग हा जगाला प्रदिर्घ काळ भोवलेला आहे. भारतात मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो,असा समज होतो. १९५० सालापर्यंत देवीच्या रोगात सुमारे ६० टक्के लोक जगभरात मृत्युमुखी पडत होते. १७९८ साली एडवर्ड जेन्नर यांनी देवीवरच्या लसीचा शोध लावला. १८०३ मध्ये त्यांनी शोधलेल्या देवीच्या लसीच्या प्रचार-प्रसारासाठी रॉयल जेनेरियन संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जगभरात ही लस देण्यात येऊ लागली. भारतात स्वातंत्र्यानंतर यासंदर्भात अतिशय गांभीर्याने काम करण्यात आले. त्यामुळे १९७७ साली भारतातून हा रोग संपूर्णपणे आणि १९८० ला संपूर्ण जगातून हया रोगाचा नायनाट झाला. एडवर्ड जेन्नर यांच्या संशोधनाच्या १० वर्षांपूर्वी नेमकी क्रांतीकाळाच देवी अमेरिकेवर कोपली. त्यामुळे क्रांतीसेनेच्या समोर एक नवे आव्हान उभे ठाकले. १७८२ साली अमेरिकेतील ही देवीची साथ आटोक्यात आली. तोपर्यत एक लाख लोकांचा बळी तिने घेतला होता. कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगावर लसीकरणाचा उपाय हा प्रकारच एकूण जगात त्यावेळी प्राथमिक अवस्थेत होता. लसीकरणाचे सर्व प्रकार प्रायोगिक अवस्थेत होते. लसीकरणाचा असाच धाडसी प्रयोग अमेरिकन क्रांतीसेनेवर करण्यात आला. जीवघेण्या थंडीचा व हिमवर्षावाचा मौसम संपेपर्यंत अमेरिकन क्रांतीसेना टिकून राहण्यासाठी, हा अनोखा प्रयोग करण्यात आला. या उपचारात देवी झालेल्या रूग्णाच्या देवीच्या वण्रातून किंवा जखमेतून वाहणारा स्त्राव, निरोगी व्यक्तीच्या शरीरावर जखम करून किंवा असलेला जखमेवर लावायाचा. यामुळे त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात आवश्यक ती प्रतिकार शक्ती निर्माण होऊन, त्याला देवीची बाधा होण्याची शक्यता कमी व्हायची. हा प्रयोग अघारीच होता. भारतात याच्याशी मिळता-जुळता प्रयोग करणारे मांत्रिक किंवा भगत होते. देवी होऊन गेलेल्या माणसांच्या जखमांवर धरलेल्या खपल्यांची पुड या मांत्रिकांकडे किवा भगतांकडे असायची. हे लोक देवीच्या लागण झालेल्या अथवा निरोगी माणसाच्या हातावर मनगटापासून एका विताच्या अंतरावर चाकूने किंवा वस्त-याने आडावा काप घ्यायचे आणि त्याच्यात ही खपल्यांची पुड भरायचे आणि नंतर ती जखम कपडयाने घट्ट बांधायचे. या प्रयोगानंतर त्या व्यक्तीला देवी येत. तसेच तीन दिवस प्रचंड ताप यायचा व तीन दिवसानंतर या तापातून ती व्यक्ती बचावल्यास देवीच्या कोपातून त्याची सुटका व्हायची. अनेकजण या उपचारातच दगावत. काही भगत खपल्यांची पुड पोहयात गुळ घालून खायला देत आणि वातूळ पदार्थ खाण्यास देत. याप्रकारात वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता आणि र्निजंतूकीकरण नावाचा प्रकार नव्हता. म्हणजे आडवा काप किंवा चिरा घेण्यासाठी वापरलेला चाकू तापवला जायचा नाही आणि तोच चाकू तसाच दुस-या व्यक्तीला वापरला जायचा. १८१७ ला ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाने मुंबईमधील काळबादेवीच्या जवळ देवीची लस देण्यासाठी स्वतंत्र खाते तयार केले. एक इंग्रज डॉक्टर,एक भारतीय वैद्य,दोन कारकून आणि आठ पोलिस शिपाई असा लव्हाजमा मुंबईत देवीची लस देण्यासाठी दर सोमवारी फिरत असे. मुबंईतील श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत प्रत्येक स्तरातील भारतीयांनी देवीपेक्षा देवीच्या लसीचा धोसरा घेतला होता. कारण देवीच्या भगतांनी इंग्रजांची लस घेतल्यास कोप होईल अशी भिती त्यांच्या मनात दृढ केली होती. फक्त पारशी लोकांनी स्वतःहून सर्वप्रथम सहपरिवार देवीची लस घेतली. अखेर देवीची लस घेण्यासाठी इंग्रजांना कायदयाची जबरदस्ती करावी लागली. देवीच्या रोगाचा आणि लसीचा इतिहास मोठा आहे. अमेरिकन क्रांतीसेनेवर लसीचा केलेला प्रयोग मोठया प्रमाणात यशस्वी झाला. हिवाळा संपेपर्यंत क्रांतीसेनेतील २५०० लोक वेगवेगळया आजारांनी मृत्यू पावले. त्यातील शंभर-दिडशेच लोक देवीच्या रोगाने मरण पावले होते. अघोरी असला तरी क्रांतीसेना वाचवण्यासाठी केलेला प्रयोग मोठया प्रमाणात यशस्वी झाला होता. लसीकरण या वैद्यकीय उपचाराच्या संशोधनात यामुळे नक्कीच गती मिळाली असणार. व्हॅलीफोर्जच्या लष्करी तळात क्रांतीसेनेला देवीपासून वाचवण्यात यश आले,तसेच युरोपातील राजकारणातील झालेल्या बदलांमुळे अमेरिकन क्रांतीसेनेत सहभागी होण्यासाठी युरोपातील विविध देशांमध्ये भरती सुरु झाली. अमेरिकन काँटिनेंटल काँग्रेसच्या प्रतिनिधींनी युरोपातील देशांना आपल्या सोबत इंग्लंडविरूद्ध लढण्याची दिलेली लस बरोबर लागू पडली होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
रोचक व अभ्यासपूर्ण माहिती..
ReplyDeleteखूप चांगली माहिती
ReplyDelete