युगकर्त्याचे अखेरचे पर्व

"मला कोणीही समजू शकले नाही. मला स्वर्गाविषयी म्हणजेच मृत्युविषयी कोणतीच तक्रार  नाही.  आयुष्यात मी अत्यंत प्राथमिक स्तरापासून अध्ययन करुन ज्ञानाच्या शिखराला स्पर्श करत आलो आहे.  त्यामुळे मला कोण समजू शकणार आहे ?  आता मला फक्त  स्वर्गच समजू शकेल."  कन्फ्यूशियस आपला शिष्य जिगोंग याला सांगत होता.  व्यवस्थेकडून नाकारल्या गेल्यामुळे त्याला असले नैराश्य आले होते.  तो नैराश्याचा सामना करत असातांनाच 'लू' राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत होती.  'वेई' चा राजा लिंग याचे निधन होऊन 'चे' नवा राजा झाला होता.  राजा चे याने कन्फ्यूशियसला आपला सल्लागार म्हणून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.  यामुळे कन्फ्यूशियसच्या शिष्यांना आनंद झाला आणि ते उत्साहीत झाले होते.  राजा चे राज्यातील यादवीमुळे त्रस्त होता.  त्याचे सरंजामदार त्याची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते.  अशावेळी 'वेई' आणि 'लू' राज्यांत तणाव निर्माण झाला.  वेई राज्य हे लू राज्यापेक्षा सामर्थ्यशील असल्याने वेई राज्याने लू राज्याचा सीमेतील एका योद्धयाच्या समाधी स्थळावर आपला हक्क सांगितला होता.  लू राज्य हे समाधी स्थळ वेईला देण्यास तयार नव्हते.  त्यामुळे युद्धजन्य परिस्थिीती निर्माण झाली.  अशावेळी कन्फ्यूशियसने जिगोंगला 'लू' मध्ये पाठवले आणि शांती प्रकिया सुरु केली.  दोन्ही राज्यातील प्रतिनिधींमध्ये शांती वार्ता आयोजित करण्यात आली.  त्यामुळे युद्ध टळले.  'लू' चा पंतप्रधान आणि कन्फ्यूशियसचा शिष्य कोंग जी यामुळे अत्यंत प्रभावीत झाला.  आपल्या आचार्यांना परत 'लू' मध्ये आणण्याच्या त्याच्या प्रयत्नांना या घटनेमुळे बळ प्राप्त झाले होते.  पुन्हा एकदा इतर सामंतांनी विरोध केला आणि कन्फ्यूशियसची घरवापसी लांबली.  वेईसोबत युद्ध टळले म्हणून हे लोक आनंदी असले तरी ते कन्फ्यूशियसला परत येण्याची परवानगी देण्यास तयार नव्हते.  खरे तर वेईच्या विशाल व बलाढय सैन्यासमोर त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते.  कन्फ्यूशियसमुळे त्यांचा पराभव टळला होता.  असे असले तरी कन्फ्यूशियसच्या घरी परतण्याची परवानगी देण्याची आणि त्याचे सल्ले ऐकण्याची त्यांची अजिबात ईच्छा नव्हती.  कन्फ्यूशियसच्या अनुपस्थितीत त्याच्या 'कुफू' येथील विद्यालयाचे संचालन त्याचा शिष्य 'सिया' करत होता.  आचार्यांच्या अनुपस्थितीमुळे विद्यालयाची अवस्था बिकट होती.  अध्ययन-अध्यापनात पूर्वीसारखे गांभीर्य राहिले नव्हते.  अखेर इसवी सन पूर्व ४८४ साली कांग जी याने राजा एईकडून 'लू' मध्ये परतण्याची अनुमती मिळवली.  तसेच कन्फ्यूशियसच्या हत्येचा आदेश देखील मागे घेण्यास भाग पाडले.  मात्र कन्फ्यूशियसची घरवापसी सर्शत होती.  सामंतांचा विरोध पत्कारून एई हया गोष्टीला अनुकुल झाला होता.  त्याने कन्फ्यूशियसने परत आल्यावर नव्याने राजकारणात हस्तक्षेप करू नये.  असे बंधन घातले होते.  कोंग जी याने हे मान्य केले आणि तात्काळ एक दूत ही आनंदवार्ता देण्यासाठी वेईला रवाना केला.  दूत जेंव्हा निरोप घेऊन आला तेंव्हा कन्फ्यूशियसचे डोळे वाहू लागले.  आपल्या आयुष्याची अखेरची ६ वर्षे का होईना कन्फ्यूशियस आता आपल्या जन्मभूमीत घालवू शकणार होता.  कन्फ्यूशियसच्या आगमनाने त्याच्या विद्यालयाचा कारभार सुरळीत होऊ लागला.  कन्फ्यूशियसने देखील केवळ अध्यापनाकडे लक्ष केंद्रित केले होते.  त्याला राजकारणापासून अलग ठेवण्यात आले होते.  कोंग जी कधी-कधी त्याचे मार्गदर्शन घेत होता.  लू मध्ये परतल्यानंतर एक वर्षातच त्याचा मुलगा 'कोंग ली' उर्फ 'बो यू' चा मृत्यु झाला.  आपल्या पुत्राबाबत कन्फ्यूशियस कधीच समाधानी नव्हता.  तो नावालाच त्याचा मुलगा होता.  त्याच्याविषयी कन्फ्यूशियसला कधीच काही वाटले नाही.  काही अभ्यासकांच्या मते कन्फ्यूशियसला एक मुलगी देखील होती.  'एनालेक्ट्स' या ग्रंथात केवळ एका प्रसंगात तिचा उल्लेख करण्यात आला आहे.  कन्फ्यूशियसच्या मुलीचे नाव 'कुंग ये चांग' असे होते.  त्याची मुलगी त्याच्या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल जाणून होती.  तसेच तिलाही ज्ञानाजर्नात विशेष रुची होती.  मात्र तिला तिच्या योग्यतेनुसार स्वतःचा विकास करण्याची संधी मिळाली नाही.  आपला मुलगा कोंग ली याच्याकडून त्याच्या पदरात कायमच निराशा पडली.  त्यामुळे आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात आपली मुलगी कुंग ये चांग हिच्याशीच तो संवाद करत असे.  कोंग ली अथवा बो यू चे निधन वयाच्या ४६ वर्षी झाले.  त्याचे फारसे  दुःख कन्फ्यूशियसला झाले नाही.  त्याचा मानस पुत्र 'यान हुई' यालाच त्याने ख-या अर्थाने स्वतःचा वारसदार मानले होते.  यान हुई त्याचा सगळयात प्रतिभावंत आणि प्रिय शिष्य होता.  कन्फ्यूशियसचे कौटुंबिक जीवन अयशस्वीच ठरले होते.  त्यामुळे त्याच्या इतिहासात त्याच्या कुटुंबातील सद्स्यांची अत्यंत नाममात्र नोंद असलेली दिसते.  बो यू च्या निधनानंतर काही दिवसांनी यान हुई दोन दिवस विद्यालयात आला नाही.  कन्फ्यूशियसने त्याची चौकशी करण्यासाठी काही शिष्यांना त्याच्या घरी पाठवले.  त्यावेळी यान हूईला प्रचंड ताप आलेला होता.  हया आजारातच त्याचे निधन झाले.  त्यावेळी कन्फ्यूशियस एवढेच म्हणत होता की,"परमेश्वर माझा प्राण घेत आहे."  पितृछत्र नसेलेला यान हूई अत्यंत गरीब होता.  त्याची आई,भाऊ व बहिण यांच्याकडे त्याच्या अंत्यविधीसाठी देखील पैसा नव्हता.  यान हूईच्या निधनाने कन्फ्यूशियस पुरता खचला होता.  त्याला स्वतःच्या पुत्राच्या निधनाचे काही वाटले नव्हते. मात्र यानचा मृत्युने तो कोलमडून पडला.  त्याचा अंत्यविधी आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे त्याने ठरवले.  अत्यंविधी साधा करण्याची त्याची ईच्छा होती.  मात्र त्याच्या शिष्यांनी बाहय देखावा करण्याकडे लक्ष दिले.  त्यामुळे एखाद्या राजकुमाराचा व्हावा असा अंत्यविधी यान हूईचा झाला.  आपल्या पित्याचा अंत्यविधी करत आहोत.  अशा भावाने कन्फ्यूशियसने आपल्या पुत्रतुल्य शिष्याला अखेरचा निरोप दिला.  त्याचे हे वर्तन त्याच्या अनेक शिष्यांना मान्य झाले नाही.  त्यांनी त्याचा विरोध केला  कारण त्याच्या आचार्यांचे वागणे त्यांना परंपरेच्या विरुद्ध वाटत होते.  कन्फ्यूशियस प्रत्येक वेळी परंपरेच्या विरुद्धच वागला होता.  त्याच्या शिष्यांनी त्याला कायम साथ दिली होती.  यावेळी मात्र आपला गुरु अतीच करत आहे,असे त्यांना वाटले.   जिंगोगने आपल्या आचार्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी सगळी व्यवस्था केली.  याप्रसंगी कन्फ्यूशियसने आपला अंत्यविधी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.  कन्फ्यूशियस आता सत्तर वर्षांचा झाला होता.  एखादा माणूस वयाचे सत्तर वर्ष पूर्ण करतो.  ही त्यावेळी खूप मोठी घटना मानली जात असे.  माणसाचे आर्युमान कमी असल्यामुळे अशी मान्यता होती.  कन्फ्यूशियसच्या शिष्यांनी त्याचा जन्मदिवस साजरा केला.  त्याची तब्बेत ही आता त्याची साथ सोडत होती.  त्याने 'लू राज्याचा इतिहास' लिहिण्याची महत्वकांक्षी योजना अनेक वर्षांपासून हाती घेतील होती.  त्याला आपल्या अंताची जाणीव होऊ लागली होती.  त्यामुळे प्रकृतीचा विचार न करता त्याला हे काम पूर्ण करायचे होते.  अखेर त्याने इसवी सन पूर्व ४८१ सालच्या हिवाळयात त्याने 'लू चा इतिहास' लिहून पूर्ण केला.  सत्ताधा-यांकडून त्याच्या मार्गदर्शनाविषयी उपेक्षा कायम होती.  त्यांना कन्फ्यूशियस नकोच होता.  जीवनातील अनुभवांनी होरपळलेला कन्फ्यूशियस अखेरच्या काळात 'परिवर्तनाचे पुस्तक' हया ग्रंथाच्या अध्ययनाकडे वळला.  लाकडी काडयांच्या आधारे भविष्य कथन करण्याची विधी सांगणारा हा ग्रंथ होता.  कन्फ्यूशियसने कायम हया ग्रंथावर आणि त्यातील विधीवर संशय व्यक्त केला होता.  आता मात्र  तो होता की,"मला अजून पन्नास वर्षे जगण्याची संधी प्राप्त झाली असती,तर मी परिवर्तनाच्या पुस्तकाचा ब-यापैकी अभ्यास करू शकलो असतो."  जीवनातील कटू अनुभव,अपयश,समाजाचे भरकटलेपण यासोबतच म्हातारपण यामुळे भविष्य कथनाच्या विधीबाबत त्याला आकर्षण वाटले असेल.  खरे तर त्याच्या प्रखर विवेकी बुद्धीने परिवर्तनाच्या पुस्तकाचा स्वीकार केला नसून त्याच्या व्याकूळ मनाने केलेला होता.  त्याने अजून ५० वर्षे जरी परिवर्तनाच्या पुस्ताकचा अभ्यास केला असता तरी त्याला त्याचे नेमके भविष्य  दर्शन होऊ शकले नसते.  भविष्य कथन करणा-या लाकडी काडयासुध्दा त्याला  असे सांगू शकल्या नसत्या  की,"भावी २५० वर्षांमध्ये तुझी सारी ग्रंथसंपदा जाळण्यात येईल.  एक हजार वर्षांनंतर तुझी देवता म्हणून पूजा केली जाईल.  १५०० वर्षांनंतर तुला चीनचा सम्राट घोषित करण्यात येईल.  २४४७ वर्षांनी म्हणजे इ स १९६७ मध्ये विद्यार्थ्यांचा जमाव कुफू मधील तुझी प्रतिमा ध्वस्त करतील आणि नारे देण्यात येतील की कन्फ्यूशियस मरण पावला आहे.  २४८७ वर्षांनी म्हणजे इ स २००७ मध्ये बेस्ट सेलर म्हणून चीनमध्ये विकण्यात येणारे पुस्तक कन्फ्यूशियसच्या तत्त्वज्ञानाची वर्तमानकाळातील प्रासंगिकतेवर आधारित असेल.  संपूर्ण विश्वात तू विचार ही केला नसेल त्यापेक्षा अमर्याद पटीनं तुझी किर्ती पसरलेली असेल."  कन्फ्यूशियसला स्वत;च्या जीवनात हे अनुभवू शकला नाही आणि परिवर्तनाच्या पुस्तकात ही शोधू शकला नाही.  २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात जग कन्फ्यूशियसकडे आशेनं पाहू लागले.  मात्र इसवी सनाच्या ५ व्या शतकाच्या अखेरच्या दशकात उपेक्षित कन्फ्यूशियस शांततापूर्ण मरणाची प्रतिक्षा करत बसलेला होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                    
   

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !