परुष्णी काठी लागली समाधी

ऋग्वेदात राजा सुदास याचे दहा राजांशी युद्ध झाले,असा उल्लेख आढळतो.  यालाच दाशराज्ञ युद्ध असे संबोधले जाते.  या युद्धामुळे संपूर्ण उत्तर भारतावर आर्यांचा हक्क प्रस्थापित झाला.  असे ही सांगितले जाते.  हे युद्ध लढले गेले परुष्णी किंवा इरावती नदीच्या काठावर.  ज्या नदीला आपण आज रावी असे संबोधतो.  दाशराज्ञ युद्धापासून आजवर रावीचा प्रवाह कायमच रक्तात न्हाऊन निघाल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे.  अशा परुष्णी काठी वसलेल्या देवनगरीत सोळाव्या शतकात म्हणजे २२ सप्टेंबर १५३९ ला एका महात्म्याने देह ठेवला.  शिष्यांचा निरोप घेतांना महात्म्याने आपल्या एका शिष्यावर स्वतः निर्माण केलेल्या प्रकाशमार्गावर इतरांचे सारथ्य करण्याची जबाबदारी सोपवली.  त्याला गुरूगादीवर बसवले.  दुस-या शिष्याच्या हातून नव्या गुरूला तिलक लावून,त्याला सद्गुरू म्हणून अभिषक्त केले.  हा विधी पूर्ण झाल्यावर महात्म्याने स्वतः नव्या गुरुंपुढे पाच पैसे आणि एक नारळ गुरुदक्षिणा म्हणून ठेवले.  मग त्याच्या चरणावर मस्तक ठेवून 'सिक्ख गुरू' म्हणून त्याला प्रणिपात केला.  गुरू असलेल्या महात्म्याने आपल्या शिष्याला गुरूपदी बसवणे आणि त्याला वंदन करणे म्हणजे,'जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो  ' या कवी बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्तींचा साक्षात प्रत्यय.  हा महात्मा यावरच न थांबता  आपला शेवटचा संदेश देतांना नवीन गुरुंना उद्देश्यून म्हणाला,' गुरूजी,आता मी पूर्णपणे मुक्त झालो.  तुम्ही आता आम्हा सा-यांचे सद्गुरू झालात.  तुम्ही लेहणा होतात.  आजवर तुम्ही पुष्कळ देणे-घेणे केलेत.  आता तुम्ही तुमच्या शिष्यांना सारे काही देणार आहात.  तुम्ही फार मोठी जबाबदारी पत्कारली आहे.  तुम्ही ती निश्चितपणे चांगल्या रीतीने पार पाडणार आहात. तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी सिक्ख येतील.  तुम्ही त्यांना योग्य ते सांगत राहाल.  त्यांच्याकडून योग्य ते करवून घ्याल.  ईश्वराचे अखंड नामसंकिर्तन ही आपली प्रमुख साधना आहे.  सा-यांनी बंधुभावाने वागून सज्जन सदाचारी शिष्यांचे संघटन करायचे हा आपला ध्येयवाद आहे.  त्यासाठी जे जे मार्गात आडवे येईल ते दूर करायचे.  चांगल्यांना बरोबर घ्यायचे.  वाईटाला प्रथम बदलायची संधी द्यायची.  सा-यांनी सा-यांसह चांगल्या मार्गाने प्रगती करायची.  आदर्श सिक्ख व्हायचे.  हे सारे आता तुम्ही करवून घ्यायचे.  जातो आम्ही,तुम्ही प्रथम आम्हाला निरोप द्यावा.  परवानगी द्यावी.'  स्वतः तयार केलेल्या पायावर एका नव्या धर्मामंदिराची पहिली विट रचल्यावर 'आम्ही जातो आमच्या गावा,' अशा शब्दात आपल्या शिष्यांचा निरोप घेणा-या या वात्सल्यमूर्तीचा वियोग शिष्यांसाठी अपार वेदनादायक होता.  यावर महात्म्याने आपल्या शिष्यांना आपल्या जीवनदर्शनाचा सार सांगितला,' आपली ईश्वरतत्त्वाशी जुळलेली स्नेहसोबत कदापि संपता कामा नये.  ती सोबत असतांना आपण संपलो तरी चालेल.  नव्हे,तेच आनंदाचे आहे.' अशा अत्यंत स्नेहार्द शब्दांनी शोकाकुल शिष्यांचे सांत्वन केले.  आपल्या गुरूमाऊलीचा अंत्यसंस्कार कोणत्या धर्माच्या रिवाजानुसार करायाचा याबद्दल शिष्यांमध्ये वाद सुरू झाला.  कारण त्यांचा गुरू 'हिंदू का गुरू,मुसलमान के पीर,' म्हणून सर्वांना प्रिय होता.  त्यामुळे दहन की दफन यावर झगडा सुरू झाला.  आपण ज्या सौहार्दासाठी आयुष्य वेचले,त्याच जीवनसाधनेला आपले शिष्य  विरहाने बुद्धीभ्रष्ट होऊन विसरतील याची जाणीव महात्म्याला होती.  त्यानेच अखेर यावर तोडगा काढला.  त्यानुसार त्याने सांगितले की,'माझ्या मृत्यूनंतर हिंदू-मुसलमानांनी माझ्या डाव्या-उजव्या बाजूला आपापली श्रद्धा-सुमने अर्पित करावीत.  सकाळपर्यंत ज्यांची अर्पण केलेली फुले टवटवीत राहतील,त्यांनी आपल्या रिवाजानुसार माझा अंत्यसंस्कार करावेत !' अशी सूचन करून अखेर  या महात्म्याचा देह परूष्णीच्या काठावर अथांग मौनात विसावला.  गुरुंच्या आदेशानुसार मृतदेहाच्या डाव्या बाजूला मुसलमान बांधवांनी आणि उजव्या बाजूला हिंदू बांधवांनी फुले अर्पित केली.  सकाळी गुरूजींच्या शवावरील चादर बाजूला करण्यात आली तेव्हा पार्थिव शरीर अपार्थिवाकडे गेलेले होते.  चादरीखाली केवळ फुलेच होती.  हिंदूमुसलमान दोन्ही शिष्यांनी अर्पण केलेली फुले टवटवीत होती.  दोन्ही जमातीच्या शिष्यांनी आपापली फुले नेली आणि आपल्या रीतीने अंत्यसंस्कार केले.  देवनगरी कर्तारपूरमध्ये ही घटना घडली.  परुष्णीच्या काठावर त्या महात्म्याची म्हणजे गुरू नानकदेवांची चिरंतन समाधी लागली होती.  गुरू नानकदेवांच्या निर्वाणाची कथा लौकिकार्थाने घेण्याऐवजी त्यातील गर्भित अर्थ शोधणे महत्वाचे आहे.  कथेची सत्यासत्यता पडताळण्यासाठी विवेकवादी वा विज्ञानवादी बुद्धी खर्च करण्यापेक्षा नानकदेवांचा बंधूभावाचा,एकात्मतेचा,त्यांच्या धर्मतत्त्वांच्या आचरणाचा व चिरंतनतेचा  आणि कर्मकांडाच्या व्यर्थतेचा संदेश येथे समजावून घेणे महत्वाचे आहे.  आपल्यानंतर गुरूपदाचा मान आपल्या सर्वाथाने योग्य शिष्याला देण्याची त्यांच्या मनाची विशालता. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार समजण्यास पुरेशी आहे.  शब्द वापरण्यासाठी दांभिकता पुरेशी आहे,परंतु कृतीसाठी मात्र मनाची विशालता महत्वाची आहे.  नानकदेवांनी असा पाया रचला म्हणूच गुरू गोविंदसिंग ग्रंथाला चिरंतन गुरूपद बहाल करू शकले.  नानकदेवांनी आपले शिष्योत्तम भाई लेहणा यांच्यातील नव्या धर्मपरंपरेविषयी असणारी अढळ निष्ठा आणि नेतृत्व क्षमता ओळखून त्यांना गुरूपदावर बसवले,अन्यथा एखादयाने आपल्या दोन पुत्रांचा विचार केला असता.  नानकदेवांनी आपल्या जीवनाची संध्याकाळ आपले कुटुंब आणि शिष्य परिवार यांच्यासोबत कर्तारपूरमध्ये अत्यंत समाधानपूर्वक व्यतीत केली.  सततच्या पदयात्रेने शरीर श्रमले होते.  दोन शरीर आणि एक आत्मा अशा भावाने ज्यासोबत जीवनातील प्रत्येक संघर्षाला ते सामोरे गेले ते भाई मरदाना देखील त्यांना सोडून गेले होते.  दरम्यान मातापित्यांचे निधन झाले.  त्यामुळे बालपण हरवल्याच्या आणि पोरक झाल्याच्या तीव्र वेदनेने नानकदेवांसारख्या महात्म्याला देखील पारखे ठेवले नाही.  प्रौढपणाची जाणीव वाढली आणि वृद्धत्वाची चाहूल लागली.  कर्तारपूर आणि आसपासचा परिसर आता त्यांची नवी कर्मभूमी होती.  कर्तारपूरचा आश्रम म्हणजे निवांत जगण्याची सोय असे नानकदेवांनी कधीच मानले नाही.  त्यांच्यातील बळीराजा येथे पुन्हा त्यांच्या मदतीला आला.  कर्तारपूरमध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर नानकदेव शेतकरी होत होते.  स्वतः जमिनीत घाम गाळून अन्न पिकवत होते.  शीख धर्माच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. कमलजीतकौर बत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जेंव्हा कर्तारपूर साहिबला भेट दिली  तेंव्हा तेथील लंगरमधील प्रसादाला एक कधीच न अनुभवलेला स्वाद होता.  आपल्या रोजच्या भोजनातीलच पदार्थ होते,परंतु प्रत्येक पदार्थाची चव अवर्णनीय होती.  याचे कारण विचारले असता,असे कळले की नानकदेवांच्या हातचे शुद्ध देशी  बियाणे तेथे कोणताही संकर न होऊ देता जतन करण्यात आले आहे.  त्यामुळे आपल्यासारखे संकरीत अन्न खाणारे,त्या अस्सल स्वादाशी अपरिचित असणारच.  शेतीचे काम आटोपले की नानकदेव माणसांच्या मनांच्या मशागतीसाठी आपल्या काही शिष्यांसह परिसरातील एखादया गावी जात.  गावच्या पारावर संगत बोलवत,तेथे आलेल्या शिष्यांची वास्तपुस्त करत आणि त्यांना चार हिताच्या गोष्टी सांगत.  नाममहिमा,नामस्मरण,सृष्टीकडे व जीवनाकडे पाहण्याची नेमकी दृष्टी,सामाजिक सलोखा,बंधूता,श्रमपूर्वक उदरनिर्वाहाचे महत्व अशा आचरणात आणण्यास अत्यंत सुलभ-सुगम गोष्टींचे मार्गदर्शन म्हणजे नानकदेवांचे प्रवचन.  त्यांच्या प्रवचनातील तत्त्वज्ञान काव्यात सगुण साकार होत असे आणि संगीताच्या तालात वातावरण मंत्रमुग्ध होत असे.  संगतमध्ये सहभागी न झालेल्या लोकांची विचारपूस करण्यास आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यास नानकदेव स्वतः जात असत.  तत्कालीन समाजाचा विचार करता धर्मभेद,वर्णाधिष्ठित समाज,जातीगत उच्च-निचता,स्त्री-पुरुष असमानता,अज्ञान इत्यादी अनेक कारणांनी कोणीही ख-या धर्मापासून वंचित राहू नये हा नानकदेवांचा प्रयत्न होता.  अज्ञानाच्या अंधःकारात धडपडणा-या समाजाला त्यांना प्रकाशाकडे घेऊन जायचे होते.  अनघड पाषाणांमधून सुंदर शिल्प घडवायचे होते.  त्यामुळे संवाद हाच त्यांच्या जनजागरणाचा मार्ग होता.  आपण श्रेष्ठ,ज्ञानी,पंडित,उपदेशक असा कोणताही भाव त्यांच्या संवादात नव्हता.  एवढेच नव्हे तर त्यांचे व्यक्तिमत्वचमुळी एका प्रेमळ माता-पित्याच्या भावांचे समतोल मिश्रण होते.  लोकांमध्ये वावरणारा व विरघळणारा हा महात्मा होता.  त्यांच्यासाठी माणूस महत्वाचा होता.  त्यांना माणूस बदलवयाचा होता नव्हे तर त्याला माणूस करायचे होते.  त्यामुळे कायम त्यांनी लोकशिक्षकाची भूमिका पार पाडली.  जीवनाच्या अखेरच्या पर्वातही त्यांनी समाजातील ढोंग,दंभ,शोषण,कर्मकांड,भेदभाव यांच्याविरूद्ध आपला लढा कायम ठेवला.  यासाठी त्यांनी हिंदू असो का मुसलमान कोणत्याही धर्माच्या ठेकेदाराशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहिले नाही.  अखेरच्या काळात नानकदेवांचा वावर पंजाबपुरता मर्यादित राहिला.  त्यामुळे अचलबाटला,मुलतान अशा पंजाब प्रांतातील प्रमुख गावांशी निगडीत अनेक घटना त्यांच्या जीवनसंध्येच्या क्षितीजावर दिसून येतात. नानकदेवांचा जन्म आणि निर्वाण अनुभवणारा रावीचा प्रवाह आणि तीच्या काठावरील माती धन्य झाली. याच रावीच्या तीरावरल्या कर्तारपूरमध्ये कायमचा विसावा घेऊन अपार्थिवाच्या प्रवासाला गेलेल्या नानकदेवांसाठी निश्चितच रावीचा प्रवाह अडखळला असेल आणि तिचे काठ पाणावले असतील.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      

Comments

  1. अतिशय हृदयस्पर्शी तितकाच समतेचा पुरस्कार करणारा लेख..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !