लोकशिक्षक महात्मा
नानकदेव व भाई मर्दाना प्रवास करत-करत मक्केला पोहचले. मक्केत मुक्काम असताना एके रात्री नानकदेव झोपले होते. अचानक कुणी तरी आपल्याला मारत आहे,याची जाणीव झाल्याने त्यांना जाग आली. एक संतापलेला मौलवी त्यांना मारत होता. त्यांनी मौलवीला मारण्याचे कारण विचारले असता,संतापलेला मौलवी म्हणाला," कोण हा मूर्ख ! पवित्र काबाकडे पाय करून झोपतो म्हणजे काय ?" झोपलेल्या नानकदेवांनी मक्केतील पवित्र काबाकडे पाय केले आहे,असे मौलवीचे मत होते. त्यामुळे तो संतापला होता. संतापलेल्या आणि मारहाण करत असलेल्या मौलवीची नानकदेवांना गंमत वाटली. पवित्र काबाच्या दिशेने पाय करून झोपलो म्हणून हा मौलवी संतापतो आणि आपल्याला मारहाण करतो. 'अखंड जयाला देवाचा शेजार' असा हा मौलवी संतापू शकतो आणि मारहाण करू शकतो,खरोखर याला खरा धर्म आणि ईश्वर यांची जाणीव झाले आहे का? असा प्रश्न नानकदेवांना पडला. त्यांनी दाभिंक मौलवीची अक्कल ठिकाण्यावर आणण्यासाठी त्याला प्रश्न केला की,"मियाजी आपण मला का मारत आहात?"त्यावर मौलवी म्हणाला,"काबाकडे पाय करून झोपतोस ?" यावर नानकदेव त्याला शांतपणे म्हणाले,"मियाजी,ज्या दिशेला अल्ला नसेल त्या दिशेला माझे पाय ठेव." मौलवीने नानकदेवांचे पाय धरले आणि फरफटत दुस-या बाजूला वळवून ठेवले पण गंमत झाली ! त्या बाजूला देखील मौलवीला काबाची वाट दिसू लागली मौलवी अशाप्रकारे चारही बाजूंना नानकदेवांचे पाय फिरवून पाहिले,त्याला प्रत्येक दिशेला काबाची वाट दिसू लागली. तो चकित झाला आणि पुरता गोंधळून गेला. यावर त्याच्या दांभिकतेवर नेमके बोट ठेवत नानकदेव म्हणाले," मियाजी,अल्ला सर्वत्र आहे !" परमेश्वर चराचरात सामावलेला आहे,या तत्त्वाची धर्माच्या नावावर पोट भरणा-या मौलवीला विसर पडला होता. धर्माच्या नावावर प्रतिमा-प्रतिकांवरून वाद करणा-या लोकांना हा संदेश नानकदेवांना दयायचा होता. जो या अखिल विश्वाचा निर्माता आहे आणि ज्याने माणसासह सर्व पसारा निर्माण केलेला आहे. असा हा परमेश्वर तुम्हाला कोणत्याही आकारात,प्रतिकात व प्रतिमांत बद्ध करता येऊ शकत नाही. माणसाने स्वतःचा शोध घेतला तर त्याला तो स्वतःतच असलेला दिसेल. एकदा आपल्या प्रवासात नानकदेव काशीला गेले. काशीला जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध घातले जाते. तेथे दान-दक्षिणा दिल्याने आपल्या मृत पूर्वजांना ते स्वर्गात कुरियरने प्राप्त होत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच सूर्याला अर्घ्य दिल्याने ते त्याच्यापर्यंत पोहचते. नानकदेव काशीच्या गंगा नदीवर हे प्रकार पाहत फिरत होते. धर्माच्या नावाखाली करण्यात येणा-या कर्मकांडांचा नानकदेवांना तिटकाराच होता. हा सर्व प्रकार करणारे पंडित पाहून नानकदेव पाण्यात उतरले आणि त्यांनी पाणी उडवण्यास सुरवात केली. त्यांनी चालवलेला प्रकार पाहून त्या पंडितांनी विचारले," तुम्ही हे काय करीत आहात ?" नानकदेवांनी सांगितले," या दिशेला माझा प्रांत पंजाब आहे. तेथे माझी शेती आहे. माझ्या शेतीतील पिकांना मी पाणी देत आहे." त्यांच्या अशा वागण्यामुळे पंडितांना वाटले की, हा एक मुर्ख माणूस असावा. ते नानकदेवांवर हसले आणि त्यांना म्हणाले," अरे शेती कुठे,पीक कुठे? त्याला हे पाणी पोहोचणारे कसे ? हा व्यर्थ खटाटोप आहे." नानकदेवांना त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिकिया प्राप्त झाली. नानकदेव म्हणाले," असे कसे ? का नाही पोहचणार पाणी? जर तुम्हाला धन-धान्य किंवा अन्य वस्तू दान-दक्षिणा दिल्याने ते माझ्या मृत पितरांपर्यंत स्वर्गात पोहचू शकते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू शकते. तुम्ही सूर्याला अर्घ्य दिल्याने जर सूर्याला इतके लांब पोहचते,तर मी उडवलेले पाणी इतक्या जवळच्या माझ्या शेतीपर्यंत का नाही पोहचणार? यावर पंडित खजिल झाले. कर्मकाडांची व्यर्थता आणि त्याच्या नावावर चालणारे भोळया-भाबडया लोकांचे शोषण यावर नानकदेवांनी कायमच प्रहार केले. धर्म किंवा जाती यावरून माणसा-माणसात करण्यात येणारा भेद त्यांना कदापि मान्य नव्हता. हिंदू-मुसलमान असला भेद नानकदेवांनी आपल्या आचारात आणि विचारातही ठेवलेला नव्हता. दोन्ही धर्मातील धर्ममार्तंडांचा आणि त्यांच्या दांभिक-स्वार्थी प्रवृत्ती त्यांनी कायम निषेधच केला. यामुळेच हिंदू व मुसलमान अशा दोन्ही समाजात नानकदेवांचे अनुयायी निर्माण झाले. नानकदेवांनी आपला पोषाखही वेगळाचे केलेला होता. त्यांच्या पोषाखावरून त्यांचा धर्म कोणता हे कुणालाही कळत नसे. ते सांगत आहेत तो तिसराच धर्म आहे,याची ऐकणा-यांना आणि पाहणा-यांना जाणीव होत असे. त्यांनी आपल्या अनुयायांना देखील धर्माच्या नावाच्या चौकटीत बद्ध केले नव्हते. संस्कृत भाषेतील 'शीष' म्हणजे 'शिष्य' यावरून पंजाबी भाषेत त्याचे उच्चारण अपभ्रंश होऊन 'शीख' असे झाले. त्यांनी अनुयायांना केवळ शिष्य म्हणजे शीख संबोधले. लोकांशी संवाद साधणे याला त्यांना नेहमी महत्व दिले. गीत आणि संगीत यांच्या माध्यमातून संदेश देणारा नानकदेव एकमेव धर्मसंस्थापक होते. ते आपली शिकवण पद्यामध्ये लिहित आणि भाई मर्दाना त्याला चाल लावून ते रबाबच्या संगतीने गात असे. नानकदेवांनी आपल्या शिकविणीच्या प्रसारासाठी कायम प्रवास केला. आपल्या प्रवासात त्यांनी लोकांच्या प्रबोधनाला अत्यंत महत्व दिले. नानकदेवांनी धर्मसंस्थापका ऐवढीच लोकशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्यांच्यातील लोकशिक्षकाने मध्ययुगिन भारतात लोकशिक्षणाचे अत्यंत मौलिक कार्य केले. नानकदेवांना लोकांचा शिक्षक बनून राहण्यात समाधान वाटत होते. आपण कुणी दैवी पुरुष आहोत किंवा ईश्वराचे दूत आहोत असा कुठलाही दावा ते करत नसत. 'मी निसर्गाच्या प्रवाहातून आलो आहे आणि ईश्वराच्या आज्ञेने निघून जाईन," असे ते म्हणत. आपले जीवन व शिकवण यांना त्यांनी ईश्वराचा अवतार किंवा प्रेषित अशा कोणत्याही आवरणात गुंडाळले नाही. तसेच आपल्या शिकवणीला किंवा वचनांना ईश्वरी संदेश संबोधून मोठेपणही बहाल केले नाही. त्यांची शिकवण ही मूलतः धर्मातील दांभिकपणा आणि अनिष्ट गोष्टींविरŠद्ध पुकारलेला लढा,अशा स्वरूपात होती. आपल्या शिकवणुकीप्रमाणे वागण्याचे धैर्य त्यांच्याकडे होते. माणसाने प्रापंचिक व पारमार्थिक जीवनाची सांगड घालावी असा त्यांचा आग्रह होता. याच तत्त्वाचा त्यांनी आयुष्यभर प्रचार-प्रसार केला. संसार त्यागून संन्यासी म्हणून जीवन जगण्याला त्यांचा कठोर विरोध होता. नानकदेवांचे व्यक्तीमत्व म्हणजे मृदू स्वभाव आणि कठोर तत्वनिष्ठा,नम्रपणा आणि आपल्या कार्याच्या महानतेविषयीचा निःशंकपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाजातील व धर्मातील दांभिकता-विसंगती-अनिष्ठ प्रथा यांच्यावर अतिशय नकळतपणे,कुणाला बोचणार नाही अशा पद्धतीने बोट ठेवण्याची दयाळू विनोदबुद्धी. त्यांचा या सर्व स्वभाव वैशिष्टयांचा लाभ त्यांना आपल्या जीवनकार्यात झाला. त्यांनी लोकांना आपल्याकडे येण्यास भाग पाडले. त्यांनी माणसांना तुम्ही पापी-पश्चातापदग्ध-अपराधी आहात,मी यातून तुम्हाला मुक्त करतो. असा आव आणला नाही. एक सहृदय आणि समजून घेणारी व्यक्ती म्हणून,मित्र वा पिता म्हणून आपल्याजवळ बोलवले, भगवान बुद्ध आणि नानकदेव यांच्यात एक कमालीचे साम्य येथे आढळते. ते म्हणजे या दोघांच्या व्यक्तिमत्वातला व शिकवणुकीतला सारखेपणा. बुद्धांनी देखील माणसांना केवळ मार्ग सांगितला आणि या मार्गाने गेल्यास योग्य ठिकाणी पोहचशील, तेथे पोहचल्यावर तूझ्या अनुभवाला प्रमाण मानून सत्य काय ते ठरव, हे सांगितले. नानकदेवांनी देखील नेमके हेच केले. त्यांनी माणसांना स्वतःचा शोध घेण्यास सांगितले. त्यांच्या शिकवणुकीला विनोदाची देखील किनार होती. विनोद करतांना त्यांनी स्वतःची देखील गय केली नाही. ते म्हणत,"मी जेव्हा शांत बसतो,तेव्हा लोक म्हणतात मजजवळ ज्ञान नाही. मी जेव्हा बोलतो,तेव्हा लोक म्हणतात मी वाचाळ आहे. मी जेव्हा येऊन टेकतो,तेव्हा लोक म्हणतात अनाहूत पाहुणा मुक्काम ठोकायला आला आहे. मी जेव्हा निघून जातो,तेव्हा लोक म्हणतात मी माझ्या कुटुंबाला वा-यावर सोडून पळून गेलो. मी जेव्हा मस्तक झुकवतो,तेव्हा लोक म्हणतात मी घाबरून जाऊन प्रार्थना करतो आहे. शांतपणे माझा वेळ घालवण्याकरता मी काहीच करू शकत नाही. हे परमेश्वरा,आता आणि यापुढे तूच तुझ्या या सेवकाचा मान राख." एका महापुरूषाने असे स्वतःवर विनोद करत,प्रबोधन करण्याचे साधेपण लोकांना आपलेसे करणारे वाटत होते. त्यांच्या साधेपणात कोणतीही कृत्रिमता किंवा ढोंग दडलेले नव्हते. १९ व्या शतकातील संत गाडगे बाबांच्या शैलीचा प्रत्यय नानकदेवांनी सोळाव्या शतकातच दिलेला दिसतो. आपल्या आयुष्यात नानकदेवांना जे अनुयायाी मिळाले,त्यांची संख्या पाहता त्यांना फार तर हिंदू आणि मुसलमान धर्मातून फुटून निघालेल्या काही असंतुष्ट लोकांचा गट असे म्हणता आले असते. नानकदेवांच्या हयातीत एक धर्म म्हणून शीख धर्माची चौकट निर्माण झालेली नव्हती. नानकदेवांनी जी उणीपुरी वीस-तीस वर्षे लोकशिक्षणाचे कार्य केले, त्यामध्ये त्यांनी आपल्या शिकवणुकीतून शीख धर्माचा पाया रचला. भविष्यातील शीख धर्माला तत्त्वज्ञान आणि आचार यांची बैठक दिली. एक धर्म म्हणून स्वतःची भाषा आणि साहित्य,धार्मिक श्रद्धा आणि संस्था,परंपरा आणि रूढी असलेला एक धर्म म्हणून शीख धर्माची उभारणी करण्याचे काम नानकदेवांच्या उत्तराधिका-यांनी केले. एक असामान्य लोकशिक्षक म्हणून जनसामान्यांमध्ये विरघळून गेलेला हा महात्मा आपल्या जीवनकार्यातून व संदेशातून त्यांना सतमार्गाकडे घेऊन जाण्याची भूमी तयार करण्यात यशस्वी ठरला.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment