शीख-मुस्लिम वैर ?
शीख आणि इस्लाम धर्मांच्या संबंधांचा विचार करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे शीख आणि इस्लाम धर्मात वैर अथवा संघर्ष होता. इस्लामच्या विरोधात शीख धर्माची स्थापना करण्यात आली होती. हिंदू-मुसलमान संघर्षाला एक वेगळी किनार देण्यासाठी असला भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे. खरं पाहिले तर गुरू नानकदेव ज्या घराण्यात उपनयन संस्कार (मुंज) करणे बंधनकारक होते. अशा कर्मठ व सनातनी हिंदू घराण्यातील होते. त्यांनी आपल्या उपनयन संस्काराला आणि यज्ञोपवीत (जानवं) धारण करण्याला विरोध करुन एका नव्या धर्माची मुहूर्तमेढ रोवली. तसेच शीख समुदाय आपण हिंदूपेक्षा पृथक अथवा भीन्न आहोत हे सदैव अधोरेखित करत आला आहे. अनेक इतिहासकार आणि धर्ममार्तंड शीख धर्माला हिंदू धर्मातील एक संप्रदाय अथवा पंथ म्हणून हिंदू धर्मात कोंबण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसतात. हा प्रयत्न शीख धर्माच्या स्थापनेपासून आजवर अविरत सुरू आहे. यामध्ये शीख आणि इस्लाम या दोन धर्मांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न असतो. उत्तर भारतातील संतपरंपरेचे गाढे अभ्यासक पं. परशुराम चतुर्वेदी,लेखक-विचारवंत खुशवंतसिंह अशा व्यासंगी लोकांनी शीख व इस्लाम धर्मातील वैर अथवा संघर्ष संपूर्णतः नाकारलेला आहे. पं. परशुराम चतुर्वेदी हे याबाबत मत व्यक्त करतांना म्हणतात की,' शीख धर्माच्या इतिहासाचा सखोल व तटस्थ अभ्यास केल्यास असे लक्षात येते की शीख-मुस्लिम वैर ही निव्वळ कल्पना अथवा निर्माण करण्यात आलेला भ्रम आहे. गुरू नानकदेवांनी आपल्या शीख धर्माचा प्रचार करतांना इस्लाम मधील मौलिक तत्त्वांविरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. ऐवढेच नव्हे तर त्यांनी इस्लाममधील काही मूलभूत तत्त्वांचा पुरस्कार केला होता. त्यामध्ये एकेश्वरवाद,मूर्तिपूजेची व्यर्थता,वर्णव्यवस्थाची निरर्थकता आणि विश्वबंधूता यांचा समावेश होतो. नानकदेवांनी या तत्त्वांचा एवढया जोरकसपणे अंगीकार केला की कधी-कधी त्यांचा शीख धर्म इस्लाम धर्मानुयायी वाटण्याची शक्यता आहे.' पं. परशुराम चतुर्वेदी हे स्वतः अत्यंत निरपेक्ष अभ्यासक व चिंतक असल्यामुळे त्यांचा हा निष्कर्ष यत्किंचितही चूकीचा वाटत नाही. अनेक सामान्य हिंदू लोकांमध्ये शीख म्हणजे मुसलमान अशी धारणा असलेली दैनंदीन जीवनात आपल्याला दिसून येते. नानकदेवांनी खरे तर हिंदू आणि इस्लाम यांच्यातील मौलिक व मानवतावादी तत्त्वांचा स्वीकार करत समन्वयवादी अशा एका नव्या धर्माची स्थापना केली. खुशवंतसिंह यांनी यासंदर्भात अत्यंत सटिक विश्लेषण केले आहे. ते म्हणतात - भारतात इस्लामने पाऊल ठेवण्यापूर्वीपासूनच इथे ब्राह्मण समाजाने हिंदू धर्माला जाती-पातींच्या ज्या श्रृंखलांमध्ये जखडून टाकले होते,त्या तोडून टाकण्याकरता चळवळी सुरू झाल्या होत्या इस्लामच्या आगमनामुळे त्यांना गती मिळाली एवढेच. जिथे संपर्क खूप जवळून आला,तिथे इस्लामने हिंदू लोकांच्या तत्त्वज्ञानावर आपला प्रभाव टाकला. खुशवंतसिंहांच्या या विश्लेषणाचा सखोल विचार केल्यास आपल्या हे सहज लक्षात येऊ शकते. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राजवट स्थिरावल्यावर ख-या अर्थाने मध्ययुगीन भक्ती आंदोलनांचा कालखंड सुरू झाला. त्यापूर्वी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वर्ण -जात भेदविरहित धर्म आणि भक्ती मार्गातील लोकशाही याची मागणी प्रारंभ झाली होती. इसवी सनानंतरच्या पहिल्या शतकात दक्षिण भारतात अलवार संतांची भक्तीपरंपरा निर्माण झाली होती. भजन व ध्यानधारणा यांच्या माध्यमातून कडक उपासना करण्याच्या पद्धतीचा प्रसार त्यांनी सुरू केला. भविष्यात भक्तिसंप्रदाय म्हणून ओळखली गेलेली चळवळ सुरू करणारे रामनुजाचार्य (१०१७-३७) यांचा उदय याच्यातूनच झाला. भक्तिसंप्रदायाने हिंदू धर्माच्या चौकटीत राहून ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीपैकी फक्त विष्णू आणि त्याच्या अवतारांचीच भक्ती करण्यावर जोर दिला. त्यात राम आणि कृष्ण हे दोन अवतारच प्रमुख होते. त्यातही कृष्णभक्ती अधिक लोकप्रिय झाली. त्यामुळेच मध्ययुगीन भक्ती आंदोलनाच्या केंद्रवर्ती कृष्ण भक्ती प्रभावी असलेली दिसते. भक्ती आंदोलनातून निर्माण झालेल्या विविध पंथांनी आपले आचरण देखील वेगळे व सुलभ ठेवले. इथूनच पुढे मग भगवान विष्णूंचे भक्त स्वतःला वैष्णव म्हणवून घ्यायला लागले आणि त्यांच्या दृष्टीने विष्णू हाच जणू एकमेव देव बनला. हरिहर भेद संपुष्टात आणण्यात या भक्ती पंथांना मोठया प्रमाणात यश आले. नकळतपणे एकेश्वरवादाचाच हा पुरस्कार होता. कारण वैष्णव पद्धतीच्या उपासनेमध्ये देव व्यक्ती वा आकारस्वरूपापेक्षा अमूर्त वा निर्गुण,निराकार असल्याचा संकल्पनेचा स्वीकार केला गेला. हे तिचे एक महत्वपूर्ण वैशिष्टय होय. वैष्णवांच्या बहुतेक विधींचा केंद्रबिंदू देवतांचे मूर्तीपूजनच असला,तरी या देवतांकडे ते लोक प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणूनच पहात. ईश्वर सर्वव्यापी,निर्गुण आणि निराकार आहे.ही काही तशी वैष्णवांनी शोधलेली संकल्पना नव्हे. ईश्वरासंबंधी भारतात प्रचलित असलेल्या अनेक संकल्पनांपैकीच या एका संकल्पनेवर वैष्णवांनी जोर दिला एवढेच. यासंदर्भात आदि शंकराचार्यांचे एक वचन याबाबत महत्वाचे आहे. शंकाराचार्य म्हणतात – 'हे परमेश्वरा,माझ्या तीन पापांबद्दल मला क्षमा कर. निराकार अशा तुला,मी माझ्या विचारांमध्ये आकार दिला. अनिर्वचनीय अशा तुझे,तुझी स्तोत्रे गाताना मी शाब्दिक वर्णन केले आणि देवळांचे उंबरठे मी झिजवत राहिलो व तुझे अस्तित्व सर्वव्यापी आहे,हेच विसरलो.' मध्ययुगीन भारतात भक्ती आंदोलनांच्या प्रसारातून पूर्वेकडे चैतन्य महाप्रभू,मध्य भारतात संत नामदेव-तुकाराम आणि उत्तरेस रामानंद,साधना पिपा,मीराबाई,तुलसीदास आणि मुख्य म्हणजे कबीर-रैदास,असे या संप्रदायाचे धुरीण होते. कबीर हे रामनंद या हिंदू गुरूचे मुसलमान शिष्य होते. त्यांनी हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मातील मौलिक तत्त्वांचा समावेश आपल्या शिकवणुकीत केला. नानकदेवांवर कबिरांचा सखोल प्रभाव होता. तसेच सूफी शेख इब्राहिम फरीद (१४५०-१५३५) जे सूफी फरिउद्दीन शकरगंज यांचे वंशज होते. त्यांचाही प्रभाव नानकदेवांवर होता. गुरू नानकदेवांना सूफी फरिउद्दीन शकरगंज यांच्याविषयी देखील अतीव आदर असल्याने त्यांच्या काही रचना गुरू ग्रंथसाहेबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकेश्वरवाद हा नानकदेवांच्या तत्त्वज्ञानाचा आत्मा म्हणावा लागतो. मध्ययुगीन भक्ती आंदोलनांनी ज्याप्रकारे हिंदू धर्मात विविध वैष्णव पंथांना जन्म दिला. तसाच त्यातून एक नवा धर्म जन्माला आला तो म्हणजे शीख धर्म. आपण असेही म्हणू शकतो की शीख धर्म हा मध्ययुगीन हिंदू भक्ती संप्रदाय आणि इस्लाममधील सूफी पंथ यांच्या विचारसरणींतून जन्माला आलेला आहे. असे असले तरी नानकदेवांनी हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्मातील त्रुटी,शोषण,अन्याय इत्यादीवर सारखीच टिका केली. नानकदेव आणि इतर शीख गुरू हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजात प्रिय होते. त्यामुळेच 'गुरू नानक शाह फकीर हिंदू का गुरू,मुसलमान के पीर' या ओळी सार्थ ठरतात. शीख आणि इस्लाम यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणा-या प्रवृत्तींनी शीख धर्मातील काही महत्वाचे व वैशिष्टयपूर्ण समन्वय व सहकार्य स्थळं पाहणे आवश्यक आहे. नानकदेवांचे आद्य अनुयायी भाई मरदानांपासून अनेक मुस्लिम अनुयायांचा संदर्भ देता येतो. गुरू गोविंदसिंहांच्या बाबतीत काही लोक त्यांना शीख-इस्लाम संघर्षाचे प्रतिक बनवू पाहतात. मात्र हिमालय पर्वत रांगांमधील अनेक हिंदू राजांशी तसेच तेथील अनेक मोगल सुभेदारांविरूद्ध लढण्यास त्यांना सय्यद बुद्धु शाह याने सहकार्य केले होते. तसेच त्याने त्यांच्या सेनेत अनेक मुस्लिम सैनिकांनी भरती केले होते. खालसा स्थापनेच्या वेळी अनेक मुस्लिम अनुयायी देखील हजर होते. असा दाखला शीख धर्माचे अभ्यासक देतात. बादशहा अकबर ते शाहजँहा पर्यंत शीख आणि मुस्लिम संबंध चांगले राहिलेले दिसतात. अल्लाह यार खाँ यांनी गुरू गोविंदसिहांचे जीवन चरित्र शायरीत (काव्यात) शब्दबद्ध केले आहे. नवाब मलेरकोटला याने गोविंदसिंहजींच्या पुत्रांना भिंतीत गाडण्याला विरोध केला होता. महाराजा रणजीतसिंह यांचा एक सर्वात विश्वासू मंत्री म्हणून फकीर अजीजुद्दीन कायम त्यांच्या सोबत असायचा. सारासार विचार करता असे लक्षात येते की शीख आणि इस्लाममध्ये जो संघर्ष झाला अथवा रंगवण्यात आला. तो संघर्ष दोन धर्मांचा नव्हता. औरंगजेबाने जेंव्हा त्याच्या धर्मांधतेचा अतिरेक करण्यास सुरवात केली तेंव्हा गुरू गोविंदसिंहांना शीख धर्माला एक राजकीय व लष्करी शक्ती म्हणून नवे रूप देण्याची आवश्यकता वाटली. त्यामुळे त्यांनी खालसाची स्थापना केली. त्यांच्या खालसा स्थापनेमुळे औरंगजेबाला ते राजकीय दृष्टया देखील प्रतिस्पर्धी वाटू लागले. याची परिणिती रक्तरंजित संघर्षात झाली. त्यामुळे गुरू गोविंदसिंहांचा संघर्ष हा एक शासक म्हणून औरंगजेबासोबत होता. सामान्य शीख आणि सामान्य मुसलमान यांच्यातील हा संघर्ष नव्हता. तो संघर्ष धार्मिक असता तर गोविंदसिंहांसोबत हिंदू राजेरजवाडे का उभे राहिले नाही? त्यांना तर त्यांच्याशी देखील संघर्ष करावा लागला. राजा पोरस,छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप यांच्या वाटयाला जसे एकाकी लढणे आले. तसेच गुरू गोविंदसिंह आणि महाराजा रणजिंतसिंहांच्या वाटयाला आले. औरंगजेबाचा वाढता अत्याचार हा या संघर्षाचा केंद्रबिंदू होता. धर्म नोहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment