हुकुमशाहीला नाकारणारा तत्त्वज्ञ..

एक दिवस कन्फ्यूशियस आपला शिष्य जिलूसोबत आपल्या विद्यालयात चर्चा करत होता.  'क्वी' राज्यातून परत आल्यानंतर त्याच्या विद्यालयाची प्रसिद्धी आणि विस्तार खूप वाढला होता.  दरम्यानच्या काळात 'लू' राज्याने अनेक राजकीय घडामोंडींचा आणि हुकूमशाहीचा अनुभव घेतला होता.  हया सर्व उलथापालथींमध्ये कन्फ्यूशियसचे विद्यालय मात्र सुव्यवस्थित सुरू होते.  कन्फ्यूशियस आणि जिलू गहन चर्चेत गढलेले असतांनाच झाऔ राजा डिंग याचा एक संदेशवाहक त्याच्या विद्यालयात राजाचा संदेश घेऊन हजर झाला.  संदेशाच्या खलित्यातील मजकूरात राजा डिंग याने कन्फ्यूशियसला लू राज्यातील 'चुंगडू' प्रांताचा प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला होता.  चुंगडू प्रांत हा लू राज्याचा मध्यवर्ती प्रांत होता.  ज्यामध्ये लू राज्याच्या राजधानीचा देखील समावेश होता.  कन्फ्यूशियसने राजाचा प्रस्ताव जिलूला सांगितला, तेंव्हा जिलूला हा आपल्या गुरुचा अपमान वाटला.  कारण आपले आचार्य हे राज्याचे पंतप्रधान होण्याच्या पात्रतेचे आहेत.  असे जिलूला वाटत होते.  कन्फ्यूशियसने काही काळ विचार केला.  त्यानंतर तो जिलूला म्हणाला," जर तुम्ही कोणत्याही उच्च सरकारी पदावर नसाल तर तुम्ही सरकारच्या धोरणांवर प्रभाव पाडण्यास असमर्थ ठरतात.  सत्तेमध्ये भागीदार झाल्याशिवाय तुम्ही जनतेसाठी कोणतेच भरीव योगदान देऊ शकत नाही.  त्यामुळ मी हा प्रस्ताव स्वीकारत आहे."  यावेळी जिलूही आपल्या गुरुशी सहमत झाला.  सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी कन्फ्यूशियसला मिळालेला हा पहिलाच प्रस्ताव नव्हता ,तर यापूर्वी त्याला मिळालेल्या प्रस्तावांना नाकारत त्याने स्वीकारलेला हा पहिलाच प्रस्ताव होता.  सात वर्षांनी क्वी राज्यातून आपल्या लू राज्यात परतल्यावर कन्फ्यूशियस आपले विद्यालय शांतपणे चालवत होता.  असं असले तरी लू राज्य अशांत होते.  राज्यातील यादवी व बंडाळी थांबण्यास तयार नव्हती.  लू राजा जी मरणासन्न अवस्थेत होता. त्याचे सामंत,जमीनदार आणि सैन्य अधिकारी मनमानी करत होते.  त्यांना आकळण्याची क्षमता राजात राहिली नव्हती.  राजा जी याने आपला पुत्र डिंग याला आपला उत्तराधिकारी नेमले असले तरी डिंगला राजा मानण्यास हे लोक तयार नव्हते.  कन्फ्यूशियस हे सर्व पाहत होता;परंतु परिस्थिती अशी होती की तो काहीच करू  शकत नव्हता.  त्यामुळे त्याने आपल्या विद्यालयावरच लक्ष केंद्रित केले होते.  त्याचबरोबर लू राज्याच्या इतिहास लेखनासही त्याने प्रारंभ केला होता.  इसवी सन पूर्व ५०५ सालातील एक दिवस जिलू त्याच्याकडे आला आणि त्याने कन्फ्यूशियसला सांगितले की,"लू राज्याचा सेनापती यांग हुओ याने राजाविरुद्ध बंडखोरी केली आहे.  राज्यातील तीनही सामंत परिवारांना सत्ताभ्रष्ट करण्यात आले आहे आणि राजा डिंगला त्याच्या महालात नजरकैद करण्यात आले आहे."  जिलूचे कथन संपण्याच्या आधीच कन्फ्यूशियसच्या मनाला एका हुकुमशहाच्या जन्माची चाहूल लागली होती.  कन्फ्यूशियस हा विचार सेनापती यांग हुओच्या रुपाने प्रत्यक्षात उतरला.  यांग हुओने ४ वर्षे लू राज्यात आपली हुकुमशाही सत्ता राबवली.  राज्यातील सगळयात प्रभावी सामंत जी चे निधन झाले होते.  त्याचा मुलगा 'हुआन जी' त्याचा उत्तराधिकारी बनला.  त्याला राज्यकारभारापेक्षा रंगेलपणात रस होता.  यांग हुओने त्याला जेरबंद केले.  तसचे कन्फ्यूशियसचा मित्र नांगोंग जिंग्सूचा 'मेंग' सामंत परिवार आणि तिसरा 'शू' सामंत परिवार दुर्बल झाले होते.  यांग हुओने पूर्वीच्या सर्व मंत्र्यांना बरखास्त केले.  त्याला आता आपले नवे मंत्रीमंडळ बनवायचे होते.  प्रत्येक हुकुमशहाला त्याच्या हाताखालील लोक सगळयाच बाबतीत त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे लागत असतात.  त्याच्यापेक्षा वरचढ लोकांबद्दल त्याच्या मनात कायम भय असते.  त्यामुळे यांग हुओने देखील बुद्धिजीवी वर्गातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रीमंडळात घेतले नाही.  यासाठी प्रत्येक हुकुमशहा मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मंत्रीमंडळात मी अधिकाधिक सर्वसामान्य माणसांना प्रतिनिधत्व दिले आहे.  अशा सर्वसामान्यांना भ्रमित आणि प्रभावित करणा-या चकव्याचा आधार घेत असतो.  खरे तर त्याला कानाखालचे लोक घेऊन स्वतःची अर्निबंध सत्ता चालवायची असते.  असे असले तरी केवळ सर्वसामान्य हया शीर्षकाखाली बिनडोक लोकांकडून राज्य चालवणे देखील अवघड असते.  त्यामुळे त्याला एखादा तरी विश्वासू विद्वान आपल्यासोबत हवा असतो.  कारण हुकुमशहाला आपल्याही बुद्धीच्या मर्यादा ही माहित असतात.  केवळ लोकांना भूलवण्याऐवढी बुद्धीवर भागत नसते.  कसे का होईना राज्यही चालवायचे असते.  यांग हुओला अशावेळी कन्फ्यूशियसची आठवण झाली.  त्याने कन्फ्यूशियसला आपल्या मंत्रीमंडळात सहभागी होण्याचा प्रस्ताव पाठवला.  कन्फ्यूशियसने त्याच्या दूताला आपल्या प्रकृतीमुळे प्रवास करणे शक्य नाही.  असे सांगून त्याचे आदरातिथ्य करून त्याला माघारी पाठवले.  यांग हुओ देखील कच्च्या गुरुचा चेला नव्हता.  एक दिवस त्याने कन्फ्यूशियसला गाठले आणि आपल्या मंत्रीमंडळात सामिल होण्यासाठी त्याला राजी देखील केले.  कन्फ्यूशियस काही काळ त्याच्या बोलण्याने प्रभावित झाला.  कारण आपल्या मनातील आदर्श शासन प्रणाली लागू करण्याची ही त्याला सुवर्णसंधी वाटली.  आपल्या निर्णयाचा पुनर्रविचार करतांना मात्र कन्फ्यूशियस तात्काळ भानावर आला.  आपण यांग हुओच्या गोड बोलण्याच्या कच्छपी लागणे योग्य नाही.  याची जाणीव त्याला झाली.  कोणत्याही हुकुमशहाच्या सरकारमध्ये सहभागी योग्य नाही. कारण हुकुमशहांचे 'खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात'.  हे जाणवल्यावर कन्फ्यूशियसने स्वतःला सावरले.  त्याने यांग हुओचा प्रस्ताव नाकारला.  यांग हुओने देखील त्याचा नाद सोडला.  कोणताही तत्त्ववेत्ता किंवा विद्वान कोणत्याही हुकुमशहाची गुलामी करू शकत नाही आणि त्याने करू देखील नाही.  कारण यामुळे एकच गोष्ट साध्य होते ती म्हणजे हुकुमशाही अधिक बळकट होणे.  जगातील कोणताही हुकुमशहा सर्वसामान्य जनतेच्या मनात सुखी-आनंदी जीवनाचे स्वप्न पेरत असतांनाच मोठया समूहाच्या मनात छोटया समूहाविषयी विष कालवत सत्तेवर आरूढ होतो.  त्याच्यासाठी वंश,वर्ण,धर्म,संस्कृती यांचा लिलया वापर करतो.  त्याचा परिणाम एवढाच होतो की तो आपली सत्ता उपभोगतो.  त्याच्या सत्तालालसेची किंमत सुरवातीला छोटया समूहाला चूकवावी लागते.  शेवटी त्याला डोक्यावरच नव्हे तर डोक्यात घुसवून घेतलेल्या मोठया समूहाला.  अखेर गोळाबेरीज म्हणजे संपूर्ण देशाला किंमत चूकवावी लागते.  एकदिवस सगळेच जात्यात असतात.  हयाला जगातील सर्व हुकुमशाहांचा इतिहास साक्षी आहे.  हुकुमशाहीच्या काळात ही जो लोकांमधील सद्सद्विवेक जागृत ठेवण्याचा प्रयत्न करतो.  तोच खरा तत्त्वज्ञ अथवा विद्वान असतो.  अशावेळी मोहाचे क्षण येतच नाही असे नाही.  मात्र त्यांना दूर सारून आपल्यासोबत समाजाला प्रकाशाकडे नेण्याचे काम या लोकांनी करायचे असते.  त्यांचीच नोंद इतिहासाने नायक म्हणून ठेवलेली आहे.  याचा आदर्शच जणू कन्फ्यूशियसने घालून दिला.  प्रत्येक हुकुमशाहाची अखेर ठरलेला असतो. त्याप्रमाणे यांग हुओची सत्ता ४ वर्षांनी उलथवण्यात आली.  त्याकाळात काही जमिनदारांनी देखील कन्फ्यूशियसला आपल्या पदरी राहण्याचा प्रस्ताव दिला होता.  त्याने असे सर्व प्रस्ताव नाकारले.  नांगोंग जिंग्सूचा पिता सामंत मेंग याचे निधन झाले होते.  जिंग्सूचा भाऊ 'मेंग यी' हा नवा सामंत बनला.  त्याने यांग हुओची सत्ता उलथवण्याचा संकल्प केला.  यासाठी त्याने  'जी' आणि 'शू' परिवारांना देखील आपल्या समवेत घेतले.  जी हुआन याने सैन्याची कमान आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा यांग हुओने त्याला अटक केली.  यामुळे मेंग यी याने आपल्या सैन्यासह राजधानीवर हल्ला केला.  त्यावेळी यांग हुओचा पराभव झाला.  त्याची हुकुमशाही संपुष्टात आली.  जुआंग जी हया इतिहासाकाराने लिहिले की हुकुमशाहा यांग हुओला लू राज्यातून स्त्री वेश धारण करून पळावे लागले.  अखेर त्याने क्वी राज्यात शरण घेतली.  यांग हुओच्या पतनानंतर जी,मेंग आणि शू या सामंत घराण्यांनी राजा डिंगला पुन्हा सत्तेची सुत्रं सोपवली.  त्यांचा अंदाज असा होता की डिंग हा नामधारी राजा राहिल आणि आपण आपली सत्ता अमर्यादपणे उपभोगू शकू.  त्यांचा हा अंदाज सपशेल चूकला.  चार वर्षाच्या विजनवासात राजा डिंग याने आपल्या चूका,कर्तव्य,त्रुटी व समस्या यासंदर्भात आत्मचिंतन केले होते.  आपण आता कळसुत्री बाहुलीप्रमाणे राज्यकारभार करणार नाही. असा त्याने ठाम निर्णय घेतला.  एक समर्थ शासक म्हणून आता राजा डिंगचा पुनर्रजन्म झाला होता.  त्याला आता राज्यकारभार चालवण्यासाठी आपल्या प्रशासनाची पुनर्रचना करायची होती.  त्यासाठी अनेक बदल त्याने आपल्या मंत्रीमंडळात केले.  जुन्या-नव्या मंत्र्यांचा समावेश असलेला एक संतुलित मंत्रीमंडळ बनवले.  जी हुआनला पंतप्रधान केले असले तरी जी,मेंग आणि शू हया तीनही सामंत घराण्यांवर नियंत्रणाची व्यवस्था निर्माण केली.  कारण डिंगच्या मतानुसार सामंत घरण्यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यात विविध समस्या निर्माण झाल्या होत्या.  लू राज्याचा एक समर्थ शासक म्हणून कारभार करण्यास राजा डिंग आता तयार झाला होता.  आता त्याला आपल्या राज्यकारभारासाठी कन्फ्यूशियसची आवश्यकता होती.  त्यामुळेच त्याचा संदेशवाहक कन्फ्यूशियसच्या विद्यालयात पोहचला होता.  कन्फ्यूशियस देखील अशाच संधीची प्रतिक्षा करत होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                       


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !