आम्ही जातो आमुच्या गावा..
"आता सर्व काही संपले आहे. मला आजवरच्या आयुष्यात असा एकही माणूस मिळाला नाही. ज्याला स्वतःच्या चूकांची जाणीव झाली आहे आणि जो त्यांना सुधारण्याची ईच्छा ठेवतो." जीवनविषयी सर्वाथाने हताश कन्फ्यूशियस आपला शिष्य जिलू याला सांगत होता. इसवी सन पूर्व ४८१ मध्ये जिलू वेईच्या राजाचा एक विनंतीपूर्ण संदेश घेऊन आपल्या आचार्यांकडे आला होता. वेईच्या राजाला त्याचे सामंत त्रास देत होते आणि त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला होता. अशावेळी त्याला कन्फ्यूशियससारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता होती. जिलू वेईच्या राजाचा सल्लागार होता. त्यामुळे तो राजाचा संदेश घेऊन कन्फ्यूशियसकडे आला होता. आचार्यांनी दिलेला नकार पाहून जिलूने जिगोंगला आपल्यासोबत येण्याची विनंती केली. त्यानी देखील हा प्रस्ताव अमान्य केला. अखेर जिलू एकटाचा वेईला परतला. त्याने सगळयांचा निरोप घेतला. तो त्याचा अखेरचा निरोप ठरला. तो आता कधीच परतणार नव्हता आणि क्रूर नियती कन्फ्यूशियसची साथ सोडणार नव्हती. कन्फ्यूशियस आपल्या या प्रिय शिष्याला कायम सोबत ठेवू ईच्छित होता. मात्र नियतीला जिलू कन्फ्यूशियसच्याच काय पण कोणाच्याही सोबत ठेवणार नव्हती. जिलू गेला आणि काही महिन्यानंतर म्हणजे इसवी सन पूर्व ४८० मध्ये त्याची वेईमध्ये हत्या करण्यात झाली. शांती प्रस्थापित करण्यास गेलेल्या जिलूला आपल्या प्राणाचे मोल चूकवावे लागले. कन्फ्यूशियसला असे वाटू लागले की,"परमेश्वर आपल्या प्रत्येक प्रिय शिष्याला आपल्यापासून हिरावून घेत आहे." तसे वाटणे स्वाभाविक होते. कारण त्याच्या आयुष्याचे लौकिक संचित म्हणून आता त्याच्याकडे त्याचे शिष्य सोडून काहीच नव्हते. थोडी-थिडकी नव्हे तर आयुष्याची ४० वर्षे जिलू सावलीसारखा कन्फ्यूशियससोबत राहिला होता. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात जिलू होता. हे सर्व दुःख विसरण्यासाठी कन्फ्यूशियसने आपले लक्ष पुन्हा अध्यापनाकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अध्यापनातही रस राहिला नव्हता. आपल्या जीवनाच्या सूर्यास्ताची जाणीव त्याला झाली होती. कन्फ्यूशियसच्या आयुष्याचा उरलेला दिड वर्षाचा काळ म्हणजे अज्ञाताच्या प्रवासाला निघण्यापूर्वीची अस्वस्थतेचा काळ ठरला. त्याला स्वतःच्या भविष्याविषयी आश्वस्त करणारी एकच गोष्ट त्याच्याकडे होती ती म्हणजे त्याचा नातू. त्याचा मुलगा त्याच्या कसोटीवर उतरला नसला तरी आपल्या नातवामध्ये आपला दिव्य वारसा चालवण्याची असलेली अफाट क्षमता त्याला जाणवली होती. यासाठी त्याने आपल्या मुलाच्या प्रपंचाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. त्याचा नातू देखील आपल्या आजोबाची मनोभावे सेवा करत होता. आयुष्याच्या संध्यापर्वात का होईना कन्फ्यूशियसला जाणवलेली ती मंद वा-याची झुळूक होती. इसवी सन पूर्व ४७९ सालचा हिवाळा प्रारंभ होण्याच्यापूर्वीच कन्फ्यूशियसची प्रकृती ढासळू लागली. त्याचा आधार जिंगोग त्याच्या व्यापाराच्या निमित्त्याने बाहेरगावी गेलेला होता. कुफूच्या विद्यालयातील कन्फ्यूशियसच्या शिष्यांना आपल्या आचार्यांच्या अंत समीप आल्याची जाणीव होऊ लागली होती. त्याचबरोबर कन्फ्यूशियसचे सर्व शिष्य विद्यालयात जमा होऊ लागले. अंतकाळात कन्फ्यूशियसने उद्धृत केलेल्या वचनांसंदर्भात त्याचा शिष्य जेंगजी याने लिहिले आहे की," जेंव्हा एखादया पाखराचा अंत समीप येतो तेंव्हा त्याच्या किलबिलाटात एक वेदना विरघळलेली असते. तसेच एखाद्या माणसाचा अंत समीप येतो तेंव्हा त्याची वाणी अद्भूत होते." कन्फ्यूशियसच्या अखेरच्या संदेशात आपल्याला याचा प्रत्यय येतो. "तुमची आस्था अतूट राहिली पाहिजे आणि ज्ञानाप्राप्तीबद्दल तुमचे सखोल प्रेम कायम असायला हवे. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही सद् मार्गावरच चालले पाहिजे." कन्फ्यूशियसचे शेवटेच शब्द हे केवळ त्याच्या शिष्यांसाठी नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी होते. आता जिगोंग ही विद्यालयात परतला होता. कन्फ्यूशियसने त्याला पाहिले आणि त्याच्या भावनांचा बांध फुटला. कन्फ्यूशियस त्याला म्हणाला की,"तू यायला खूप उशीर केला. माझे अनुकरण कसे केले पाहिजे हे आजवर कोणीच समजू शकले नाही." आपल्या आचार्यांच्या मनातील ही अंतीम खंत ऐकून जिगोंगच्या डोळयांमधून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्याच्यात कन्फ्यूशियसच्या अश्रूं देखील मिसळले होते. "आचार्य मी आपले अनुकरण करेल. एवढेच नाही तर आम्ही सर्वजण तुमचे अनुकरण करू." जिगोंगचे हे शब्द कानावर पडत असतानांच कन्फ्यूशियसचे डोळे मिटत होते. त्यानंतर त्याचे डोळे कधीच उघडले नाही. सातव्या दिवशी इसवी सन पूर्व ४७९ साली वयाच्या ७३ व्या वर्षी हया महान तत्त्ववेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यावेळी पाठीमागे ठेवून जाण्यासाठी आपल्या चिरंतन तत्त्वज्ञानाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हते. त्याच्या शिष्यांनी 'सी' नदीच्या काठावर आपल्या आचार्यांना अखेरचा विसावा दिला. जिगोंगने आपल्या गुरुच्या ईच्छेप्रमाणे अत्यंत साधेपणाने आणि शालीनपणे त्याचा अंत्यविधी केला. खरं तर माजी मंत्री म्हणून शासकीय ईतमामाप्रमाणे राजधानीच्या मुख्य रस्त्यांवरून त्याची अंतयात्रा निघणे अपेक्षित होते. राज्यकर्त्यांनी मात्र हयापासून सावध अंतर ठेवले होते. कन्फ्यूशियसच्या मृत्युची त्यांनी काहीच खबर घेतली नाही. कन्फ्यूशियसच्या 'कोंग' परिवारातील देखील कोणीच त्याच्या अंत्यविधीत सहभागी झाले नाहीत. कन्फ्यूशियस हा एक विचित्र गुरु होता. त्याच्या विचारांमुळे व वर्तनामुळे व्यवहारी शहाण्यांना लाज वाटेल अशी परिस्थिती उत्पन्न होते. अशी राजकर्त्यांप्रमाणे त्यांची देखील धारणा होती. हेच लोक मात्र काही वर्षांनी आपण कन्फ्यूशियसचे वशंज आहोत असे भुषणाने सांगत मिरवू लागले होते. सत्य सांगणा-या आणि अन्यायाविरूद्ध लढणा-या कोणत्याही माणसाच्या पदरात जगाकडूनच हेच पडत आलेले आहे आणि पडणार आहे. कन्फ्यूशियसचा शिष्य जिगोंगने मात्र आपले आयुष्य आपल्या गुरुचे महत्व जगाला पटवून देण्याचा निर्धार केला होता. त्याने 'सी' नदीच्या काठी आपल्या गुरुच्या समाधीजवळ एक पर्णकुटी बांधली आणि तेथेच राहून तीन वर्ष दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. एक यशस्वी व्यापारी असलेल्या जिगोंगने आपल्या तत्त्वज्ञानाला किंमत मिळवून देण्यासाठी गुरुचे नियोजनबद्ध मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला. कन्फ्यूशियसचा प्रथम स्मृती दिन आला तरी राज्यकर्त्यांनी त्याच्यावरचा बहिष्कार संपवलेला नव्हता. जिगोंगने प्रथम स्मृती दिनाचा इव्हेंट बनवला. त्याने कन्फ्यूशियसच्या समाधी स्थळावर एक भव्य समारोह आयोजित केला. त्यामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या. आपल्या आचार्यांचा स्मृती दिन त्याने एखाद्या राजासारखा साजरा केला. त्याने व्यापारात कमावलेला सर्व पैसा यासाठी खर्च केला. तसेच त्याने आपल्या संपत्तीचा वापर कन्फ्यूशियसचा प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आजही वापरली जाणारी आणि भविष्यात ही उपयुक्त असणारी एक युक्ती समारोहात वापरली. जिगोंगने तेथे सामान्य लोकांसाठी भंडा-याचे आयोजन केले. बाहेरून येणा-या लोकांच्या मुक्कामासाठी आपल्या पर्णकुटीच्या बाजूला अनेक पर्णकुटींचे निर्माण केले. लोक हया नव्या वस्तीला 'कन्फ्यूशियस नगर' असे संबोधू लागले. आता कन्फ्यूशियस सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नव्हता. मोफत भोजनाने तृप्त सामान्य जन तात्काळ कन्फ्यूशियसचे गुणगाण करू लागले. राजाला आणि त्याच्या मंत्रीमडंळाला त्यांनी कन्फ्यूशियसची दखल घेतली नाही. याबद्दल खंत व्यक्त करू लागली. कन्फ्यूशियस मरेपर्यंत विचाराने लोकांना स्वीकारता आला नाही. मोफत भोजनाने मात्र तो लोकांना पूर्ण समजला. अखेर एक वेळ अशी आली की 'लू' चा राजा 'एई याला कन्फ्यूशियसच्या महानतेवर भाषण दयावे लागले. तसेच त्याचे मोठे स्मारक उभारावे लागले. अर्थातच महान तत्वज्ञाचा 'बाबा-बुबा' केल्यावरच हे शक्य झाले. समाधी भोवती कन्फ्यूशियसच्या शिष्यांनी वृक्षारोपण केले. त्यामुळे तेथे 'कन्फ्यूशियस बन' निर्माण झाले. कालांतराने कन्फ्यूशियसच्या वंशजांच्या समाध्या देखील तेथेच बांधण्यात आल्या. आजही जिगोंगची झोपडी कन्फ्यूशियसच्या समाधी जवळ एका शिष्याच्या गुरुप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष देत उभी असलेली आपल्याला तेथे पाहायला मिळते. कन्फ्यूशियसच्या विद्यालयाची जबाबदारी त्याचा शिष्य 'जेंगजी'ने स्वीकारली. कन्फ्यूशियसच्या अनेक शिष्यांनी त्याच्याबद्दलच्या स्मृती आपल्या लेखनातून जतन करण्यास सुरवात केली. कन्फ्यूशियसच्या निधनाच्या दहा वर्षांनंतर त्याचा नातू 'जिसी' याने जेंगजीचे शिष्यत्व पत्कारले. जिसीला कुटुंबातून व नातेवाईकांकडून यासाठी विरोध स्वीकारावा लागला. कारण त्याने संतांचा मार्ग पत्कारू नये असे त्यांना वाटत होते. जेंगजीनंतर जिसीने विद्यालयाचा कारभार हाती घेतला. त्याने आपल्या आजोबांच्या विखुरलेल्या उपदेशांचे व विचारांचे संकलन केले. त्याच्या प्रयत्नांमुळे कन्फ्यूशियसच्या विचारांचा प्रचार-प्रसार मोठया प्रमाणात झाला. त्याकाळातील अनेक समाध्यांमध्ये जिसी संकलित पुस्तकांच्या प्रती सापडल्या आहेत. जिसीच्या प्रयत्नांमुळे चीनमध्ये कन्फ्यूशियसवादाची स्थापना झाली. एवढेच नव्हे तर 'कन्फ्यूशियस धर्म' देखील जन्माला आला. कन्फ्यूशियसचे तत्त्वज्ञान देखील त्याच्या जीवनाप्रमाणेच काळाच्या सागरात कायम खाली-वर हेलकावे खात राहिले आहे. आज २१ व्या शतकात जग पुन्हा कन्फ्यूशियसवादाचा गांभीर्याने विचार करू लागलेले दिसत आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
महान लोकांचे विचार पुढे जाण्याची कारणे नेमकेपणानं सांगितली आहेत..कधी कधी वेगळ्या वाटेने ही विचार पोहचू शकतात हे सत्य या निमित्ताने अधोरेखित केले . लेखनशैलीस सलाम..
ReplyDelete