रॉयल नेव्हीच्या वेढयातील न्यूयॉर्क
२९ जून १७७६ ची पहाट न्यूयॉर्कच्या इतिहासात अजरामर झाली आहे. या दिवशी पहाटे न्यूयॉर्कवासीयांनी जे दृश्य पाहिले,त्याने त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. ग्रेट ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या महाकाय युद्धनौकांनी न्यूयॉर्कचा समुद्र व्यापला होता. 'चॅथम','ग्रेहाउंड','फोनिक्स' आणि 'अशिया' सारख्या इंग्लंडच्या सागरी शक्तीचा प्रत्यय देणा-या प्रख्यात युद्धनौका उगवत्या सूर्यासोबत न्यूयॉर्कच्या किना-यावर झळकल्या. ब्रिटन ही त्यावेळी जगातील महासत्ता आणि त्यांचे आरमार म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ आरमार असे समीकरण होते. समुद्रावर सत्ता असणारे देश याकाळात बलाढय मानले जात. व्यापार,युद्ध आणि प्रवास यासाठी जहाज हे तेंव्हा सर्वात वेगवान साधन होते. भारतात याचे महत्व केवळ छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम कळाले होते. त्यामुळेच त्यांनी भारतातील पहिल्या आरमाराची स्थापना केली. बाकी भारताला मात्र समुद्र पर्यटन देखील वर्ज्य होते. ग्रेट ब्रिटनचे सर्वात बलाढय आरमार पाहून न्यूयॉर्क शहराची गाळण उडाली. स्वतःच्या अस्तित्वाची खात्रीच त्यांना उरली नाही. रॉयल नेव्हीचे शंभर जहाज रात्रीच्या अंधारात न्यूयॉर्कच्या किना-याजवळ पोहचली. त्याकाळातील ही सर्वात आधुनिक जहाजे होती. तत्कालिन जगाच्या एकमेव महासत्तेची राजमुद्रा समुद्रावर डौलदारपणे मिळवणारी ही जहाजे. त्यांच्यासमोर नव्याने जन्माला आलेल्या अमेरिकेची क्रांतीसेना म्हणजे उंदराने हत्तीला आव्हान देण्यासारखेच म्हणावे लागेल. इंग्लंडच्या आरमारातील सर्व जहाजांमधून ९००० अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ब्रिटिश सैन्य अमेरिकेच्या धरतीवर उतरले. क्रांतीसेनेच्या जुनाट बंदुका आणि छोटया तोफांचा आग ओकणा-या ब्रिटिश आरमारासमोर टिकाव लागणे शक्य नव्हते. लेग्झिंटनच्या पहिल्या गोळीने महासत्ता ब्रिटिनच्या गर्वाला आव्हान दिले होते. लेग्झिंटनची पहिली गोळी जणू काही ब्रिटिश राजसत्तेच्या वर्मावर बसली. आपलेच अपत्य असणा-या अमेरिकेने आपल्याला आव्हान देणे ब्रिटनला कदापि सहन होणे शक्य नव्हते. अमेरिका आपल्या हातातून निसटता कामा नये यासाठी इंग्लंडचा राजा आणि संसद कामाला लागले. ऑगस्ट १७७६ अखेरीस रॉयल नेव्हीचे आणखी ५०० जहाजे न्यूयॉर्क बंदारात येऊन धडकली. त्यांनी आपल्या सोबत ३२००० पेक्षा अधिक ब्रिटिश सैन्य अमेरिकेच्या भूमीवर पोहचवले. १८ व्या शतकातील ही सर्वात मोठी आरमार मोहिम होती. अमेरिकावासीयांना वठणीवर आणण्यासाठी ब्रिटनचे सुमारे ४० % आरमार अमेरिकेच्या सागर किना-यावर उतरले होते. महासत्ता ब्रिटनची आरमार मोहिम देखील त्याकाळाचा विचार करता महासत्तेचा रूबाब व दरारा प्रदर्शित करणारी होती. कारण या मोहिमेवर तब्बल ८५००० पौंड राजसत्तेने खर्च केले होते. एक आकाराने मोठा आणि दुभती गाय असणारा देश आपले वर्चस्व झुगारून स्वतंत्र होण्यापासून वाचवण्यासाठी,तसेच जगाला आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय देण्यासाठी हा खर्च ब्रिटनला करावाच लागणार होता. ऐतिहासिक अशा या मोहिमेची जबाबदारी जनरल विल्यम होवे आणि ॲडमिरल लॉर्ड रिचर्ड होवे या दोघा बंधूवर सोपविण्यात आली होती. राजसत्ता कुर व मगरूरपणे अमेरिकेला चिरडण्याचा प्रयत्न करत असतांना, इंग्लंडच्या सर्वसामान्य जनतेची बुद्धी मात्र ठिकाणावर होती. ब्रिटिश जनतेने या खर्चिक मोहिमेला आणि त्याच्यासाठी होणा-या तीव्र विरोध केला होता राजसत्तेचा हा उन्मत्तपणा देशाच्या आर्थिक संकटाला आमंत्रण देणारा ठरेल. याची चिंता सर्व सुजाण नागरिकांना होती. असल्या मुर्खपणाने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते. याची चिंता नागरिकांना होती. त्यांची भिती अनाठायी नव्हती,सरकारचा हेकेखोरपणा आणि उर्मटपणा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्यास अखेर कारणीभूत ठरलाच. अमेरिकन मोहिमेसाठी सरकार करत असलेल्या सैन्य भरतीला देखील जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने जर्मनीच्या 'हेस कॅसल' प्रांतातून भाडोत्री सैनिकांची भरती करून, त्यांच्या जोरावर अमेरिकेला नमविण्याचा घाट घातला. इंग्लंड - अमेरिका यांच्यातील हे युद्ध १७७५ ते १७८१ असे सुमारे आठ वर्षे चालले. इंग्लंडच्या लोकशाहीवरचा सर्वात मोठा कलंक म्हणून यासर्व इतिहासाकडे पाहिले जाते. स्वकियांना समजून न घेता त्यांच्या न्याय्य मागण्यांना जेंव्हा बेदरकारपणे चिरडण्याचा प्रयत्न केला जातो,तेंव्हा कोणत्याही सत्तेचा अंत समिप येत असतो. कोणत्याही सत्ताधा-याला आणि त्याच्या चमच्यांना आपले राज्य कायम अबाधित राहिल असा दर्प होण्याचा इतिहास जेवढा जूना आहे,तेवढाच अशा प्रवृत्तींच्या पतनाचा इतिहास देखील जूना आहे. हिटलर किंवा मुसोलिनी यांच्यासाठी पागल झालेली जनता जगाने पाहिली आहे. तसाच त्यांचा अंत सुद्धा जगाने पाहिला आहे. ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता अशा ब्रिटिश राजसत्तेला आपला फाजिल आत्मविश्वास चांगलाच नडला. अमेरिकेला संपविण्याचा प्रयत्न करतांना ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याला ग्रहण लागले आणि एका नव्या महासत्तेच्या सूर्योदय होऊ घातला. इंग्रज आणि अमेरिकन खरे पाहिले तर एकाच वृक्षाच्या दोन शाखा. त्यांच्यातील वैमनस्याने सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. इंग्लंडमधील बहुसंख्य जनतेला सरकारने प्रथम याबद्दल भम्रित केले होते. अमेरिकन जनतेच्या मागण्या चूकीच्या आहेत,असा जनतेचा समज करण्यात काही काळ सत्ताधारी यशस्वी झाले. चार्ल्स फॉक्स,बर्क यांच्यासारख्या काही लोकांनी राजसत्ता आणि जनमत यांचा विचार न करता सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. खरे हे त्यांचे धाडस होते. सत्ताधारी आणि त्यांच्या मागे असलेला अविचारी झूंड यांचाविरोध करणे अत्यंत कठीणच नव्हे, तर जीवावर बेतणारे असते. असे असले तरी हे लोक मागे हटले नाही. ते सत्य मांडत राहिले. अमेरिकेत ही क्रांतीकारकांना विरोध करणारे आणि राजनिष्ठ अविचारी होते. त्यांना क्रांतीकारक स्वतःचे शत्रु वाटत होते आणि जी सत्ता त्यांचे शोषण करत होती तीच्याबद्दल त्यांना अपार कळवळा व अभिमान होता. न्यूयॉर्क,न्यू जर्सी, पॅसिलवेनिया,नॉर्थ कॅरोलीना आणि साऊथ कॅरोलीना या प्रांतामध्ये अशा राजभक्तांची संख्या मोठया प्रमाणात होती. जॉन ॲडम्स यांच्या मतानुसार एकतृतीयांश अमेरिकन जनता अशी मूर्ख होती. या मुर्खांनी इंग्रजांना सुमारे २००००० सैनिकांची कुमक दिली. तसेच जेंव्हा युद्धात अमेरिकन क्रांतीसेनेचा विजय झाला,त्यावेळी सहा लाख राजभक्त घरदार सोडून कॅनडामध्ये पळून गेले. खरे पाहिले तर हे युद्ध निसंदिग्धपणे इंग्लंड जिंकू शकत होता. क्रांतीसेनेच्या पदरात पडत असलेल्या अपयशाने अनेक अमेरिकन निराश झालेले होते आणि अनेक राजभक्त अमेरिकन इंग्रजांचे समर्थक होते. अमेरिकेतील वसाहतींमध्ये परस्पर वैमनस्य आणि अंतर्विरोध मोठे होते. एक राष्ट्र म्हणून हवी असलेली सहकार्य भावना आणि विश्वास यांची कमतरता अजूनही होती. ब्रिटिश सरकार आणि सेनापती यांना मात्र परिस्थितीचा नेमका अंदाज कधीच घेता आला नाही. अमेरिकन समाजाच्या कमजोर पैलूंचे योग्य विश्लेषण करता आले असते,तर इंग्रजांना सहज यश संपादित करता आले असते. ब्रिटिश सेनापतींमध्ये आत्मविश्वासाची कमी म्हणा किंवा चाणाक्षपणाची कमी म्हणा त्यांना योग्यवेळी योग्य निर्णय घेता आले नाही. ब्रिटिश सैन्याचा सेनापती जनरल होवे याच्या मनात पहिल्यापासूनच अमेरिकन समाज आणि क्रांतीसेना यांच्याविषयी एक सहानुभूती होती. त्यामुळे त्याने युद्धात वेळकाढूपणाचे धोरण हेतुपुरस्सर स्वीकारले. त्याने क्रांतीसेनेचा सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन याच्याकडे एक अत्यंत उदारतापूर्ण शांतता प्रस्ताव पाठवला होता जॉर्ज वॉशिंग्टनने मात्र त्याने पाठवलेला लिफाफा उघडून देखील पाहिला नाही. उलट त्याला संदेश पाठवला की,' अमेरिकन जनतेच्या हाती सर्व नागरी अधिकार असले पाहिजे', म्हणजेच अमेरिकेच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी वॉशिंग्टन यांनी केली. खरे पाहिले तर त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर जगात सर्वात आधुनिक आणि सामर्थ्यशाली सैन्याच्या समोर केलेला हा आघावपणाच म्हणावा लागेल. अनेकवेळा असला आघावपण अविचारानेच केला जातो,तर कधीकधी असला आघावपणा विचारपूर्वक केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा आघावपणा नेमका कोणत्या प्रकारचा होता,हे नेमकेपणाने सांगता येत नाही मात्र जगातील मोजक्या श्रेष्ठ सेनापतींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. कदाचित त्यांचा हा आघावपणाच कोणत्याही अर्थाने ज्याला सैन्य म्हणता येणार नाही,अशा क्रांतीसेनेच्या अंतिम विजयाचा मंत्र ठरला असावा. पुढे भविष्यात आठ वर्षे चाललेल्या युद्धात आत्मविश्वास हे अमेरिकन क्रांतीसेनेचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध भविष्यातील अमेरिकेची पायाभरणी करणा-या अनेक द्रष्टया नेत्यांना जन्म देणार होते. ज्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव सर्वात वरच्या स्थानी चिरंतन कोरले जाणार होते.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment