समताधिष्ठित खालसा

गुरू गोविंदसिंहांनी शीख धर्माला खालसामध्ये परावर्तीत करतांना समता हा खालसाचा मुलभूत सिद्धांत मानला.  वर्ण,जात,उच्च-नीच,स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही भेदाला मूठमाती देणे म्हणजे खालसा.  यासंदर्भात गुरू अमरदासांचे एक वचन अत्यंत महत्वाचे आहे.  ते म्हणतात,'जातीच्या श्रेष्ठतेवर कोणीही गर्व करण्याचे कारण नाही. ज्याने ब्रह्म जाणला तो खरा ब्राहमण. एकाच ब्रह्म तत्त्वातून सर्वांची निर्मिती झाली आहे आणि एकाच मातीने निर्माण करण्यात आलेल्या भांडयाप्रमाणे हे सर्व जगत आहे.  जर सगळयांचे शरीर पंचमहाभूतांनी निर्माण झाले आहे, तर त्यात उच्च-नीच भेद असण्याचे कोणतेही कारण नाही.' हयाच तत्त्वाने सर्व शीख गुरूंनी आपल्या शीख समाजात उच्च-नीच अथवा मध्यम जातीतील लोकांना एकसमान मानले आणि सर्वांचा स्वीकार करुन  समतेचे तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणले.  त्यांचे समानतेचे तत्त्व केवळ ग्रंथांमध्ये वा वचनांमध्ये अडकून पडले नाही.  गुरू नानकदेवांपासून ते दशम गुरू गोविंदसिंह यांच्यापर्यंत 'समता' हे तत्त्व शीख धर्माचा आत्मा म्हणून प्रस्थापित करण्यात आले.  आजही शीखांच्या प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.  वर्ण-जात भेदाला तीलांजली देण्यासोबतच शीख गुरूंच्या शिकवणूकीतील व वर्तनातील स्त्री-पुरुष समानता हा विशेष लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.  खालसाच्या आचारसंहितेत हे प्रकर्षान अंर्तभूत करण्यात आले आहे की स्त्री व पुरुष यांच्या अधिकारात कोणत्याही प्रकारचे निसर्गनिर्मित अंतर नाही.  कारण निसर्गाने दोघांची निर्मिती केवळ मानव म्हणूनच केली आहे.  त्यामुळे मानव म्हणून आपण असा भेद करणे कदापि उचित नाही.  गुरू गोविंदसिंहांनी खालसाची स्थापना करतांना पंचप्यारे आणि इतर शीखांना जे कढाईतील बत्तासे टाकून गोड करण्यात आलेले जल अमृत म्हणून दिले.  त्या जलात बत्तासे टाकण्याचा मान त्यांनी आपल्या पत्नीला दिला होता.  खालसा स्थापनेच्या समारंभाच्या आयोजनात स्त्री-पुरुष दोघांचा समान सहभाग व सक्रिय सहभाग ठेवण्यात आला होता.  शीख धर्माच्या इतिहासात प्रसिद्ध आंदोलनांमध्ये स्त्रियांचा  असलेला सक्रिय सहभाग हा विशेष ठळकपणे दिसून येतो.  सर्वांना परिचित असलेले जालिनयनवाला बागमधील आंदोलनात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया सहभागी होत्या किंवा शहिद ए आझम भगतसिंहांच्या मातेचा आपल्या पुत्राच्या बलिदानासंदर्भात दिसलेला धीरोदात्तपणा ही उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत.  असे ही सांगितले जाते की नानकदेवजींच्या निर्वाणानंतर गुरू अंगददेव शोकमग्न व हतबल झालेले असतांना एका स्त्रीनेच त्यांच्या एकांतवासाची सोय केली आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केले.  येथे आपल्या महानुभावपंथातील महदंबेची आठवण होते.  चक्रधर स्वामींच्या उत्तरपंथे गमनानंतर शोकावेगाने गलितगात्र झालेल्या नागदेवाचार्यांना पाठीवर घेऊन रिद्धपुरला आणणारी आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देणारी त्यांची बहिण महदंबाच आपल्याला  गुरू अंगदेवांना सावरणा-या स्त्रीमध्ये दिसल्याशिवाय राहत नाही.  गुरू अमरदासांनी एका राणीला त्यांच्या दर्शनास येण्याची अनुमती दिली नव्हती.  कारण त्या राणीला बुरख्यात किंवा गोषात त्यांच्या दर्शनासाठी यायचे होते.  स्त्रियांच्या गोषा पद्धतीतून त्यांच्या गुलामीची जाणीव होत असते.  यामुळेच गुरू अमरदासांनी राणीला भेट नाकारली.  औरंगजेबाच्या कैदेत असतांना गुरू तेगबहादुरांना एका स्त्रीनेच अन्न-पाणी अत्यंत भक्तिभावाने पुरवले होते.   गुरू हरगोविंदजींच्या चरणी  आपली सर्व संपत्ती अर्पण करणा-या 'कौला' नावाच्या मुस्लिम महिला अनुयायी स्त्रीचे स्मरण चिरंतन करण्यासाठी अमृतसरमध्ये एक सरोवर हरगोविंदजींनी निर्माण केले आणि त्याचे नामकरण 'कौलसर' असे केले.  अमृतसरमधील कौलसर आजही स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत आहे. १८ व्या शतकात अनेक शीख स्त्रिया विविध युद्धांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्याचा गौरवशाली ईतिहास स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. खालसाची निर्मिती करतांना गुरू गोविंदसिंहांनी पाच 'ककार' दिले.  त्यांनी शीख धर्माचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी खालसा स्थापनेच्या निमित्त्याने पाच ककारांच्या माध्यमातून काही प्रतिकांचा स्वीकार केला.  त्यांनी या प्रतिकांचा स्वीकार का केला असावा? याबद्दल त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या समकालीन व्यक्तींनी  प्रकाश टाकलेला नाही.  त्यामुळे त्याचे नेमके स्पष्टीकरण कधीच करण्यात आलेले नाही.  गोविंदसिंहांच्या काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास यासंदर्भात काही समजावून घेता येणे शक्य आहे.  वर्ण-जाती पल्याड जाऊन सर्वांनी 'सिंह' ही उपाधी धारण करण्यामागे एका लढवय्या समाज म्हणून वेगळी ओळख निर्माण करणे औरंगजेबाच्या काळात आवश्यक होते.  मद्य आणि तंबाखू निषिद्ध ठरवून त्यांनी इतर धर्मांप्रमाणे वैयक्तिक नीतिमत्तेचे कोंदणात आपल्या धर्माला बसवले.  मद्याच्या बाबतीत जरी नसले तरी तंबाखूसेवनापासून शीख लोक कटाक्षाने दूर राहू लागले.  केस व दाढी याप्रमाणेच त्यांनी तंबाखूचा नियम एवढा कठोरपणे पाळला की ते त्यांना हिंदूपासून वेगळे ठेवणारे एक व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे.  कमरेला किरपान(कृपाण) व कच्छा घालण्याचे नियम सैनिकांकरता शिस्तीचा व पेहरावाचा भाग म्हणून होते; परंतु त्यामुळे त्यांच्या सर्व कामात एक सुटसुटीतपणा आला.  शेतक-यांना शेतात काम करतांना धोतराच्या पसा-यापेक्षा कच्छा सोयीचा वाटू लागला.  आज थ्री फोर्थ किंवा बरमुडावर जग किती अवलंबून आहे.  हे आपण पाहत आहोतच.  कच्छाचेच  हे  आधुनिक अवतार आहेत.  खालसामध्ये मुस्लिमांशी विवाह किंवा शरीरसंबंध ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला.  यामागे शिखांच्या पलटणी मुस्लिम बहुल गावांवर व खेडयांवर चालून गेल्यावर तिथल्या स्त्रियांच्या शीलाला धक्का लागू नये हा हेतू होता.  डोक्यावरचे केस आणि दाढी वाढवण्याच्या अनोख्या नियमामागच्या कारणांचा शोध अनेक अभ्यासकांनी घेताला आहे.  त्याबाबत विविध सिद्धांत देखील मांडण्यात आले आहे.  काही अभ्यासकांचे मते भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून ऋषी-मुनी लांब दाढी आणि केस ठेवत होते.  गुरू गोविंदसिंहांनी आपल्या अनुयायांनी दाढी व केस वाढवून वैराग्यपूर्ण संतवृत्तीचा अवलंब करावा.  हा उद्देश ठेवला असावा.  तसेच खालसांनी 'संत-सैनिक' बनावे अशी त्यांची अपेक्षा होती.  याबाबत दुसरा मतप्रवाह असा आहे की खालसाची स्थापना करण्यापूर्वी गोविंदसिंहांनी दीर्घ काळ हिंदूंच्या दुर्गा या दुष्टसंहारक देवीची उपासना केली होती.  या देवीचे रूप नेहमी केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत चितारले जात असल्यामुळे तिच्याबद्दलचा आदर दर्शवण्याकरता खालसांनी केस वाढवण्याचा नियम बनवला असेल.  प्रख्यात लेखक व विचारवंत खुशवंतसिंह यांना हे दोन्ही कारणे तेवढी संयुक्तिक वाटत नाहीत.  त्यांच्या मते मुसलमानांविरोधात लढण्याकरता आपल्या अनुयायांना तयार करत असतांना गुरू गोविंदसिंहांना वायव्य सरहद्द प्रदेशातील केसाळ टोळीवाल्यांची एक भीतीदायक बाजू लक्षात घेणे आवश्यक होते.  हे लोक आपल्या डोक्यावरचे केस खांद्यांवर रूळण्याएवढे वाढवून मोकळे सोडत व दाढीही वाढवत,त्यामुळे त्यांना पाहताक्षणी समोरच्याच्या छातीत धडकी भरत असे.  आपल्या अनुयायांच्या मनातील ही भीती दुर व्हावी आणि शत्रुला आपली भीती वाटावी यासाठी केस व दाढी वाढवण्याचा नियम केला असावा.  केसांमध्ये कंगवा बाळगण्याचा नियम केस लांब वाढवण्याला पूरक  असा आहे.  त्यात सहसा पगडीखाली दोन चौरस इंचांचा एक कंगवा केसांमध्ये खोचून ठेवला जातो.  तसेच पाच ककारात पगडी नसली तरी लांब केस व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि युद्धात शिरस्त्राण म्हणून उपयोगी ठरत होती.  हातातील कडे म्हणजे संयमाचे प्रतीक समजले जाते.  तसेच ते उजव्या हातात घालण्याचा अर्थ 'नैतिक हातकडी' असा होतो.  इतिहासाचा धांडोळा घेतल्यास पूर्वी योद्धे लढाईवर निघाल्यावर त्यांच्या हातात शुभचिन्ह म्हणून ताईत इत्यादी बांधत असत.  कडे हे त्याचीच प्रतीक होय.  अशा प्रकारे पाच ककारांच्या निर्मितीमधून गोविंदसिंहांनी एक धर्म म्हणून आपल्या अनुयायांना इतरांपेक्षा एक वेगळी ओळख दिली.  ही धार्मिक चिन्हे अंगा-खांद्यावर बाळगायला लावून गुरूजींनी एक असा शीख समाज तयार करायाचा होता जो आपली ओळख पटवू शकेल किंवा ती लपवू देखील शकणार नाही.  तसेच आपला धर्म त्याला नाकारता येणार नाही.  या वेगळेपणात धार्मिक छळ होण्याची शक्यता देखील होती.  म्हणून गोविंदसिंहांनी पाच ककारांची निवड करतांना कोणत्याही छळाचा वा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धैर्य वृद्धिंगत होण्याची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. होता  गुरू गोविंदसिंहांनी खालसाच्या माध्यमातून एक धर्म म्हणून शीख धर्माला पूर्णत्व दिले  तत्त्वज्ञानाला आचारधर्माची जोड दिली.  खालसामुळे सर्वधर्म समभावाचा व सर्वांगीण समतेचा  आपला पिंड शीख धर्माने त्यागला नाही.  तो आजही कायम आहे.  मात्र एक निरूपद्रवी,शांततावादी व सहनशील या आपल्या प्रतिमेचा त्याग जरूर केला.  खालसामुळे शीख सशस्त्र योद्धे झाले आणि त्यामुळेच भविष्यात महाराजा रणजिंतसिंहांच्या प्रयत्नांनी शीख एक राज्यकर्ती जमात होऊ शकली.  शीख धर्माच्या रचनेत,आचरणात आणि प्रतिकांमध्ये गुरू गोविंदसिंहांनी केलेले परिवर्तन ज्यांना मान्य नव्हते,असे लोक साधे शीख राहिले व त्यांना 'सहजधारी' संबोधले जाऊ लागले.  नव्या सुधारणांचा स्वीकार करणारे खालसा म्हणून ओळखले जाऊ लागले.  सहजधारी असो वा खालसा कोणीही सर्व गुरूंच्या तत्त्वज्ञानावर  असलेली निष्ठा मात्र ढळू दिली नाही.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                         

Comments

  1. मानवांतील समता आणि स्त्री-पुरुष समानतेचे अवघड कार्य शीख समाजाने आपल्या विचारांतून रुजवले.हजारो वर्षांच्या चुकीच्या रुढी- परंपरा मोडीत काढल्या.हे खरोखर अखिल जगाला मार्गदर्शक कार्य आहे.आपणांस वआपल्या लेखनशैलीस प्रणाम!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !