गुरूमुखी ते गुरूग्रंथ साहेब..
गुरूअंगददेवांनी गुरूगादी भाई अमरदास यांच्याकडे सोपवली,तोपर्यंत त्यांनी एक धर्म म्हणून शीख धर्माची उभारणी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रारंभ केली होती. नानकदेवांचा वारसा शीख धर्म म्हणून जेथे आकाराला आला,तो पंजाब आणि सिंध प्रांत होता. येथे प्रामुख्याने पंजाबी आणि सिंधी भाषा बोलल्या जात होत्या. नानकदेवांची मातृभाषा पंजाबी होती. त्यामुळे त्यांच्या गुरूवाणीची भाषा पंजाबी असणे स्वाभाविक होते. पंजाब लगत असलेल्या सिंध प्रांतात नानकदेवांचा प्रभाव निर्माण झालेला होता,तेथील भाषा सिंधी होती. पंजाबी व सिंधी या दोन्ही भाषांना प्राचीन परंपरा असली, तरी त्यांना स्वतःची लिपी नव्हती. सिंधी भाषा फार्सी लिपीत लिहिण्याचा प्रघात पडलेला होता. (काही प्रमाणात संस्कृतच्या देवनागरीचा वापर होत असे.) सिंधी भाषेचे अनुकरण पंजाबी भाषेत देखील होऊ लागले होते. नानकपूर्व काळात पंजाब व सिंध प्रांतात 'लेंहदा' बोली प्रचारात होती. या बोलीची एक स्वतंत्र अशी महाजनी लिपीही व्यापारीजनांत प्रचलित होती. आणखी काही काळ गेला असता,तर आज पंजाबी भाषा फार्सी लिपीत लिहिली जात असलेली आपल्याला दिसली असती. जगातील भाषांचा इतिहास अवलोकल्यास असे लक्षात येते की स्वतःची म्हणून स्वतंत्र लिपी निर्माण करू न शकलेल्या अनेक भाषा आज लुप्त झाल्या आहेत किंवा स्वतःचे सत्व गमावून बसल्या आहेत. गुरूपदावर अभिषिक्त झाल्यानंतर गुरू अंगददेवांनी पंजाबीला स्वतःची स्वतंत्र लिपी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अंगददेवांनी उत्तर भारतात त्याकाळी प्रचलित असलेल्या विविध लिपींना एकत्र करून गुरूमुखी ही वेगळी लिपी तयार केली. त्यांनी लेंहदा बोली आणि तीच्या लिपीचा आधार गुरूमुखीसाठी घेतला. व्यापारी समाजाची ही लिपी असल्यामुळे वायव्य भारतातील मोठा व्यापारी वर्ग शीख धर्माचा अनुयायी होण्यास मदत होणार होती. लेहंदामध्ये स्वरचिन्ह नव्हते,ही त्रुटी दूर करण्यासाठी देवनागरी लिपीचे सहकार्य घेण्यात आले. काश्मीरची 'शारदा' लिपी आणि कांगडा प्रदेशाची 'ठाकुरी' लिपी यांचाही उपयोग गुरूमुखी लिपी निर्माण करण्यासाठी करण्यात आला. गुरूंच्या मुखातून निघालेली म्हणून पंजाबी भाषेच्या लिपीला गुरूमुखी असे संबोधण्यात आले. येथे एक प्रश्न निर्माण होतो की लिपीला मुखी असे संबोधण्याचे कारण काय असावे ? 'मुखी' या शब्दातून 'वाणी' असा असा अर्थ प्रकट होतो. तसे पाहिले तर वाणीचा किंवा मुखाचा लिपीशी संबंध नसतो. बोलली जाते ती खरी बोली किंवा भाषा असते. बोलण्यासाठी लिहिता येणे आवश्यक नसते. लिहिता न येणारा माणूस भाषा बोलू शकतो. आपण भाषा मुखाने बोलतो म्हणजे ध्वनी निर्माण करतो. बोलेले वा सुचलेले लिहितांना लिपीचा वापर करतो. प्रत्येक भाषा काही निवडक ध्वनींच्या सहाय्याने बोलली जाते. त्यांना मूलध्वनी असे म्हणतात. साधारणपणे जगातील भाषांमध्ये अधिकाधिक ५० मूलध्वनी असतात. मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन मिळून ४८ मूलध्वनी आहेत. भाषेत वापरल्या जाणा-या प्रत्येक ध्वनीला लिहिण्याच्या सोयीसाठी काही तरी चिन्ह दिले जाते. यांनाच आपण मूळाक्षर किवा वर्ण असे संबोधतो. मूळाक्षरांच्या किंवा वर्णांच्या चिन्हांचे आकार आणि नियम यांना मिळून कोणत्याही भाषेची लिपी निर्माण होत असते. गुरूमुखी खरी पाहिली,तर लिपी आहे त्यामुळे तिला लिपी संबोधण्याची आवश्यकता नव्हती;परंतु गुरूंच्या वाणीतून निघालेले ज्ञान तिच्यामध्ये संग्रहित करण्यात आले. म्हणून तिला गुरूमुखी संबोधले गेले. गुरूमुखीच्या वर्णमालेत स्वर आणि ३० व्यंजने मिळून एकूण ३५ मूळाक्षरे किंवा वर्ण आहेत. नानकदेवांची गुरूवाणी आणि त्यांचे सर्व लिखाण गुरूमुखीत लिहिले गेले. गुरू नानकदेवांच्या मुखातून निघालेल्या गुरूवाणीला लिखित स्वरूप देणारी म्हणून ही कदाचित लिपीला गुरूमुखी संबोधले गेले असावे. गुरू अंगददेवांनी केलेली गुरूमुखी लिपीची निर्मिती म्हणजे त्यांचे शीख धर्मासाठी आणि पंजाबी भाषेसाठी दिलेले एक महान योगदान मानावे लागते. गुरूमुखीमुळे आज शीख धर्म आणि पंजाबी भाषा यांना स्वतःची स्वतंत्र ओळख व अस्मिता मिळाली आहे. खरे पाहिले तर गुरूमुखी एक धर्मलिपी म्हणून अस्तित्वात आली,मात्र ती पंजाबी भाषेची देखील लिपी होऊन गेली. त्यामुळे पंजाबी भाषेचा विकास झपाटयाने होऊ लागला. शीख धर्माचे साहित्य गुरूमुखीत लिहिल्या जाऊ लागले. धर्मप्रसारासाठी लोकभाषा पंजाबीचा वापर होऊ लागला. गुरूमुखीची निर्मिती हा एक शीख धर्माची एक वेगळा धर्म म्हणून वाटचालीतील अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जातो. अंगददेवांनी नानकदेवांच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी गुरूमुखीच्या माध्यमातून विशुद्ध स्वरूपात भावी पिढयांकडे सुपूर्द केली. त्यांनी स्वतःचे विचार देखील गुरूमुखीत संग्रहित केले. त्यांचा समावेश पुढे गुरूग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला. आज अंगददेवांचे ६३ पदे गुरूग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट असलेली दिसतात. गुरूमुखीच्या निर्मितीसोबतच अंगददेवांनी नानकदेवांच्या गुरूवाणीचे संकलन ही प्रारंभ केले होते. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. नानकदेवांच्या विविध ठिकाणी असलेल्या शिष्यांशी संपर्क साधून,अंगददेवांनी गुरूवचनांचे संकलन केले. त्यामुळे शीखांचे संघटनही होत गेले आणि शीख धर्मपरंपरेला आकार येत गेला. नानकदेवांनी आपली गुरूवाणी लिखित स्वरूपात ठेवली होती की नाही याबद्दल विविध मतमतांरे अभ्यासकांमध्ये आहेत. नानकदेवांनी केलेल्या प्रदीर्घ व प्रचंड प्रवासामुळे त्यांची वाणी विखुरलेली होती. तेथील भक्तांनी ती कंठस्थ केलेली होती,परंतु त्या-त्या भागातील बोलींचा प्रभाव गुरूवाणीवर पडला होता. त्यामुळे गुरूवाणीला विशुद्ध रुपात लिपीबद्ध करण्याचे मोठे आव्हान अंगददेवांसमोर होते. गुरूमुखीमुळे गुरूवाणीला विशुद्ध स्वरूपात कायमचे जतन करण्यात आले. तसेच तीच्यामुळे फार्सी,उर्दू,संस्कृत आदी भाषांचा प्रादुर्भाव गुरुवाणीला आणि पंजाबी भाषेला होऊ शकला नाही. अंगददेवांच्या या महान कार्याने गुरूग्रंथ साहेबच्या निर्मितीचे बीजारोपण झाले. नानकदेवांचे चरित्रलेखन करून घेण्याचे काम देखील अंगददेवांनी केले. बालसिंधू उर्फ पैरा मौखा नावाच्या नानकशिष्याने नानकदेवांचे चरित्र लेखन केले. अंगददेवांनी त्यावर संस्कार केले. यामुळे शीख धर्मास 'गुरूचरित्र' उपलब्ध झाले. नानकदेवांना अनुभवलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेल्या शिष्यांशी संपर्क साधून अंगददेवांनी त्यांच्या गाथांचा किंवा आठवणींचा एक मोठा संग्रह संकलित केला. ज्याला 'जनमसाखी' (साक्ष) असे संबोधले जाते. 'लीळाचरित्र' निर्मिती प्रसंगी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांनी अशीच भूमिका निभावली होती. गुरू अंगददेव आणि नागदेवाचार्य यांच्या कार्यातील अनेक साम्यस्थळे आपल्याला येथे अनुभवण्यास मिळतात. गुरूमुखीमुळे शीख धर्माचे साहित्य विशुद्ध राहिले व पंजाबी भाषा विकसित होत गेली. पंजाबी भाषेला स्वतःची लिपी लाभल्याने ती साहित्याची भाषा होऊ शकली. १९८१ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार अमृता प्रितम यांच्या रुपाने पंजाबी साहित्याला मिळाला. भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार पंजाबी भाषेतील साहित्यासाठी एका महिलेला मिळतो. हे नानकदेवांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाचे पंजाबी समाजाने केलेले सक्रिय अनुकरणाचे यश म्हणता येईल. गुरूमुखीची अक्षरे गिरवतच भारताला जगातील एक महान अर्थतज्ज्ञ व कर्मयोगी पंतप्रधान मिळाला,तो म्हणजे डॉ. मनमोहनसिंह गुरूमुखीने साक्षर झालेल्या डॉ. मनमोहनसिंहांच्या ज्ञानाने आज जग अर्थसाक्षर होत आहे. गुरूमुखीच्या खाणीतील अशा हि-यांची गणना करणे अशक्य आहे. अंगददेवांनी नानकदेवांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याकरता अनेक केंद्रे स्थापन केली. या केंद्रांना मंजी असे म्हणतात. ही मंजीची स्थाने शिखांची एकत्र येण्याची ठिकाणे बनली आणि पुढे चालून त्यांच्या जागी गुरुद्वारे निर्माण झाले. अंगददेवांनी नानकदेवांनी कर्तारपूर साहिब येथे सुरू केलेल्या लंगर परंपरेला अधिक व्यापक, व्यवस्थित आणि व्यवहार्य केले. गुरूवाणीचे श्रवण-मनन आणि मग सहभोजन म्हणजेच लंगर. त्यासाठी प्रत्येक गुरूद्वा-यात पद्धतशीर व्यवस्था करण्यात आली. लंगरला नानकदेवांपासून ते आजवर धर्म-जात-वंश-पंथ यांच्या मर्यादा कधीच पडल्या नाही. असे करून आपण भूकेल्यांवर,वंचितांवर,गरजवंतांवर थोर उपकार करत आहोत. असा अहंकार आणि अवडंबर देखील चिटकले नाही. उलट लंगरमधील भोजन प्रसाद म्हणून देतांना ते ग्रहण करणारा आपल्याला सेवेची संधी देत आहे,असा भाव सेवेक-यांच्या मनात व वर्तनात असतो. प्रत्येक पदार्थ वाढतांना 'वाहेगुरू' उच्चार करून वाढला जातो. यासाठी अन्नदान हा अत्यंत घृणास्पद शब्द देखील कधी वापरला जात नाही. अन्नदान या शब्दात उपकृत करण्याचा अहंकार जाणवतो. लंगरचा संबंध राजकारण, प्रसिद्धी,समाजकल्याण इत्यादीशी कधी जोडण्यात आला नाही. अनाथांना किंवा रुग्णांना दोन केळी देऊन छायाचित्रासह प्रसिद्धी करून घेणारे एक डझन लोक पाहण्याची एव्हाना आपल्याला सवय झाली आहे. अंगददेवांनी शीख धर्मात बलोपासनेचे संस्कार देखील रुजवले. नानकदेवांनी सुद्धा बलोपासनेचे महत्व वेळोवेळी विषद केले होते. कारण कसरत-क्रीडा यागोष्टी माणसाला शरीराने व मनाने सुदृढ करत असतात. सृदृढ शरीरच जीवनाच्या आणि आध्यात्माच्या पथावरील संघर्षाचा मुकाबला करू शकते. असे नानकदेव आणि अंगददेव दोघांचे मत होते. अंगददेवांनी आपला आवडता खेळ असलेल्या कुस्तीच्या माध्यमातून पंजाबच्या मातीत बलोपासना आणि क्रीडा संस्कृती रुजवली. आजही भारताच्या क्रीडा क्षेत्रात पंजाबचा दबादबा आपल्याला दिसून येतो. त्यामागे अंगददेवांचे नियोजनबद्ध प्रयत्न महत्वाचे आहे. उद्योगप्रियता,शरीरसाधना,लोकसंघटन आणि दीनदुर्बलांची प्रत्यक्ष सेवा यांच्या माध्यमातून नानकदेवांच्या तत्त्वज्ञानाला शीख धर्माच्या कोंदणात बसवण्याचे कार्य गुरू अंगददेवांनी पार पाडले. यावरून नानकदेवांची निवड किती सार्थक होती,याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment