जग दोघांचे असेल हे! (जागतिक महिला दिनानिमित्त लिहिलेला दैनिक सार्वमत मधील विशेष लेख)

                    
               जग दोघांचे असेल हे !
आजपासून शंभर वर्षापूर्वी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये एका वेगळयाच परिषदेचे आयोजन करण्यात आले. ते वर्ष होते १९१० आणि परिषद होती 'आंतरराष्ट्रीय महिला परिषद'. त्याकाळातील चूल व मूल हे विश्व भेदून स्वतःचे नवे क्षितीज शोधणा-या जगभरातील शंभर महिला या परिषदेमध्ये सहभागी झाल्या. अशी परिषद आयोजित करण्याची कल्पना देखील एका महिलेचीच होती,ती म्हणजे क्लारा जेटकिन. मार्क्सवादी विचारवंत आणि कार्यकर्ती असणा-या क्लारा यांनी महिलांच्या अधिकारांसाठी आजीवन संघर्ष केला. त्यांनी या परिषदेत 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस' साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि परिषदेत सहभागी सर्व महिलांनी त्याला एकमुखी पाठिंबा दिला. यानंतर १९११ ला ऑस्ट्रिया,डेन्मार्क, जर्मनी व स्वित्झरलँड या युरोपियन देशांमध्ये सर्वप्रथम 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस' साजरा करण्यात आला. ८ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस' म्हणून साजरा करण्यामागे एक रंजक आणि महिलांच्या सामर्थ्याचा परिचय देणारी घटना दडलेली आहे. १९१७ च्या रशियाच्या बोल्शेवीक क्रांतीपर्वात रशियन महिलांनी 'भाकरी आणि शांती' याची मागणी करत रशियन झार निकोलस याच्याविरुद्ध संप पुकारला. तो ऐतिहासिक दिवस होता ८ मार्च १९१७. हा रशियन राज्यक्रांतीच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा व निर्णायक दिवस होता. देशातील सर्वच महिला विरोधात गेल्याने रशियातील जुल्मी झारशाहीच्या पायाखालची वाळू सरकली. झार निकोलस याने पदत्याग करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही. त्यापूर्वी सुमारे शंभर वर्षांपासून रशियातील पुरुष मंडळी झारशाही उलथून टाकण्याचा प्रयत्न करत होती. देशातील महिलांनी जेंव्हा असहकार पुकारला तेंव्हाच या क्रांतीला ख-या अर्थाने यश आले. स्त्रीला शक्ती का मानण्यात येते,यामागची संकल्पनाच येथे ख-या अर्थाने स्पष्ट होते. रशियन राज्यक्रांतीमध्ये ज्याला क्रांतीचा लेखक संबोधन्यात आले आहे.त्या मॅक्सिम गॉक्री 'आई' ही कादंबरीच जागतिक साहित्यात एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून ओळखण्यात येते. अशा प्रकारे स्त्री सामर्थ्याची प्रचिती देणारा हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस' म्हणून ओळखला जाऊ लागला. १९७५ ला संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) त्याला मान्यता दिली. एवढेच नव्हे तर दरवर्षी एक मध्यवर्ती कल्पना (थीम) घेऊन हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. देश,धर्म,पंथ अशा सर्व तटबंदयांच्या पलिकडे जाऊन जगातील महिला त्यांच्या या सन्मान सोहळयाचे स्वागत करत असतात. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची पहिली थीम होती 'सेलीब्रेटिंग द पास्ट,प्लानिंग फॉरद फ्य़ुचर.' 'अर्थ फॉर इक्वल' (एक समान जग किंवा समानतेसाठी वसुंधरा) ही थीम २०२० साठी युनोने जाहीर केली आहे. लिंगभेदविरहित एक समान जग हे सक्षम जग आहे. वैयक्तकिरत्यिा, आम्ही सर्व आपल्या स्वतःच्या विचारांसाठी आणि कृतींसाठी जबाबदार आहोत. आम्ही प्रखर रूढींना आव्हान देणे, पक्षपाती लढा देणे, समज वाढवणे, परस्थिती सुधारणे आणि महिलांचे कर्तृत्व साजरे करणे सक्रियपणे निवडू शकतो. एकत्रतिपणे,आपल्यातील प्रत्येकजण लिंग समान विश्व तयार करण्यात मदत करू शकतो. असा निर्धार महिलांनी या थीममधून व्यक्त केला आहे. प्रसार माध्यमं व समाज माध्यमांनी या थीमचे नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात स्वागत केलेले आपण पाहतच आहोत. ही थीम लिंग भेदावर आधारित सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी महिलांना निश्चितचपणे प्रोत्साहित करणारी ठरतेय. युनोने अशी थीम स्वीकारण्यामागे एक महत्वाचे कारण असे आहे,की वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचा २०१७ च्या अहवालात जगातील स्त्री-पुरुष लिंगभेदाधारित असमानता समुळ नष्ट होण्यासाठी अजून किमान शंभर वर्षांची वाटचाल करावी लागेल,असे प्रतिपादन केले आहे, यामुळेच या असंतुलनाचा व विषमतेचा विनाश करण्यासाठी चांगल्यासाठी संतुलन या ध्येयाने झपाटून काम करण्याची नितांत गरज आहे. जागतिक पार्श्वभूमीवर आपण भारतीय महिला त्यांची परिस्थिती आणि समस्या यांचा विचार करतो,तेंव्हा आपल्याला आपल्या इतिहासाचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. जगातील पहिला महिला दिवस अमेरिकेतील सोशालिस्ट पार्टीच्या आव्हानावरुन २९ फेब्रुवारी १९०९ ला सर्वप्रथम साजरा करण्यात आला,असा दावाही केला जातो. महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी अमेरिकेसह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क नव्हता. दुस-या बाजूला भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा असमानतेचा अंश देखील ठेवला नाही. भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना झाल्या क्षणापासून हा हक्क महिलांना बहाल करण्यात आला. यामध्ये कोणतीही उपकृत भावना नव्हती,तर समानतेसाठी जीवन वेचणा-या महापुरुषाची ती सहज कृती होती. आधुनिक भारताचेच नव्हे,तर पुरोगामी भारताचे दुसरे शिल्पकार भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी देखील आपल्या पहिल्या मंत्रीमंडळापासूनच महिलांना प्रतिनिधीत्व देण्यास प्रारंभ केला. आज आपण राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यापर्यंत मजल मारली आहे. असे असतांना आजही आपल्या देशात स्त्री-पुरुष असमानतेवर,महिलांवरील अत्याचारांवर,त्यांच्या समस्यांवर,स्त्री भ्रुण हत्यांवर चिंतन करण्यासाठी चर्चासत्र वा परिषदांचे आयोजन करावे लागते,ही खरी चिंतनाची बाब आहे. याचा अर्थ आपण केवळ वरकरणी बदललोय,आपल्यातील प्राचीन पुरुषी अहंकार व संस्कार बदलले नाहीत. जगाच्या तोंडावर फेकण्यासाठी आपण काही दाखले सातत्याने देत असतो. आमच्याकडे  स्त्रीला देवी मानतात,आमच्याकडे गार्गी,लोपामुद्रासारख्या विदुषी होत्या, जिजाऊ,अहिल्यादेवी,इंदिरा गांधी अशा कर्तबगार स्त्रीया आमच्या देशात झाल्या इत्यादी इत्यादी. असे असतांना स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात असंतुलन कसे,ग्रामीण भागाच्या तूलनेत शहरी भागात मुलींची संख्या कमी कशी,निर्भयासारखे अत्याचार महिलांवर कसे, विविध पदांवर निवडूण येणा-या महिलांचे पतीच त्यांचा कारभार चालवतात कसे,सांगायचे झाल्यास ही यादी संपणार नाही. यासर्व प्रश्नांना समुळ नष्ट करण्यासाठी आता महिलांनाच बदलावे लागेल. नोकरी मिळण्यासाठी शिक्षण वा पतीची सोय म्हणून राजकारण असे करुन चालणार नाही. पुरुषी वर्चस्व व कालबाहय कर्मकांड यांचे संस्कार देणा-या टिव्ही मालिकांमधून बाजूला होत,सावित्रीमाईने दिलेल्या शिक्षणाचा नेमका अर्थ समजावून घ्यावा लागेल. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत प्रतिनिधीत्व करणा-या किती महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ  स्वच्छतागृहांची निर्मिती केली आणि घराबाहेर वावरतांना होणा-या या कुचंबनेतून महिलांना दिलासा दिला. या एका समस्येपासून जरी महिलांनी विचार करायला आणि प्रश्न विचारायला सुरवात केली,तरी महिलांना समान वागणूक मिळण्याची प्रतीक्षा अधिक करावी लागणार नाही. असमान वागणूक मिळते यासाठी शिक्षण नाही,ही सबब आता अधिक काळ चालू शकणार नाही. शिक्षणाच्या संधी महिलांना मोठया प्रमाणात प्राप्त आहेत,गरज आहे ती हे शिक्षण डोळसपण आत्मसात करत,आत्मभान जागृत करण्याची, दुस-या बाजूला घटनेने व कायद्याने सर्व काही दिलेले आहे,त्यांचा वापर करण्याची समज,सजगता,क्षमता आणि सामर्थ्य केवळ दाखविणे गरजेचे आहे. पुरुषांच्या बदलण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही, महिला बदलल्या,की हे आपोआप घडणार आहे. यामुळे हे जग केवळ एकाचे न राहता खरोखर दोघांचे असेल. 
                                        राहुल हांडे,
                              भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !