रंगेल सेनापती आणि विजयपर्वाचा प्रारंभ

नवा कोरा सरसेनापती अमेरिकन क्रांतीसेनेच्या विरोधात लढण्यासाठी  ब्रिटिश सैन्याला मिळाला होता.  तो म्हणजे जॉन  बरगोईन.  त्याच्या आगमनाने ब्रिटिश सैन्यात नवे चैतन्य संचारले होते.  क्रांतीसेनच्या विरोधात अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नव्हे, तर मौजमस्ती करण्यासाठी हा नवा जोश ब्रिटिश सैन्यात ओसंडून वाहत होता.  सरसेनापतीच रंगेल असेल तर त्याच्या रंगेलपणात सैन्य रंगणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.  जॉन बरगोईन याने अमेरिकेत ब्रिटिश सैन्याचे सूत्र हाती घेतल्यानंतर पहिले फरमान काढले. त्यानुसार फौजेने कूच करताना अधिका-यांसोबत त्यांच्या कुटुंबियांना नेण्याची मुभा देण्यात आली.  त्यामुळे सेनेच्या आनंदाला पारावार राहिला नाही.  कोणत्याही सैन्याचे लढणे आणि जिंकणे  हे सर्वात महत्वाचे लक्ष असते.  कुटुंबकबिला घेऊन निघालेल्या सैन्याचे पानिपत झाल्याशिवाय राहत नाही.  जगाचा इतिहास याला साक्ष आहे.  बरगोईनच्या आदेशात त्याचा रंगेलपणा दडलेला होता.  यामुळे ब्रिटिश सैन्याचे ध्येय बाजूला पडले आणि सैन्य मौजमजेत रंगून गेले.  नाच,गाणी आणि मेजवान्या सुरू झाल्या.  जनरल होवेच्या काळात ब्रिटिश सैना ही केवळ सेनाच होती.  आता मात्र ७७०० जवानांच्या फौजेसोबत २००० अधिका-यांच्या बायका,रखेल्या,नोकरचाकर आणि इतर बाजारबुणगे फौजेत होते.  यावर्णनावरून पेशव्यांची पानिपतची मोहिम डोळयासमोर उभी राहते.  सैन्यात मौजेसाठी असलेल्या बाया-बाजारबुणगे म्हणजे कोणत्याही फौजेवर भार असतो.  तसेच एखाद्या सैन्याला अतिरिक्त कुमक घेऊन जाणारा कूच करतांना. आपल्या रंगेलपणासाठी वृद्धापकाळात लहानग्या अकरा वर्षाच्या मुलीसोबत विवाह करतो आणि काशी यात्रा करतो,तेंव्हा त्या सैन्याची अखेर सांगण्याची गरज नाही.  जॉन बरगोईनच्या सैन्यातील कुटुंबीय,नोकरचाकर हे ओझे वाढल्याने शेकडो जनावरांचा ताफा त्यांच्या सेवेसाठी ठेवण्यात आला होता.  यामध्ये बैलांची संख्या अधिक होती.  कारण त्यांना कुटुंबकबिला आणि त्यांचे सामान सुमोर १५०० गाडयांमधून ओढून न्यायचे होते.  दुस-या बाजूला सैन्याचा सर्वात महत्वाचा भाग असलेला तोफखान्याच्या गाडया ओढण्यासाठी केवळ ५० रेडे होते.  या फौजेत ३० गाडया केवळ दारूच्या होत्या.  ही दारू उडवण्याची नव्हती, तर रिचवण्याची होती.  असे होते सरसेनापती जॉन बरगोईनचे ब्रिटिश सैन्य  बरगोईन महाशयांची नियुक्ती प्रामाणिक आणि जबाबदार. अशा कोणत्याच इंग्रंज अधिका-याला मान्य नव्हती.  रंगेल बरगोईन याने अमेरिकेत पाऊल टाकताच,भूतपूर्व सरसेनापती होवे आणि त्याचा सहकारी क्लिंटन यांना आपल्यासमोर हजर होण्याचा आदेश दिला.  जनरल होवेच्या सर्व योजना रद्द करणे,हा कोणत्याही नव्या सत्ताधा-याचा पहिला कार्यक्रम बरगोईन याने राबवला.  न्यू इंग्लंड भागातील ब्रिटिश ठाणी पुन्हा परत मिळवण्याची न्यू आयडिया लढवण्यात आली.  त्यानुसारच सरसेनापतीची ही आनंदी सेना मौजमजा करत न्यू इंग्लंडकडे निघाली होती.  खरे पाहिले तर त्यावेळी ब्रिटिश सरकार वेगळयाच संकंटाला तोंड देत होते आणि बरगोईन महाशयांचे अजबगजब निर्णय अमेरिकेच्या भूमीवर ब्रिटिश सैन्याच्या अडचणीत भरत टाकत होते.  स्पेनने पुकारलेले थेट युद्ध आणि रशिया,पोर्तुगाल,फ्रांस,डेन्मार्क आदी देशांनी तटस्थपणाचा आव आणून इंग्लंडची आर्थिक व लष्करी कोंडी करण्याचा खेळलेला डाव.  तीन हजार सागरी मैलांवर सैनिक आणि त्यांच्यासाठी रसद पुरवणे अत्यंत खर्चीक होते.  अमेरिकेत लढण्यासाठी सैन्य भरतीला इंग्लंडमध्येच विरोध होत होता. यावर उपाय म्हणून जर्मनीच्या जमिनदाराकडून भाडोत्री सैनिक घेतल्याने ब्रिटिश् सरकारच्या विरोधात जनतेच्या मनातील असंतोषात वाढ झाली.  सैनिकांची उणिव भरून काढण्यासाठी अमेरिकेत सरसेनापती जॉन बरगोईन याने आपल्या स्वभावानुसार एक अफलातून योजना जाहिर केली.  अमेरिकेतील निग्रो गुलाम जर ब्रिटिश सैन्यात भरती झाले,तर त्यांची गुलामीतून मुक्तता करण्यात येईल.  असा जुमला त्याने सोडला.  त्याचा हा जुमला त्याच्यावरच उलटला.  फेकणा-यावर त्याचे जुमले असेच उलटत असतात.  मुक्त होण्याच्या वेडया आशेने आपल्या अमानुष गुलामीने जगण्याची आशा सोडलेल निग्रो सैन्यात जाऊन मरण्यास तयार झाले.  दुस-या बाजूला बरगोईनच्या गो-या सैनिकांच्या रक्तातील वर्णद्वेष उफाळून आला.  काळया निग्रो गुलामांसोबत एकाच सैन्यात राहण्यास ते तयार नव्हते.  त्यांचा संताप असंतोषात कधी परावर्तीत होईल हे सांगता येत नव्हते.  त्यांच्या संतापावर उतारा म्हणून ही बरगोईनने बायका,रखेल्या आणि बाजारबुणगे यांना सोबत ठेवण्याची सवलत दिली असावी.  या निर्णयात त्याचा मुळचा पिंड देखील सुप्तपणे प्रभावी असणारच  जनरल जॉन बरगोईनचे सैन्य न्यू इंग्लंडच्या वाटेवर असतांना त्याच्यासमोर दोन महत्वाचे प्रश्न होते.  एक म्हणजे तो स्वतः आणि त्याचे सैन्य अमेरिकेतील रस्त्यांविषयी अनभिज्ञ होते.  तसेच त्याच्या बिनीच्या सैनिकांना जंगलातून झाडे तोडून रस्ते बनवावे लागत होते.  अमेरिकन क्रांतीसेना मोठे वृक्ष आणि पूल पाडून त्यांचा रस्ता बंद करत होते.  क्रांतीसेनेने बरगोईनच्या सैन्याचे अन्नधान पळवून नेणे किंवा जाळून टाकण्याचा प्रकारही सुरू केला होता.  जमेल त्या मार्गाने बरगोईनच्या सैन्याची नाकाबंदी करण्यात क्रांतीसेनेला यश येत होते.  १७७७ सालचा ऑगस्ट महिना आता उजाडला होता.  बरगोईनची सेना चांगलीच जायबंदी झाली होती.  दिवसाला एक मैल एवढयाच वेगाने ती पुढे मजल मारू शकत होती.  अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासू लागला होता.  अन्नधान्याच्या शोधार्थ बरगोईनने आपली फौज आसपासच्या खेडयात पाठवली.  अन्नधान्य मिळणे तर लांबच पण बेनिगटनच्या स्थानिक क्रांतीकारकांनी ही फौज अक्षरशः कापून काढली.  ब्रिटिश सैन्यातील सुमारे ९०० सैनिक मारले गेले किंवा पकडले गेले.  बरगोईन आणि त्याचे सैन्य अत्यंत बिकट अवस्थेत सापडले.  १७७७ सालाचा सप्टेंबर महिना सुरू झाला होता.  हा सप्टेंबर महिना क्रांतीसेनेचे आणि अमेरिकेचे भविष्य सुनिश्चित करणारा ठरला.  एक वर्षापूर्वी याच महिन्यात सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टनची क्रांतीसेना संपल्यात जमा झाली होती.  क्रांतीसेना आणि अमेरिका यांचे भविष्य अंधःकारात गेले होते.  डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या मुहूर्तावर वॉशिंग्टनने कात टाकली आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही.  गनिमी काव्याच्या जोरावर आपल्या सैन्याला टिकवून धरणारा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टनचे सैन्य आज बरगोईनच्या सैन्यासमोर फ्रिमेन फील्डच्या मैदानात छाती काढून उभे ठाकले होते.  दरम्यानच्या काळात वॉशिंग्टन यांनी कर्नल डॅनियल मॉर्गनच्या नेतृत्वात ५०० निष्णात नेमबाजांची तुकडी तयार केली होती.  मॉर्गन आणि त्याचे शार्प शुटर बरगोईनच्या कूच करण्याच्या एकमेव मार्गावर दबा धरून बसले होते.  बंदुकीच्या टप्प्यात आल्या-आल्या त्यांनी ब्रिटिश सैन्यावर चौफेर हल्ला चढवला.  कर्नल डॅनियल मॉर्गन हा युरोपात बदनाम करण्यात आलेला योद्धा होता.  युरोपातील सैनिकांना मॉर्गनचे युद्धतंत्र कुटिल नीती किंवा अपराधी वृत्ती वाटत असे.  संख्या आणि साधन-संपत्ती दोन्ही बाजुने दुर्बल असणा-या सैन्याला अशीच युद्धनीती वापरावी लागते.  जेंव्हा हे लोक गनिमी काव्याचा वापर करून बलाढय सैन्याला धूळ चारतात, तेंव्हा ही बलाढय सेना गनिम योद्धयांचे असेच वर्णन करते.  छत्रपती शिवरायांचे शत्रुने केलेले वर्णन पाहिले, तर आपल्या हे सहज लक्षात येऊ शकते.  शत्रु सैन्याचे अधिकारी टिपणे हा मॉर्गनचा विशेष हातखंडा होता.  त्यानुसार बेमिस हाईटच्या आणि अन्य लढायांमध्ये त्याने   शत्रु सैन्याचे अधिकारी आणि वाटाडे यांना लक्ष्य केले होते.  वाटाडे मारले गेल्याने आणि पळून जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने जॉन बरगोईनच्या सैन्याची पंचाईत झाली.  अमेरिकेचा भूगोल आणि तेथील वाटा-पळवाटांची माहिती असणारे वाटाडे बरगोईनला मिळणे कठिण झाले.  त्याच्याकडे असणारे गद्दार अमेरिकन वाटाडे मारले गेले होते आणि मॉर्गनच्या तुकडीच्या निशाणा आपल्याला थेट यमसदनी धाडेल. या भितीने नवीन वाटाडे मिळण्याची आशा मावळली.  अखेर १९ सप्टेंबर १७७७ ला अलबानीच्या वर सरटोगाजवळ 'बेमिस हाईट' च्या पठारावर ब्रिटिश सेना आणि जाजॅ वॉशिंग्टन यांची क्रांतीसेना एकमेकासमोर उभ्या ठाकल्या.  'फ्रिमेन फिल्ड' या बेमिस हाईटवरील १५ एकराच्या पटांगणावर अमेरिकन क्रांतीसेनेच्या ११ व्या व्हर्जिनिया बटालियनने ब्रिटिश सेनेला आव्हान दिले.  आता अमेरिकन क्रांतीसेना बरगोईनच्या सैन्याच्या तुलनेत संख्येने मोठी होती.  मॉर्गनच्या नेमबाज तुकडीने जंगलातील झाडींमधून आपला खेळ सुरू केला आणि एकूण एक इंग्रंज अधिकारी टिपण्याचा कार्यकम सुरू झाला.  ब्रिटिश जनरल सायमन फ्राशर याने विखुरलेली ब्रिटिश सेना एकत्र करून क्रांतीसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला,परंतु मॉर्गनच्या नेमबाजांनी त्यालाच टिपला.  एवढेच नाही तर जॉन बरगोईन स्वतः मरता मरता वाचला.  गोळीबारात त्याचा घोडा मारला गेला.  एका वर्षात अमेरिकन सेनेचा खात्मा करून इंग्लंडला परतण्याची वल्गना करणारा बरगोईनच्या सैन्याचा एका वर्षात पराभव झाला.  अमेरिकन क्रांतीसेनेचा अधिकारी बेनेडिक्ट अर्नाल्डने ब्रिटिश सैन्याला तीन बाजूने घेरले आणि चौथ्या बाजूला हडसन नदीने त्यांना अडवले.  याही परिस्थितीत आपल्याला काही कुमक मिळेल या आशेवर जॉन बरगोईनने तीन आठवडे लढण्याचा प्रयत्न केला.  अखेर १७ ऑक्टोबर १७७७ ला गारद झालेली,गंभीर जखमांनी निकामी झालेली,दमलेली आणि उपासमारीने मेलेली ब्रिटिश सेना अमेकिरन क्रांतीसेनेला शरण आली.  बरगोईन सरटोगाजवळ लढाईच हरला नव्हता,तर सर्व सेना देखील गमावून बसला होता.  सरटोगाच्या लढाईने अमेरिका-इंग्लंड यांच्यामध्येच नव्हे ,तर युरोपात खळबळ उडाली  अंतिम विजयाच्या लढाईची दिशा निश्चित केली. 
प्रा.डॉ.राहुल हांडे,
  भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     
 
 

Comments

  1. अतिशय चित्तथरारक इतिहास!! रोमांचक, थरारक वर्णन ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !