शांतीदूताचे निर्वासन

"महाशय आपले मन अथांग वेदनेने भरलेले दिसते.  आपल्याला केवळ एकाच प्रकारची धून वाजवता येते का? जर आपल्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर आपण ही परोपकारच्या भावनेचा त्याग केला पाहिजे.  ही म्हण आपल्याला माहित नाही का? जर आपल्याला पोहता येत नसेल तर अशी एखादी जागा शोधा,जेथून आपण पायी चालत सहजपणे नदी पार करू शकतो."  एक अशिक्षित माणूस आपल्या डोक्यावरील धान्याचे बाचकं खाली ठेवत वाद्य वाजवणा-या कन्फ्यूशियस जवळ बसला.  'वेई' राज्याच्या राजधानीच्या शहरात आपल्या छोटयाशा भाडयाच्या घरासमोर अंत्यविधी प्रसंगी वाजवण्यात येणा-या संगीताची धून वाजवत बसलेल्या कन्फ्यूशियसची तंद्री हया माणसाच्या बोलण्याने भंग पावली.  त्या अशिक्षित माणसाच्या शब्दांमधील जीवनसंदेश त्याच्या अंतरमनापर्यंत पोहचला.  अचानक भानावर आलेल्या कन्फ्यूशियसने,"आपण अत्यंत योग्य सांगत आहात."  अशी प्रतिकिया दिली.  जणू काही त्या माणसाच्या जीवंत जीवनानुभवाने कन्फ्यूशियसच्या मनातील सर्व विषाद संपुष्टात आला होता. मात्र त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला होता. ही घटना होती इसवी सन पूर्व ४९८ सालातील.  'लू' राज्यातील सर्वात प्रभावी व्यक्ती बनलेला कन्फ्यूशियस 'वेई' राज्यात एक निर्वासित जीवन जगत होता.  याला कारण दरम्यानच्या काळात कन्फ्यूशियसच्या जीवनात अनेक घटना घडून गेल्या होत्या.  ज्यामुळे त्याला वेई राज्यात असे निर्वासित व विपन्न जीवन कंठावे लागत होते.  'लू' राज्याचा कायदे मंत्री व दरबारातील सर्वात प्रभावी व्यक्ती असलेल्या कन्फ्यूशियसला एक शांतीदूताच्या भूमिकेतून आदर्श राज्याची निर्मिती करायची होती.  राज्य आदर्श बनले नाही. मात्र राज्यकर्त्यांनी हया शांतीदूत तत्त्वज्ञाला राज्यातून निर्वासित करुन स्वतःसाठी शांती प्राप्त करुन घेतली.  त्यामुळे राज्यातील प्रजेने देखील कन्फ्यूशियसला नाकारले होते.  कोणत्याही काळात अपवादात्मक विवेकी लोक वगळता बहुतांश प्रजा राज्यकर्त्यांनी दिलेल्या चष्म्यातूनच कोणत्याही व्यक्तीचे आणि काळाचे मूल्यमापन करत असते.  त्यामुळे कोणत्याही महापुरुषाच्या विचारांचा व कृतींचा अन्वयार्थ राज्यकर्ते आणि काळ यांच्यानुसार नेहमीच बदलत असतो.  त्यांच्या वाटयाला वंदन व तिरस्कार हे चक्राकार पद्धतीने येतच असतात.  त्याचा तीरस्कार करुन आपण बरेच काही गमावले आहे.  ही जाणीव प्रबळ झाल्यावर तो 'वंदनीय' होता. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्याचे अनुसरण करत बिघडलेले सुधरवण्याचा प्रयत्न सुरु होतो.  पुन्हा चांगले दिवस आले की तत्कालीन राज्यकर्त्यांना हे श्रेय स्वतःकडे घ्यायचे असते.  त्यामुळे ते महापुरुषांची बदनामी सुरु करतात.  प्रजा तर मेंढरासारखीच असते.  प्रजेला देखील भरल्या पोटी महापुरुषांचे विचार-कार्य डावलून त्यांच्या राज्यकर्त्यांनी सांगितलेल्या महापुरुषांमधील 'त्रुटी-दोष' एकदम योग्य वाटू लागतात.  कालातंराने पुन्हा वाईट काळ येतो आणि पुन्हा...    हे चक्र  जगात असेच सुरु असलेले दिसते.  त्याला कन्फ्यूशियस अपवाद कसा ठरणार होता.  'लू 'राज्यात कन्फ्यूशियसचा प्रभाव वाढल्यानंतर,"सांमत घराण्यांच्या सत्तालोलुप वृत्तीमुळे कोणत्याही राज्यात कायम अशांतता असते.  त्यामुळे त्यांचे निशस्त्रीकरण करुन सैन्य शक्ती केवळ केंद्रिय सत्तेच्या आखत्यारीत राहिल्यास राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नांदू शकते."  असे तत्त्व कन्फ्यूशियस मांडत होता.  त्याचे सामंत घराण्यांमधील  विद्यार्थी आता स्वतः सत्ताधारी झाले होते.  तसेच इतर विद्यार्थी झौऊ दरबारात,इतर सामंतांच्या पदरी आणि परराज्यातील शासन व्यवस्थेत मोठया पदांवर अधिकार पदांवर होते.  त्याच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेला हा अत्यंत अनुकूल असा कालखंड होता.  'लू' चा शासक 'डिंग' देखील कन्फ्यूशियसच्या या कल्पनेमुळे अत्यंत प्रभावीत झाला होता.  त्याचप्रमाणे अधिकारी वर्गातील कन्फ्यूशियसचे शिष्य आपल्या आचार्यांचे हे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी भूमी निर्माण करत होते.  राज्यातील सर्व शासक आपले शस्त्र आणि रथ राजा डिंगच्या हवाली करू लागले होते.  तसेच राज्यातील दुर्ग नष्ट करण्याची योजना देखील हातात घेण्यात आली.  त्यामुळे सुर्वण काळ आता समीप येऊन ठेपला आहे.  अशी मानसिकता संपूर्ण राज्यात निर्माण झाली होती.  मात्र राज्यकर्त्यांचा मूळ स्वभाव पुन्हा उफाळून आला.  कोणत्याही राज्यकर्त्याचा अधिकाधिक शक्तीशाली होण्याकडे कल असतो.  'लू' राज्यातील सामंतांमध्ये ही प्रवृत्ती पुन्हा जागृत झाली.  कन्फ्यूशियसचा मित्र नागोंग जिंग्सूचा मोठा भाऊ आता 'जी' घराण्याचा सत्ताधारी होता.  त्याने आपला सेनापती 'क्यू' याला त्याच्या अधिकारात नसलेल्या 'बेई' शहराजवळील दुर्ग ध्वस्त करण्याचा आदेश दिला.  एके काळी जी घराण्याच्या अधिकारात असलेले बेई शहर काही काळापूर्वी एका सामंत घराण्याने त्यांच्याकडून जिंकून घेतले होते.  दुर्ग ध्वस्त करण्यामागे 'सामंत जी' चा उद्देश सामरिक दृष्टीने महत्वाचे बेई शहर पुन्हा हस्तगत करण्याची योजना होती.  एवढे कारण झाले आणि जी घराण्याविरुद्ध दोन छोटे सामंत घराणे एकत्र आले.  त्यांनी आक्रमणाचा पवित्रा घेतला.  त्यांच्या या कृतीमुळे राजा डिंग नाराज झाला.  त्याने आपले सैन्य पाठवून हया दोन सामंत घराण्यांचा विरोध मोडीत काढला.  यावेळी झालेल्या लढाईत मोठया प्रमाणात रक्तपात झाला.  हे सर्व पाहून कन्फ्यूशियसच्या लक्षात आले की शांती निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न विफल झाले आहेत.  राज्यातील तीन मोठया सामंत घराण्यांमध्ये बंधूभाव निर्माण झाला असता तर राज्यात शांती नांदली असती.  मात्र त्यांच्यामध्ये हा बंधूभाव स्थापित होऊ शकला नाही.  'मेंग' घराण्याने आपले दुर्ग ध्वस्त करण्यास नकार दिला.  इसवी सन पूर्व ४९८ मध्ये पुन्हा 'लू' राज्यात यादवी सुरु झाली.  निःशस्त्रीकरणातून शांती स्थापन करण्याची कन्फ्यूशियसची ईच्छा अपूर्णच राहिली.  शांतीदूत म्हणून लू राज्यात एक सौहार्दपूर्ण समाज निर्माण करू पाहणारा कन्फ्यूशियसच यामध्ये 'खलनायक' ठरवण्यात आला.  एखादया लोककल्याणकारी विचारधारेला संपवणे अशक्य असते. कारण हया विचारांना चिरंतन मूल्यांची कवचकुंडलं प्राप्त झालेली असतात.  अशावेळी विचार मांडणा-याला कायमचा संपवणे किंवा त्याच्या विचारधारेला अत्यंत नियोजनपूर्वक बदनाम करणे एवढेच उपाय शिल्लक असतात.  अर्थात त्याचा लोककल्याणकारी विचार कधीच संपवता येत नाही.  उलट विविध कालखंडात त्याला जोमदार धुमारे फुटत असतात.  कन्फ्यूशियसच्या बाबतील त्याला लौकिकदृष्टया संपवणे आणि त्याच्या तत्त्वज्ञानाच्या हेतूला बदनाम करणे.  हे दोन्ही हातखंडे वापरण्यात आले.  'क्यू'चा राजा जिंग त्याचा शिष्य होता.  त्यामुळे कन्फ्यूशियस हा जिंगचा लू राज्यातील हेर आहे,लू राज्य संपवण्यासाठी बुद्धभेद करण्याचे काम तो करतो यासाठी त्याल जिंग पैसा पुरवतो इत्यादी अफवा पसरवण्यात आल्या.  यामुळे जनतेच्या मनात कन्फ्यूशियसविषयी राग निर्माण झाला.  त्याची लोकप्रियता संपुष्टात आली.  राज्यातील तीनही शक्तीशाली सामंत घराण्यांनी कन्फ्यूशियस सामंत घराण्यांना सामर्थ्यहीन बनवून स्वतः राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे.  तसेच तो सत्ता काबीज करून स्वतः हुकुमशाहा बनण्याची महत्वकांक्षा बाळगत आहे.  क्वी चा राजा जिंग याच्या सांगण्यावरूनच कन्फ्यूशियस दुर्ग नष्ट करण्याची योजना राबवत आहे.  ज्यामुळे लू राज्यावर उत्तर दिशेकडून आक्रमण करणे. राजा जिंगला सोपे जाईल.  तसेच कन्फ्यूशियसला लू चा राजा म्हणून सिंहासनावर बसवता येईल.  कन्फ्यूशियसचे प्राण पहिल्यांदाच धोक्यात आले होते.  राजा डिंग याने त्याला मंत्रीमंडळातून काढले नसले तरी त्याच्या परामर्श घेणे बंद केले होते.  वा-याची दिशा लक्षात आल्याने कन्फ्यूशियसने देखील आपल्या विद्यालयाकडे अधिक लक्ष देण्यास सुरवात केली होती.  मात्र विद्यालय सतत असुरक्षित्तेच्या दहशतीत होते.  त्यामुळे काही विद्यार्थी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सतत पहारा देत होते.  तसेच आपल्या आचर्यांच्या सुरक्षेचा चोख प्रबंध ठेवत होते.  आपल्या आचार्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांची बाजू मांडत होते.  कन्फ्यूशियसला आता समजले होती की समाजातील सत्ताधारी आणि प्रभावशाली वर्गाने आपल्यापासून फटकून राहण्यास सुरवात केली आहे.  त्याच्या शत्रुंची संख्या दिवसोंदिवस वाढतच गेली.  एक दिवस त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.  अखेर एक दिवस त्याचा  मित्र नांगोंग जिंगसू याने त्याला प्राण वाचवण्यासाठी लू राज्याचा त्याग करण्याचा सल्ला दिला.  जिंगसूच्या सांगण्यातील तथ्य आणि सत्य एव्हाना कन्फ्यूशियला देखील मनोमन पटले होते.  इसवी सन पूर्व ४९७ सालच्या उन्हाळयात एके दिवशी एक जुनी बैलगाडी कन्फ्यूशियच्या विद्यालयाच्या दारात येऊन उभी राहिली.  कन्फ्यूशियस आणि त्याचे तीन शिष्य बैलगाडीत बसले.  ती बैलगाडी धूळ देखील उडणार नाही.  याची खबरदारी घेत लू राज्याच्या सीमेकडे चालू लागली.  एक महान तत्त्ववेत्ता उपेक्षित,कलंकित आणि अपमानीत अवस्थेत १३ वर्षांच्या वनवासासाठी बाहेर पडला होता.  स्वतःच्या लू राज्याच्या समृद्धीसाठी त्याने दिलेल्या विचाररुपी सोन्याची माती झाली होती.  जणू काही या तीचीच धूळच बैलगाडीमुळे उडत होती. धूळीमुळे कन्फ्यूशियची जन्मभूमी व कर्मभूमी त्याच्या नजरेसमोरून धूसर होऊ लागली आणि समोर पसरलेल्या उपेक्षेच्या मरुभूमीत होणार असलेली फरफट मनाच्या दरवाज्यावर धडका देऊ लागली.
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !