७० एमएमला सात इंचाचे आव्हान.. (दै.दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीतील प्रासंगिक लेख)
(प्रासंगिक)
७० एमएमला सात इंचाचे आव्हान...
राहुल हांडे
handerahul85@gmail.com
मुबंईच्या एका सप्त तारांकीत हॉटेलसमोर काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे अनेक दिग्गज वलयांकीत चेहरे एका व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होते. ती व्यक्ती होती अॅमेझानचे मालक, जेफ बेजोस. याला कारण आज आपल्या चित्रपट क्षेत्रासाठी जेफ बेजोस एक अत्यंत खास विभूती आहे. त्यांची अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ कंपनी जगातील अन्य देशांपेक्षा भारतात उत्तम कामगिरी करत असल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या व्यक्तीला भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रचंड रस असलेला दिसतो. गेल्या दोन वर्षात बेजोसच्या या कंपनीच्या प्रेक्षकांमध्ये सहापटीने वाढ झाली असल्याने,त्यांनी भारतात ओरिजिनल सिरीज निर्मिती क्षेत्रात काही हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. बेजोस करत असलेली गुंतवणूक व्यवसाय आणि रोजगार या दृष्टीने उत्साहवर्धक असली,तरी पारंपरिक भारतीय चित्रपट उद्योगासाठी ही बाब काहीशी चिंताजनकच म्हणावी लागेल.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ,नेटफ्लिक्स,हॉटस्टार,सोनी-लिव आणि ऑल्ट बालाजी यासारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग चॅनेल्सच्या ओवर-द-टॉप(ओटीटी) प्लॅटफॉर्मने वेबसेरीज हा मनोरंजनाचा एकदम नवा व ताजा प्रकार भारतात लोकप्रिय केला आहे. २०१६ साली नेटफ्लिक्सने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सहा महिन्याअगोदर भारतीय मनोरंजन बाजारात प्रवेश केला होता. यामुळे हे वर्ष या नवीन क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे होते. तसे पाहिले तर देशाचा पहिला प्लॅटफॉर्म ओटीटी २००८मध्ये आलेला रिलायंस एंटरटेनमेंटचा बिगफ्लिक्स होता. २०१४-१५ मध्ये टीवीएफ निर्मित परमनंट रुममेट्स आणि पिचर्स सारख्या सिरीज मोठया प्रमाणात लोकप्रिय ठरल्या. गेल्या वर्षी याच प्लॅटफॉर्मद्वारा निर्मित कोटा-फॅक्ट्री ही कृष्ण-धवल सिरीज चर्चेचा विषय ठरली होती. वेबसेरीज या प्रकाराची लोकप्रियता पाहता आज प्रत्येक मोठा चित्रपट निर्माता-निर्देशक ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वेबसिरीज निर्माण करण्याची महत्वकांक्षा बाळगत आहे. टायगर व बजरंगी भाईजानसारख्या सुपर हिट चित्रपटांचा यशस्वी दिग्दर्शक कबीर खानची महत्वकांक्षी वेबसेरीज द फॉरगॉटन आर्मीचे प्रसारण प्रारंभ झालेले आहे. मनोज बाजपेयीसारख्या बहुआयामी परंतु चित्रपटांमध्ये मर्यादित स्थान असलेला अभिनेत्याने द फॅमिली मॅन या वेबसेरीजच्या माध्यमातून यशाचे नवे किर्तिमान स्थापित केले आहे. सैफ अली खान व विवेक ओबेरॉय सारख्या अभिनेत्यांना वेबसेरीजच्या माध्यमातून नवसंजिवनी प्राप्त झाली. यामुळेच अभिषेक बच्चन देखील आपल्या करियरला सावरण्यासाठी ब्रेथ २ या बेबसिरीजमध्ये एका महत्वाच्या भूमिकेत नशीब आजमावत आहे.
वेबसेरीज हा मनोरंजनाचा प्रकार लोकप्रिय होण्यामागची कारणं शोधतांना, प्रेक्षक व चित्रपट माध्यमाशी निगडीत सर्व घटक यांच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. आज आपल्या देशाच्या लोकसंख्येचा ७० टक्के भाग हा ३५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवकांचा आहे. मनोरंजन म्हणून या युवा प्रेक्षकांची चित्रपटांकडून असलेली अपेक्षा व दृष्टिकोन बदलेला आहे. दूरदर्शनच्या सास-बहू,नागिनसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शो यांची मनोरंजन क्षमता,युवा प्रेक्षकाच्या दृष्टीने संपुष्टात येत आहे. कदाचित तो अधिक नवा व प्रगल्भ झालेला आहे. चित्रपट पाहण्यासाठी खास वेळ काढवा लागतो,चित्रपटगृहात जावे लागते,मल्टीप्लेक्सचे महागडे टिकट खिशाला कात्री लावते इत्यादी बाबींचा विचार करता,हातात असलेल्या मोबाईलच्या सात इंची स्क्रीनवर त्याला सर्वागाने चित्रपटाचा फिल देणाऱ्या वेबसेरीज उपलब्ध होतात. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी हा प्रेक्षक त्याचा आस्वाद घेऊ शकतो. वेबसेरीजच्या निर्माते-दिग्दर्शक यांनी हे नेमकेपणाने हेरले आहे. यामुळेच वास्तव व सत्य घटनांना काल्पनिक रंग देऊन वेबसेरीजची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रत्येकाला सहज संधीची उपलब्धता वेबसेरीजच्या दुनियेत होत आहे. नवखे कलावंत,दिग्दर्शक व विविध तंत्रज्ञ यांना झटपट संधी देणारे हे क्षेत्र ठरले आहे. कलावंताच्या भूमिकेतून विचार करता हे अभिनेता-अभिनेत्री यांचे माध्यम आहे,यासाठी मोठा स्टार असणे आवश्यक नाही.
कबीर खानच्या मते वेबसिरीज माध्यमाने भारतीय चित्रपटातील स्टार ही कल्पना पूर्णपणे हद्दपार जरी झाली नाही,तरी तिचे प्रभूत्व मात्र निश्चितच कमी होणार आहे. इरफान खान असो वा मनोज बाजपेयी यांच्यासारख्या कसलेल्या व दमदार अभिनेत्यांना चित्रपट माध्यमात येणाऱ्या मर्यादा इथे नाही. त्यांच्यातील सशक्त अभिनेता परिपूर्णपणे येथे व्यक्त होऊ शकतो. त्यांच्यासाठी योग्य कथानक व भूमिका वेबसेरीजमध्ये उपलब्ध आहे. सेन्सॉर नावाचा अडथळा नसल्याने दिग्दर्शकाला व लेखकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य वेबसेरीजमध्ये घेता येते. याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सेक्रेड गेम्स,गंदी बात,सिटी ऑफ ड्रिम्ससारख्या वेबसेरीजमध्ये करण्यात आला. उत्तेजकता,नग्नता व बिभत्सता यांचा अतिरेक या वेबसेरीजच्या निर्माता-दिग्दर्शक यांना यशाची हमी वाटली. मात्र आजच्या सुजाण व प्रगल्भ युवा प्रेक्षकांनी त्यांना नाकारले. वेबसेरीजचा आशय व सादरीकरण दर्जेदार असणे देखील महत्वाचे ठरत आहे.
वेबसिरीजमुळे दिग्दर्शकाएवढेच महत्व लेखकाला महत्व प्राप्त झाले आहे. मनोज बाजपेयीच्या मते वेबसिरीज चा खरा नायक लेखकच आहे. साहित्य क्षेत्रासाठी देखील ही आशादायक बाब वाटते. एकाच वेळी १९० देशात प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीजला चित्रपटगृहांची उपलब्धता हा देखील अडथळा नाही. कोणताही चित्रपट एकाचवेळी ऐवढया देशात प्रदर्शित होत नाही.
वेबसिरीजच्या या वादळात पारंपरिक चित्रपट माध्यम कसे तग धरणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. गेली सत्तर-पंचाहत्तर वर्ष या माध्यमाने भारतीय समाजमानसावर गारूड केलेले आहे. भारतीय जनमानसाच्या सत्तर एमएमला सात इंची स्क्रीनवर आलेला हा झंझावात विस्कटविणार की बदलविणार हे येणारा काळच ठरवेल.
--------------
लेखकाचा संपर्क - ८३०८१५५०८६
Comments
Post a Comment