"जिन्हें जुर्म-ए - इश्क पे नाज था'" या पंकज सुबीर यांच्या हिंदी कादंबरीचं परीक्षण
जिन्हें जुर्म- ए - इश्क पे नाज था…
मानवी इतिहासाच्या व संस्कृतीच्या सुमारे पाच हजार वर्षांवर धर्म या संकल्पनेने अधिराज्य गाजवले आहे. धर्माचे हे गारूड कमी होण्याऐवजी अधिकाधिक प्रभावी होतांना आपण अनुभवत आहोत. मानव निर्मित या संकल्पनने त्याच्या सुमारे तीनशे पिढयांचे रक्त प्राशन करत,आपले स्थान अढळ केलेले दिसते. एक सभ्य व सुसंस्कृत समाज म्हणून मानव प्राण्याला आकार देण्यासाठी जन्माला आलेल्या धर्मामुळे मानवाच्या तीनशे पिढया सभ्य देखील झाल्या आणि हिंस्त्र पशुपातळीवर ही गेल्या. जगाच्या इतिहासात इतर कोणत्याही कारणांमुळे झालेला रक्तपात व हत्या धर्माच्या तुलनेत नगण्यच आहे. मानवी समाजाची प्रगती, समग्र ज्ञान, बुद्धिमत्ता,मूल्य,विचार,कल्पनाशीलता इत्यादी सर्व गोष्टी केवळ एकाच बिंदूवर येऊन स्थिरावतात तो म्हणजे धर्म. एकविसाव्या शतकात मंगळावर वसाहती स्थापन करण्याचे स्वप्नासाठी प्रयत्नशील मानवी समाज पाच हजार वर्षांपासून धर्माच्या बिंदूवरच गोठलेला जाणवतो. धर्माच्या गोठण बिंदूवर आलेले हताश मानवी जीवन आणि त्याचे ज्ञान काही धर्मग्रंथाचे मोहताज होते. यामुळेच शहिद भगत सिंह यांनी 'मानव जातीचे सर्वाधिक नुकसान धर्मामुळे झाले आहे.' असे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. आज आपल्या देशात सर्वत्र धर्म व सांप्रदायिकता,भारत-पाकिस्तान फाळणी व गांधी,राममंदिर,धर्मकेंद्रित नागरिकता संशोधन इत्यादी विषयांवर हलकल्लोळ माजला आहे. आपला समाज आधुनिकतेकडून मध्ययुगिन मानसिकतेकडे 'उलट चालिला प्रवाहो' या उक्तीनुसार मार्गक्रमण करत असतांना हिंदी साहित्यात पंकज सुबीर यांची धर्म व सांप्रदायिकता यांनी निर्माण झालेल्या वाद-विवादांची आणि त्यातून जन्माला आलेल्या प्रश्नांची उकल करू पाहणारी 'जिन्हें जुर्म-ए - इश्क पे नाज था' ही अत्यंत लक्षवेधक कादंबरी प्रकाशित झाली आहे. इतिहास व वर्तमान अशा दोन्ही काळांच्या अवकाशात या प्रश्नांचे मुळं शोधण्याचा प्रयत्न पंकज सुबीर कादंबरीत करतात. समकालिन हिंदी साहित्यातील चर्चित व प्रसिद्ध लेखक पंकज सुबीर यांची ही तीसरी कादंबरी. 'ये वो सहर तो नही' आणि 'अकाल मे उत्सव' या अनेक पुरस्कारांनी सन्मानित त्यांच्या आधीच्या दोन कादंब-या वाचकप्रिय ठरल्या आहेत. कथा,गजल,प्रवास वर्णन,संपादन या साहित्याच्या प्रमुख प्रकारांमध्ये या प्रतिभावंत साहित्यिकाने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. पकंज सुबीर आपल्या वैशिष्टपूर्ण लेखन व भाषा शैली यांच्यामुळे हिंदी साहित्यात ओळखले जातात. ' जिन्हें जुर्म-ए - इश्क पे नाज था' ही कादंबरी देखली या प्रयोगशील साहित्यिकाचा एक नवा प्रयोगच म्हणावा लागेल. मानवी समाज व संस्कृतीच्या पाच हजार वर्षांचा इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी येथे केला आहे. मानवाने धर्माच्या नावाखाली केवळ युद्ध व रक्तपात यामध्ये पाच हजार वर्षांचा केलेला अपव्ययाची कारणमीमांसा अत्यंत सूक्ष्मपणे त्यांनी कादंबरीत केली आहे. कादंबरीचे कथानक वाचकाला एका वेगळयाच विश्वात घेऊन जाते,जेथे त्याला इतिहास व वर्तमानाच्या संदर्भात वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो. डॅऩ ब्राऊन यांनी 'दा विंची कोड' मध्ये बायबलचे सिद्धांत आणि सलमान रश्दी यांनी द सैटेनिक वर्सेज मध्ये कुराणातील तथ्यांच्या अभावावर प्रकाशझोत टाकला आहे. परंतु पकंज सुबीर यांनी आपल्या कादंबरीत सगळे धर्म ज्या मूलभूत तत्त्वांवर उभे आहेत,त्यांचा शोध घेतला आहे. खरोखर आदर्श व चिरंतन असलेल्या या मूलभूत तत्त्वांना सगळयाच धर्मानी तिलांजली दिल्याने या सर्व धर्मांचे स्वरूप कसे विकृत होत गेले. याचा प्रत्यय ही कादंबरी देते. एका रात्रीच्या अवकाशात पाच हजार वर्षांचा इतिहास व वर्तमान परिस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे. प्रोफेसर रामेश्वर आणि त्यांचा मानस पुत्र शाहनवाज यांचा संवाद आणि दंगल यांच्या पार्श्वभूमीवर पाच हजार वर्षांचा इतिहास व वर्तमान चित्रित करणारे कथानक म्हणजे ही कादंबरी. कमलेश्वर यांच्या 'कितने पाकिस्तान' या कादंबरीच्या धाटणीची ही कादंबरी म्हणावी लागेल. 'कितने पाकिस्तान' मध्ये इतिहासाला सत्यासाठी,सत्तेसाठी,स्वार्थासाठी वाकवणा-या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना ज्याप्रमाणे न्यायालयात बोलवले जाते आणि त्यांच्या कृतीमागील तथ्यांचा व कारणांचा शोध घेतला जातो. तसाच या कादंबरीत शाहनवाज व त्याच्या गर्भवती पत्नी हिना यांना दंगलखोरांपासून वाचविण्यासाठी रामेश्वर प्रशाशकीय अधिकारी किंवा पोलिस यांना दुरध्वनी करतो तेंव्हा,त्याचा कॉल नेहमी चूकीचा लागतो. कधी गांधींना,कधी नथूरामला,तर कधी जिन्नांना. दरवेळेस लागलेल्या चूकीच्या नंबरने या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांशी सविस्तर चर्चा होते. ज्यामध्ये भारत-पाक फाळणीपासून हिंदू-मुस्लिम संबंधांपर्यंत चर्चा जाते. संपूर्ण कादंबरी संवादात्मक शैलीत आहे. हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,जैन,पारसी इत्यादी धर्म व त्यांचे धर्मग्रंथ यांच्यातील अंतःस्त्रोत शोधण्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण व अधिकारपूर्ण प्रयत्न लेखकाने केला आहे. धर्मांच्या इतिहासात रस असणा-या वाचकांना व अभ्यासकांना कादंबरीतील माहितीचा विश्वसनीय संदर्भ म्हणून वापर करता येऊ शकतो. अनेक मैलांवरून शाहनवाज आणि प्रसव वेदनांनी तळमळणारी हिना यांना वाचविण्यासाठी रामेश्वरची चाललेली धडपड, यातून मानवता व प्रेम यांच्यामध्ये धर्म येत नाही याचा संदेश मिळतो. पंकज सुबीर यांनी ज्यासाठी सर्व धर्म समान आहेत अशा एखाद्या सुफी मलंगाप्रमाणे अत्यंत निष्पक्ष व तटस्थ भावाने लेखन केले आहे. 'न काहू से दोस्ती,न काहू से बैर.' प्रत्येक धर्माचा मूल मंत्र प्रेम,बंधूता,विश्वास,समानता आणि मानवताच आहे,याचा आग्रह त्यांचा लेखनातून दिसतो. प्रत्येक काळातील प्रत्येक धर्माचे धर्ममार्तंड व राजकारणी यांच्यामुळे आपल्या मुळ उद्देशापासून भटकलेल्या प्रत्येक धर्माला त्याच्या विशुद्ध आरंभ बिंदूकडे नेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न,वर्तमानासाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणारा आहे. भारतासारख धर्मनिरपेक्ष देशात एक समुदाय नागरिकता कायद्याच्या गॅसचेंबरमध्ये गुदमरत असतांनाच्या काळात ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. हे तिचे लक्षवेधक वैशिष्टय म्हणता येईल. लेखकाने स्पष्ट केले नसले तरी कम्युनिस्ट असल्याचा भास होईल अशा रामेश्वरची शाहनवाज व हिना यांचे प्राण वाचविण्यासाठी होत असलेली तळमळ मानव व मानवता यांच्याविषयीची संवेदनशीलता व्यक्त करते. सभ्य म्हणवणारा मानवी समाज व त्याची संस्कृती यांची समीक्षाच पंकज सुबीर करतांना दिसतात. योग्य मार्गदर्शनाचा अभाव,धर्मग्रंथातील तत्त्वाज्ञान,व्याख्या यांची सोयीनुसार मोडतोड करणारे धार्मिक व राजकीय पुढारी यामुळे आजची युवा पिढी संभ्रमात व भरकटलेल्या अवस्थेत आहे. धर्माची नेमकी परिभाषा व तिचा अर्थ तिला समजेनासा झाला आहे. त्यात सोशल मिडियाचा भस्मासुर विकृत ज्ञानाचा प्रसार करत असतांना, 'जिन्हें जुर्म-ए - इश्क पे नाज था' ताज्या हवेची झुळूक ठरते,जी मन-बुद्धी यांच्यावर साचलेल्या जाळीजळमटांना साफ करू शकेल. म्हणूनच पंकज सुबीर यांचे "तुम लोग कमजोर और डरे हुए लोग हो, इसलिए ही तुम लोगों को विचारो से डर लगता है। तुम मोम के बने हुए पुतले हो, जो विचारो की आग का सामना कर ही नहीं सकते, किसी भी तरह नहीं कर सकते। मोम के सारे पुतले चाहते हैं कि सारे सूरज नष्ट कर दिए जाएँ समाप्त कर दी जाए सारी ऊष्मा, सारी गर्मी, ताकि मोम के पुतलों का साम्राज्य स्थापति हो सके।" हे विधान वर्तमानावरचे परखड भाष्य ठरते.
राहुल हांडे,
लेखक संपर्क – ८३०८१५५०८६
‘
Comments
Post a Comment