जाहीरनाम्यातील मेघगर्जना

'आमचा दृढ विश्वास आहे की,ईश्वराने प्रत्येक मानव समान बनवला आहे आणि प्रत्येक माणसाला त्याचे जीवन जगण्याचा आणि जीवनात सुखाचा व समृद्धीचा शोध घेण्याचा स्वयंसिद्ध अधिकार आहे.' या  थॉमस जेफरसनच्या  आवेशपूर्ण उद्गारांनी न्यूयॉर्कच्या सिटी हॉलसमोरील  प्रांगणात जमलेला प्रचंड जनसमुदाय भारवून गेला होता.  ९ जुलै १७७६ चा हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे.  ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या जहाजांचा प्रचंड मोठा बेडा न्यूयॉर्कला कोणत्याही क्षणी जमीनदोस्त करण्याचा तयारीत असतांना,  अमेरिकन क्रांतीचा बौद्धिक सेनापती थॉमस जेफरसन न्यूयॉर्कवासीयांच्या माध्यमातून अखिल अमेरिकेच्या मनात विद्रोहाची बारूद भरत होता.  ऐव्हाना स्वातंत्र्याची भावना आता अमेरिकेच्या धमण्यांमधून रक्त म्हणून वाहू लागली होती.  'अभी नही तो कभी नही' याची जाणीव अमेरिकन समाजाला झाली होती.  जेफरसनच्या शब्दांनी पेटलेला न्यूयॉर्कवासीयांचा जनसमुदाय 'बोलिंग ग्रीन' या सिटी हॉलजवळील ठिकाणी पोहचला.  तेथे दिमाखात उभा असलेला ब्रिटश साम्राज्याचा सम्राट किंग जॉर्ज तिसरा याचा पुतळा जनसमुदायाने जमिनदोस्त केला.  जनसमुदायाच्या कृतीने केवळ किंग जॉर्जचा पुतळा जमिनदोस्त झाला नव्हता,तर ब्रिटिश साम्राजाचा मस्तवालपणा धुळीला मिळाला होता.  भविष्यात धातुच्या या पुतळयाला वितळवून त्यापासून ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी ४२००० बंदुकीच्या गोळया बनवण्यात आल्या.  थॉमस जेफरसन न्यूयॉर्कवर आग ओकण्यासाठी तयार रॉयल नेव्हीच्या जहाजांच्या आणि सुमारे ३०००० ब्रिटिश सैन्याच्या सावटाखाली न्यूयॉर्कवासीयांना करत असलेले संबोधन म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा (Declaration of Independence)  सार होता.  या घटनेच्या आठ दिवस आधी म्हणजे १ जुलै १७७६ रोजी फिलाडेल्फिया येथे 'कॉटिनेंटल काँग्रेस' आयोजित करण्यात आली होती.  थॉमस जेफरसनेच काँग्रेसमध्ये अमेरिकन त्याच्या नेतृत्वातील समितीने तयार केलेला स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसूदा मांडला.  जाहीरनाम्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  अखेर कॉटिनेंटल काँग्रेसच्या चौथ्या दिवशी म्हणजे ४ जुलै १७७६ ला अमेरिकेन स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याला मान्यता दिली.  म्हणूनच ४ जुलै १७७६ हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  जाहीरनाम्याच्या मसुदा समितीत थॉमस जेफरसन,बेंजामिन फ्रँकलिन,रॉजर शेरमन,जॉन ॲडम्स आणि रॉबर्ट आर. लिव्हिंगस्टोन यांचा समावेश होता.  विशेष म्हणजे मसुदा समितीतील जॉन ॲडम्स आणि थॉमस जेफरसन हे अनुकमे अमेरिकेचे दुसरे व तिसरे राष्ट्राध्यक्ष झाले.  स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मूळ मसुदा थॉमस जेफरसन यांनी बनवला होता.  बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉन ॲडम्स यांनी त्यात काही किरकोळ बदल केले होते.  ख-या अर्थान थॉमस जेफरसनचा स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा निर्माता होता.  कॉटिनेंटल काँग्रेसच्या मान्यतेनंतर हा जाहीरनामा एका चर्मपत्रावर सुंदर हस्ताक्षरात लिहून काढण्यात आला.  २ ऑगस्ट १७७६ ला यावर समिती सद्स्यांनी हस्ताक्षर केले.  अमेरिकेन स्वातंत्र्याचा जाहीरनामा मानवी समाजाच्या इतिहासात भारताच्या संविधानाप्रमाणे मानवतेचा जाहीरनामा मानला जातो.  थॉमस जेफरसनच्या जाहीरनाम्याची प्रारंभ पुढील शब्दांनी होतो,' जेंव्हा मानवी समाजाच्या इतिहासात निसर्ग नियमानुसार स्वतंत्र होण्यास सक्षम बनलेला एक मानव समुह त्याच्याशी पूर्वापार राजकीय संबंध असलेल्या दुस-या मानवी समुहापासून अलग होऊन,जगातील राष्ट्रांमध्ये एक राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य व समानतेची मागणी करतो,तेंव्हा त्याची ही मागणी अटळ समजून आणि जनमताचा आदर करून त्याच्या स्वातंत्र्याच्या मागणीमागील कारणांना स्पष्ट करणे अनिवार्य होते.' जेफरसन यांनी आपल्या मुळच्या ब्रिटिश मानवी समुहापासून अलग होण्याची कारणे सांगणे अनिवार्य होऊन गेले आहेत,असे जरी प्रतिपादन जाहीरनाम्याच्या प्रारंभी केले असले, तरी प्रत्यक्षात जाहीरनाम्यात या कारणांचा उल्लेख केलेला नाही.  उलटपक्षी जेफरसन तत्कालिन कारणांचाच उल्लेख यामध्ये करतात.  लोकशाहीचे अनन्यसाधारण महत्व आणि जनतेचे केंद्रवर्ती स्थान यांना थॉमस जेफरसन यांनी अतिशय सुंदर शब्दात आविष्कृत केलेले दिसते.  जेफरसन म्हणतात,' आम्हांला याची स्पष्ट जाणीव आहे की,सर्व जन्मतःच समान आहे आणि विश्वनिर्मात्याने प्रत्येक मानवाला काही मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत.  ज्यामध्ये जगण्याचा हक्क,स्वातंत्र्य आणि सुख हे प्रमुख अधिकार सांगता येतात.  या हक्कांच्या प्राप्तीसाठीच मानवी समाज शासन व्यवस्थेची निर्मिती करत असतो.  तसेच शासन करण्याचे अधिकार शासकांना शासितांनी प्रदान केलेले असतात.  तथापि कोणताही शासक किंवा शासन प्रणाली समाजाच्या जगण्याचा हक्क,स्वातंत्र्य,समानता,सुख इत्यादी हक्कांची पायमल्ली करत असले,तर जनतेला त्या शासकाला किंवा शासन प्रणालीला बदलवून किंवा उलथवून स्वतःच नवीन शासन व्यवस्था निमार्ण करू शकते.' जेफरसन यांनी लोकशाहीची जी अत्यंत तर्कपूर्ण व्याख्या येथे केलेली दिसते.  जाहीरनाम्यात लोकशाहीच्या व्याख्येनंतर ब्रिटिश सम्राटावर सुमारे वीस प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.   विशिष्ट घटना,कायदे आणि मानवी हक्क नाकारणारे निर्बंध यांच्या सर्मपक उदाहरणांमधून सम्राटाच्या जनताविरोधी नीतिला विघातक सिद्ध करण्यात जेफरसन यशस्वी झालेले दिसतात.  आरोपांच्या मांडणीनंतर अत्यंत मार्मिक वाक्यप्रयोग करण्यात आले आहेत.  अमेरिकेचा पक्ष सबळ करण्यासाठी आणि संपूर्ण स्वातंत्र्याची निर्माण झालेली अपरिहार्यता विषद करण्याचा यशस्वी प्रयत्न जाहीरनाम्यात करण्यात आला.  ब्रिटिश सम्राटाच्या अत्याचारी,शोषणकारी आणि दमनकारी प्रवृत्तीचे वर्णन करतांना जेफरसन यांनी केलेली शब्दरचना अतिशय सर्मपक आहे.  जेफरसन म्हणतात,' अत्याचारांच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही अत्यंत दयनीय किंवा लिन शब्दांमध्ये सविनय प्रार्थना करून न्यायाची याचना केली.  आमच्या दयायाचना करणा-या प्रत्येक पत्राच्या उत्तरादाखल आम्हाला अत्याचारच देण्यात आला.  प्रत्येक कार्यातून केवळ एक अत्याचारी असेच ज्याचे वर्णन करणे शक्य आहे.  असा राजा त्याच्या आधिन असलेल्या जनतेचा शासक म्हणून अयोग्य ठरतो.'  राजाच्या कुकर्माचा समाचार शेलक्या शब्दात घेतांना थॉमस जेफरसन आपली मातृभूमी आणि देशबांधवांशी असलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.  आम्हांला तुम्ही परके मानले आणि वाईट वागणूक दिली याची खंत व्यक्त करतात.  ते म्हणतात,' आम्ही आमच्या इंग्रंज बांधवांबद्दल  कधीही उदासीन नव्हतो. आम्ही सातत्याने त्यांना आमच्यावर विनाधिकार नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये, यासंदर्भात ईशारा देत होतो.  ज्या परिस्थितीत नाईलाजास्तव आम्हाला स्वदेश सोडून येथे यावे लागले.  याचे आम्ही त्यांना  वारंवार स्मरण करून दिले.  आम्ही त्यांच्या औदार्याला आणि जन्मजात न्यायप्रियतेला साद घातली.  आपण आमच्यावर होणा-या अत्याचारांचा  स्वकिय म्हणून विचार व निषेध करावा.  असल्या अत्याचारांमुळे आपला संबंध विच्छेद किंवा परस्पर व्यवहारांचा अंत होणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. याचीही जाणीव करून दिली.  परंतु त्यांनी न्याय किंवा स्वकिय अशा कोणत्याच दृष्टीकोनातून आमचा आवाज ऐकण्याऐवजी आपले कान बंद करून घेतले.  आता आमच्याकडे संबंध विच्छेदाच्या अपरिहार्यतेला मान्य करण्याशिवाय कोणताही उपाय उरलेला नाही.  इतर लोकांप्रमाणे आम्ही देखील तुम्हाला युद्धकाळात शत्रु आणि शांतीकाळात मित्र मानणार आहोत.' यामुळेच थॉमस जेफरसन यांनी लिहिलेल्या जाहीरनाम्याची भाषा आणि शब्दरचना अद्वितीय आहे.  अशीच  अनुभूती आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषा आणि शब्दरचना पाहून येते.  अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा एका स्वातंत्र्ययुद्धाचा उद्घोष होता.  जगाने आजवर अनेक क्रांत्या आणि विद्रोह अनुभवले आहेत.  असे असले तरी त्यापैकी कोणत्याही क्रांतीचा प्रारंभ असल्या हदयस्पर्शी शब्दांत झाला नाही.  फ्रेंच राज्यक्रांतीने 'स्वातंत्र्य,समता आणि बंधूता' हा महामंत्र जगाला दिला.  त्यानंतर आधुनिक युगातील प्रत्येक शोषित वर्ग आणि जातीसमुहांनी विद्रोहासाठी यांचा पुनरुच्चार केला.  असे असले तरी थॉमस जेफरसन आणि त्यांच्या सहका-यांनी याच भावनांना आणि सिद्धांताना अविष्कृत करण्यासाठी भाषेची जी कलाकारी साधली,तिची प्रशंसा करावीच लागते. स्वतःचा पक्ष मांडण्यासाठी त्यांनी दाखवलेली मर्यादा व आत्मसंयम यांनी त्यांच्या जाहीरनाम्याला एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवलेले दिसते.  असलाच आत्मसंयम व मर्यादा महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढयात दाखवला होता.  त्यांचा विरोध हा ब्रिटिश शासन आणि राजसत्ता यांच्यापुरता होता.  त्यांनी ब्रिटिश जनतेला आपले शत्रु कदापि मानले नाही.  कोणत्याही देशातील सामान्य जनतेला शत्रु मानने हा विकृतीचाच प्रकार असतो.  कारण कोणत्याही देशातील सामान्य माणूस हा दुस-या देशातील लोकांबाबत धोरण ठरवत नसतो की त्यांच्यावर प्रत्यक्ष अत्याचार करत नसतो.  अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात अमेरिकन नेत्यांनी आपल्या इंग्रंज बांधवांबद्दल सदैव सद्भावनाच ठेवली. 'Blood is thicker than Water' हया जर्मन भाषेतून इंग्रंजीत रुढ झालेल्या म्हणीचे स्मरण त्यांनी कायम ठेवले.  कारण त्यांना इंग्रंजांशी कायमचे शत्रुत्व ठेवायचे नव्हते.  असे असले तरी स्वातंत्र्याच्या जाहीरनामा म्हणजे युद्धाची मेघगर्जनाच  होती.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,
  भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !