राज करेगा खालसा..

चैत्रपाडव्याचा दिवस होता.  वर्ष होते इ. स. १६९९  शीखांचे दहावे गुरू गोविंदराय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो शीख आनंदपुरच्या दिशेने निघाले होते.  सारे रस्ते,सडका आणि पायवाटा जणू काही आनंदपुरमध्ये जाऊन थांबत होत्या.  शीखांचे जत्थेच्या जत्थे देशाच्या कानाकोप-यातून आनंदपुरकडे निघाले होते.  आसाम,बंगाल,बिहार,काश्मिर,महाराष्ट्र,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,गुजरात अशा भारताच्या विविध भागातून हे लोक आनंदपुरला पोहचत होते.  वर्ण,जात,भाषा,वेशभुषा भिन्न असलेल्या या लोकांचे ध्येय मात्र एकच होते.  त्यांचा संकल्प आणि विचार एक होता.  गुरू तेगबहादुरांप्रमाणे सर्वधर्म समभावासाठी शिर देण्याच्या प्रतिज्ञेने या सर्वांना एका धाग्यात गुंफले होते.  आनंदपुर शहरात आणि भोवतालच्या परिसरात शीखांच्या अलोट सागराला भरती आली होती.  एका खुल्या मैदानात शानदार शामियाने उभारण्यात आले होते.  त्यांच्यामध्ये सुमारे पन्नास हजार शीख बसलेले होते.  सर्व शामियान्यांच्या समोर एक अतिशय सुंदर रेशमी शामियाना उभारण्यात आला होता.  गुरू गोविंदरायांनी याप्रसंगी एक विशाल यज्ञाचे आयोजन केले होते.  यज्ञ समाप्त झाल्यावर ते मुख्य शामियान्याच्या समोर उभे राहिले.  त्यांनी आपली तलवार म्यानेतून बाहेर काढली आणि म्हणाले की,' मला एका शिर हवे आहे.  येथे असा कोणी माईचा लाल आहे का जो गुरुंच्या नावावर आपले शिर अपर्ण करेल?' काही काळ जमलेल्या शीख समुदायात गंभीर शांतता निर्माण झाली.  एवढयात गर्दीतून एक आवाज आला की,' माझे शिर अपर्ण होण्यास तयार आहे,सच्चे बादशहा.' जमावाने आणि गुरुजींनी पाहिले तर तो लाहोरवरून आलेला एक तरूण शीख दयाराम होता.  गुरुजी  दयारामला म्हणाले,'माझ्या जवळ ये.' दयाराम अत्यंत निर्भयपणे गुरुजींच्या जवळ गेला. गुरुजी  त्याला शामियान्याच्या आत घेऊन गेले.  थोडया वेळाने शामियान्यातून एक अत्यंत भयाण किंकाळी लोकांच्या कानावर आदळली.  असे वाटत होते की जणू काही गुरुजींनी आपल्या तलवारीने दयारामचे शिर धडावेगळे केले असावे.  एव्हाना रक्ताची एक धार शामियान्यातून बाहेर वाहू लागली होती.  काही वेळातच गुरुजी  शामियान्यातून बाहेर आले.  त्यांची तलवारीच्या पात्यावर रक्ताचे ओघळ पाहून जमलेला समुदाय विचारात पडला.  त्यांचे हे रूप  पाहून तेथील शांतता अधिकच रौद्र झाली.  गुरुजी  पुन्हा गरजले,' अजून कोणी वीर पुरुष आहे का ?  जो शक्तीच्या देवीला आपले शिर अर्पण करू  शकेल.' तेवढयात दिल्लीचे भाई धर्मदास पुढे सरसावले.  त्यांनी आपले शिर गुरुजींच्या  समोर झुकवले.  गुरुजी  त्यांना आत घेऊन गेले  पुन्हा तशीच भयाण किंकाळी लोकांच्या कानाचे पडदे फाडून गेली.  शामियान्यातून बाहेर पडणारा रक्ताचा प्रवाह विस्तारला होता.  गुरुजींनी  आणखी तीन वेळा अशाच प्रकारे आव्हान केले.  त्याला द्वावरकेचे भाई मोहनचंद,बीदरचे भाई साहबचंद आणि भाई हिम्मत राम या युवकांनी प्रतिसाद दिला.  गुरुजी  त्यांना ही शामियान्यातून घेऊन गेले आणि पुन्हा आधिच्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली.  बाहेर बसलेल्या शीख समुदायाला वाटले की गुरुजींनी  या पाचही जणांना शक्ति देवीला बळी दिले.  काही वेळाने गुरुजी  बाहेर आले आणि त्यांना एका मोठया भट्टीवर एक खूप मोठी कढाई ठेवण्याचा आणि तिच्यात पाणी भरण्याचा आदेश दिला.  गुरू  गोविंदराय गुरूवाणीचा पाठ करत कढाईतील पाणी आपल्या तलवारीने ढवळू लागले.  त्यांच्या पत्नी माता सुंदरी यांनी त्या पाण्यात काही बत्ताशे टाकले.  बत्ताशे कढाईतील पाण्यात संपूर्ण विरघळले आणि गुरुजींचा  पाठ देखील पूर्ण झाला.  त्यांनी शामियान्याचा पडदा हटवला.   त्याबरोबर जमलेल्या समुदायाला धक्का बसला.   कारण गुरुजींच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांच्या सोबत शामियान्यात गेलेले पाचही युवक जिवंत आणि सुखरूप  असलेले दिसले.   गुरुजींच्या आव्हानावर मरण्यास तयार झालेले हेच पाच जण भविष्यात 'पंच प्यारे' शीख धर्माच्या इतिहासात अजरामर होणार होते.  गुरुजींनी  या पाचही जणांना कढाईतील 'अमृत' प्राशन करण्यास दिले.  नंतर त्यांच्या हातून स्वतः अमृतपान केले.  गुरू  गोविंदरायांनी आपल्या कृतीमधून या पंचप्यारेंना एका नव्या बंधुसमाजाची दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर गुरुजींनी  जमलेल्या शीख समुदायासमोर उभे राहून उद्घोषणा केली की,' आजपासून मी माझे नामकरण गोविंदराय ऐवजी गोविंदसिंह करत आहे.  माझ्याप्रमाणे आजपासून प्रत्येक शीख आपल्या नावासमोर सिंह ही उपाधी लावेल.  त्यांच्या पुढील पिढयांच्या नावासोबतही सिंह उपाधी जोडली जाईल.  आजपासून प्रत्येक शीख स्वतःला सिंहासमान शक्तिशाली समजेल.  तसेच आजपासूनच शीख धर्म हा खालसा म्हणून ओळखला जाईल.  खालसा म्हणजे 'पवित्र'.  सर्व शीख धर्म अनुयायाी देखील खालसा म्हणून ओळखले जातील.  आज हे अमृतपान केल्यानंतर कोणताही शीख आपले केस कापणार नाही.  त्याला पाच ककार म्हणजे केस,कडे,कच्छा,कृपान आणि कंगवा यांना सदैव आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनवावा लागेल.  प्रत्येक खालसाला प्रतिज्ञा करावी लागेल की धर्मावर कोणतेही संकट आले तर आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास तो मागे-पुढे पाहणार नाही.  ज्याप्रमाणे हे पाच सिंह मरण पाहून ही डगमगले नाहीत.' हा दिवस होता ३० मार्च १६९९.  याच दिवशी शीख धर्माचे परिवर्तन खालसा मध्ये झाले.  'खालसा' हा शब्द 'खलिस' या अरबी शब्दापासून निर्माण झाला आहे.  खलिस म्हणजे तावून-सलाखून निघालेला,अत्यंत शुद्ध  गुरूनिष्ठेच्या आणि आत्मबलिदानसाठी तयार असलेल्या शिष्य समुदायाचे तावून सलाखून निघालेले सोने म्हणजे खालसा.  शीख धर्माचे खालसामध्ये रूपांतर करत असतांना नानकदेवांपासून शीख गुरूंनी दिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या शिकवणुकीचे विस्मरण होऊ दिले नाही.  त्यांनीं पुरुषांना 'सिंह' उपाधी देतांना स्त्रियांच्या नावापुढे 'कौर' किंवा 'कुंवर' लावण्याचा आदेश दिला.  खालसासाठी बलिदान करण्यासाठी तयार झालेल 'पंच प्यारे' देखील वैशिष्टयपूर्ण आहेत.  नानकदेव ते गुरू  तेगबहादुर यांच्या गुरूवाणीतील समतेचे तत्व येथे नकळतपणे जोपासले गेले.  पंच प्यारेंमध्ये एक ब्राहमण,एक क्षत्रिय आणि तीन शुद्र होते.  त्यांना एकाच भांडयातून अमृतपान करवण्यात आले.  खालसा स्थापना आणि दीक्षा समारंभात सहभागी झालेल्या प्रत्येकाला कढाईतील गोड जल म्हणजेच 'अमृत' एका सामायिक पेल्यातून पाणी प्राशन करण्यासाठी देण्यात आले.  अर्थातच खालसाने जातीव्यवस्थेला कायमची मूठमाती दिली.  कृत्रिम वर्णभेद वा जातीभेद मानत व्यक्तीला व्यक्तीचा स्पर्श किंवा माणसांना अस्पृश्य ठरवत त्यांचा स्पर्श विटाळ मानणा-या सनातनी प्रवृत्तीला मोडून काढण्याचा उद्देश यामागे होता.  गुरू गोविंदसिंहांनी धर्माचे खालसात रूपांतर करण्यामागे आपले पिता गुरू तेगबहादुरांचे जीवितकार्य ही प्रेरणा असल्याचे मानले आहे.  यासंदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट विवेचन केले आहे.  याबद्दल त्यांनी लिहिले आहे: 'प्रत्येक ठिकाणी सत्याची कास धरणे,पाप आणि वाईटाचा नाश करणे,यासाठी माझा जन्म झाला आहे.  सदाचरण वृद्धिंगत होवो,चांगले ते टिकून राहो व या भूमीतून जुलूमाची मुळे उखडली जावो.' लोकांचा नायक,सरदार म्हणून आपली ऐहिक कार्ये पार पाडायची तर आपली विचारसरणी बदलणे आवश्यक आहे,हे त्यांच्या ध्यानात आले.  आपल्या अनुयायांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे तर त्यांना शस्त्र चालवण्यास शिकवावे लागेल. हे तर खरेच,पण त्याचबरोबर बळाचा वापर करण्यातली नैतिकतादेखील त्यांना पटवून द्यावी लागेल,हे गुरू गोविंदसिंहांनी जाणले होते.  दीक्षासमारंभानंतर गुरू गोविंदसिहांनी त्या पाच जणांना,'वाहे गुरूजी दा खालसा,वाहे गुरूजी दी फतेह' म्हणजेच  खालसा लोक देवाने निवडलेले आहेत,आमच्या देवाचा विजय होवो,' अशा नव्या घोषणेने सलामी दिली.  त्यांच्या जीवितकार्यावरच्या श्रद्धेबरोबरच त्यांनी आपल्या अनुयायांना ऐहिक यशाचे वचनही दिले.  ते म्हणजे 'राज करेगा खालसा,'ते लोकांना म्हणाले : खालसा राज्य करतील.  त्यांचे शत्रु विखुरले जातील,फक्त जे शरण येतील,त्यांचेच रक्षण केले जाईल.' गुरू गोविंदसिंहांनी शीख आता दुबळा राहणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही.  तो प्रसंगी धर्माच्या रक्षणार्थ तलवार देखील चालवेल.  अशी घोषणा करून खालसाच्या माध्यमातून शीख धर्माला क्षात्रतेजाची आभा दिली.  एक धर्म म्हणून आपले तत्त्वज्ञान आणि वेगळेपण टिकवण्यासाठी लढवय्यी आणि राज्यकर्ती जमात होण्याशिवाय पर्याय नाही.  हे ओळखण्यात त्यांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.  तसा धर्म आणि शस्त्र यांची युती हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय ठरतो.  असे असले तरी कदाचित अनेकदा ती अपरिहार्यता देखील ठरत असावी.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !