शांतीदूताचे निर्वासन
"महाशय आपले मन अथांग वेदनेने भरलेले दिसते. आपल्याला केवळ एकाच प्रकारची धून वाजवता येते का? जर आपल्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर आपण ही परोपकारच्या भावनेचा त्याग केला पाहिजे. ही म्हण आपल्याला माहित नाही का? जर आपल्याला पोहता येत नसेल तर अशी एखादी जागा शोधा,जेथून आपण पायी चालत सहजपणे नदी पार करू शकतो." एक अशिक्षित माणूस आपल्या डोक्यावरील धान्याचे बाचकं खाली ठेवत वाद्य वाजवणा-या कन्फ्यूशियस जवळ बसला. 'वेई' राज्याच्या राजधानीच्या शहरात आपल्या छोटयाशा भाडयाच्या घरासमोर अंत्यविधी प्रसंगी वाजवण्यात येणा-या संगीताची धून वाजवत बसलेल्या कन्फ्यूशियसची तंद्री हया माणसाच्या बोलण्याने भंग पावली. त्या अशिक्षित माणसाच्या शब्दांमधील जीवनसंदेश त्याच्या अंतरमनापर्यंत पोहचला. अचानक भानावर आलेल्या कन्फ्यूशियसने,"आपण अत्यंत योग्य सांगत आहात." अशी प्रतिकिया दिली. जणू काही त्या माणसाच्या जीवंत जीवनानुभवाने कन्फ्यूशियसच्या मनातील सर्व विषाद संपुष्टात आला होता. मात्र त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला होता. ही घटना होती इसवी सन पूर्व ४९८ सालातील. ...