वह सुबह कभी तो आयेगी..
ब्रिटिश सैन्याचा ससेमिरा चूकवत सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन कसाबसा पुढे जात होता. अखेर आपल्या तीन हजारी जीर्णर्शीण क्रांतीसेनेला घेऊन न्यू जर्सीच्या बाहेर पडला. डेलावेअर नदी पार करून तो एका सुरक्षित स्थानी थांबला. त्याचा पाठलाग करणारी ब्रिटिश सेना न्यू जर्सीत दाखल झाली. तेथील जनतेने ब्रिटिश सेनेचे स्वागत केले आणि तीला रसद पुरवली. हिवाळा आता आपले रंग दाखवू लागला होता. त्यामुळे ब्रिटिश सेना न्यू जर्सीवाल्यांचा पाहुणचार घेत थांबली. डेलावेअर नदीच्या पलिकडे जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याची क्रांतीसेना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत होती. हिवाळयाच्या थंडगार व अंधा-या लांबलचक रात्रींप्रमाणेचे वॉशिंग्टन ला आपले भविष्य वाटत होते. 'ईस रात की सुबह नही,' अशी भावना कोणत्याही सेनापतीच्या मनात बळावण्याचा काळ तो अनुभवत होता. वॉशिंग्टन यांनी अशा काळात मोठया साहसाने आणि धैर्याने आपल्या क्रांतीसेनेला तोलून धरले. कारण ' वह सुबह कभी तो आयेगी,' ही त्यांची भावना त्यांनी प्रबळ केलेली होती. पराभवाच्या व निराशेच्या काळात वॉशिंग्टन यांनी आपली रणनीती निश्चित केली. समोरासमोरील युद्धात बलाढय ब्रिटिश सेनेसमोर आपला निभाव लागणे अशक्य आहे. याची जाणीव त्यांना झाली. अखेर गनिमी कावा युद्धतंत्राचा अवलंब करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जेंव्हा सर्व दरवाजे बंद झाले आहेत,असे वाटायला लागते तेंव्हा कोणताही संयमी माणूस आशावादी राहतो. त्याच्या संयमामुळे अचानक त्याला कुठेतरी प्रकाशाचा कवडसा जाणवतो. त्या कवडस्याचा मागोवा घेत पुढे जाणे म्हणजे एक जुगारच असतो. जॉर्ज वॉशिंग्टन यांना असाच प्रकाशाचा कवडसा दिसला आणि त्यांनी जुगार खेळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना दोनदा डेलावेअर नदी पार करून आपले नशिब आजमावे लागले. पहिल्या वेळी ख्रिसमिसच्या रात्री आपल्या कांतीसेनेला घेऊन त्यांनी नदी पार केली. डिसेंबर महिन्याच्या जीवघेण्या थंडीत बुट म्हणून कच-यात सापडलेले ब्लॅकेटचे तुकडे गुंडाळून वॉशिंग्टन यांची सेना शत्रुवर हल्ला करण्यासाठी निघाली. २५ डिसेंबर १७७६ ची ती रात्र होती. ख्रिसमसच्या मस्तीत असणा-या एका बलाढय सेनेवर हल्ला करण्याचे धाडस करण्याचा धाडसी निर्णय यशस्वी ठरला. ब्रिटिशांची तारंबळ उडाली आणि त्यांचा पराभव झाला. जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या क्रांतीसेनेने शत्रुचा केवळ पराभवच केला नव्हता,तर त्यांच्या ताब्यात युद्धकैदी म्हणून असणा-या आपल्या एक हजार सहका-यांना देखील सोडवून आणले होते. वॉशिंग्टन यांनी खेळलेला अखेरचा जुगार अपेक्षापेक्षा अधिक यशस्वी ठरला. त्यांची सेना तीन हजारीवरून चार हजारी झाली. शत्रुच्या मनात धडकी भरली ते वेगळे. गनिमी काव्यात एक यश प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर अधिक काळ समाधान मानायचे नसते. पहिल्या हल्ल्याने शत्रू सावध झालेला असतो. त्याला असे वाटते की प्रतिस्पर्धी सेनेला आपण सावध झालो आहोत. हे माहित आहे आणि त्यामुळे लगेच दुसरा हल्ला करण्याचे धैर्य ती दाखवणार नाही. अशावेळी शत्रूच्या या कयासाचा आणि सावधपणाचा लाभ उठवावा लागतो. शत्रु पहिल्या हल्ल्याची स्थल-काळ-दिशा यानुसार आपली रणनीती ठरवतो. तसेच त्याचा अत्यंत सावध पवित्रा मानसिक दृष्टया त्याला कुठेतरी दुबळा करत असतो. अशावेळी तात्काळ आणि वेगळया स्थल-काळ-दिशा यांची निवड करून केलेला वार त्याच्या वर्मी बसतो. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी नेमके हेच केले. एका आठवडयाने म्हणजे ३ जानेवारी १७१७ रोजी प्रिन्सटन येथे त्यांनी शत्रुवर चढाई केली. ब्रिटिशांचा पराभव झाला. लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिसच्या नेतृत्वात असलेली बलाढय ब्रिटिश सेना अक्षरशः पळून गेली. यामुळे अमेरिकन क्रांतीसेना आणि जनता यांचा उत्साह वाढला. क्रांतीसेनेत नव्याने भरती होणा-यांची संख्या वाढली. अमेरिकन काँग्रेस यांनी सरसेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांना सहा महिन्याची मुदतवाढ दिली. एखादा अपयशी ठरला की त्याला कायमचे मातीत गाडण्याची ईच्छा बाळगणारे विघ्नसंतोषी आणि एखादा यशस्वी होत असला तर त्याचे पाय ओढणारे खेकडे सदासर्वकाळ आढळतात. जगाचा इतिहास आणि वर्तमान याला साक्षी आहेत. जगाच्या या त्रिकालाबाधित सत्यानुसार अमेरिकन क्रांतीसेनेचा जनरल जॉर्ज वॉशिंग्टन आणि ब्रिटिश सैन्याचा जनरल होवे या दोघांनाही याची किंमत चूकवावी लागली. ब्रिटिश सेनेचा जनरल होवे एक सेनापती म्हणून चांगले यश प्राप्त करत होता;परंतु एक माणूस म्हणून त्याला आपल्या अमेरिकन बांधवांविषयी जिव्हाळा वाटत होता. त्याला ते मुळचे आपलेच लोक आहेत याची जाणीव होती. तसेच इंग्लंडने कितीही प्रयत्न केला,तरी एक दिवस अमेरिकन जनता स्वातंत्र्य मिळवणारच याची देखील खात्री होती. कारण तो प्रत्यक्ष अमेरिकन भूमीवर होता. अशाप्रकारे क्रूर आणि अव्यवहार्य वर्तनातून इंग्लंडला अमेरिका कायमचा गमवावा लागेल,याची पूर्ण कल्पला होवेला होती. त्यामुळे तो मवाळ आणि समजूतदार भूमिका बजावत होता. असे असले तरी त्याने अमेरिकन क्रांतीसेनेविरुद्ध अपेक्षित यशसुद्धा प्राप्त केले होते. मात्र त्याच्या मवाळ भूमिकेचे भांडवल करुन इंग्लंडमध्ये राजकारण शिजवले जात होते. लॉर्ड जॉर्ज गारमिन ही व्यक्ती अमेरिकेसंबंधातील खात्याची सचिव होती. लॉर्ड गारमिन याने जनरल होवेला पदावरुन हटवण्याचा घाट घातला. होवेची मवाळ भूमिका आणि अपुरी कारवाई यांचे कारण दाखवत त्याने जनरल जॉन बरगोईन नावाच्या लष्करी अधिका-याला अमेरिकन युद्धात सर्वाधिकार दिले. त्यानुसार बरगोईन हा ५५ वर्षांचा जनरल इंग्लंडहून अमेरिकेला रवाना झाला. तेथे पोहचल्यावर तो ब्रिटिश सैन्याची सूत्र हातात घेणार होता. लॉर्ड गारमिन याने ३००० मैलांवरुन डाव साधला होता. तत्कालिन राजकारणात गारमिन यशस्वी झाला,असला तरी भविष्यात अमेरिका कायमाचा हातातून गमवण्याच्या एक मैलाचा दगड त्याने रोवला होता. जनरल जॉन बरगोईन हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. इतिहासकारांमध्ये देखील त्याच्याविषयी एकवाक्यता दिसत नाही. बरगोईन एक रंगेल,छंदीफंदी,स्त्रीलंपट आणि जुगारी माणूस होता. इंग्लंडचा सम्राट किंग जॉर्ज तिसरा याची खुशामत करुन,फायदे लाटणारा म्हणूनही बरगोईनची ख्याती होती. रंगेलपणा आणि जुगार यांच्यापायी कर्जबाजारी झालेला,बरगोईन हा एक लबाड जुगारी होता. जुगारातही तो प्रामणिक नव्हता. असे असले तरी काही इतिहासकारांच्या मते एक महत्वकांक्षी माणूस आणि उत्कृष्ट सेनापती होता. लष्करी डावपेचात कल्पक होता. हे सर्व असले तरी अमेरिकन युद्धाविषयीचे गांभीर्य त्याला नव्हते. आपण एका वर्षात हे युद्ध संपवणार आणि अमेरिकन क्रांतीसेनेला पराभूत करुन इंग्लंडला परतणार,अशा बढाया तो आपल्या निकटवर्तीयांमध्ये मारत होता. जनरल होवेचे अधिकार आता सीमित झाले होते,जनरल बरगोईन आता ब्रिटिश सेनेचा सरसेनापती होता. दुस-या बाजूला जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांना देखील युद्धासोबत काँटिनेन्टल काँग्रेसच्या राजकारणाच्या आघाडीवर लढावे लागत होते. वॉशिंग्टन यांना विरोध करणारा काँग्रेसमधील गट त्यांना पदावरून हटवण्यासाठी सतत प्रयत्नशील होता. यासाठी जे हातखंडे वापरता येतील त्यांचा वापर हा गटाने केला. क्रांतीसेनेला आवश्यक अर्थसाहय आणि साधनसामुग्री पुरवण्यात हा गट अडथळे आणत होता. क्रांतीसेनेला सेना म्हणून काही अर्थ नसतांना आणि युद्धात विजयाची कोणतीही खात्री नसतांना,अमेरिकन काँग्रेसमध्ये असले राजकारण सुरू होते. 'घर में नहीं है दाने, अम्मा चली भुनाने,' अशी अवस्था अमेरिकन काँग्रेसची झालेली होती. हे झाले इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातील अंतर्गत राजकारण. त्याच्या पार्श्वभूमीवर युरोपात इंग्लंडची खोड मोडण्याचे राजकारण शिजत होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध केवळ अमेरिकेचा इतिहास घडवणार नव्हते,तर इंग्लंडचे भविष्य देखील बिघडवणार होते. अमेरिकन स्वातंत्र्युद्धाच्या निमित्ताने युरोपिअन देशांमधील इंग्लंडबद्दल असलेला असंतोष एकवटण्यास सुरवात झाली होती. त्यांना अमेरिकेला स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा इंग्लंडची खोड मोडणे महत्वाचे होते. १७७९ मध्ये अमेरिका-ब्रिटन यांच्या युद्धाचा भडका उडाला असतांना,स्पेनने ब्रिटनविरोधात युद्धाचा शंखनाद केला. असे असले तरी स्पेनने अमेरिकेला साहय केले नाही किंवा त्याची बाजू घेतली नाही. १७८० मध्ये डेन्मार्क,स्वीडन,नेदरलॅड,पोर्तुगाल आणि रशिया यांनी एका संघाची स्थापना केली. त्याला त्यांनी 'सशस्त्र तटस्थ संघ' (League of Armed Neutrality) असे नाव दिले. समुद्रावर इंग्लंडच्या बेकायदेशीर व दमनकारी कृत्यांना विरोध करणे आणि त्याबाबत त्याला चेतावनी देणे, हा सशस्त्र तटस्थ संघाचा उद्देश्य होता. यामध्ये इंग्लंडविषयीचा असंतोष आणि असूया यांना साकार होण्याची संधी अमेरिकन स्वातंत्र्युद्धामुळे युरोपातील देशांना मिळाली होती. यामुळे तत्कालीन महासत्ता इंग्लंडची तळी सगळीकडून भरली जाणार होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment