रंगेल सेनापती आणि विजयपर्वाचा प्रारंभ
नवा कोरा सरसेनापती अमेरिकन क्रांतीसेनेच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटिश सैन्याला मिळाला होता. तो म्हणजे जॉन बरगोईन. त्याच्या आगमनाने ब्रिटिश सैन्यात नवे चैतन्य संचारले होते. क्रांतीसेनच्या विरोधात अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नव्हे, तर मौजमस्ती करण्यासाठी हा नवा जोश ब्रिटिश सैन्यात ओसंडून वाहत होता. सरसेनापतीच रंगेल असेल तर त्याच्या रंगेलपणात सैन्य रंगणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. जॉन बरगोईन याने अमेरिकेत ब्रिटिश सैन्याचे सूत्र हाती घेतल्यानंतर पहिले फरमान काढले. त्यानुसार फौजेने कूच करताना अधिका-यांसोबत त्यांच्या कुटुंबियांना नेण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे सेनेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कोणत्याही सैन्याचे लढणे आणि जिंकणे हे सर्वात महत्वाचे लक्ष असते. कुटुंबकबिला घेऊन निघालेल्या सैन्याचे पानिपत झाल्याशिवाय राहत नाही. जगाचा इतिहास याला साक्ष आहे. बरगोईनच्या आदेशात त्याचा रंगेलपणा दडलेला होता. यामुळे ब्रिटिश सैन्याचे ध्येय बाजूला पडले आणि सैन्य मौजमजेत रंगून गेले. नाच,गाणी आणि मेजवा...