७० एमएमला सात इंचाचे आव्हान.. (दै.दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीतील प्रासंगिक लेख)
(प्रासंगिक) ७० एमएमला सात इंचाचे आव्हान... राहुल हांडे handerahul85@gmail.com मुबंईच्या एका सप्त तारांकीत हॉटेलसमोर काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे अनेक दिग्गज वलयांकीत चेहरे एका व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होते. ती व्यक्ती होती अॅमेझानचे मालक, जेफ बेजोस. याला कारण आज आपल्या चित्रपट क्षेत्रासाठी जेफ बेजोस एक अत्यंत खास विभूती आहे. त्यांची अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ कंपनी जगातील अन्य देशांपेक्षा भारतात उत्तम कामगिरी करत असल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या व्यक्तीला भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रचंड रस असलेला दिसतो. गेल्या दोन वर्षात बेजोसच्या या कंपनीच्या प्रेक्षकांमध्ये सहापटीने वाढ झाली असल्याने,त्यांनी भारतात ओरिजिनल सिरीज निर्मिती क्षेत्रात काही हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. बेजोस करत असलेली गुंतवणूक व्यवसाय आणि रोजगार या दृष्टीने उत्साहवर्धक असली,तरी पारंपरिक भारतीय चित्रपट उद्योगासाठी ही बाब काहीशी चिंताजनकच म्हणावी लागेल. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ,नेटफ्लिक्स,हॉटस्टार,सोनी-लिव आणि ऑल्ट बालाजी यासारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग चॅनेल्सच्या ओवर-द-टॉप(ओटीटी) प्लॅटफॉर्मन...