महात्म्याचा खरा वारसदार
अमृतसर जिल्हयातील खेडूर गावातील चौधरी लेहणा,एके दिवशी पहाटे शेजार-याच्या घरातून येणा-या सुमधुर संगीतमय सुरांनी जागे झाले. त्यांच्या लक्षात आले की त्यांचा शेजारी जोधा कोणते तरी भजन गात आहेत. त्या स्वरांनी आकर्षित झालेले चौधरी लेहणा जोधाच्या घरात पोहचले. एवढया पहाटे स्नान करून प्रसन्न चित्ताने भजन करत असलेला जोधा त्यांना दिसला. तो गात असलेल्या पदांमध्ये चौधरी लेहणांना अलौकिकत्वाचा स्पर्श जाणवला. पदांमधील शब्दांनी आणि त्यांच्या अर्थानी लेहणांच्या अंतरमनात ते खोलवर उतरत गेले. त्याचे भजन संपल्यानंतर लेहणांनी जोधाला तो कोणती पदं गात असतो,याविषयी चौकशी केली. यावर जोधाने सांगितले की तो गुरू नानकदेवांचा शिष्य आहे आणि ही पदे म्हणजे त्यांची गुरूवाणी आहे. गुरूवाणीने देवीभक्त असलेल्या चौधरी लेहणा यांच्या मनाचा ताबा घेतला होता. नानकदेवांचे दर्शन घेण्याची आणि त्यांची गुरूवाणी प्रत्यक्षात ऐकण्याची ओढ त्यांचा मनाला लागली. त्यांचे पिता फेरुमल खत्री यांच्याकडून चिन्तपूर्णी आणि ज्वालादेवी यांची भक्ती त्यांना वारस्यात मिळाली होती. पंजाबमधील फिरोजपूर जिल्हयातील 'मत्ते की सराय' गावातील एक छोटे दुकानदार फेरुमल खत्री आणि त्यांची पत्नी रामो (दयाकौर/मनसादेवी/सभीराई या नावाने देखील त्यांचा उल्लेख होता.) यांच्या पोटी ३१ मार्च १५०४ रोजी एक पुत्राचा जन्म झाला. ज्याचे नाव त्यांनी लेहणा असे ठेवले. दुकानदारी व व्यापार यामुळे फेरुमल यांचे कुटुंब गावातील एक प्रतिष्ठितांमध्ये गणले जात होते. त्यांच्या सधनतेने गावचा जहागिरदाराची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. फेरुमल यांची संपत्ती जप्त करण्याची दुष्ट योजना त्याने बनवली. त्याच्या योजनेची खबर लागताच फेरुमल रातोरात अमृतरसर जिल्हयातील खेडूर या गावी आपल्या बहिणीकडे परिवारासह निघून गेले. उद्यमी फेरुमलांनी खेडूरमध्ये किराणा दुकान टाकले. सचोटीने व्यवसाय करण्याचा त्यांचा पिंड असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाची लवकरच भरभराट झाली. खेडूर गावात देखील ते प्रतिष्ठित व सधन म्हणून ओळखले जाऊ लागले. जानेवारी १५२० मध्ये फेरुमलांनी आपला पुत्र लेहणा याचा विवाह त्याच गावातील देवीचंद खत्री यांची कन्या खीवीसोबत करून दिला. आपल्या पित्यासोबत चिन्तपूर्णी आणि ज्वालादेवी यांच्या दर्शनाला बालपणापासून जाणा-या लेहणाला देवीच्या भक्तीचे बाळकडू मिळाले होते. गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर पित्याचा व्यवसाय आणि देवीभक्ती अशा दोन्ही गोष्टी लेहणाने अत्यंत सचोटी व निष्ठेने सांभाळल्या. लेहणा एक कर्तबगार व्यक्ती म्हणून खेडूर पंचक्रोशीत ओळखला जाऊ लागला. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक चौधरी या बिरूदाने त्याचा आदरपूर्वक उल्लेख करू लागले आणि लहणा आता चौधरी लेहणा म्हणून ओळखले जाऊ लागले. आपला शेजारी जोधाच्या मुखातून गुरूवाणीचे श्रवण आणि गुरू नानकदेव यांच्या महतीचे कथन ऐकून चौधरी लेहणा नानकदेवांच्या भेटीसाठी आतुर झाले होते. त्यांची देवीभक्ती अढळ असली तरी त्यांचे मन कायत बैचेन असायचे. आपण करत आहोत ती खरोखरच भक्ती आहे की केवळ कर्मकांड आहे,या विचाराने ते अस्वस्थच असत. त्यांच्या मनात ख-या धर्ममार्गाविषयी ओढ व जिज्ञासा होती. नानकदेवांची माहिती मिळाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष नानकदेवांना भेटण्याचा योग चौधरी लेहणांना लवकरच प्राप्त झाला. जोधाशी चर्चा केल्यानंतर थोडयाच दिवसात नवरात्री उत्सव आला. नेहमीप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी चौधरी लेहणा काही गावक-यांसोबत निघाले. त्यांच्या मार्गात नव्याने वसलेले कर्तारपूर लागत होते. कर्तारपूरमध्ये एका ठिकाणी गर्दी पाहून चौधरी लेहणा आणि त्यांचे सहप्रवासी थबकले. चौकशी केली असता असे समजले की प्रत्यक्ष नानकदेव तेथे गुरूवाणी गात होते आणि उपदेश करत होते. नानकदेवांच्या अमृतवाणीत चौधरी लेहणा न्हाऊन निघाले. त्यांचे मन शांत-शांत होत आहे,याची जाणीव त्यांना अंचबित करत होती. अलौकिक,सहज आणि सात्विक वाणीच्या प्रवाहात वाहत देवीभक्त चौधरी लेहणा 'एक तुही निरंकार' सांगणा-या नानकदेवांच्या चरणात कधी येऊन पोहचले हे त्यांनाही समजले नाही. नानकदेवांचे प्रवचन संपल्यावर चौधरी लहणांनी त्यांचे चरण धरले आणि आपणास शरण देण्याची गळ घातली. नानकदेवांच्या चरणांवर डोके ठेवलेले चौधरी लेहणा म्हणाले,' गुरूजी,आज अनेक वर्ष भटकल्यानंतर आपल्या रुपात मला सद्गुरूची प्राप्ती झाली. आता आपल्या चरण म्हणजेच माझे जीवन.' मोरपिस फिरल्याप्रमाणे नानकदेवांचा स्नेहपूर्ण हात चौधरी लेहणांच्या डोक्यावरून फिरला आणि नानकदेवांनी एवढेच सांगितले,' आजपासून तू कर्तारपूरच्या लंगरचा व्यवस्थापक.' त्याक्षणी चौधरी लेहणा हे भाई लेहणा झाले. भाई लेहणांनी पत्नी,दोन पुत्र-दोन पुत्री आणि सधन परिस्थिती अशा सगळया लौकिक पाशांवर तुळशीपत्र ठेवले. आपल्या सहप्रवासी गावक-यांना त्यांनी पुढील यात्रेला जाण्यासाठी निरोप दिला. गावक-यांनी यात्रेला नका येऊ; परंतु गावी तरी परतावे अशी विनंती केली. भाई लेहणांनी त्याला साफनकार दिला. थोडयाच दिवसात आपली सेवा,विनम्रता आणि उदारता यामुळे नानकदेवांचे परमशिष्य म्हणून ते ओळखले जाऊ लागले. नानकदेवांनंतर गुरूगादीवर बसण्याचा मान त्यांचे दोन पुत्र श्रीचंद व लक्ष्मीचंद यांच्यापैकी एकाला मिळावा असा दबात कुटुंबातून आणला जात होता. नानकदेवांनी मात्र मनोमन आपला उत्तराधिकारी म्हणून भाई लेहणांची निवड केली होती. कारण त्यांना गुरूगादीवर बसण्यासाठी पुत्रापेक्षा पात्रता महत्वाची होती. त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सारच त्याच्यात होते. पुत्रप्रेमापायी भक्तीमार्गातील श्रेष्ठता नाकारतील ते नानकदेव कसले. हाडं गोठवणा-या थंडीच्या एका रात्री नानकदेवांनी एक परीक्षा घेतली. त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावले आणि सांगितले की,'माझे हे वस्त्र अत्यंत मळलेले आहेत. ते मला उदया परिधान करायचे आहेत. तुम्ही नदीवर जा आणि हे कपडे धूवून-वाळवून मला सकाळी घालण्यासाठी तयार करा.' श्रीचंद आणि लक्ष्मीचंद दोघांनीही कडाक्याच्या थंडीचे कारण देत ते काम नाकारले आणि ते झोपण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांच्या शेजारच्या खोलीत झोपणा-या भाई लेहणांना नानकदेवांनी ते काम सांगितले. एक चकार शब्द न उच्चारता गुरुजींना वंदन करत त्यांनी ती वस्त्रे उचलली आणि ते नदीवर गेले. अत्यंत भक्तीभावाने त्यांनी ती वस्त्रे धुतली-वाळवली आणि सकाळी गुरूजींना परिधान करण्यासाठी दिली. वस्त्रे परिधान करुन गुरूजी बाहेर आल्यानंतर श्रीचंद आणि लक्ष्मीचंद तेथे आले आणि त्यांच्याकडे धुण्यासाठी कपडे मागू लागले. त्यावर मी तीच वस्त्रे धारण केली आहेत,असे सांगितल्यावर सर्वजण आवाक झाले,कारण भाई लेहणांनी प्रचंड कडाक्याच्या थंडीत नदीवर जाऊन वस्त्रे धुतली-वाळवली यावर कोणाचा विश्वास बसेना. परंतु भाई लेहणांना शीख धर्माचा दुसरा गुरू म्हणून जबाबदारी देण्यावरचा नानकदेवांचा विश्वास दृढ झाला होता. नानकदेवांनी भाई लेहणांची योग्यता सिद्ध करण्यासाठी तशी अनेकवेळा परीक्षा घेतली होती. मात्र हा प्रसंग भाई लेहणांना शीख धर्माचे दुसरे गुरू अंगददेव म्हणून गुरूगादीवर विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला. नानकदेवांनी आपल्या निर्वाणाच्या तीन आठवडे आधी म्हणजे ७ सप्टेंबर १५३९रोजी भाई लेहणांना गुरू अंगददेव म्हणून गुरूगादीवर अभिष्कित केले. त्यांना आपल्या खेडूर गावी जाऊन धर्मसिद्धांताचा प्रचार-प्रसार व नव्या शिष्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली. खेडूरमध्ये गुरू अंगददेव आपल्या घरी न राहता आपल्या आत्याच्या घरीच कायम राहिले. ते खेडूर सोडून कधीही गेले नाही. एक अत्यंत वैशिष्टयपूर्ण व प्रभावी वाणी अंगददेवांकडे होती. अत्यंत सुगम-सहज-सरल शब्दांमधून ते शिष्यांना प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचे मार्गदर्शन करत. त्यांनी रचलेली ६३ पदे (शबद) गुरूग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट आहेत. बाबराचा मुलगा हूमायू याचे गर्वहरण करून,त्याला योग्य मार्गदर्शन अंगददेवांनी केले. शेरशहा सुरीने त्याचा पराभव केला,दिल्लीसोडून आपल्याला उरल्यासुरल्या सैन्यासह हूमायूने पळ काढला. अफगाणिस्तानकडे पळत असतांना वाटेत त्याला खेडूर लागले. शीखांचे गुरू अंगददेव येथे राहतात हे त्याला समजले. त्यांची भेट घेण्याचे त्याने ठरवले. कारण त्याने आपला पिता बाबर याच्याकडून नानकदेवांबद्दलही खूप ऐकले होते. अंगददेवांच्या निवासात गेल्यावर त्याने पाहिले की ते समाधी लावून बसले आहेत. मुगल बादशहा हूमायू त्यांना भेटायला आला आहे,असे समजल्यावर ते लगेच समाधी सोडतील आणि आपले मोठे स्वागत करतील. अशी त्याला अपेक्षा होती. अंगददेव मात्र खूप काळ समाधीतच होते. यामुळे हूमायूचा पारा चढला,त्याला हा स्वतःचा अपमान वाटला. तो अंगददेवांच्या खोलीत गेला आणि त्याने मान्येतून तलवार काढली. त्याच क्षणी हसत अंगददेवांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले,'खरोखर बादशहा तू बहादुर आहेस. पण शेरशहा सुरीसमोर तुझी ही तलवार कुठे गेली होती जी तू आज एका संन्याशावर उगारत आहे.' हे ऐकून हूमायू ओशाळला आणि गुरू अंगददेवांच्या चरणावर नतमस्तक होऊन क्षमायाचना केली. अंगददेवांनी त्यांच्याकडे येण्यामागची त्याची ईच्छा त्याला सांगितली आणि म्हणाले,'तू विजयी होशील,परंतु कोणत्याच साधू-संतांबाबत अशी चूक पुन्हा करू नको. जो राजा पराभवातही आपला विवेक व संयम सोडत नाही,त्याच्या पदरी कधीच पराभव येत नाही.' हूमायूला अंगददेवांचा आर्शीवाद आणि संदेश मिळाला होता. काही काळानंतर त्याने शेरशहा सुरीचा मुलगा सलीमशहा सुरीचा पराभव केला आणि पुन्हा बादशहा म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसला. खेडूरसोडून अंगददेव केवळ गोयन्दवाल येथे जात,जेथे भाई अमरदास राहत होते. आपल्या निर्वाणाची जाणीव झाल्यावर त्यांनी भाई अमरदास यांना गुरूपदी बसवले २९ मार्च १५५२ ला गुरू अंगददेवांचे निर्वाण झाले,परंतु त्यापूर्वी त्यांनी एक धर्म म्हणून शीख धर्माचे मजबूत निर्माण प्रारंभ केले होते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment