गुरू नानक शाह फकीर...
'नाह कोई हिंदू नाह मुसलमान' हा नानकदेवांनी सच्चखंडाच्या प्रसंगानंतरचा पहिला संदेश. त्यांच्या पहिल्या संदेशात शिख धर्माचा पाया रचला गेला. नानकदेवांचा पहिला संदेश शिख धर्माची भविष्यकालिन वाटचाल निश्चत करणार होता. त्यांच्या संदेशाचा अन्वयार्थ शोधण्यासाठी आपल्या पुन्हा एकदा तळवंडीला जावे लागते. तळवंडीच्या मातीने नानकदेवांच्या बालमनाला आणि व्यक्तिमत्वाला दिलेला आकार वैशिष्टपूर्ण होता. रायबुलार यांच्यासारख्या उदार मुसलमान जमिनदाराचे गाव तळवंडी. त्यांचे कारभारी असणारे नानकदेवांचे पिता काळूराम मेहता. हया दोन व्यक्तिमत्वांच्या संबंधात व सौहादर्यात नानकदेवांना दोन एकदम विरुद्ध धर्मपरंपरांचा परिचय एकाच वेळी होत गेला. परिचयासोबतच या धर्मपरंपरांचा समन्वय देखील होऊ शकतो,याची कल्पना येत गेली. मुसलमान जमिनदारीचे गाव असल्याने तळवंडीत हिंदूबरोबरच मुसलमान समाजही मोठया प्रमाणात होता. त्यामुळे तळवंडीत हिंदू पंडितांसोबतच मुसलमान काजी-मुल्ला-फकीर देखील होते. सुफी संप्रदायाचा परिचय तळवंडीला झालेला होता. सम्मद हुसेन नावाचा एक असाच सुफी फकीराचे तळवंडीत वास्तव्य होते. नानकदेवांची सम्मद हुसेन सोबत मैत्री जमली होती. हुसेन फकीराने मुस्लिम धर्मातील अनेक कथा नानकदेवांना ऐकवल्या होत्या. एक भिन्न धर्मिय समाज म्हणून नानकदेव तळवंडीत मुसलमानांना पाहत होतेच,मात्र हुसेन फकीराच्या कथांमधून एक धर्मपरंपरा म्हणून ईस्लामचा परिचय त्यांना होत होता. हिंदू शिक्षकांप्रमाणेच मुसलमान शिक्षकांकडे देखील त्यांना शिकण्यासाठी पाठवण्यात आले होते. तळवंडीत हिंदू होते त्यांचे शिक्षक होते,मुसलमान होते त्यांचे शिक्षक होते यापेक्षा एक सर्वात श्रेष्ठ शिक्षक होता. तो म्हणजे तिथला नितांत रमणिय निसर्ग. दोन्ही धर्मातील शिक्षकांपेक्षा आणि धर्मपरंपरांपेक्षा नानाकदेवांना निसर्गाने कायम आकर्षित केले. धर्माची निरस व रूक्ष चर्चा आणि कधीच अंमलात न आणली जाणारी तत्त्वे यांच्या श्रवणात-वाचनात नानकदेवांचे मन कधीच रमले नाही. त्यांना धर्म निसर्गात दिसत होता. मानव ज्या निसर्गाचा भाग आहे,त्या निसर्गाचे सर्वश्रेष्ठत्व त्यांना खुणावत होते. त्याची निर्मळता,सहजता,अकृत्रिमता म्हणजेच खरा परमेश्वर हे जाणवत होते. कोणत्याही धर्माच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेली कृत्रिम व बेगडी तत्त्वज्ञानं व सिद्धांत म्हणजे धर्म आणि तो परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्ग हे त्यांना मान्य होत नव्हते. परमेश्वराची खरी अनुभूती घेण्यासाठी निसर्गाशी व स्वतःशी संवादी होण्याची आवश्यकता त्यांना जाणवत होती. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' याची प्रचीती घेण्यात नानकदेवांना रस होता. रानावनातील वारा परमेश्वराचा स्पर्श देत होता. त्या वा-यावर डोलणारी पान-फुले त्याच्या अस्तित्वाची अनुभूती देत होते. झुळझुळत वाहणारे झरे परमेश्वराने निर्माण केलेल्या विश्वाच्या अखंड प्रवाहाची प्रचीती देत होते. निसर्गाच्या सहवासात नानकदेव त्याच्यातील आणि स्वतःतील परमेश्वराचा शोध घेत होते. भगवान बुद्धांच्या मार्गाला नास्तिक म्हणून बदनाम करण्यात आल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. बुद्धांनी आत्म्याचे व ईश्वराचे अस्तित्व नाकारले. याचा अपप्रचार मोठया प्रमाणात करण्यात आला. खरे तर त्यांनी या दोन्ही संकल्पना अस्तित्वात आहे किंवा नाही याचा शोध माणसाने स्वतःत डोकावून घ्यावा. स्वतःचा शोध घेत गेल्यास या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील याची हमी दिली. त्यांनी कोणताही धर्म सांगितला नाही,तर त्यांनी केवळ मार्ग दाखवला. बुद्धांनी त्यांना स्वतःला परमेश्वर गवसला किंवा त्याने मला जगाचा उद्धार करण्याचा आदेश दिला किंवा वरदान दिले असा दावा देखील केला नाही. मला देखील प्रमाण मानू नका असे सांगण्याचे धैर्य दाखविणारा जगातील पहिला महात्मा म्हणजे भगवान बुद्ध. हा मार्ग बुद्धानंतर कबीर-रविदास-मीरा-नानकदेव-तुकाराम असा होत आपल्यापर्यत पोहचलेला दिसतो. नानकदेवांनी निसर्गाच्या एकांतात स्वतःचा शोध घेतला आणि त्यांना चराचरात परमेश्वर दिसू लागला. देव त्यांच्याशी बोलू लागला आणि त्यांच्या काव्यपदांवर डोलू लागला. प्रत्येक धर्मसंस्थापकाची व त्याच्या धर्माची शिकार कर्मकांडांच्या जंगलात झालेली दिसते. कर्मकांडांचा आणि धर्माचा अर्थार्थी कोणताही संबंध नाही. स्वतःचा शोध घेत परमेश्वराच्या शोधासाठी प्रवासाला निघणे म्हणजे धर्म होता. आपण कर्मकांडांचे स्तोम माजविणा-यांना आणि त्यांच्या मागे मेढंराप्रमाणे जाणा-यांना धार्मिक समजायला लागलो. प्रतिमा-प्रतिकांवरून रक्तपात करू लागलो. आपला धर्म दुस-यावर लादू लागलो. दुस-याच्या धर्मात परमेश्वराला जे संबोधले गेले त्यावरून अर्वाच्य भाषा वापरणारे प्रत्येक धर्मातील महाभाग आता समाज माध्यमांवर गरळ ओकत आहेत. तसे पाहिले तर परमेश्वर एकच असून तो चराचरात असल्याची ग्वाही प्रत्येक धर्मसंस्थापकाने दिली आहे. धर्म आणि भाषेनुसार परमेश्वराला नाव देण्यात आले. आता कोणत्याही धर्मात परमेश्वराला जे संबोधण्यात आले आहे,त्यावरून जर कोणी अर्वाच्य भाषा वापरत असेल,तर तो अतिंमतः परमेश्वरासाठीच त्या भाषेचा प्रयोग करत असतो. याचे भान कोणालाही नाही. उलट असे करणे म्हणजे मी किती कट्टर अथवा जहाल धार्मिक आहे,असे समजले जाते. हेच प्रत्येक धर्माचे अपयश ठरते. जगातील कोणताही एक धर्म जाणलेला आणि प्रत्यक्षात आचरणात आणलेला व्यक्ती इतर कोणत्याही धर्माला नावे ठेवू शकत नाही किंवा कोणत्याही धर्माच्या अनुयायाला परका मानू शकत नाही. कारण त्याला धर्माचे नेमके मर्म समजलेल असते. जगात आजवर धर्माच्या नावाखाली झालेला रक्तपात म्हणजे धर्मसत्ता-राजसत्ता-अर्थसत्ता यांनी सामान्य माणसांची केलेली दिशाभूल आहे. धर्मयुद्धांमध्ये सरशी कोणाचीही झाली तरी छळ-यातना मात्र सामान्य माणसाच्याच पदरात असतात. त्यांना लढवणा-यांच्या झोळया मात्र सत्ता-संपत्तीने ओसांडून वाहतात. नानकदेवांचा धर्म म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा शोध घेत परमेश्वराचा शोध घेणे आणि पुन्हा निसर्गात त्याचे विविध रूपातील अस्तित्व पाहण्याची दृष्टी प्राप्त करणे. त्यामुळे त्यांच्या मनातील पूर्वीच्या धर्मपरंपरांच्या भिंती कोसळल्या. परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गावरून भांडण्यापेक्षा त्याच्याकडे जाणे त्यांना महत्वाचे वाटले. त्यांचे बालपण ते तारुण्य हिंदु-मुसलमान संघर्ष पाहण्यात गेले होते. त्याच्यातील व्यर्थता त्यांच्या लक्षात आली होती. निसर्गाशी संवादी राहिल्याने त्यांचे मन आभाळ झाले. प्रत्येक माणसाने स्वतःचे आभाळ वेगळे आहे असे लाख मानले तरी सर्व माणसे एकाच आभाळाखाली असतात. ते आभाळ आपला-परका असे मानत नसते. ती सर्व आभाळाची लेकरे असतात. नानकदेवांसारख्या आभाळाने देखील आपपर भाव विचारात न घेता त्याला कवेत घेतले. दुखः-वेदना-यातना यांनी होरपळलेल्या,द्वेष-मत्सर यांनी पेटलेल्या मनांवर जलधारा बरसवल्या. संत मुक्ताबाई यांच्या भाषेत 'जग झालेया वन्ही।संत सुखे व्हावे पाणी।'. प्रत्येक परकीय आक्रमणाला सर्वप्रथम झेलणा-या पंजाबमध्ये हिंदू-मुसलमान दोन्ही समाजातील परस्परांसंदर्भातील अविश्वास नानकदेवांनी अनुभवला होता. बाराव्या शतकापासून नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यांच्यात तत्त्वज्ञानात्मक आदान-प्रदानास प्रारंभ झाला होता. उत्तर भारतात भक्त कबीर,सूफी शेख इब्राहिम फरीद,शेख फरिउद्दीन शकरगंज,हजरत निजामुद्दीन औलिया,ख्वाजा मोइद्दीन चिस्ती असे अनेक लोक संत म्हणून सर्वमान्य झाले होते. कबीरामुळे मध्ययुगिन भक्ती आंदोलनाला प्रचंड वेग व मौलिकता प्राप्त झाली होती. महाराष्ट्रात शेख महंमद,चांद बोधले आदि मुसलमान संतांना मान्यता मिळाली होती. धार्मिक व सांस्कृतिक संघर्ष-समन्वय-अभिरसरण ही प्रकिया या बहुपेडी भारतीय जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. नानकदेवांनी बालवयातच हिंदू आणि मुस्लिम धर्मांचा सखोल अभयास व सूक्ष्म निरिक्षण सुरू केले होते. गावात येणारे साधू-संत-फकीर अशा सर्वाशी त्यांनी सतत वादविवाद व चर्चा केली होती. हे सर्व लोक ख-या धर्मापासून लांब आहेत किंवा खरा धर्म त्यांना ज्ञात नाही. याबाबत नानकदेवांचा अनुभव पक्का होत गेला. यातूनच त्यांचा पहिला संदेश 'नाह कोई हिंदू नाह मुसलमान' अवतरला. हा देखील त्यांच्या तपश्चर्येचा भाग होता. समाजात राहून नेटका प्रपंच करणारे नानकदेव कायम समाज सन्मुख राहिले. कारण त्यांना भवसागरात गटागंळया खाणा-या सामान्य जनांना यशस्वीपणे भवसागर तारून पैलतीरावर पोहचवायचे होते. 'काह रे,बन खोजन जाई ? सर्व निवासी सदा अलेपा,तोही संग समाई.' म्हणजेच अरे,देव जंगलात का बसलाय ? तो तर सर्वत्र आहे. पण सर्वत्र असूनही तो कुठेच अडकून पडलेला नाही. सुगंध जसा फुलात राहतो,आरशात जसे प्रतिबिंब बसते, तसाच ईश्वर आपल्या अंतःकरणातच त्याला शोधा. अंतःकरणात देवाचा शोध लागला म्हणून नानकदेवांना थांबायचे नव्हते. त्यांना प्रवास करून जेथे-जेथे परमेश्वराचे अस्तित्व सांगितले जाते तेथे - तेथे जाऊन त्याचा शोध घ्यायचा होता. विविध प्रदेशातील समाज समजून घ्यायचा होता. आपल्याला समजलेले समाजाला समजावून सांगायचे होते. हिंदू-मुसलमान दोघांनाही एकाच मार्गावर आणायचे होते. जो मार्ग त्यांना कोणतेही अवडंबर न करता परमेश्वरापर्यंत पोहचवणारा होता. एक शोधयात्री आणि लोकशिक्षक म्हणून त्यांच्या जीवनाचे एक नवे पर्व सुरू होणार होते. त्यांच्या परमार्थाचा प्रवास गीत-संगीतमय असणार होता. निसर्गाने त्यांना परमेश्वराच्या सुर-लय-तालाची साक्षात अनुभूती दिली होती. हाच सुर-लय-ताल त्यांना समाजाला बहाल करायचा होता. तो समाज हिंदू किंवा मुसलमान नसणार होता,तो मानव समाज असणार होता. म्हणून नानकदेवांविषयीच्या लोकप्रिय ओळी,'गुरू नानक शाह फकीर,हिंदू का गुरू,मुसलमान के पीर.' सार्थ ठरणार होत्या.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment