'गुरू का चक्र' ते 'अमृतसर'
शिखांचे तिसरे गुरू अमरदास यांचे निवासस्थान असलेल्या गोयंदवालच्या वेशीवर त्यांच्या निर्वाणानंतर, एके दिवशी एक नग्न साधूचे आगमन झाले. शिखांचे चौथे गुरू रामदासांना हे वृत्त समजताच ते स्वतः गोयंदवालच्या वेशीवर साधूच्या स्वागतासाठी पोहचले. पाचशे रूपये आणि काही मिष्ठान्न त्यांनी साधूच्या चरणी अपर्ण केले. साधूने रामदासांकडे पाहिले आणि तो म्हणाला,' आपली दाढी खूपच मोठी झाली आहे.' यावर गुरू रामदासांनी उत्तर दिले,' हो ! आपल्या चरणांवरील धूळ पुसण्यासाठी मी ही दाढी वाढवली आहे.' एवढयावरच न थांबता त्यांनी आपल्या दाढीने साधूच्या पायवरील धूळ झटकण्याचा प्रयत्न केला. रामदासांच्या उत्तराने साधू प्रभावित व प्रसन्न झाला. तसेच त्यांच्या कृतीने त्यांच्यातील प्रामाणिकपणा त्याला भावला. हा साधू म्हणजे शीख धर्मातील 'उदासी संप्रदाय' संस्थापक नानकदेवांचे पुत्र श्रीचंद होते. नानकदेवांनी गुरूगादीवर न बसवल्यामुळे श्रीचंदांनी विद्रोह केला होता. ते नग्नावस्थेत भ्रमण करत असत. त्यांनी आपला स्वतंत्र संप्रदाय उदासी नावाने स्थापन केला होता. आपला वारसाहक्क नाकारला गेला. याचा राग धरून त्यांनी गुरू अंगददेव आणि अमरदास यांची कधीच भेट घेतली नाही. चौथे गुरू रामदासांची ख्याती ऐकून मात्र त्यांना भेटण्याची ईच्छा श्रीचंदांची झाली. अंगददेव आणि अमरदास यांच्या निर्वाणानंतर बराच काळ लोटला होता. श्रीचंद यांचा राग देखील कदाचित शांत झाला होता. रामदासांच्या भेटीनंतर आणि त्यांच्या विनम्र वर्तनानंतर श्रीचंद संकोचले आणि म्हणाले,' गुरूजी,तुम्ही गुरूगादीचे अधिकारी आहात. तुमच्याजवळ पराकोटीची विनम्रता आहे. म्हणूनच तुम्ही गुरूपदापर्यंत पोहचलात. माझ्यापाशी विनय नाही,म्हणूनच मी दूर ठेवला गेलो. हे स्वीकारलेच पाहिजे.' त्यांच्यातील कटूता कमी झाल्याचे हे लक्षण होते. खरे पाहिले तर अंगददेवजी आणि अमरदासजी देखील विनम्र होते; परंतु द्वेषामुळे श्रीचंदाना त्याची जाणीव होऊ शकली नसेल. रामदासांच्या भेटीने श्रीचंद हळूहळू विनयशील होत गेले. त्यांची आणि रामदासांची गाढ मैत्री होऊ शकली नाही; पण दुरावा आणि कटुता संपली. सर्वात महत्वाचे म्हणजे उदासी संप्रदायाचे वेगळेपण संपुष्टात आले आणि त्याचा पुन्हा शीख धर्मात विलय झाला. दुस-या आणि तिस-या गुरूंना उदासी पंथामुळे मोठा क्लेश सहन करावा लागला होता. तसेच धर्मात निर्माण झालेला कलह निर्माण झाला होता. त्याचा बिमोड करण्यात रामदास यशस्वी ठरले. गुरू रामदास यांचा जीवनसंघर्ष अनेकांना प्रेरणादायक असा आहे. एक अनाथ मुलगा शीख धर्माच्या गुरूगादीवर अभिष्कित होतो, हे थक्क करणारे आहे. २४ सप्टेंबर १५३४ ला लोहोरमधील 'चुनेमंडी' भागातील हरिदास सोढी आणि दयाकौर यांच्या पोटी एक बालक जन्माला आले. हरिदास-दयाकौर अत्यंत गरीब दांपत्याने आापल्या मुलाचे नाव 'भाई जेठा' असे ठेवले. वयाच्या सातव्या वर्षी जेठाचे वडिल वारले. आपले आणि आईचे पोटभरण्यासाठी जेठा हरब-याचे चने (छोले) विकू लागले. आईचे छत्रही लगेच हरपले. अनाथ झालेला जेठा आपल्या नानी (आईची आई) जवळ वासरके येथे आला. आजोळी गरीब नानी देखील अनाथच होती. एकादशीच्या घरी महाशिवरात्र आली. असे असले तरी एकमेकांचे कोणी एक तरी आहे,हे समाधान कमी नव्हते. वासरके हे गुरू अमरदासांचे मूळ गाव होते. गुरूगादीवर अभिष्कित झाल्यावर अमरदासची गोयंदवाल येथे वास्तव्यास होते. जेठाच्या घरात दारिद्रय असेले तरी पारमार्थिक श्रीमंती होती. ही श्रीमंतीच त्यांना वारस्यात मिळाली. काळ लोटत होता. जेठा तरुण होत होता. त्याच्यातील अनुवांशिक पारमार्थिक ओढीने त्याचे पाय अमरदासांच्या गोयंदवालकडे वळू लागले. गोयंदवालमध्ये आपला चने विकण्याचा व्यवसाय केला,तर परमार्थही साधता येईल. हा विचार पक्का करून जेठा गोयंदवालला पोहचला. गोयंदवालमध्ये चणे विकणा-या या तरुण मुलाकडे गुरू अमरदासांचे लक्ष गेले. ते आपली धाकटी कन्या बीबी भानू /भानी/भानुमती हिच्या विवाहासाठी योग्य मुलाचा शोध घेत होते. जेठाला पाहून हाच तरूण आपला जामात होण्यास योग्य आहे,अशी साद त्यांच्या अंर्तमनाने दिली. त्यांनी मनातील प्रत्यक्षात आणले. एका अनाथाला शीख गुरूचा जामात होण्याची संधी मिळाली. आपले श्वसुर अमरदासजींनाच जेठा गुरू मानत होता. जामात झाल्यानंतर अमरदासजींनी जेठाला एक शिष्य म्हणून चांगले तावून-सलाखून घेतले. लंगरची व्यवस्था असो की अकबराकडे करावी लागलेली शिष्टाई अशा प्रत्येक परीक्षेत जेठा खरा उतरला. यामधून शीख धर्माला त्याचे चौथे गुरू मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. अमरदासांनी आपल्या अंतसमयी जेठाला गुरूगादीवर रामदास नावाने अभिष्कित केले. शिखांचे चौथे गुरू रामदासांचा कार्यकाळ केवळ सात वर्षांचा ठरला. असे असले तरी त्यांचे योगदान फार महत्वाचे ठरले. अमरदासजींच्या आदेशावरून दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी अडवल्या जाऊ शकेल, अशा खोलगट जागी एक नगर वसवण्याची आणि तेथे एक विशाल सरोवर निर्माण करण्याची,नगराच्या चोहोबाजूंनी वृक्ष लावण्याची कामगिरी जेठांवर सोपवण्यात आली. माणसांच्या पाण्याचा आणि पशु-पक्ष्यांच्या चा-याचा प्रश्न सोडवण्यासाठी, हे नगर निर्माण अमरदासजींना करायचे होते. आपल्या गुरूच्या आदेशानुसार जेठांनी अकबर बादशहाने त्यांची पत्नी भानीला दिलेल्या जहागीरीतील एक ठिकाण निवडले. त्याठिकाणी नगर वसवले आणि नगराच्या मधोमध एक मोठे सरोवर निर्माण केले. त्यांनी नगराचे नाव 'गुरू का चक्र' असे ठेवले. जेठाजी जेंव्हा गुरू रामदास म्हणून गुरूगादीवर आले, तेंव्हा हे नगर 'चक्र रामदास' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर हे शहर रामदासपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. रामदासजींच्या निर्वाणानंतर गुरू अर्जनदेवांनी रामदासपूरच्या सरोवराच्या मध्यभागी एका मंदिराची स्थापना केली आणि सरोवराचे नाव 'अमृत सरोवर' असे ठेवले. भविष्यात अमृत सरोवराला 'अमृतसर' असे संबोधले जाऊ लागले आणि रामदासपूर हे नगरच अमृतसर म्हणून इतिहासात अजरामर झाले. गुरू रामदासांनी अमृतसर वसवतांना आपला द्रष्टेपणा दाखवला होता. वायव्य भारतात स्वतंत्र शीख राज्याची स्थापना होण्यासाठी आणि शीख धर्माला बळकटी येण्यासाठी अमृतसर शहराचे निर्माण खूप महत्वाचे ठरले. कलकत्ता ते काबूल या प्राचीन व्यापारीमार्गावर अमृतसर वसलेले आहे. बुखारा,काबूल,पेशावर आणि काश्मिर येथून भारतात जाणा-या मालासाठी अमृतसर जकात ठाणे होते. रामदासजींनी अमृतसरमध्ये 'गुरू का बाजार' नावाने मोठी पेठ निर्माण केली आणि शहराचे व्यापारी महत्व वाढवले. महाराजा रणजिंतसिंह यांना शीख राज्यनिर्मितीसाठी या उत्पन्नाचा खूप लाभ झाला. अमृतसर शीख धर्माचे सर्वात प्रमुख तीर्थस्थान बनले,तरी गुरू रामदासांपासून गुरू गोविंदसिंहापर्यत कोणत्याच गुरूंचा पवित्र सहवास अधिक काळ अमृतसरला लाभू शकला नाही. कारण रामदासानंतर प्रत्येक गुरूंचे जीवन म्हणजे एक संघर्षमय प्रवास राहिला आहे. रामदासजींच्या अकबराशी झालेल्या मैत्रीचा लाभ शीख धर्मासाठी त्यांनी करून घेतला. बादशहाच्या मैत्रीमुळे शीख धर्मासाठी विविध सवलती त्यांना मिळवता आल्या. अमरदासजींच्या आणि रामदासजींच्या काळात शीख-मुस्लिम संघर्ष झाला नाही. उलट शीख धर्माच्या वाढीसाठी अकबरी धोरणांचा उपयोगच झाला, असे दिसून येते. 'दीन-ए-इलाही' हा हिंदू-मुस्लिम इत्यादी धर्मपरंपरांचा मेळ घालणारा धर्म स्थापन करण्याचा अकबर बादशहाचा प्रयत्न होता. यामुळे संत,महात्मे,पीर,फकिर यांच्याशी संवाद साधण्यात व त्यांच्या सहवासात राहण्यात बादशहाला विशेष रस होता. काबूलची स्वारी जिंकून परततांना अकबराने रामदासजींची भेट घेण्यासाठी अमृतसरला भेट दिली. पूर्वी त्याला भेटलेले भाई जेठा आता गुरू रामदास झाले आहेत. त्यांच्यातील बदलाची अनुभूती त्याला घ्यायची होती. त्याने लंगरसाठी देऊ केलेली १२ गावांची जहागीर त्यांना नाकारली आणि त्याने दिलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटून दिल्या. सत्ता-संपत्ती आणि संतत्त्व यांचा मेळ बसणे अशक्य आहे,हे त्याला स्पष्टपणे ऐकवले. पहिल्या तिन्ही गुरूंनी शीख संघटनासाठी लंगरला महत्व दिले. रामदासजींनी 'मसंद' अथवा गुरूदक्षिणा पद्धतीचा आरंभ केला. लंगरला सुनिश्चित आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचे काम मसंदमुळे झाले. प्रत्येक शिखाने आपल्या धर्मनिधी म्हणून आपल्या परीने मसंद देण्याची प्रथा यातून निर्माण झाली. इस्लाममध्ये अशाच धर्मनिधीला 'वक्फ' असे संबोधले जाते. शीख धर्माच्या प्रसारासाठी व मसंद प्रथेच्या बळकटीकरणासाठी गुरू रामदास, हे स्वतः लाहोरला जाऊन राहिले. तसेच अमरदासांचे पुतणे भाई गुरूदास यांना आग्रा येथे पाठवले. दूरदृष्टीच्या रामदासांनी धर्मप्रचारक म्हणून अनेकांना उत्तम प्रकारे तयार केले. धर्ममते लोकांना समजावून सांगणे,प्रश्नांची उत्तरे देतांना बाळगायची सावधगिरी,धर्माविषयीचे समज-गैरसमज दूर करणे,मेळावे घेणे,धर्मनिधी गोळा करणे असे कार्य त्यांचे धर्मप्रचारक करत. तसेच आपला अनुभव गुरूजींना येऊन सांगत,गुरूजी त्यांना अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करत. अशाप्रकारे मिळालेल्या अल्पावधीत गुरू रामदासांनी शीख धर्मासाठी दिलेल्या योगदानाला तोड नाही. १ सप्टेंबर १५८१ ला गुरू रामदासांचे निर्वाण झाले. त्यापूर्वी त्यांनी पाचव्या गुरूंची नियक्ती केली होती,मात्र तोपर्यंतची परंपरा बदलली होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment