नव्या आक्रमकाला बदलवला

इ. स. १५१९ पासून भारतीय प्रदेशांवर एका नव्या आकमणाच्या लाटा धडकू लागल्या.  तैमूनलंगचा पाचवा वारस आणि आईकडून चंगीझखानाचा नातलग असलेला जहीरुद्दीन मुहंमद बाबर याने इ स १५०४ ला काबूल जिंकले. अफगाणिस्तानावर विजय मिळवल्यानंतर इतर आक्रमकांप्रमाणे त्याची नजर भारताकडे वळली.  दिल्लीच्या तख्तावर इब्राहीमखान लोदी होता.  इ. स. १५२४ पर्यंत बाबराने एकूण चार स्वा-या भारतावर केल्या.  अखेर १५२६ ला पानिपतच्या युद्धात बाबराने सुलतान इब्राहीमखान लोदीचा पराभव करून,त्याला ठार मारले.  बाबराचा संघर्ष प्रामुख्याने त्याच्या आधी भारतात आलेल्या मुसलमानांशी झाला.  आपल्या सामर्थ्यशाली तोफखान्याच्या जोरावर भारतातील मुसलमानांवर बाबराने तसा अत्यंत सहज विजय प्राप्त केला होता.  यासाठीच इतिहासाचा अन्वयार्थ हा राजकिय महत्वाकांक्षांच्या दृष्टिकोनातून लावणे अत्यंत आवश्यक असते.  राज्यकर्त्यांकडून जेंव्हा एखादे आक्रमण किंवा युद्ध घडवले जाते,तेंव्हा त्याच्यामागे स्वतःची कधीही पूर्ण न होणारी सत्तालालसा,हे खरे कारण असते. हा राज्यकर्ता त्याला त्यावेळी जनता व सैन्य यांच्यात उन्माद निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टीचा अत्यंत चाणाक्षपणे वापर करत असतो.  'धर्म-वंश-जात-भाषा-संस्कृती' यापैकी सोयीस्कर ठरणा-या कोणत्याही घटकाचा वापर त्याच्याकडून केला जातो. धर्म-वंश-जात-भाषा-संस्कृती यांच्या पलिकडे जाऊन 'रयतेचे राज्य' ही संकल्पना छत्रपती शिवरायांसारख्या एखाद्याच महान राजाच्या मनात येऊ शकते.  भारतात प्रथम आलेल्या अरबानंतर,मुसलमान राज्यकर्ते भारतात जसे जसे स्थिरावत गेले तसे तसे नंतर आलेल्या मुसलमान आक्रमकांचा संघर्ष हा प्रामख्याने मुसलमानांशीच झाला.  बाबराला देखील इब्राहीमखान लोदीला पराभूत करून भारतावर राज्य करायचे होते.  संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. प्रभाकर कामत यांच्या मते,'बाबर सुन्नीपंथीय मुसलमान असला,तरी तो धर्मवेडा नव्हता.  आपला पुत्र हुमायून याला कोणत्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा आदेश त्याने केला.'  असे असले तरी बाबराने भारतावरील आपल्या आक्रमणाला 'जिहाद' संबोधले होते.  या जिहादमध्ये त्याचा विजय म्हणजे इस्लामचा विजय,असे तो सांगत होता.  लढत मात्र मुसलमानांविरूद्धच होता.  स्वधर्मियांच्या विरोधात लढत इस्लामचा प्रसार हा कसला जिहाद असावा.  याचा सखोल विचार केल्यास आणि बाबराच्या वर्तनाची संगती लावल्यास असे लक्षात येते की बाबराला इस्लाम आणि स्वतःचे शत्रु असलेले मुसलमान यांच्याबद्दल कोणताही कळवळा नव्हता.  त्याला स्वतःचा राज्यविस्तार महत्वाचा होता.  स्वतःच्या बाबरी सैन्यात उन्माद निर्माण करण्यासाठी इस्लामचा वापर तो अत्यंत शिताफिने करत होता.  बाबराला रोजनिशी लिहिण्याची सवय होती.  त्याची रोजनिशी साहित्य अकादमीच्या वतीने 'बाबरनामा' नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तसेच बाबर अत्यंत अभ्यासू होता,कारण त्याच्यासोबत त्याचे फिरते वाचनालय युद्धभूमीवर देखील असायचे. अशा महत्वाकांक्षी,अभ्यासू व धोरणी राज्यकर्त्यांना धर्म-वंश-जात-भाषा-संस्कृती या गोष्टींचा वापर आपल्या राजकिय भूकेसाठी नेमका करता येतो.  सामान्य जनता आणि सैन्य यांच्यात संभ्रम,उन्माद व अविचार पेरण्यासाठी ते तसे सदैव करत आले आहेत.  बाबर देखील याच माळेचा मणी होता.  तो भारताला लोदीचे राज्य समजत होता. त्यामुळे लोदी राज्यातील हिंदू-मुसलमान दोन्ही त्याचे शत्रु होते.  भारतातील पीर,मुल्ला,सूफी अशा कोणालाच बाबराने मोजले नाही. अफगाण पठाण असलेल्या  लोदी सैन्याचा त्याच्या आधुनिक शस्त्रांसमोर टिकाव लागला नाही.  दिल्ली हे बाबराचे ध्येय होते.  दिल्लीच्या वाटेवर त्याने कोणतीही नीतिमत्ता राखली नाही.  यादरम्यान इ. स. १५२१च्या सुमारास एक महत्वाची घटना घडली.  ज्यामुळे बाबर काहीसा बदलणार होता.  ऐमनाबाद येथे बाबराची एका महापुरुषाशी गाठ पडली.  हा महापुरुष म्हणजे गुरू नानकदेव  ऐमनाबाद येथे बाबराला त्यांच्या उपदेशवाणीचा लाभ झाला.  नानकदेवांची बाबराशी भेट ही घटना जेवढी ऐतिहासिक आहे,तेवढीच मोठी नाटयमय देखील आहे.  दिल्लीच्या वाटेवर बाबर येणा-या प्रत्येक गावाला सर्वाथाने लूटत व बेचिराख करत चालला होता.  नानकदेव हे सर्व पाहत होते.  बाबर मुल्ला-मौलवी-सुफी संतांना सोडत नव्हता,तर हिंदू संत-पंडित यांची अवस्था वेगळी सांगण्याची गरजच नाही.  बाबराच्या वादळात उद्ध्वस्त झालेल्या लोकांना आधार देण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी नानकदेव सैयदपूरला पोहचले.  आपला गुरू सैयदपूरला आहे,हे कळताच भाई मरदाना तेथे पोहचले.  नानकदेवांचे इतरही शिष्य तेथे जमले होते.  नानकदेव आणि त्यांचे शिष्य आपद्ग्रस्तांची सेवा करीत होते.  ही गोष्ट बाबराच्या सुभेदाराला समजली.  त्याने त्यांना व त्यांच्या शिष्यांना कैद केले.  नानकदेवांना ओझे वाहण्याचे आणि भाई मरदानांना मुगल सेनापती मीरखानच्या घोडयाच्या पागेत काम देण्यात आले.  असेच इतर शिष्यांना सैन्याच्या सेवेत दाखल करण्यात आले.  नानकदेव आणि त्यांचा प्रत्येक सत्याग्रही शिष्य  निमूटपणे शिक्षा म्हणून दिलेले काम स्वीकारले.  त्यांनी प्रतिकार केला नाही की पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही.  यातनामय शिक्षा भोगत असतांनाही नानकदेव आणि त्यांचे शिष्य यांचे भजनगायन अखंड सुरू होते.  बाबराच्या सैन्याला याचे मोठे नवल वाटत होते.  नानकदेव हा साधा माणूस नाही.  याची जाणीव त्यांना कुठे तरी होऊ लागली होती.  अशा संतावर आणि त्याच्या शिष्यांवर जुलूम-जबरदस्ती करण्याची त्यांना लाज वाटू लागली.  नानकदेवांच्या भजनाचा परिणाम सैनिकांवर होऊ लागला,तसाच तो सर्वसामान्य जनतेवर होऊ लागला.  बाबराचा सेनापती मीरखान हे सर्व पाहत होता.  एक वेगळीच अनुभूती त्याला होत होती.  मीरखानला भजनाचा अर्थ कळत नव्हता,मात्र त्याच्यातील अलौकिकाचा स्पर्श आणि स्वर्गीय संगीताचा नाद त्याला मंत्रमुग्ध करत होता.  विस्मयचकित मीरखान बाबराकडे गेला. त्याने ही दिव्य अनुभूती बाबराकडे कथन केली.  मीरखानसोबत बाबर तेथे आला.  छावणीतील दिव्यत्वाच्या प्रचीतीने बाबर भारावल्यासारखा झाला.  भजनाचे स्वर बाबराच्या कानावर पडले,तसे त्याचे लक्ष भजन गाणा-या कैद्याकडे गेले.  तो तेजःपुंज चेहरा पाहून बाबराला स्वतःचा विसर पडला.  नानकदेव अथांग अलौकिकाच्या अवकाशात अपार्थिवाचे भजन गात होते.  भाषेचा जाणकार असल्याने नानकदेवांच्या भजनाचा आशय त्याला सहज उमजला.  नानकदेव म्हणते होते,'जीव केवढासा असतो ? किती काळ तो वावरतो ? परमात्मा कसा अमर्याद असतो ? तो दिसतो का ? पण जाणवल्याखेरीज राहतही नाही.  तो शाश्वत,अनंत तर आहेच,पण सर्वगामी आणि सर्वव्यापीही आहे.  त्याच्या ठाई केवळ प्रेम असते  मिथ्या अहंकारी आणि क्रूर व्यक्तींना - त्या कितीही शक्तीसंपन्न असल्या तरी - परमात्म्याच्या दरबारी स्थान असते काय ?' आता मात्र बाबर चपापला. विजेत्या सुलतानाला स्वतःच्या कःपदार्थ असण्याची जाणीव अस्वस्थ करून गेली.  त्याच्या मुखातून सहज उद्गार निघाले,'मीरखान मला या फकीराच्या चेह-यात अल्लाहचा आभास होतो आहे.' नकळतपणे त्याची पावले नानकदेवांकडे वळली.  तो त्यांच्यापुढे विनम्र होऊन बसला आणि म्हणाला,' मी आपल्यासाठी काय करू ? आपण माझ्याकडून काही तरी स्वीकारावे अत्यंत विनम्र भावाने मी आपणास विनंती करत आहे.' बाबराकडे अत्यंत स्नेहपूर्ण व दयाळूपणे पाहत नानकदेव म्हणाले,' मला आपणाकडून काहीही नको  मी ईश्वराचा सामान्य सेवक असून तोच माझी जी काही अल्प-स्वल्प गरज असेल ती भागवतो.  जर आपणास खरेच काही द्यायचे असले, तर एकच काम करा - आपण कैद्य केलेल्या या सर्व अभागी जीवांना मुक्त करा आणि त्यांची धन-संपत्ती परत करा मला माझ्यासाठी हेच हवे आहे.' बाबराने तात्काळ नानकदेवांची ईच्छा पूर्ण केली.  सर्व कैद्यांना मुक्त करून,त्याने सैयदपूरमधील सैन्य माघारी बोलावले.  नानकदेवांनी सदैव आपल्यासोबत रहावे,अशी तो विनंती करू लागला.  नानकदेवांनी अत्यंत प्रेमाने त्याची विनंती नाकारली.  नानकदेवांच्या भेटीने बाबर मात्र बदलला होता.  नानकदेवांनी तो भारत काबीज करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धतीचा त्याग करण्याचा संदेश दिला.  नानकदेव म्हणाले,' जर तुला या हिंदुस्थानात तुझे राज्य स्थापान करायचे असेल,तर आधी आक्रमक वृत्ती सोडून दे. या भूमीवर अनेक प्रकारचे लोक आहेत,बहुसंख्य हिंदू आहेत,तसेच आता मुसमानही खूप आहेत.  सर्व समाजांशी राजा म्हणून आपुलकीने वाग, लोकांना चांगले प्रशासन दे. यासाठी तू आधी स्वतः इथला हो  इथल्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी हो.  सारेच केवळ लढायांनी जिंकता येत नाही.  प्रेम,सद्भावना,दया यांनी खरे माणसं जिंकता येतात.  जुगार,दारूबाजी,अनीती हे शासकांना संपवत असतात.  शासक चारित्र्यवान असला,तरच त्याचे प्रशासन कोणत्याही भ्रष्टाचारापासून मुक्त असते.' असे सांगतात की,नानकदेवांच्या उपदेशानंतर बाबर अनीतीने कमी वागला. स्वतःच्या फायदयासाठी का होइना पण नानकदेवांच्या उपदेशाचा सार त्याच्या लक्षात आला होता.  विजयासाठी त्याने क्रूरतेपेक्षा युद्धकौशल्याचा वापर केला.  प्रशासनात देखील त्याने यश मिळवले  १५२४ नंतर जेंव्हा बाबराचे राज्य भारतात स्थापन झाले,तेंव्हा त्याच्या राज्यकाळात हिंदूंवरील अत्याचारात कमी झाली. तुर्कस्थानातील बाबराने आपली भूमिका बदलल्याने तो स्थैर्य असलेले राज्य स्थापन करू शकला.  सद्भाव,सदाचार,सहकार्य,समन्वय व स्नेह यांनी माणसं जिंकता येतात. क्रूरतेने एखादे राज्य स्थापन करता येते,पण टिकवता येत नाही. हा नानकदेवांचा संदेश त्याने आपला पुत्र हूमायूनला देखील सांगितला होता. क्रूर आक्रमकाला बदलवण्याचे सामर्थ्य नानकदेवांसारख्या अलौकिक महात्म्यातच असू शकते.
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      


Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !