स्वातंत्र्ययुद्धाचे बौद्धिक पोषण करणारा बळीराजा
कोणतेही सार्वजनिक आंदोलन अथवा राज्य व्यवस्था यांच्यात कालौघात दोन पक्ष निर्माण होणे,अत्यंत स्वाभाविक आहे. जहाल-मवाळ,कर्मठ-उदार,राजभक्त-देशभक्त इत्यादी नावांनी हे पक्ष ओळखले जातात. आंदोलन किंवा राज्यव्यवस्था यांच्या स्वरूपानुसार हे नामकरण होत असते. अमेरिकन कांतीत देखील देशभक्त (Patriots) आणि राजभक्त (Loyalists) असे दोन पक्ष निर्माण झाले. उदारवादी किंवा देशभक्त जहाल होते. त्यांचा ब्रिटिश सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध होता. एका अर्थाने हा पक्ष संपूर्ण स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता. राजभक्त किंवा रूढीवादी मध्यममार्गाचा अवलंब करण्याचे पक्षधर होते. नेमस्तपणे आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारसमोर ठेवाव्यात आणि मान्य करून घ्याव्यात असा त्यांचा आग्रह होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसमध्ये देखील जहाल-मवाळ असे दोन पक्ष असल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. अमेरिकन स्वातंत्र्य लढयात प्रारंभी दोन्ही पक्षांचा वाद हा दृष्टीकोनात्मक अंतर ईथपर्यंत मर्यादित होता. एका ऐतिहासिक घटनेने दोन पक्षातील दरी रुंदावत गेली. ही घटना म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची घोषणा अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीतील देशभक्त आणि राजभक्त अशा विभागणीस काही कारणे होती. त्यामध्ये पहिले कारण म्हणजे अमेरिकेबाबत ब्रिटिशांच्या आक्रमक व अन्यायकारक नीतीविषयी असणारी घृणा,दुसरे म्हणजे स्वातंत्र्याविषयी जनता व नेत्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह-उल्हास आणि तिसरे कारण होते 'स्वातंत्र्य-समता-बंधुता' यांच्या पायावर उभ्या असलेल्या नव्या तत्त्वज्ञानांचा जगावर पडत असलेला प्रभाव. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या समांतर फ्रेंच राज्यक्रांतीची बीजं अंकुरत होती. रशियात झारच्या विरोधात जनमानस निर्माण होऊ लागले होते. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडसह सर्व युरोपात कारखान्यांमधील कामगार हा नवा वर्ग निर्माण झाला होता. परंपरागत धार्मिक नियंत्रणाखाली असलेला युरोपातील शेतकरी-शेतमजूर खेडयातून शहरात पोहचला होता. औद्योगिक क्रांतीमुळे 'धर्म-वंश-संस्कृती' यांचा इमला आर्थिक हितसंबंधावर उभा आहे. याची जाणीव स्पष्ट वा नेमकी नसली तरे कुठे तरी होऊ लागली होती. युरोपातील अशा सर्व घटनांचे अंतःसंबंध एकमेकांत गुंफलेले होते. त्याच्या परिणाम अमेरिकन जनतेच्या व नेत्यांच्या मानसिकतेवर होण अपरिहार्य होते. युरोपातील सर्व घटनांनी अमेरिकन जनतेला स्वतःच्या गुलामीची आणि शोषणाची जाणीव होऊ लागली असावी,असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाश्चात्य जगातील युगप्रर्वतक तत्त्वज्ञांमध्ये ज्याचे नाव घेतले जाते,अशा रुसोच्या विचारांचा प्रभाव अमेरिकन स्वांतंत्र्य युद्धातील बुद्धिजीवी व विचारवंत नेत्यांवर होता. सामाजिक बंधने आणि गुलामी यांचा घोर विरोधक रुसो अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीच्या पायात भिनलेला होता. अमेरिकन जनतेला तीन हजार सागरी मैलांवरुन त्यांचे नियंत्रण करणारी दमनकारी-शोषक राजसत्ता नको होती. तसेच युरोपातील चर्चकेंद्रित आणि विशेषतः इंग्लंडमधील व्यक्तीस्वातंत्र्याची गळचपी करणारी रुढीग्रस्त जीवनशैली देखील नको होती. अमेरिकन जनतेच्या पूर्वजांनी शोधलेल्या,वसवलेल्या आणि घडवलेल्या नव्या जगासाठी त्यांना नवे आभाळ आणि नवे अमर्याद क्षितीज हवे होते. 'स्वातंत्र्य-समता-बंधुता' यांचा आग्रह धरणारा रुसो अराजकवादी नव्हता. त्याला नैतिकतेच्या पायावर उभी 'स्वातंत्र्य-समता-बंधुता' हवी होती. अशा नैतिकतेसाठी नियमाधिष्ठित कायदयाच्या राज्याविषयाी रुसो आग्रही होता. यामुळेच प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य ग्राहय धरून आकाशात झेप घेण्याची संधी प्रत्येकाला देणारे,मात्र एकसंध अमेरिकन समाज म्हणून त्याच्या कायदयाचे पालन बंधनकारक असणारे राष्ट्र निर्माण करणे. हे अमेरिकन विचारवंत नेत्यांचे रुसोप्रणित ध्येय होते. रुसोप्रमाणेच जॉन लॉक यांच्या तत्त्वज्ञानाचा देखील प्रभाव अमेरिकन नेत्यांवर होता. लोकशाहीला सर्वोतोपरी मानणारे आणि दमनकारी शासनव्यवस्थेविरूद्ध विद्रोहाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा लॉक अमेरिका,भारत आणि अन्य वसाहतींच्या स्वातंत्र्ययुद्धांचे एक प्रेरणास्थान असलेला दिसतो. कोणताही समाज हा कायदयावर उभा असतो. कालबाहय झालेले किंवा जनतेला मान्य नसलेले कायदे जनतेच्या ईच्छेनुसार बदलवले जाऊ शकतात. कोणत्याही समाजाचा शासकाची सत्ता निरंकुश नसून. ती त्या समाजाची परंपरा व संचित असते. जे त्याच्यापर्यंत चालत आलेले असते. जोपर्यंत शासक या परंपरेचे पालन व संचिताचे जतन करेल तोपर्यतच त्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार असतो. हा जॉन लॉक यांचा विचार अमेरिकन असो वा भारतीय वा अन्य कोणत्याही वसाहतीतील स्वातंत्र्य चळवळींचाच नव्हे तर जगातील कोणत्याही देशात अन्यायाविरूद्ध होणा-या प्रत्येक चळवळींचा वा आंदोलनांचा गाभा आहे. अशाप्रकारे रुसो आणि जॉन लॉक यांनी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला तत्त्वज्ञानात्मक व बौद्धिक रसद पुरवलेली दिसते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा ज्याला एका अर्थाने पितामह म्हणता येईल अशा थॉमस पेन यांचे विचार रुसो आणि जॉन लॉक यांना पुरक असेच होते. मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा थॉमस पेन हा इतिहासातील पहिला विचारवंत मानला जातो. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन करणार त्याचा 'मानवी हक्क' या ग्रंथाने जगात स्वातंत्र्याची इच्छा बाळगणा-या लोकांना प्रेरणा दिली. मुळचा ब्रिटिश असणारा थॉमस पेन इंग्लंडच्या अबकारी खात्यात नोकरी करत होता. अबकारी खात्यात चालणा-या भ्रष्टाचाराबद्दल त्याने आपल्या खात्याला निवेदन दिले. त्याच्या अशा घोर अपराधामुळे कामात दुर्लक्ष केल्याबद्दल त्याची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली. त्याच्या असल्या बंडखोर वृत्तीमुळे तो सभ्य समाजालाच काय पण आपल्या बायकोला देखील नकोसा झालेला होता. तिने देखील त्याची आपल्या जीवनातून कायमची हकालपट्टी केली. विद्रोहापायी भणंग व एकाकी झालेल्या थॉमसला इंग्लंडमध्ये अमेरिकन वसाहतीचा कारभार पाहणारा त्याचा मित्र बेंजामिन फ्रॅकंलिन याने एक शिफारसपत्र देऊन अमेरिकेत आपल्या जावयाकडे पाठवले. १७७४ ला वयाच्या सदोतिसाव्या वर्षी अमेरिकेच्या धरतीवर थॉमस पेनने पाय ठेवला. नेमक्या त्याचवेळी अमेरिकेत स्वातंत्र्यलढयाची पहाट उगवत होती. पेनने एका स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक म्हणून आपल्या अमेरिकन जीवनाला सुरवात केली. अमेरिकेतील इतर संपादकांपेक्षा हा संपादक वेगळा होता. निग्रो गुलामीला विरोध,स्त्रियांच्या समान हक्कांचा आग्रह,लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य अशा सरकारला आणि समाजाच्या ठेकेदारांना नको असणा-यांना नावडणा-या विषयांवर थॉमस तळमळीने लेखन करू लागला. १० जानेवारी १७७६ ला पेनने 'कॉमन सेन्स' ही ४७ पानांची पुस्तिका लिहिली. अमेरिकन वसाहतीने इंग्लंडच्या जोखडातून कायमचे मुक्त होणे आवश्यक नव्हे तर अपरिहार्य आहे. असे ठाम प्रतिपादन केले. अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचे उगमस्थान 'कॉमन सेन्स' मध्ये होते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सहा महिन्यातच अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. अमेरिकेच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणा-या थॉमस पेनला इंग्लंड,पत्नी व समाज यांच्याप्रमाणे अमेरिकेनीही नाकारले. सच्चा विद्रोही ना शत्रुला ना स्वकियांना अशा कोणालाच पचवता येत नाही,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थॉमस पेन. अमेरिकन परराष्ट्र खात्याचा पहिला सचिव थॉमस पेन,फ्रांसकडून नव्याने जन्माला आलेल्या अमेरिकेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी झटणारा थॉमस पेन, इंग्लंमध्ये असतांना एडमंड बर्कच्या फ्रेंच क्रांतीविरोधी लिखाणाला आपल्या 'राईट्स ऑफ मॅन' मधून उत्तर देणार थॉमस पेन,यामुळे राजद्रोहाबद्दल अटक होणार म्हणून फ्रांसला पळून येणारा आणि तेथील जहाल क्रांतीकारकांडून करण्यात आलेल्या सोळाव्या लूईच्या शिरच्छेदाचा निषेध करणारा थॉमस पेन, फ्रांसची सत्ता जहालांकडे आल्यावर त्याचा विरोधाचा वचपा काढण्यासाठी तुरुंगात डांबण्यात आलेला थॉमस पेन, तेथ शिरच्छेदाची शिक्षा करण्याची तयारी होतांना फ्रांसमधील अमेरिकन राजदूतामुळे जीव वाचलेला थॉमस पेन, पंधरा-वीस वर्षांनी अमेरिकेत परतल्यावर अमेरिकन नागरिक नाही, म्हणून मतदानाचा हक्कही नाकरण्यात आलेला थॉमस पेन, आयुष्याची अखेरची सात वर्ष दारिद्रय,शारीरिक व्याधी आणि सामाजिक बहिष्कार यांना तोंड देत अखेरचा श्वास घेतलेला थॉमस पेन, १८०९ ला मृत्यूनंतर मानवी हक्कच काय पण स्वतःच्या बापाच्या क्वेक्कर पंथीय ख्रिश्चन दफनभूमीत चिरनिद्रा नाकारण्यात आलेला थॉमस पेन. एका अथांग शोकांतिकेचा नायकाला शोभेल असे थॉमस पेनचे आयुष्य अस्वस्थ करणारे आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी मानवी हक्क आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणा-या थॉमस पेनला त्याच अमेरिकेत साधा मतदानाचा हक्क मिळाला नाही आणि मेल्यानंतर गाडून घेण्याचे स्वातंत्र्य देखील मिळाले नाही. १९४५ ला त्याला मरणोपरांत अमेरिकन नागरिकत्व बहाल करुन त्याच्यावर थोर उपकार करण्यात आले. तोच अमेरिका आज मानवी हक्काचा आणि स्वातंत्र्याचा प्रवक्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी इतरांच्या मानवी हक्कांचा व स्वातंत्र्याचा गळा घोटत आहे. थॉमस पेनचा अंत अमेरिकेच्या मुखवटयामागील चेह-याचा खरा रंगच म्हणावा लागतो. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला बौद्धिक रसद पुरवून तिचे भरण-पोषण करणारा थॉमस पेन अखेर अमेरिकेचा बळीराजाच ठरला.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
.धन्यवाद सर, थॉमस पेन बद्दल खूपच मौल्यवान माहिती मिळाली. त्याच्या चरित्रावरचे इंग्रजी पुस्तक असेल तर सुचवा.सच्चा विद्रोही परकीयांना व स्वकीयांनाही नको असतो.. कटू सत्य
ReplyDelete