पराभव पर्व...
१५ सप्टेंबर १७७६ ला न्यूयॉर्क शहर जागे झाले ते ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीच्या धडाडणा-या तोफांनी. हिवाळयाचा प्रारंभ असणा-या सप्टेंबर महिन्यातील या थंड सकाळी न्यूयॉर्क भाजून निघू लागले. जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या बंकर हिलच्या विजयाने बोस्टन गमावून पळून गेलेला ॲडमिरल होवेला अमेरिकन सैन्याला धडा शिकवणे अपरिहार्य झाले होते. तसे पाहिले तर जनरल होवे हा माणूस अमेरिकन क्रांतीसैन्य आणि जनता यांच्याविषयी आत्मियता बाळगणारा होता. आपल्यातील आणि अमेरिकनांमधील समान धाग्याविषयी त्याला जिव्हाळा होता. अमेरिकन जनतेला केवळ घाबरवणे आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याने कायम आपली भूमिका नरमच ठेवली होती. बंकर हिलचा बदला घेण्यासाठी न्यूयॉर्कला जमिनदोस्त करण्याची त्याची ईच्छा नव्हती;परंतु ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती म्हणून त्याला त्याच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे अपरिहार्य होते. न्यूयॉर्क वर आक्रमण करण्यापूर्वी ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार जनरल होवे याने क्रांतीसेनेच्या नेत्यांसोबत एक शांतीवार्ता केली होती. ही शांतीवार्ता जरी ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार असली तरी जनरल होवेला मनापासून युद्ध थांबावे आणि काही तरी तोडगा निघावा असे मनापासून वाटत होते. यासाठी ११ सप्टेंबर १७७६ रोजी त्याने एका भव्य मेजवानीचे आयोजन केले. मेजवानीसाठी कॉटिनेंटल काँग्रेसच्या सभासदांना आमंत्रित करण्यात आले. ॲडमिरल होवने ब्रिटिश सरकारचा शांती प्रस्ताव सर्व नेत्यांसमोर मांडला,त्यानुसार कॉटिनेंटल काँग्रेसने आपला स्वातंत्र्याचा जाहीरनामा मागे घ्यावा आणि इंग्लंडची राजसत्ता मान्य करावी. असे केल्यास ब्रिटिशांकडून लष्करी कारवाई थांबण्यात येईल आणि अमेरिकन जनतेची मनुष्यहानी व अमेरिकेचा पराभव टळेल. प्रस्तावाचा बारकाईने विचार केल्यास असे लक्षात येते की अमेरिकेने बिनर्शत शरणागती पत्कारावी असे ब्रिटिनच्या राजाने आणि संसदेने ॲडमिरल होवेच्या माध्यमातून अमेरिकन नेत्यांना सुनावले होते. तसेच ब्रिटिश सत्तेसमोर त्यांचा टिकाव लागणार नाही,अशी भीती दाखवली होती. पण जगातील क्रांत्यांचा इतिहास सांगतो, क्रांती करायला निघालेले सत्तेसमोर प्रथमतः दुबळे व असंघटित असतात. त्यांच्यातील वेडेपण व झपाटलेपण मात्र कोणत्याही बलाढय सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते. कोणतीही क्रांती कोणा एखादयाच्या किंवा मोजक्या लोकांच्या मनात आल्याने जन्माला आलेली नसते. ती त्या समाजाची समूह भावना असते जी काही धाडसी आणि वेडयालोकांच्या माध्यमातून साकार झालेली असते. वेडेच असले धाडस दाखवू शकतात,कारण तथाकथित शहाण्यांना सुखी प्रपंच अबाधित ठेवत स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे जगातील कोणत्याही क्रांतीचे नेते वेडेच राहिलेले आहेत. जगाचा इतिहास म्हणजे हया वेडयांच्या गाथाच म्हणाव्या लागतील. सगळया जहागिरदार-सरजांमदार यांच्याप्रमाणे समजूतदार विचार शिवरायांनी केला असता, तर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पावन झालेली मराठी माती म्हणून तीला मोठया अभिमानाने कपाळाला लावण्याचे भाग्य आपल्या भाळी नसते. शिवछत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न म्हणजे कातडी बचाव वागणा-या सर्व शहाजोगांच्या दृष्टीने वेडेपणा आणि झपाटलेपणाच होता. आज शिवरायांचे पोवाडे गाणे सोपे आहे;परंतु शिवराय होणे आजही तेवढेच अवघड आहे. त्यांचे धाडस आणि झपाटलेलेपण नकळतपणे क्रांतीला सशक्त व समर्थ करत जाते. त्यानंतर समाजाचा असहकार कोणत्याही सत्तेला नामोहरण करतो. ॲडमिरल होवे कॉटिनेंटल काँग्रेसच्या वेडयांना शहाणे करू शकला नाही. शांतीवार्ता असफल ठरली. ॲडमिरल होवेसमोर आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. क्रांती करायला निघालेल्या वेडयांना सत्तेच्या सामर्थ्यासमोर आपल्या दुर्बलतेची कणभर जाणीव नव्हती. त्यांच्या क्रांतीसेनेचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टनला याची प्रचीती लवकरच येणार होती. त्यापूर्वी तशी ती येण्यास सुरवात देखील झाली होती. २१ ऑगस्ट १७७६ रोजी होव बंधूंनी आपली फौज लाँग आयलंडवर उतरवून अमेरिकन क्रांतीसेनेला एक दणका दिलेला होता. लाँग आयलंडवर त्यांना कोणीही फारसा विरोध केला नाही. त्यानंतर ब्रिटिश् सेनेनी ब्रुकलनीकडे कूच केली ब्रुकलीनमधील अमेरिकन क्रांतीसेनेची इत्यंभूत माहिती ब्रिटिशांना मिळाली होती. त्यामुळे अमेरिकन क्रांतीसेनेच्या कमकुवत बाजूंवर जोरदार हल्ला करत,ब्रिटिश सैन्याने आघाडी घेतली. ब्रुकलीनमधील अमेरिकन सैन्य शक्ती ब्रिटिशांनी आता पुरती जोखली होती. त्यांनी ब्रुकलीनमधील अमेरिकन सेनेची अत्यंत निदर्यपणे व क्रुरपणे कत्तल आरंभली. एकही सैनिक वाचणार नाही, याची खबरदारी घेतली. जॉर्ज वॉशिंग्टनची सेना पुरती कोलमडून पडण्याच्या बेतात होती. अशावेळी मेरिलँडच्या ४०० बहाद्दर सैनिकांनी जीवाची बाजी लावली. ४०० पैकी केवळ ९ सैनिक शिल्लक राहिले. तरी ते हटले नाही. मेरिलँडच्या योद्धयांच्या अतुलनीय शौर्याने जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या उर्वरित सैन्याला यशस्वी माघार घेता आली आणि सुरक्षित ठिकाणी पोहचता आले. शांतीवार्ता फसल्यानंतर चार दिवसांनी रॉयल नेव्हीचा कहर न्यूयॉर्कच्या भूमीवर बरसू लागला. फोनिक्स जहाजाच्या नेतृत्वात ब्रिटिश आरमारी बेडा ब्रिटनच्या सामारिक शक्तीचे दर्शन घडवू लागला. प्रथमतः ॲडमिरल होवे न्यूयॉर्कवर थेट हल्ला करण्याच्या मताचा नव्हता. बंकर हिलच्या दारूण पराभवामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. ॲडमिरल होवेने यावेळेस अत्यंत सावध पवित्रा घेतला. त्यानुसार जनरल हेन्री क्लिंटन याला होवेने ईस्ट नदीच्या उत्तरेस असणा-या 'किप्स बे' याठिकाणी फौजा उतरवण्याचा आदेश दिला. नेमक्या किप्स बे येथेच अमेरिकन फौजा आपली मोर्चाबांधणी करत होत्या. बंकर हिलपेक्षा येथे परिस्थिती विपरित होती. ब्रिटिश फौजांना कव्हर देण्यासाठी त्यांचे आरमान येथे सज्ज होते. जनरल हेन्री क्लिंटनचे सैन्य छोटया होडयांमधून ईस्ट नदी पार करत जेंव्हा किना-याकडे पोहचत होते,तेंव्हा फोनिक्स आणि इतर जहाजांनी अवघ्या एक तासात सुमारे २५०० तोफगोळयांचा भडीमार करत त्यांना कव्हर दिले. युद्धाचा असला रूद्रावतार अमेरिकन सैन्याने पहिल्यांदाच अनुभवला. आतापर्यंत ब्रिटिश सैन्याशी त्यांच्या किरकोळ चकमकी किंवा छोटया लढाया केल्या होत्या. रॉयल नेव्हीच्या तोफखान्यासमोर अमेरिकन तोफखाना म्हणजे केवळ विनोदच म्हणावा लागेल. त्यामुळे ब्रिटिश सैन्य किना-यावर पोहचेपर्यंत अमेरिकन सैन्याने तेथून पळ काढला होता. ज्या सैन्याने जनरल जॉर्ज वॉशिंग्टन आणि अमेरिकन जनतेला काही दिवसांपूर्वी गौरवाचा क्षण अनुभवण्यास दिला होता,आज तेच सैन्य रणांगणातून पळून गेले होते. वॉशिंग्टन यांनी याच सैन्याला काही दिवसांपूर्वी त्याच्या पराक्रमाबद्दल शाबासकीची थाप दिली होती. आज मात्र त्याच वॉशिंग्टन यांना त्यांच्या संरक्षकांनी सुरक्षित स्थळी नेले नसते,तर ते ब्रिटिश सेनेच्या हाती लागले असते. पुढे सुमारे दोन महिने न्यूयॉर्क मध्ये युद्ध सुरू होते. अमेरिकन सैन्याला न्यूयॉर्क वाचवण्यसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली. ३६०० सैनिकांचे बलिदान आणि ३०० अधिकारी व ४००० सैनिक बंदी अशी गत अमेरिकन सैन्याची झाली. हे ४००० हजार युद्धकैदी रॉयल नेव्हीच्या जुन्या आणि वापरात नसलेल्या जहाजांवर कैदेत ठेवण्यात आले. साखळदंडांमध्ये जखडलेले युद्धकैदी आणि अत्यंत वाईट अवस्थेतील जहाजावरील कारागृह ही परिस्थिती अत्यंत विदारक होती. तहान,भूक आणि घुसमट याने यातील अनेकांचा मृत्यू झाला. युद्ध काळातील मॅनहटन भागात मोठी आग लागून ५०० इमारती जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी न्यूयॉर्क शहर अशाच मोठया आगीच्या भक्षस्थानी पडले. तेंव्हा न्यूयॉर्क म्हणजे राखेचा ढिग अशी अवस्था झाली होती. या दोन्ही आगी नेमक्या तोफांच्या मा-यामुळे लागल्या की ब्रिटिश सत्तेला विरोध करणा-यांची अवस्था काय होते ? हे दाखवण्यासाठी लावण्यात आल्या. याबद्दल इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. न्यूयॉर्कचा पराभव हा अमेरिकन स्वातंत्र्य लढयातील सर्वात मोठा पराभव आणि कलंक समजला जातो. आपल्याच लोकांविरूद्ध ब्रिटिशांनी क्रौर्याची परिसीमा येथे गाठली. न्यूयॉर्कच्या लढाईचा शेवट ११५०० अमेरिकन युद्धकैदयांचा तुरुंगात बळी घेऊन झाला. क्रांतीसेनेचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आता हताश आणि हतबल होता. माघार घेऊन पळ काढण्याव्यतिरिक्त त्याच्यासमोर कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. न्यूयॉर्कचा दारूण पराभव झाला होता. वॉशिंग्टनची सेना पराभवाने गलितगात्र झाली होती. क्रांतीसेनेत बेशिस्त व अंधाधुंदी माजली. ज्यांचा कार्यकाळ संपला ते सैनिक पळून जाऊ लागले. बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याऐवजी जॉर्ज वॉशिंग्टन काहीच करू शकत नव्हते. आपल्या उरलेल्या सेनेला एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर राहिला होता. अखेर न्यू जर्सी ओलांडून ते डेलावेअर नदीच्या पैलतीरवर पोहचले. ब्रिटिश सेना अत्यंत वेगाने त्यांच्या पाठलाग करत होती. सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या मागे चालणारे ३००० जीर्णशीर्ण लोक म्हणजे अमेरिकन क्रांतीसेना. अशा अवस्थेत कितीही सक्षम सेनापती असला तरी त्याला काही काळ तरी सर्वबाजूंनी अंधार दिसणे स्वाभाविक आहे. असे असले तरी जॉर्ज वॉशिंग्टनचे नाव जगातील श्रेष्ठ सेनापतींमध्ये कायमचे कोरण्यासाठी ही परिस्थितीच कारणीभूत ठरणार होती. अमेरिकन क्रांतीचा महानायक म्हणून त्याची खरी वाटचाल येथूनच सुरू होणार होती. पराभवाच्या घनदाट अंधःकारात विजयाची पहाट उगवणारा किरण त्याला शोधावा लागणार होता. त्याच्या आशेचा किरणच अमेरिकेला स्वातंत्र मिळवून देणार होता आणि त्याला जॉर्ज वॉशिंग्टन ठरवणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
अतिशय रोमांचक आणि चित्तथरारक इतिहास... आणखी आणखी वाचत राहावे अशी शब्द शैली आपणास लाभली आहे.. अभिनंदन..
ReplyDeleteBeautiful. I read this history for the first time. before this, George Washingtomn was just a name!
ReplyDelete