राज्यकर्त्यांना सुधरवण्यात अपयशी लोकशिक्षक
"कोणत्याही राज्यकर्त्यानं किंवा प्रशासकीय अधिका-यानं ५ चांगले तत्त्व आणि ४ वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे. जनतेच्या पैशाचा अपव्यय न करता त्याचा वापर ख-या अर्थाने जनकल्याणासाठी वापर करणे. आपल्या हाताखालील लोकांना आणि जनतेला असे कामं सांगणे की ज्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि त्याबद्दल तक्रार असणार नाही. धनलोलुपतेचा त्याग करून आपले कर्तव्य पार पाडावे. अहंकाराचे प्रदर्शन न करता स्वतःचा आब राखणा-या शैलीचा स्वीकार आणि कोणतीही क्रुरता न दाखवता स्वतःची प्रतिष्ठा-सन्मान टिकवणे. हया पाच तत्त्वांचा स्वीकार करत असतानांच आपल्या व्यवस्थेतील कर्मचारी व जनता यांच्याशी क्रुरतेने वागणे,त्यांचे दमन-शोषण करणे,त्यांचे नुकसान-छळ करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात कंजुशी करणे, हया चार गोष्टीचा त्याग करणे महत्वाचे आहे." असे मत कन्फ्यूशियसने राज्यकर्ते आणि सरकारी अधिकारी यांच्या कार्यशैलीसंदर्भात मांडले आहे. असे असले तरी अनेक राज्यकर्त्यांनी वा अधिका-यांनी तत्त्ववेत्त्यांचा सन्मान केला. मात्र त्यांच्या आदर्श राज्य आणि राज्यकारभारविषयक तत्त्वांचा कधीच स्वीकार केला नाही.. या तत्त्वांचा उच्चार मात्र ते प्रत्येक व्यासपीठावरून आवर्जुन करत असतात. ही एक अत्यंत असाधारण विसंगती म्हणावी लागेल. ॲरिस्टॉटल सिंकदराचा गुरु होता. ग्रीक साम्राज्यत आदर्श राजा व राज्यकारभार निर्माण करण्याचे स्वप्न पाहणा-या ॲरिस्टॉटलला अखेर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला होता. तसलाच प्रकार कन्फ्यूशियसंदर्भात देखील घडला. कन्फ्यूशियसच्या विद्यालयाला आता चार वर्षे झाली होती. त्याच्या विद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना राजदरबारी नोक-या मिळाल्या होत्या. त्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली होती. गुरूदक्षिणा आणि राजा जी याच्याकडून मिळणारे वेतन मिळत होते. लू प्रांतात कन्फ्यूशियसचे विद्यालय प्रसिद्ध झाले होते. त्याचा मित्र नांगोंग जिंग्सू याने देखील त्याच्या विद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता. अध्यापक बनल्यानंतर राजदरबारात एखाद्या मोठया पदावर काम करून आदर्श राज्यकारभाराला आदर्श स्वरूप-आकार देण्याची आकांक्षा त्याच्या मनात मुळं धरू लागली होती. राजदरबारातील अनेक प्रभावशाली लोक एव्हाना त्याचा आदर करू लागले होते. लवकरच त्याची ही ईच्छा पूर्ण होण्याची संधी चालून आली. हे साल होते इसवी सन पूर्व ५१७ आणि कन्फ्यूशियस आता ३४ वर्षांचा झाला होता. 'लू' राज्यात गृहयुद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. हे गृहयुद्ध लवकरच होऊ शकते. हा कन्फ्यूशियसचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. सामंत राजा जी याने सम्राट झाऔ विरूद्ध बंड केले. लू राज्यातील सर्वात मोठया मंदिरात पूजा-अनुष्ठान करण्याचा मान जी राजाच्या घराण्याला होता. त्यानुसार आपण आपला अधिकार वापरणार आणि पूजा-अनुष्ठान करणार अशी घोषणा जी राजाने केले. येथेच गृहयुद्धाची ठिणगी पडली राजधानीत चकमकी सुरू झाल्या आणि अखेर झाऔ सम्राटाची हत्या झाली. ही बातमी विद्यालयात आपल्या वर्गात अध्यापन करत असलेल्या कन्फ्यूशियसला कळाली. त्याने आपले अध्यापन थांबवले आणि वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. त्याची ही सुट्टी सात वर्षांची ठरली. पुढे सात वर्षांनी कन्फ्यूशियस अध्यापनाकडे वळणार होता. गृहयुद्धामुळे लू राज्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे कन्फ्यूशियस आणि त्याचे विद्यालय दोन्हींच्या अस्तित्वातचा प्रश्न निर्माण झाला. अनागोंदीमुळे जी राजाकडून मिळणारे वेतन देखील बंद होण्यावर आले. अशावेळी कन्फ्यूशियसला त्याचा चाहता बनलेला राजा जिंग आठवला आणि त्याने देऊ केलेले पद आठवले. कन्फ्यूशियसने अनेकांचा विरोध सहन करत अखेर राजा जिंगच्या दरबारात मार्गदर्शक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. इसवी सन पूर्व ५१७ च्या हिवाळयात त्याने लू राज्याचा त्याग केला. आपली शाही बैलगाडी कन्फ्यूशियसला कायमची देऊन टाकलेला नांगोंग जिंग्सू आपल्या मित्राला निरोप देण्यासाठी आला. जिंग्सूचा पिता सामंत मेंग हा सुद्धा कन्फ्यूशियसच्या हया निर्वासनाला जबाबदार होता. असे असले तरी हया दोन मित्रांच्या मैत्रीत यत्किंचितही अंतर पडले नाही. जिंग्सू आपल्या पित्याच्या उद्योगांशी असहमत होता तरी त्याला नाईलाजास्तव पित्याच्या बाजूने उभे राहावे लागणार होते. कन्फ्यूशियस देखील त्याची कुंचबना ओळखून होता. अतिशय उदास मनाने जिंग्सूने कन्फ्यूशियसला निरोप दिला. असे असले तरी आपला मित्र एक दिवस नक्की परतेल. अशी आशा त्याच्या मनात होती. दोन दिवसाच्या प्रवासानंतर कन्फ्यूशियस राजा जिंग याच्या 'क्वी' राज्याच्या सीमेवर पोहचला. राजा जिंग याने आपली राजधानी 'लिंजी'मध्ये त्याचे अतिशय भव्य स्वागत केले. जिंग कन्फ्यूशियसचे स्वागत करतांना म्हणाला की," मी जी आणि मेंग परिवारापेक्षा उच्च दर्जा कन्फ्यूशियसला प्रदान करत आहे." राजमहलातच कन्फ्यूशियसच्या निवासाची सोय करण्यात आली. आपण दिलेल्या वचनानुसार राजा जिंगने आपल्या दरबारातील संगीत मंडळीचा कार्यकम कन्फ्यूशियससाठी आयोजित केला. हया कलाकारांचे संगीत स्वर्गीय अनुभूती देणारे होते. संगीतप्रेमी कन्फ्यूशियस हया संगीतात आकंठ बुडाला. सुमारे सलग तीन महिन्यांचा काळ त्याने हा संगीतास्वाद मनमुरादपणे लूटला. चीनमधील कन्प‹यूशियस संगीताच्या विकासात हयामुळे मौलिक भर पडली. राजा जिंग राजकारण,कला,अनुष्ठान आदि विषयांसंदर्भात कन्फ्यूशियसचे मार्गदर्शन व सल्ला घेत होता. कन्फ्यूशियस आणि जिंगच्या अत्यंत गंभीर व अर्थपूर्ण चर्चेतून भविष्यात कन्फ्यूशियसच्या तत्त्वज्ञानातील अनेक कालजयी तत्त्वांची निर्मिती झाली. राजा जिंगचा मार्गदर्शक व सल्लागार म्हणून क्वी राज्यात कन्फ्यूशियस अत्यंत सुखी होता. त्याचबरोबर लू राज्यातून स्थलांतर करण्याचा त्याचा निर्णय देखील योग्यच ठरला होता. कारण सामंत जी याने केलेल्या बंडामुळे एक झाऔ राजा मारला गेला. त्यानंतर त्याच्या घराण्यातील एकाला दुबळया राजसत्तेच्या सिंहासनावर बसवण्यात आले. अखेर त्याला ही राजा जिंगच्या राज्यात शरणार्थी म्हणून यावे लागले. जिंगच्या राजदरबारात सात वर्षे कन्फ्यूशियस होता आणि शरणार्थी झाऔ राजा देखील होता. असे असले तरी हया झाऔ राजाला कन्फ्यूशियसच्या मार्गदर्शनाचे महत्व वाटले नाही. त्याने कधीही कन्फ्यूशियससोबत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित कन्फ्यूशियसचे मार्गदर्शनामुळे त्याला त्याचे गमावलेल राज्य परत मिळू शकले असते. अखेर त्याचा मृत्यू जिंग राजाचा शरणार्थी म्हणूनच झाला. कन्फ्यूशियस मात्र लू राज्य योग्य वेळी सोडल्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानाचे संरक्षण व संवर्धन करण्यात यशस्वी ठरला. लू राज्यातील परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हं दिसत नव्हती. लू राज्यातील सामंत परिवार झाऔ घराण्याकडे राजसत्ता सोपवण्यास तयार नव्हते. कन्फ्यूशियसला देखील असे वाटू लागले होते की आपण ही कधी आपल्या राज्यात परतू शकणार नाही. मोकळया वेळेत कन्फ्यूशियस क्वी राजदरबारातील संगीतज्ज्ञ 'जिपांग जी' याच्याकडून संगीताचे शिक्षण घेत होता. राजा जिंगच्या पदरी असलेला कन्फ्यूशियस लौकिक अर्थाने अत्यंत सुखी होता. मात्र समाधानी नव्हता. त्याला आता जाणवू लागले होते की भले ही राजा जिंग आपल्याकडून आदर्श राज्यकर्त्यासंदर्भात आणि राज्यकारभारासंदर्भात मार्गदर्शन घेत असला तरी तो त्याची अमंलबजावणी करत नव्हता आणि करणार देखील नव्हता. दुस-या बाजूला राजा जिंगला कन्फ्यूशियस कायम आपल्यासोबत असावा असे वाटत होते. यासाठी तो त्याच्या क्वी राज्यात त्याला जहागीर आणि राज्याचे प्रधानपद देण्याचा विचार करत होता. म्हणजे कन्फ्यूशियस देखील सामंत बनला असता. कन्फ्यूशियसच्या वाढत्या प्रभावामुळे क्वी राज्यातील इतर सामंत यामुळे नाराज होते. एका शिक्षकाचा हा वाढता प्रभाव त्यांना सहन होत नव्हता. व्यासपीठावरŠन शिक्षकाचा गुणगौरव करणे अथवा त्याला अक्कल शिकवणे अत्यंत सोपे असते. न शिकलेले देखील शिक्षकाने काय करावे? हे सांगू शकतात. कारण शिक्षका एवढा दुबळा प्राणी जगात कोणीच नसतो. जगातील विकसित देशांचा अपवाद वगळता शिक्षक सर्वाथाने दुबळा राहण्यासाठी प्रत्येक देशातील शासन व्यवस्था काळजी घेत असते. शिक्षक प्रभावी झाला तर तो आणि त्याचे शिष्योत्तम व्यवस्थेवर प्रश्न विचारू शकतात आणि व्यवस्थेत हित सामावलेल्यांची अडचण करू शकतात. अखेर राजा जिंग देखील राज्यातील इतर सामंतासमोर झुकला आणि त्याने आपला निर्णय बदलला. कन्फ्यूशियसमध्ये स्वतःच्या उपेक्षेची भावना बळावत चालली होती. दुसरीकडे लू राज्यातील सामंतांनी झाऔ घराण्यातील एका 'डिंग' नावाच्या कळसुत्री बाहुलीला राजेपद बहाल केले होते. हया घडामोडींवरून कन्फ्यूशियसला वाटले की लू राज्यातील परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे वयाच्या ४१ वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व ५१० मध्ये कन्फ्यूशियस लू राज्यात परतला. त्याचा गैरसमज तेथे पोहचल्यावर दूर झाला. राज्यकर्त्यांना सुधरवण्यात अपयशी ठरलेला लोकशिक्षक कन्फ्यूशियस मात्र," भले तुम्ही राजा बनले तरी सदाचार शिकण्यासाठी एक पिढी जावी लागते." असेच म्हणत राहिला. जे वर्तमानात देखील खरं ठरते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Very good
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteअति सुंदर🙏
ReplyDeleteDevelopement of thinking takes time
ReplyDeleteकन्फ्यूशियस आणि आजचे शिक्षक यांची अवस्था बरोबर अधोरेखित केलीत..
ReplyDelete