जब लाद चलेगा बंजारा..



                    जब लाद  चलेगा बंजारा..

हजरत पैगंबरांनी मक्का काबीज केल्यानंतर सभोवतालच्या प्रदेशातील मूर्तिपूजा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या व सिहाबींच्या या प्रयत्नांचा धसका ताएफ शहरवासीयांनी घेतला. ज्या ताएफणे मदिना होण्याचे सौभाग्य नाकारले होते,तेच ताएफ त्याच्या 'लात' या आराध्य देवतेच्या मूर्तिच्या संरक्षणासाठी चिंतिंत झाले होते. आपला पूर्वापार चालत आलेला धर्म आणि मूर्ती यांच्या रक्षणासाठी ताएफवासी निर्धाराने मक्का व ताएफ  यांच्या दरम्यानच्या प्रदेशात दबा धरून बसले. पैगंबरांचे  दहा हजार सैन्य आणि नव्याने मुसलमान झालेले दोन हजार असे बारा हजाराची सेना हुनेनच्या लोकांचा समाचार घेण्यास बाहेर पडली. दोन्ही बाजूला उंच पर्वत आणि तेथे अरुंद रस्ता अशा अडचणीत हुनेनच्या लोकांनी मुसलमानांना पकडले. मुसलमान सैन्याची त्रेधा उडाली आणि ते सैरावरा पळू लागले. अशावेळी पैगंबराचे चुलते अब्बास यांनी त्यांना 'वृक्षप्रतिज्ञे' ची (बैअते रिजवान) आठवण करून दिली. यामुळे मुसलमान सैन्यात आवेश संचारला आणि ते शत्रूंवर तुटून पडले. अखेर मुसलमानांचा विजय झाला. हुनेन लोकांच्या छावणीत चीजवस्तूसह,चाळीस हजार उंट,चाळीस हजार मेंढया आणि सहा हजार लोक गनीमत म्हणून जमा झाली. ही गनीमत 'जिरान्हा' येथे पाठवून पैगंबर ताएफवर चाल करून गेले. एक महिना ताएफला वेढा देऊन देखील ताएफवासी शरण न आल्याने त्यांनी तेथून वेढा काढला. ते जिरान्हा येथे गेले आणि त्यांच्यासमोर एक बाका प्रसंग उभा राहिला. हुनेनच्या गनीमतीत जे सहा हजार लोक सापडले होते,त्यामध्ये लहानपणी खेडयात ज्या हलीमा नावच्या महिलेन यशोदेप्रमाणे त्यांचे संगोपन केले होत,तिची मुलगी अल-साइमा होती. पैगंबरांनी तिला कैदेतून मुक्त केले आणि तिला चांगले बक्षीस देऊन तिच्या नातेवाईकांकडे तिची रवानगी केली. अल-साइमावर पैगंबरांनी केलीली कृपादृष्टी पाहून कैद असलेल्या इतर लोकांनी,त्यांना त्यांच्या बालपणाची,तारूण्याची आठवण करून देत त्यांच्याशी असेलेला आपला संबंध भावनिक पद्धतीने विषद केला. याने पैगंबरांचे हृदय हेलावले,त्यांनी त्यांनाही मुक्त केले.  पैगंबरांनी उंट व शेळया आपल्या सैन्यातील शिपायांना वाटल्या. मक्केतील वजनदार लोकांना सुंदर वस्तूंच्या भेटी दिल्या.काही लोकांना तर शंभर-शंभर उंट मिळाले. जुन्या कट्टया शत्रूंविषयी त्यांनी दाखविलेला उदारपणा पाहून,मदिनावासी नाराज झाले. पैगंबर मक्कावासीयांना मिळाले,अशी त्यांची भावना झाली, पैगंबरांना हा गैरसमज कळाल्यावर,त्यांनी त्यांची समजूत काढली. ते म्हणाले,'त्यांना थोडशे जनावरांचे कळप मिळाले,तुम्हाला तर ईश्वराचा प्रेषित स्वतः पैगंबर लाभला आहे. त्याचे समाधान तुम्हाला नसाव? मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. माझे मदिनातील मित्र जगाच्या विरूद्ध दिशेला चालू लागले,तरी मी त्यांच्या मागोमाग चालेन,अल्लाह तुमचे अखंड रक्षण करो.' अरबस्थानात मक्केवर जो राज्य स्थापन करत असे,तो संपूर्ण अरबस्थानाचा राजा मानला जात असे. पैगंबरांनी मक्केवर निशाण लावल्याने ते अरबस्थानचे राजे झाले होते. अरबस्थानातील भटक्या टोळया आणि लांबलांबच्या प्रांतांनी आपले वकील त्यांच्याकडे पाठवले. पैगंबरांची किर्ती दिंगत पसरली. त्यांनी इस्लाम धर्मस्थापनेसोबत मुसलमानी साम्राज्याची स्थापनाही केली. अरबस्थानातील भटक्या टोळयांमध्ये एक राष्ट्रीयत्व निर्माण करून त्या तत्त्वाने त्या सर्वांना बांधून टाकले आणि त्यांचे एक राष्ट्र बनविले. यातूनच सारसन लोकांच्या बलाढय साम्राज्याचा पाया घातला. हे धर्मसंस्थापक म्हणून जगातील एकमेव उराहरण आहे. मदिनाच्या मशिदीतील आवरातच पैगंबर परदेशी वकीलांना भेटत. सत्ता-संपत्ती,वैभव पायाशी लोळण घेत असतांना पैगंबरांची साधी राहणी कधी बदलली नाही. मशिदीच्या पूर्वेस बांधलेल्या लहानश्या झोपडया म्हणजे त्यांचा राणीवसा होता. अत्यंत साधे राहणीमान,डोक्याला गुंडाळलेले पागोटे,फाटक्यातुटक्या कपडयांना ठिगळ लावलेला असा त्यांचा वेश असला,तरी तो निटनेटका असायचा. राज्यकर्त्ये झाले म्हणून त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या राहणीमानात कोणताच बदल झाला नाही. भटक्या टोळयांनी पैगंबर आणि त्यांचा इस्लाम बहुतेक प्रमाणात कबुल केला होता. मक्का सर करून नऊ वर्षे झाली होती. यावर्षी ह.पैगंबरांच्या भेटीला इतके वकील व इतकी शिष्टमंडळी आली की,त्या वर्षाला इस्लामच्या इतिहासात 'शिष्टांचे वर्ष' म्हणून संबोधले जाते. ताएफमधील उर्वा नावाचा पुढारी इस्लामची तत्त्वे समजावून घेण्यासाठी मदिनात आला. पैगंबरांच्या व्यक्तीमत्वाने आणि तत्त्वज्ञानाने भारावून जाऊन त्याने सरळ इस्लामचा स्वीकार केला. तो ताएफला परतल्यावर ताएफवासीयांना त्याच्या प्रचंड राग आला,कारण त्यांच्या परंपरागत श्रद्धेला त्याच्या कृत्याने धक्का बसला होता. त्यांनी त्याला दगडांनी ठेचून मारले. शांतता प्रस्थापित होण्यासाठी पैगंबरांसोबत तह करण्यासाठी ताएफचे सहा पुढारी मदिनाला आले. त्यावेळी पैगंबर रोमचा बादशहा आक्रमण करण्यासाठी येत आहे,ही वार्ता ऐकून सीरिया देशाच्या तबूक शहरावर चाल करून गेले होते. शेवटी ही बातमी खोटी ठरली. असहय उष्णता आणि अन्नाचा तुटवडा यामुळे सैन्याचे अतोनात हाल झाले. पैगंबर अखेरीस मदिनात परतले,ही त्यांच्या जीवनातील अखेरची स्वारी ठरली. ताएफवासीयांनी अखेर तह केला. इस्लामचा त्यांनी स्वीकार केला आणि अल-लात देवीच्या मूर्तीचा नाश करण्याचे ठरले. अबुसुफियान व ताएफच्या उर्वाचा पुतण्या या दोन इसमांवर ही जबाबदारी टाकण्यात आली. ताएफच्या शरणागतीने अखंड अरबस्थान पैगंबरांच्या अधिपत्याखाली आला. याच वर्षी ह. अबूबक्र तीन हजार यात्रेकरू घेऊन मक्केला हजला गेले. पैगंबरांचा एक जाहिरनामा त्यांना तेथे घोषित करून मक्केत थोडयाफार प्रमाणात शिल्लक राहिलेली मूर्तीपूजा बंद केली. मक्केच्या विजयाचे दहावे वर्ष उजाडले. पैगंबरांनी हजयात्रा करण्याचा निर्णय घेतला. मक्केत त्यांनी इस्लामधर्मीयांनी यात्रा कशी करावी याचे नियम व विधी ठरवून दिले. आजही त्याचनुसार हज यात्रा केली जाते. पैगंबरांची ही अखेरचीच यात्रा होती. अल-कस्वावरच ते स्वार झालेले होते. यात्रेच्या दुस-या दिवशी मिना येथे जाऊन 'सैतानाला दगड मारण्या' चा विधी पूर्ण केला. ह.इब्राहीम एकदा मिना खो-यातून जात असतांना,त्यांची एका सैतानाशी गाठ पडली. त्याला पाहताच ह.इब्राहीम यांनी धोंडे मारून त्याला पिटाळून लावले.तेंव्हापासून सर्व यात्रेकरू येथे आल्यावर पर्वतासमोरील धोंडे फेकून मारतात. यात्रेचा शेवटचा विधी मिना येथे एक बळी देऊन करावा लागतो. तीन दिवस चाललणारी ही यात्रा श्रद्धा आणि पूर्वापार चालत आलेल्या चमत्कारिक चालीरीतीचे मिश्रण आहे. पैगंबरांच्या जीवनातील महत्कार्य सिद्धीस गेले,त्यांनी यात्रेदरम्यान मक्का आणि सभोवतालचा परिसर डोळयांमध्ये साठवला. ही आपली अखेरची यात्रा आहे,याची जाणीव या महापुरूषाला झाली होती. मक्केतील यात्रेकरूना त्यांनी अखेरचा उपदेश दिला. परमेश्वराचा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे काम मी केले आहे,त्यानुसार वागा,असे सांगून त्यांनी मक्केचा निरोप घेतला आणि तीन दिवस मुक्काम करून ते मदिना शहरी निघून गेले. मदिनात आल्यानंतर काही दिवसातच त्यांना तापाने पछाडले. तरी त्यांनी आपला नित्यक्रम चालू ठेवला. अखेर त्यांची प्रकृती क्षीण होत गेली आणि त्यांना नित्यक्रम सोडून द्यावा लागला. ह.अबूबक्र यांना आपला गुरू लौकिक जगाचा आता निरोप घेणार याची खात्री झाली होती. बिबी आएशा पैगंबरांची शुश्रुषा उत्तम प्रकारे करत होती. एके दिवशी त्यांनी बिबी आएशाला त्यांचे सर्व पैसे गरीब लोकांना वाटायला सांगितले.'स्वर्गात ईश्वराची व माझी भेट होईल,त्या वेळी माझ्या संग्रही माझे संचित आहे,हे मला शोभणार नाही.'असे उद्गार त्यांनी काढले. लांबून-लांबून त्यांना भेटायला लोकांचे लोंढे येत होते. एक दिवशी पैगंबर शांत,गंभीर,तेजस्वी आणि प्रसन्न मुद्रेने मशिदीत आले. लोकांसमवेत नमाज पढून,त्यांनी सर्वांची प्रेमाने चौकशी केली. त्यांच्या प्रकृतीला उतार पडला अशी सर्वांची धारणा झाली. विश्रांतीसाठी बिबी आएशाच्या हाताचा आधार घेऊन ते घरात गेले. त्यांची प्राणज्योत मालवत असल्याची जाणीव तिला झाली. दोन तासांनी अत्यंत शांतपणे या महापुरूषानं आपली इहयात्रा संपवली. हा दिवस होता ८ जून ६३२. एका दंतकथेनुसार देवदूत जिब्रईल व मृत्यूचा संदेष्टा इजराईल त्यांना भेटण्यासाठी आले होते. इजराईल बाहेरच उभा राहिला,पैगंबरांनी त्याला घरात बोलवले. इजराईलने त्यांना त्यांच्या आत्म्याला स्वर्गात नेण्याची परवानगी मागितली. 'जशी तुला आज्ञा असेल तसे कर.' असे पैगंबर म्हणाले. जिब्रईलने त्यांना आशीर्वाद दिला. 'शांती,शांती,शांती,हे ईश्वराचा पैगंबर.' नंतर हजरत पैगंबरांनी आपला देह त्याग केला. अत्यंत साधी राहणी आणि उच्च तत्त्वज्ञान यांनी अरबस्थानाच्या अंधःकाराला उजळवणा-या चंद्राचा अस्त झाला. 'सब ठाठ पडा रह जावेगा,जब लाद चलेगा बंजारा' या नजीब अकबराबादी यांच्या काव्यपंक्तीत व्यक्त झालेला संदेश  सदैव मनात व कृतीत जपलेल्या पैगंबरांची जीवनयात्रा स्वर्गात जाऊन कायमची स्थिरावली.
प्रा.डॉ.राहुल हांडे,                                                  भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                         (लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !