तीर्थी धोंडा पाणी
भगवान श्रीकृष्णाने ज्या भूमीवर अर्जुनाला गीतामृत दिले. अधर्मावर धर्माचा विजय निश्चित करण्यासाठी जी भूमी असंख्य योद्धांच्या रक्ताने न्हाऊन निघाली. हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या सर्व पूर्वजांचे पिंडदान जेथे केले जाते,ती कुरूक्षेत्राची भूमी. त्यामुळे कुरूक्षेत्र हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. कुरूक्षेत्रामध्ये एक गुरू-शिष्याची जोडी धर्मशाळेऐवजी एका सरोवराच्या काठी असलेल्या वृक्षाच्या छायेत मुक्कामाला होती. तीर्थक्षेत्री असलेले हे सरोवर आणि त्याचे घाट देखील पवित्र. त्यामुळे पवित्र स्नान आणि कर्मकांड करण्यासाठी जमलेली भाविकांची मांदियाळी आणि दानधर्माची चाललेली दिवाळी. असा प्राचीन काळापासून आजवर तीर्थस्थानी असलेला चिरपरिचित नजारा. त्यात तो दिवस ग्रहणाचा म्हणजे भाविकांसाठी स्नान करुन राहूपासून मुक्तीचा आणि ब्राहमणपुरोहितांना दक्षिणेच्या प्राप्तीचा. हा सगळा खेळ सरोवराच्या काठावर बसलेल्या गुरू-शिष्यांचे मनोरंजन करत होता. गुरूने आपल्या शिष्याला रबाबाचे सुर छेडण्यास सांगितले आणि स्वतःच्या अलौकिक-अपार्थिव स्वरांन...