तत्त्वज्ञाची राजकीय कूटनिती..

"कोणताही प्रामाणिक आणि जनकल्याणाची आस असलेला शासक स्वतःवरील टिकेचे सदैव स्वागत करत असतो.  तसेच जर त्याचे काही चूकत असेल तर त्यात सुधारणा करण्यात त्याला कोणाताही कमीपणा वाटत नाही."  असे कन्फ्यूशियस 'लू' चा राजा डिंग याला सांगत होता.  डिंग अत्यंत गांभीर्याने कन्फ्यूशियसचे विचार ऐकत होता आणि त्याप्रमाणे आपल्या शासनात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होता.  कन्फ्यूशियस आता लू राज्याचा मंत्रीमंडळाचाही सद्स्य बनला होता.  आपण आपले काम अत्यंत सचोटी आणि प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.  याची जाणीव कन्फ्यूशियसला होती.  कारण त्याला राज्यकारभारत आपले तत्त्वज्ञान आणि त्याला अपेक्षित आदर्श प्रणाली राबवायची असेल तर स्वतःच्या प्रशासनातूनच याचा आदर्श निर्माण करावा लागणार होता.  त्यामुळे चेंगडू जिल्हयाचा प्रशासक म्हणून त्यानं अतिशय प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केले.  एका वर्षातच त्याचे सुशासन पाहून राजा डिंग याने कन्फ्यूशियसची आपल्या मंत्रीमंडळात 'सार्वजनिक कार्य' मंत्री म्हणून नियुक्त केली. त्याचवेळी क्वी चा राजा देखील सुशासनासाठी त्याचे मार्गदर्शन घेत होता.  राज्याच्या राजकारणात कन्फ्यूशियसचा प्रभाव वाढत होता.  राजा डिंगचा प्रस्ताव स्वीकार करुन अध्यापनाचे कार्य थांबवून प्रशासनात जातांना त्याने आपला शिष्योत्तम जिलू आणि इतर शिष्यांना प्रशासनात जाण्याचा सुप्त उद्देश कथन केलेला होता.  त्यानुसार प्रत्यक्ष प्रशासनात सहभागी होऊन आणि तिथे उच्च पद मिळवूनच तो आपल्या तत्त्वज्ञानातील आदर्श राज्यप्रणाली साक्षात उतरवणार होता.  कन्फ्यूशियस मंत्रीमंडळात सहभागी झाला आणि त्याने सर्वप्रथम आदर्श राज्याचे त्याचे प्रथम तत्त्व अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला.  त्यानुसार त्याला राज्यातील सर्व सामंत घराण्यांमधील वैर संपवायचे होते आणि त्यांच्या सैन्याचे निशस्त्रीकरण करायचे होते.  यासाठी त्याला प्रतिक्षा होती ती नेमक्या संधीची  इसवी सन पूर्व ५०० मध्ये राजा डिंग याने त्याला आपल्या रणनिती अभियानाचा प्रमुख घोषित केले.  यासाठी कारण एक कारण घडले.  'क्वी' चा राजा जिंग याने लू राज्यात चाललेल्या अंतर्गत कलहांचा लाभ उठवत सीमावर्ती भागातील लू राज्याचे दोन जिल्हे स्वतःच्या क्वी राज्यात विलिन करुन घेतले होते.  क्वी राज्य हे लू राज्यापेक्षा अत्यंत सामर्थ्यवान असल्यामुळे राजा डिंगला त्याच्याशी थेट लढणे अशक्य होते.  यासाठी त्याने कन्फ्यूशियस आणि राजा जिंग यांच्या स्नेहाबंधाचा वापर करुन घ्यायचे ठरवले.  त्याने कन्फ्यूशियसला क्वीला पाठवण्याचे ठरवले. कन्फ्यूशियसने क्वी चा राजा जिंग याच्याकडून लू राज्याचे दोन जिल्हे परत मिळवण्याचा प्रयत्न करावा. असे राजा डिंगला वाटत होते.  त्यानुसार कन्फ्यूशियस क्वी राज्यात गेला. राजा जिंगने आपल्या गुरूचे भव्य स्वागत केले. मात्र बळकावलेला भूभाग परत करण्यास नकार दिला.  असे असले तरी कन्फ्यूशियसने त्याला राजा डिंग समवेत एक शांती वार्ता करण्यास अनकुल करुन घेतले.  त्यानुसार क्वी च्या सीमेवरील 'जिआगू' हया राजा जिंगच्या शिकार क्षेत्रात शांती वार्ता आयोजित करण्यात आली.  त्यामध्ये केवळ राजा जिंग, राजा डिंग आणि कन्फ्यूशियस हया तिघांचा सहभाग असाणार होता. मात्र जिंगच्या म्हणण्यानुसार जिंग एकटाचा आपल्या रथात बसून जिआगू येथे जाणार होता आणि अत्यंत मैत्रिपूर्ण वातावरणात राजा डिंग सोबत चर्चा करणार होता.   येथे कन्फ्यूशियसने आपल्या राजकीय कूटनितीचा वापर केला.  तो राजा जिंगला म्हणाला,"जेंव्हा कोणाताही शासक आपल्या राज्याच्या सीमेबाहेर जातो तेंव्हा त्याने आपले महत्वाचे मंत्री आणि अधिकारी यांना सोबत घेतले पाहिजे.  तसेच राजा डिंगला देखील औपचारिक शांती वार्ता अपेक्षित आहे. त्यामुळे समस्येवर कायमचा तोडगा काढता येऊ शकेल.  मात्र ज्या काही वाटाघाटी होतील त्या प्रचलित नियमांनुसारच होतील."  असे म्हणून अत्यंत चातुर्याने कन्फ्यूशियसने शांती वार्ता औपचारिक केली.  त्यामुळे त्याच्यात होणारा निर्णय भविष्यात कोणालाही नाकारता येणार नाही.  अखेर राजा जिंग यासाठी तयार झाला.  राजा डिंगच्या ही डोक्यात ही राजकीय खेळी आलेली नव्हती.  लू मध्ये परतल्यावर कन्फ्यूशियसने त्याला ही राजा जिंगप्रमाणे यासाठी तयार केले.  त्याचबरोबर 'अनुष्ठान पुस्तका' तील सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना केली.  राजा डिंग देखील कन्फ्यूशियसचा अनुष्ठानाच्या पुस्तकावरील अधिकार लक्षात घेऊन त्यास तयार झाला.  अशाप्रकारे 'जिआगू' येथे शांती वार्ता आयोजित करण्यात आली.  दोन्ही पक्षांनी कन्फ्यूशियसने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले.  शांती वार्तेचे आयोजन कन्फ्यूशियसच्या देखरेखीखालीच करण्यात आले.  वार्ता स्थळी एका भव्य मंचाचे निर्माण त्याने केले होते.  दोन्ही राजांनी राजकीय शिष्टाचाराचे पालन करत एकमेकांना अभिवादन करुन एकमेकांचे स्वागत केले.  राजा जिंग बळकावलेला भूभाग देण्यास तयार नव्हता.  त्याच्या मते," हया भूभागामुळे क्वी आणि लू दोन्ही राज्यांना वू राज्यापासून धोका असतो.  त्यामुळे तो हा भूभाग स्वतःच्या ताब्यात ठेवणार आणि याबदल्यात तो वू राज्याने आक्रमण केल्यास त्यापासून लू राज्याचे देखील संरक्षण करणार होता."  प्रबळ राजा जिंगसमोर भक्कमपणे आपली मागणी मांडण्यात राजा डिंग अपयशी ठरला.  एकप्रकारे जिंगने त्याचा प्रस्ताव संपूर्णपणे नाकारला होता.  त्यामुळे शांतीवार्ता कोणताच निर्णय न होता,गुंडाळली जाणार होती.  राजा डिंग यासर्व घडामोडींमध्ये कन्फ्यूशियसच्या तटस्थ व अबोल भूमिकेमुळे नाराज झाला होता.  त्याला वाटत होते की," कन्फ्यूशियसने आपला भूभाग परत करण्यासाठी राजा जिंगवर दबाब आणावा किंवा आपल्या संबंधांचा वापर करावा."  कन्फ्यूशियस मात्र शांत होता.  जणू काही तो योग्य संधीची वाट पाहत होता.  वार्ता संपल्यानंतर संध्याकाळी शाही भोज आयोजित करण्यात आला. होता  आता ही वेळ कन्फ्यूशियसच्या कुटनितिक यशाची होती.  भोजनानंतर आयोजित नृत्य-संगीताच्या कार्यकमात क्वी चा राजा जिंग याने एक मोठी चूक केली.  कार्यक्रमात त्याच्या नृत्यांगनांनी अत्यंत अश्लील आणि अशिष्ट नृत्य सादर केले.  राजा जिंगचा पाय ते पाहून घसरला.  त्याने अशा औपचारिक प्रसंगी नको तो रंगेलपणा दाखवला.  कन्फ्यूशियसने त्याच्या वर्तनाबद्दल आणि सादर झालेल्या नृत्याबद्दल राजा डिंगला आपली नाराजी दाखवण्याची सूचना केली.  त्यानुसार राजा डिंगने आपली नाराजी व्यक्त केली.  तसेच असल्या प्रकारामुळे राजा म्हणून आपला अपमान झाला अशी बतावणी केली.  राजा जिंगला देखील आपल्या चूकीची जाणीव झाली होती.  अखेर त्याने आपला गुरु कन्फ्यूशियला आपल्या शिबीरात बोलावले.  राजा जिंग म्हणाला,"गुरुजी किती अप्रतिम व नवीन नृत्य सादर करण्यात आले.  हे नृत्य भविष्यात जुन्या नृत्य शैलीला हद्दपार करून टाकणार आहे.  गुरुजी आपण क्वीमध्ये येऊन रहा.  लू राज्याला काहीच भविष्य नाही."  यावर अत्यंत शांतपणे कन्फ्यूशियस म्हणाला,"नृत्य अत्यंत विलक्षण होते. यामध्ये कोणतीच शंका नाही.  मात्र राजा डिंग यावर अत्यंत नाराज आहेत.  याबद्दल तो सम्राट झाऊकडे यासंदर्भात तक्रार करणार आहेत.  त्याचे म्हणणे आहे की अशा औपचारिक राजकीय बैठकीमध्ये परंपरागत नृत्य सादर करण्याचा नियम आहे.  तसेच अनुष्ठानाच्या पुस्तकात देखील असेच लिहिलेले आहे.  त्यामुळे झाल्या प्रकारामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागली आहे."  आता मात्र राजा जिंग मनात घाबरला. सम्राटाकडे तक्रार जाणे हे त्याला परवडणारे नव्हते.  त्यामुळे त्याने कन्फ्यूशियसला विचारले,"मी आता माझी चूक सुधारण्यासाठी काय करावे?" यावर कन्फ्यूशियस म्हणाला,"माझे आपणास असे सांगणे राहिल की आपण लू राज्याचा भूभाग परत करावा जेणे करुन ही गोष्ट येथेच संपुष्टात येईल.  तसेच आपली प्रतिष्ठा अबाधित राहिल."  राजा जिंगकडे आता कन्फ्यूशियसचे म्हणणे मान्य करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.  त्याने लू राज्याचा भूभाग परत केला.  तहनाम्यावर दोन्ही राजांनी स्वाक्षरी केली.  कन्फ्यूशियसने आपल्या कूटनितीने लू राज्याला त्याचा भूभाग परत मिळवून दिला होता.  एकाप्रकारे कन्फ्यूशियसने आपल्या बुद्धिमत्तेचा व्यावहारिक उपयोग करŠन दाखवला होता  त्यामुळे त्याचे तत्त्वज्ञान केवळ ग्रंथबद्ध होण्यासाठी नसून त्याचा वापर व्यावहारिक यशासाठी होऊ शकतो.  हेच जणू काही त्याने सिद्ध केले होते.  जूआगू येथील शांती वार्तेमध्ये लू राज्याला विनासायास आपला भूभाग परत मिळवून दिल्यामुळे कन्फ्यूशियसची राजकीय पत आणि प्रतिष्ठा वाढली होती. राजा डिंगने त्याला आता कायदामंत्री बनवले.  असे असले तरी कन्फ्यूशियस यावर खूष नव्हता.  आपल्या तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने त्याला  'पंतप्रधान' पदाची आस होती.  कन्फ्यूशियसच्या  या मोठया यशातच त्याच्या भविष्यातील अपयशाची बीजं देखील नकळतपणे रुजली गेली होती. 
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                    



Comments

  1. सुंदर 👌
    नवीन माहिती मिळाली.
    विचार प्रकार सर्वत्र सारखेच असतात. त्याचा कोण किती अचूक व नेमकेपणाने उपयोग करतो हे महत्त्वाचे आहे. उपयोजित ज्ञान या आपण वापरलेल्या शब्दात खूप काही अभिप्रेत आहे. तेच आज विचारत असणे आवश्यक वाटते. 🙏 धन्यवाद एक छान विचार पाठविला त्याबद्दल आभार 🙏 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !