भूमापकाने मोजली आकाशाची उंची
काही माणसांचा जीवन प्रवास म्हणजे त्यांनी वाटयाला आलेल्या विसंगतींमध्ये संधी शोधली आणि एक महान व्यक्ती म्हणून जगाने त्यांच्या जीवनातील संगती शोधत त्यांच्या शौर्याची गाथा लिहिली. ब्रिटिश वसाहत असलेल्या अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये २२ फेब्रुवारी १७३२ ला पेशाने दोघेही शिक्षक असलेल्या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. शिक्षक म्हणजे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच हे वेगळे सांगणे न लगे. जगाच्या ईतिहासात विद्यार्थ्याच्या यशातला फार कमी वाटा शिक्षकाला मिळतो मात्र अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या माथी मारली जाते. शिक्षक कायम दरिद्री-लाचार असावा,अशी भारतीयांची अढळ मानसिकता आहे. पूर्वीचे शिक्षक कसे अत्यंत हालाखीचे जीवन जगत विद्यार्थी घडवत होते,हे घोळून-घोळून ऐकवणा-या चोरांची संख्या आपल्या समाजात कमी नाही. अशा शिक्षकाच्या हाताखाली हा चोर कसा तयार झाला ? हा प्रश्न मात्र ऐकणाऱ्या कोणाच्याच डोक्यात येत नाही. कारण तो चोर आज समाजाचा ठेकेदार असतो. भारतीय माणसाला सुखावणा-या बेताची परिस्थितीत असणा-या शिक्षक जोडप्याच्या घरी जन्माला आलेल्या या मुलाचे जीवन अनेक विसंगतींनी व्यापलेले राहणार होते. वयाच्या अकराव्या वर्षी या मुलाच्या डोक्यावरून पितृक्षत्र हरवले. शिक्षक आई-बापांच्या पोटी जन्माला येऊन ही त्याला अत्यंत अल्पकाळ शालेय शिक्षण घेता आले. जगण्यासाठी धडपड करणे आवश्यक होते,कारण शिक्षक बापाला त्याच्यासाठी मागे काही ठेवता आले नाही. अशावेळी मोठया भावाने पित्याची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या लहान भावाला त्याच्या क्षमतेनुसार सर्व सुख-सोयी देण्याचा प्रयत्न केला. तरीही वयाच्या चौदाव्या वर्षी या मुलाला भूमापक म्हणून काम करावे लागले. जमिनीचा नेमका नकाशा तयार करण्याचे तंत्र या मुलाने वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत अवगत करून घेतले होते. भूमापन करणा-या हया मुलाला भविष्यातील एका महासत्तेचा नकाशाच नव्हे, तर त्याच्या आकाशाची उंची मोजायची होती. हा मुलगा होता अमेरिकेचा राष्ट्रपिता जॉर्ज वॉशिंग्टन. भूमापक म्हणून काम करत-करत एक दिवस जॉर्ज वॉशिंग्टन सैन्यात भरती झाले. आपले अंगभूत कौशल्य,साहस व परिश्रम यांच्या बळावर १७५२ साली वॉशिंग्टन यांना मेजर पदापर्यंत मजल मारता आली. दरम्यान मार्था डॅन्डरिज कस्टिस श्रीमंत विधवेसोबत त्यांनी विवाह केला. मार्थाला आपल्या पहिल्या पतीपासून झालेले दोन अपत्य होती. जॉर्ज आणि मार्था या दांपत्याला मात्र अपत्य होऊ शकले नाही. मार्थाच्याच मुलांना जॉर्ज वॉशिंग्टन यांनी कायम आपले मुले मानले. वॉशिंग्टन पितृतूल्य मोठया बंधूचे निधन झाल्यावर,त्याची संपत्ती देखील त्यांना मिळाली. जॉर्ज आणि मार्था यांनी या पैशातून एक घर खरेदी केले. ज्याला आज 'माऊंट र्व्हनन' म्हणून ओळखले जाते. जीवनात आता सत्ता,संपत्ती,संसार आणि स्थैर्य प्राप्त झालेले जॉर्ज वॉशिंग्टन १४ जुलै १७५८ मध्ये व्हर्जिनियाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आ.ले त्यांच्या जीवनातील हे एक अत्यंत महत्वाचे वळण होते. तसेच अमेरिकेच्या भविष्याला देखील या घटनेमुळे कलाटणी मिळणार होती. महात्मा गांधी यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी भारतभर भ्रमण केले. त्यांना ज्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवायचे होते,तो नेमका कसा आहे,हे जाणून घेतले. त्याचप्रमाणे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७६१ साली घोडागाडीने अमेरिकेतील दक्षिणकडील राज्यांमधून प्रवास केला. यामुळे अमेरिकेतील विविध भागांमधील समस्यांविषयी त्यांना नेमके ज्ञान झाले. १७७४ साली फिलाडेल्फिया येथे भरलेल्या कॉन्टिनेटल काँग्रेसच्या व्यासपीठावर व्हर्जिनियाचा पक्ष त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. तत्कालिन अमेरिकेच्या राजकारणाच्या क्षितीजावर जॉर्ज वॉशिंग्टन नावाच्या एका नव्या ता-याचा उदय झाला. जो पुढे अमेरिकन क्रांतीचा सूर्य म्हणून तळपला. त्यांच्यापूर्वीपासून क्रांतीचे बौद्धिक नेतृत्व करणा-या थॉमस जेफरसन,बेंजामिन फ्रँकलिन,रॉजर शेरमन,जॉन ॲडम्स आणि रॉबर्ट आर. लिव्हिंगस्टोन इत्यादी नेत्यांपेक्षा हा नवा नेता वेगळा होता. बौद्धिकदृष्टया तो सक्षम होताच,परंतु एक लष्कर अधिकारी म्हणून क्रांतीसेनेला नेतृत्व देण्याची क्षमता देखील त्याच्याकडे होती. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या व्यक्तिमत्वात अशा दोन्ही असामान्य गुणांचा मिलाफ झालेला होता. तसेच एक सर्वमान्य नेता म्हणून आवश्यक गुणही त्यांच्याकडे होते. कोणत्याही राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक सर्वात महत्वाचे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाव सामावलेले होते. यामुळेच १६ जून १७७५ ला जॉर्ज वॉशिंग्टन यांची अमेरिकेतील १३ ही वसाहतींच्या संयुक्त सेनांच्या सरसेनापती पदी नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेतील जमिन मोजणी करणारा एका पो-याचा अमेरिकेचा राष्ट्रपिता म्हणून होणा-या प्रवासाचा हा आरंभबिंदू होता. ' शिस्तबद्धपणा हा कोणत्याही सेनेचा आत्मा असतो. हा शिस्तबद्धपणाच एका छोटयाशा सैन्याला भयंकर बनवतो किंवा दुर्बलांना सफलता आणि सर्वांना सन्मान मिळवून देत असतो', हे जॉर्ज वॉशिंग्टन यांचे प्रसिद्ध विधान एक सेनापती आणि नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते. असे असले तरी सरसेनापती म्हणून त्यांची निवड होतांना,अनेक कमतरता त्यांच्यातही होत्या. कोणत्याही महान व्यक्तिमत्वाचा वेध घेतांना लक्षात येते की प्राथमिक अवस्थेत त्यांच्यातला प्रत्येकच जण परिपूर्ण होता,असे नव्हे. अनेक विसंगती व अप्रगल्भता त्यांच्यातही होत्या. अनेक वेळा ज्यांना भोवतालच्या विसंगत परिस्थितीमध्ये संधी शोधता आली,ते भविष्यात महान ठरले. जॉर्ज वॉशिंग्टन यांची सरसेनापती म्हणून जेंव्हा निवड झाली तेंव्हाच्या परिस्थितीचे अवलोकन यासाठी आवश्यक ठरते. अमेरिकन क्रांतीकारकांमधील राजभक्त व रूढीवादी पक्षाने पेनासिल्वेनियाच्या जॉन डिकेंसनच्या नेतृत्वात देदीप्यमान यश प्राप्त केले होते. रशियन राज्यक्रांतीमध्ये मेंशेविक आणि बोल्शेवीक असे दोन पक्ष होते. मेंशेविक म्हणजे बहुमत असणारे आणि बोल्शेवीक म्हणजे अल्पसंख्याक असा ही एक अर्थ सांगण्यात येतो. असे असले तरी १९१७ ची रशियन क्रांती बोल्शेवीक कांती म्हणून ओळखली गेली. कारण संधीचा योग्य लाभ लेनीनच्या नेतृत्वात त्यांनी उठवला होता. तसेच अमेरिकन क्रांतीच्या बाबत देखील घडले. राजभक्त व रूढीवादी दुस-या कॉन्टिनेंटल काँग्रेसपर्यंत आघाडावर होते. क्रांतीची सुत्र एका अर्थाने त्यांच्या हातात होती. त्यांनीच मातृभूमी इंग्लंडपासून संपूर्ण संबंध विच्छेद करण्यास विलंब लावला होता. संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीला तसा त्यांचा विरोध होता. त्यांना संधी साधता आली असती तर जॉन डिकेंसन क्रांतीसेनेचा सरसेनापती झाला असता आणि कदाचित भविष्यात अमेरिकेचा राष्ट्रपिता म्हणूनही ओळखला गेला असता. कदाचित नियतीला ते मान्य नसावे. इतिहासाला कशी कलाटणी मिळेल,याचा अंदाज कोणीच करू शकत नाही. दुस-या कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह धरणा-या पक्षाचा नेता जॉन ॲडम्स याने नेमकी संधी साधली. त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून संपूर्ण क्रांतीचा उद्घोष केला. तसेच बोस्टनमध्ये जमलेल्या सर्व वसाहतींमधील सैन्याला स्वतःच्या बाजून करुन घेतले. सर्व १३ वसाहतींच्या सैन्यांची एक संयुक्त सेना निर्माण करण्यात आली. एक राष्ट्र ही भावना यामुळे बळकट झाली. वसाहतींमधून संयुक्त सैन्यात आणखी सैनिकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काळाची अनुकुलतेचा नेमका वेध घेऊन,जॉन ॲडम्सने जॉर्ज वॉशिंग्टनला सरसेनापती करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याला मान्यता मिळवून घेतली. यामागे मॅसेच्युसेटस्च्या म्हणजे उत्तरेकडील नेत्यांना दक्षिणेकडील राज्यांची मान्यता मिळविण्याचा हेतू देखील दडलेला होता. तसे पाहिले तर जॉन डिकेंसन आणि अन्य काही सैन्य अधिका-यांपेक्षा जॉर्ज वॉशिंग्टन यांचा अनुभव कमी होता. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वातील नैतिकता त्यांच्या या कमजोर बाजूस सहजपणे सावरणारी होती. कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये अनुकुलता लाभली तरी जॉर्ज वॉशिंग्टनचा पुढचा प्रवास चांगलाच खडतर ठरणार होता. जबरदस्त आत्मविश्वास आणि त्याही पेक्षा कितीही कठिण परिस्थितीत आपल्या भावनांना आवर घालत, दृढता प्रकट करण्याची कला अवगत असलेले. बलाढय ब्रिटिश सैन्याशी लढतांना कधी पराभवामुळे तर कधी प्रतिकुल परिस्थितीमुळे चिंतित झालेले. मात्र यत्किंचीतही न खचलेले. दृढ आत्मविश्वास,आशावाद, कितीही विपरीत परस्थितीत न ढळणारे मानसिक संतुलन,असीम धैर्य आणि आपल्या सैन्यात साहस व आशा पेरण्याचे कसब म्हणजे सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन. त्यांच्या अशा असामान्य गुणांची परख व मोल अमेरिकेच्या अंतिम विजयाने निश्चित केले. कारण विजेतेच आपल्या नेत्याला सोनेरी इतिहासाच्या कोंदणात दिमाखाने जतन करतात. पराभूत मात्र विजेत्यांच्या मिनमेख काढण्याचा,त्यांना केवळ दोष देण्याचा आणि जर-तरचा इतिहास लिहित बसतात.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Great vashington..
ReplyDeleteएका अतिशय सुंदर लेखमालेचा मी वाचक आहे याचा अभिमान वाटतो.जाॅर्ज वाॅशिंग्टनचे प्रेरणादायी चरित्र जमेल तितक्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
DeleteNice article. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या
ReplyDelete" लोकशाही च्या यशस्वीतेसाठी सात महत्त्वाची तत्वे" या अतिशय मौल्यवान ग्रंथात पहिल तत्व सांगितलं ते म्हणजे Mortality नैतिकता असणे व त्यासाठी उदाहरण दिलं वॉशिंग्टन यांचं. दुसऱ्यांदा राष्ट्रपती व्हावयाची वेळ आली तेव्हा वॉशिंग्टन म्हणाले मी होणार नाही. पण त्यांच्या नैतिक ते मुळे खूब दबाव आला. व ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाले. पण तिसऱ्यांदा ही दबाव आला तेव्हा त्यांनी नीतिमत्ता म्हणून पद ठाम पणे नाकारले.
बाबासाहेब यांनी इतर सहा तत्वे सांगतली आहेत. पण बाबासाहेब यांना कोण समजून घेईल?
भारतात लोकशाही टिकवायची असेल तर ही तत्वे स्वीकारावी च लागतील.
जय भीम