शीख-मुस्लिम वैर ?
शीख आणि इस्लाम धर्मांच्या संबंधांचा विचार करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे शीख आणि इस्लाम धर्मात वैर अथवा संघर्ष होता. इस्लामच्या विरोधात शीख धर्माची स्थापना करण्यात आली होती. हिंदू-मुसलमान संघर्षाला एक वेगळी किनार देण्यासाठी असला भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे. खरं पाहिले तर गुरू नानकदेव ज्या घराण्यात उपनयन संस्कार (मुंज) करणे बंधनकारक होते. अशा कर्मठ व सनातनी हिंदू घराण्यातील होते. त्यांनी आपल्या उपनयन संस्काराला आणि यज्ञोपवीत (जानवं) धारण करण्याला विरोध करुन एका नव्या धर्माची मुहूर्तमेढ रोवली. तसेच शीख समुदाय आपण हिंदूपेक्षा पृथक अथवा भीन्न आहोत हे सदैव अधोरेखित करत आला आहे. अनेक इतिहासकार आणि धर्ममार्तंड शीख धर्माला हिंदू धर्मातील एक संप्रदाय अथवा पंथ म्हणून हिंदू धर्मात कोंबण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसतात. हा प्रयत्न शीख धर्माच्या स्थापनेपासून आजवर अविरत सुरू आहे. यामध्ये शीख आणि इस्लाम या दोन धर्मांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न असतो...