नव्या क्रांतीची पहाट

पंजाबातील पटियाला राज्यात गुडाक नावाचे गाव होते.  त्या गावात भिखन शाह नावाचा एक शीख राहत होता.  पटना येथे गुरू तेगबहादुरांच्या पत्नी गुजरीदेवी यांनी एका पुत्राला जन्म दिला आहे.  हे एक अत्यंत विलक्षण अद्भूत व अलौकिक प्रतिभा असलेले बालक असून त्याच्या रूपाने ईश्वरीय शक्तीनेच जन्म घेतला आहे.  अशी जाणीव सर्वप्रथम भिखन शाह यास झाली होती.  त्याला या गोष्टीची जाणीव होताच तो पटन येथे जाण्यास निघाला.  त्याकाळातील प्रवासातील अनंत अडचणी पार करत अखेर भाई भिखन शाह पटना येथे पोहचला.  पटन्यातील गुरू तेगबहादुरांच्या निवास स्थानी पोहचल्यानंतर त्याने गुरूजींच्या पुत्राचे दर्शन घेतले.  त्यावेळी वंदन करण्यासाठी त्याचे डोके आपोआप त्या बालकाच्या पायांवर टेकले.  भाई भिखन शाह यांच्या मनात बालकाची परीक्षा घेण्याचा विचार आला.  त्यांनी बालकाच्या समोर दोन वाटया ठेवल्या.  एका वाटीत दुध होते आणि दुसऱ्या वाटीत पाणी.  दुध असलेली वाटी हिंदू धर्माचे प्रतिक आणि पाणी असलेली वाटी मुस्लिम धर्माचे प्रतिक म्हणून ठेवण्यात आली होती.  दोन्ही वाटया बालकाच्या समोर ठेवून भिखन शाह यांना मोठे झाल्यानंतर हे बालक कोणत्या धर्माची बाजू घेईल आणि कोणाचा विरोध करेल हे जाणून घ्यायचे होते.  ज्याचा विरोध भावी जीवनात बालकाकडून होणार असेल त्या वाटीला ते स्पर्श करेल. असे भिखन शाह यांनी मनोमन ठरवले होते.  बालकाने जेंव्हा दोन्ही वाटयांना स्पर्श केला  तेंव्हा भाई भिखन शाह यांच्या आर्श्चयाला पारावार उरला नाही.  हे बालक भविष्य काळात हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मांना समान समजणार आहे.  असा संदेश त्याच्या कृतीतून मिळाला होता.  भिखन शाह यांनी बालकाच्या चरणांवर डोके ठेवले आणि भविष्यवाणी केली की,'हे बालक साधारण नसून हा साक्षात ईश्वरीय प्रकाश आहे.  ईश्वराचे प्रतिरूप आहे.  हे मोठे होऊन यशस्वी बनणार आहे.  याची विरता आणि पराक्रम यांचा सामना मोठेमोठे योद्धे करू शकणार नाहीत.  अत्याचारी लोकांचा विनाश आणि दीन-दुबळयांचा आधार म्हणून याने पृथ्वीवर जन्म घेतला आहे.'  गुरू तेगबहादुर आणि माता गुजरीदेवी यांच्या पोटी जन्माला आलेले हे बालक म्हणजे गुरू गोविंदसिंह.  तेगबहादुरजींनी दिल्लीकडे प्रयाण करण्यापूर्वी आपल्या पश्चात आपला पुत्र गोविंदराय यास गुरू गुरूगादीवर अभिष्कित करण्याचा आदेश दिलेला होता.  दिल्लीच्या चांदनी चौकात औरंगजेबाच्या अन्याय अत्याचारांसमोर न झुकता प्राणांचे बलिदान तेगबहादुरजींनी दिले.  त्यांनी प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या शीख धर्माचा त्याग तर केलाच नाही; परंतु सर्वधर्म समभावाचा आदर्श म्हणून ते इतिहासात अजरामर झाले.  खरे तर त्यांना आपला मृत्यू ईस्लाम स्वीकारून अथवा कारावासातून पलायन करून टाळता आला असता.  मात्र त्यांनी असे केले नाही.  त्यांनी आपला धर्म तर त्यागलाच नाही; परंतु तसेच प्रत्येकाला आपला धर्म अनुसरण्याचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी जाणीवपूर्वक बलिदान दिले.  त्यामुळे त्यांचे बलिदान हे सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी होते.  आपला पुत्र गोविंदराय याच्या जन्मानंतर चार वर्षांनी गुरू तेगबहादुर पटना येथे आले.  पिता-पुत्राची ही पहिली भेट होती.  त्यानंतर गुरूजी लवकरच आनंदपुरला गेले.  त्यांच्यानंतर माता गुजरीदेवी यांच्यासह गोविंदराय देखील आनंदपुरला जाण्यासाठी निघाले.  गोविंदरायांचा जन्म व बालपणीचा एक मोठा काळ पटना शहरात व्यतीत झाला होता.  त्यामुळेच आज पटना येथील पटना साहिब गुरूद्वारा शीख धर्माच्या एका प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक आहे.  बालपणापासूनच नेतृत्व व शौर्य हे गोविंदरायांच्या स्वभावाचे वेगळे विशेष होते.  त्यांच्या वयाचे इतर मुले जेंव्हा खेळण्यांसोबत खेळत तेंव्हा त्यांनी तलवार,कट्यार आणि धनुष्य यांना आपली खेळणी बनवले होते.  पटना येथील भैणी साहेब गुरूद्वारामध्ये बालक गोविंदराय यांच्या छोटया खडावा,कपडे,कटयार आणि छोटा धनुष्य आजही अत्यंत भक्तीभावाने जतन करण्यात आले आहेत.  पटन्यातील वास्तव्यातच गोविंदरायांनी संस्कृत आणि फारशी भाषांचे ज्ञान प्राप्त केले.  आनंदपुरला पोहचल्यानंतर गुरू तेगबहादुरांनी त्यांच्या शिक्षणाची यथायोग्य व्यवस्था करुन  दिली होती.  त्यामुळे थोडयातच दिवसात गोविंदरायांनी संस्कृत,फारशी,अरबी आणि गुरूमुखी आदि भाषांवर प्रभूत्व प्राप्त केले.  औरंगजेबाचा सामना करू शकणारा व धर्मासाठी बलिदान देऊ शकणारा एकमेव महापुरूष म्हणजे आपला पिता असा दृढ विश्वास व्यक्त करणा-या बालक गोविंदरायांच्या असामान्यत्वाची अनुभूती कोणालाही येऊ शकते.  गुरू तेगबहादुरांच्या बलिदानानंतर मोठया धैर्याने आणि गर्वाने गोविंदरायांनी त्यांच्या शिराचे अत्यंसंस्कार केले.  गुरूजींच्या  आदेशानुसार 'वैशाखी' किंवा 'बैसाखी' च्या दिवशी म्हणजे २९ मार्च १६७६ रोजी गोविंदरायांना शीख धर्माचे दहावे गुरू म्हणून गुरूगादीवर अभिष्कित करण्यात आले.  आता ते गुरू गोविंदराय झाले.  गुरू म्हणून अभिष्कत झाल्यावरही त्यांचे शिक्षण सुरूच होते.  गोविंदराय ज्ञानार्जनासोबतच सैनिकी प्रशिक्षण देखील घेत होते.  आपले आजोबा गुरू  हरगोविंदरायांप्रमाणे आखेट म्हणजे शिकारीमध्ये ते पारंगत झाले.  गोविंदरायांमध्ये  शुरयोद्धयासोबतच एक प्रतिभावंत कवी देखील दडलेला होता.  मार्कंडेय पुराणातील देव-दानवांच्या युद्धाच्या कथेवर त्यांनी १६८४ साली पंजाबी भाषेत एक आख्यान काव्य लिहिले.  हे काव्य 'चांदी दी वार' म्हणून प्रसिद्ध असून त्याचा समावेश दशम ग्रंथात करण्यात आलेला आहे.  सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय या काव्यात त्यांनी अधोरेखित केला आहे.  आपल्या पित्याची निर्घुण हत्येमुळे शीखांचे दहावे गुरू गोविंदराय यांच्या मनात शीखांना एक लढवय्यी जमात म्हणून आकार देण्याची योजना घर करुन बसली होती.  भविष्यात योग्य वेळी ते ही योजना प्रत्यक्षात आणणारच होते.  त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.  आनंदपुरला आल्यानंतर त्यांनी लाहोरवरून मोठया प्रमाणात तीक्ष्ण बाण मागवले आणि धर्नुविद्येत नैपुण्य प्राप्त केले.   गुरूगादीवर अभिष्कित झाल्यानंतर एक गुरू म्हणून आपल्या अनुयायांमध्ये शिस्त आणि अनुशासन निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध ठेवला.  सूर्योदयापूर्वी उठून आवश्यक उपासना करणे आणि उपासनेत 'असा दी वार' चे पठण करणे महत्वाचे होते.  त्यानंतर अनुयायांना उपदेश देणे आणि त्यांच्यासोबत लष्करी सराव करण्याचा नियम त्यांनी बनवलेला होता.  लष्करी सरावासाठी अधिक वेळ देण्यावर त्यांचा भर होता.  दिवसाच्या तिस-या प्रहरी गोविंदरायजी आपल्या अनुयायांसोबत आखेटसाठी जात किंवा घोडेस्वारीचा सराव करत.  सांयकाळी 'राहिरास' च्या भजनानंतर ते शयनासाठी जात.  नकळतपणे त्यांनी आनंदपुर साहिबमध्ये लष्करी प्रशिक्षण केंद्राचे वातावरण निर्माण केले होते.  ज्यामुळे आपल्या अनुयायांवर लष्करी संस्कार व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.  दुस-या बाजूला त्यांच्या वैवाहिक जीवनास प्रारंभ झाला होता.  २१ जुन १६७७ रोजी वयाच्या दहाव्या वर्षी आनंदपुरपासून उत्तरेस दहा किलोमीटर दुर असलेल्या बसंतगढ येथील माता जितो यांच्याशी त्यांचा विवाह झाला.  त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी एप्रिल १६८४ रोजी गोविंदरायांचा दुसरा विवाह  माता सुंदरी यांच्यासोबत झाला.  वयाच्या तेहतिसाव्या वर्षी १५ एप्रिल १७०० रोजी त्यांनी माता साहिब दिवान यांच्याशी विवाह केला.  दुसरी पत्नी माता सुंदरी यांच्या पोटी त्यांचे पहिले पुत्र साहबजादे अजितसिंग यांचा १६८७ साली जन्म झाला.  त्यानंतर पहिली पत्नी माता जितो यांनी अनुक्रमे साहबजादे जुझहरसिंग (१६९१),साहबजादे जोरावरसिंग(१६९६) आणि साहबजादे फतेसिंग (१६९९) यांना जन्म दिला.  गुरू गोविंदरायांच्या तिस-या पत्नी माता साहिब दिवाण यांना लोकिकार्थाने मातृत्वाची प्राप्ती झाली नसली,तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तुत्वाचा प्रभाव शीख धर्मपरंपरेत मोठा आहे. स्वतः गुरू गोविंदसिंगांनी त्यांचा गौरव 'खालसा पंथाची जननी' असा केला आहे.  आपल्या पारमार्थिक आणि प्रापंचिक जीवनात यशस्वी मार्गक्रमण करत असतांना  आपल्या पित्याच्या मृत्यूची सल गुरू गोविंदरायांना सदैव अस्वस्थ करत होती.  आपला शीख समुदाय आता दुबळा-लाचार राहता कामा नये. म्हणून एक बलाढय लष्करी शक्ती शीख धर्माला आकार देणे त्यांना अत्यंत आवश्यक वाटत होते.  बालसुलभ वयात त्यांनी या गोष्टीचा संबंध केवळ आपल्या पित्याच्या हत्येचा सूड या एकाच भावनेशी जोडला होता.  काळाच्या ओघात त्यांचा हा दृष्टिकोन व्यापक होत गेला.  जशी-जशी त्यांची जाणीव अधिक प्रगल्भ होत गेली तस-तसे  एक धर्म म्हणून टिकाव लागण्यासाठी शीखांमध्ये परिवर्तन त्यांना महत्वाचे वाटू लागले.  गुरू नानकदेवांपासून ते गुरू तेगबहादुरजींपर्यर्ंत सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समता हेच शीख धर्माच्या शिकवणूकीचे मुख्य सूत्र होते.  त्यामुळे हिंदू-मुसलमान अशा दोन्ही धर्मात शीख धर्म लोकप्रिय झाला होता.  दोन्ही धर्मातील असा दृष्टिकोन ठेवणारे आणि दोन्ही धर्मातील शोषणाने-दमनाने पिडलेले लोक यांना शीख धर्माने आधार दिला होता.  त्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी शीखांना भक्तीसोबत शक्तीची आवश्यकता आहे.  याची जाणीव गुरू गोविंदसिंगांना नेमकेपणाने झाली होती.  त्यांची ही जाणीव शीख धर्मातील एका नव्या क्रांतीची पहाट ठरणार होती. 
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     



Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !