उपेक्षेच्या मातीत दडलेले सोनं
"मित्रांनो ! आपल्या आचार्यांच्या जीवनातील अशा दुर्दशेने व्यथित होण्याचे काहिच कारण नाही. हे जग प्रदिर्घ काळापासून चूकीच्या मार्गावर चालत आलेले आहे. मात्र परमेश्वर हया जगाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी तुमच्या आचार्यांचा उपयोग करणार आहे." 'चू' राज्यातून हताश होऊन परत असलेला कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना धीर देत होता. 'वेई' च्या सीमेवरील एका सुरक्षा रक्षकाने केलेल्या हृदय स्वागताने नव्या आशेनं पुलकित झालेल्या कन्फ्यूशियसचे हे बोल घोर निराशेत स्वतःला आणि शिष्यांना आधार देणारे वाटत होते. कारण त्याच्या भवतालच्या अंधःकारत ही आशाच काडीचा आधार होती. वेई राज्याचा त्याग केलेला कन्फ्यूशियस आणि त्याचे शिष्य परत वेई राज्यात परतत होते. दरम्यानच्या काळात निर्वासित व नाकारल्या गेलेल्या जीवनाचे अधिक अनुभव त्यांच्या गाठीला होते. वेई राज्याचा त्याग करुन कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांच्या बैलगाडीने 'सोंग' राज्याचा रस्ता धरला होता. सोंग हे कन्फ्यूशियसच्या पितृक घराण्याचे मुळ राज्य होते. एका अर्थानं कन्फ्यूशियस आपल्या पितृक भूमीकडे परतला होता. त्याच्या घराण्याला जसे हया राज्याने नाकारले होते. तसेच त्याला देखील नाकारले. सोंग राज्यात प्रवेश केल्यावर एका वृक्षाखाली कन्फ्यूशियसने आपल्या शिष्यांसह भोजन करण्याचा निर्णय घेतला. भोजनपूर्व अनुष्ठान करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्याचे वेळी सोंग राज्याचा सेनापती 'हुआन तई' आपल्या काही सैनिकांसह तेथे पोहचला. त्याने अनुष्ठान बंद करण्याचा आदेश दिला. कन्फ्यूशियसने त्याच्याकडे लक्ष न देता आपले अनुष्ठान सुरु ठेवले. यामुळे क्रोधित हुआने तईने तो वृक्ष तोडण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. यानंतर कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांची हत्या करण्याचा आदेश मिळण्याची वाट हे सैनिक पाहत बसले होते. मात्र हुआनने यासंदर्भात राजाचा आदेश घेण्याचे ठरवले. त्याने स्वतःच्या अधिकारात त्यांना ठार मारले नाही. हे कन्फ्यूशियस आणि त्याचे शिष्यांचे सुदैवच म्हणावे लागेल. हुआनने एका दुताद्वारे राजाकडे संदेश पाठवला की,"कुख्यात 'कोंग क्यू' म्हणजेच कन्फ्यूशियसला अटक करण्यात आली आहे. त्याला ठार मारण्यासाठी आपल्या आदेशाची आम्ही प्रतिक्षा करत आहोत." राजाचा आदेश येण्यास विलंब होत होता. तसेच अनेक अडथळे येत होते. या दिवसात कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांना उपासमार सहन करावी लागली. दरम्यान परत एकदा त्याचा शिष्य जिगोंगचा मित्र 'कुंग लियांग जू' कामी आला. जिगोंग कसातरी हुआन तेईच्या तावडीतून सुटला आणि वेईला जाऊन त्याने कुंग जूला त्याच्या सैन्यासह घेऊन आला. कुंगने कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांची सुटका केली आणि तो सुरक्षितपणे त्यांना वेईच्या राजधानीत घेऊन आला. इसवी सन पूर्व ४९४ चा हा सर्व घटनाक्रम होता. कन्फ्यूशियसच्या गृहराज्यात परिस्थिती अधिकच बिघडली होती. राजा डिंगचा मृत्यु झाला होता. राजा म्हणून आता 'एई' ने राज्याचा कारभार हाती घेतला होता. हया नव्या शासकावर ही 'लू' राज्यातील सामंत घराण्यांचाच प्रभाव होता. हया सर्व सामंतांना कन्फ्यूशियस मृत्यु हवा होता. त्यांना असे वाटत होते की सत्ता परिवर्तनानंतर कन्फ्यूशियस पुन्हा राज्यात परतण्याचा प्रयत्न करेल. तसेच पुन्हा निःशस्त्रीकरणाचे आपले धोरण नव्या राजाच्या डोक्यात घालेल. यासाठी त्यांनी राजा 'एई' वर दबाव आणला. अखेर राजाने कन्प‹यूशियसला ठार करण्याचा संदेश इतर राजांना दुतांकरवी पोहचवला. त्यानुसारच सोंगचा सेनापती हुआंग तेई त्याची हत्या करण्याचा आदेश आपला राजाकडून मागत होता. मात्र कन्फ्यूशियसचे नशीब बलवत्तर होते. कुंग जू समवेत वेईत परतल्यावर एका भाडयाच्या घरात कन्फ्यूशियस व त्याचे शिष्य राहू लागले. काही दिवसांनी त्यांनी 'चेन' नावाच्या छोटया राज्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चेन मध्ये पोहचल्यानंतर नावं बदलून आणि ओळख लपवून हे लोकं राहू लागले. त्यांना आपली ओळख अधिक काळ लपवता आली नाही आणि चेन राज्याचा ही त्याग करावा लागला. आता मात्र कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांच्या वाटयाला अखंड भटके जीवन आले. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी आपला मुक्काम हलवत राहणे आणि जमल्यास अध्यापन करणे किंवा परामर्श देणे. कन्फ्यूशियसला हेच समजत नव्हते की त्याचे शिष्य वगळता सारं जग त्याच्याबाबत शत्रुतापूर्ण आणि निर्दय व्यवहार का करत आहे? प्राण वाचवण्यासाठी अखंड भटकंती,भूक,कैद,तिरस्कार व प्राणघातक हल्ले भोगत असलेल्या कन्फ्यूशियसने मनाचे संतुलन बिघडू दिले नाही. तसेच स्वतःच्या चेह-यावरील हास्य मावळू दिले नाही. जीवनाच्या जीवघेण्या अशा संघर्षात आपल्या प्रिय शिष्यांसोबत भटकत असातांनाही जीवनाबद्दल त्याने कोणतीच तक्रार केली नाही. तत्कालीन समाजाला कन्फ्यूशियसच्या आदर्श व शांतीचा आग्रह धरणा-या तत्त्वज्ञानाची गरज नव्हती. त्याचवेळी 'सुन जी' नावाच्या युद्ध पंडितानं 'युद्धाची कला' नावाचा ग्रंथ लिहिला. सुन जी आणि त्याची युद्धाची कला सगळयांना महत्वाची वाटत होती. त्यामुळे सुन जी तत्कालीन चीनमधील सर्वात मोठा विद्वान सेलेब्रेटी ठरला होता. सगळया राजांना त्याची आवश्यकता होती. त्यांच्यासाठी तो 'यश गुरु' होता. त्याचा मानसन्मान ही मोठा केला जात होता. त्यामुळे शांतीचा संदेश देणा-या कन्फ्यूशियससारख्या कालजयी तत्त्वज्ञाला कोणी पुसत नव्हते. तरी दोन राज्यांमध्ये अथवा त्याच्यातील सामंतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कन्फ्यूशियस व त्याचे शिष्यगण शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. असे असले तरी कन्फ्यूशियसच्या मार्गदर्शनाची दखल घेण्याची गरज कोणाला वाटत नव्हती. कन्फ्यूशियसच्या निवार्सन आणि भटकंतीच्या काळात सगळा चीन युद्धांच्या वणव्यात जळत होता. अशीच तीन वर्षे गेली. इसवी सन पूर्व ४९१ साली कन्फ्यूशियसला आपले राज्य 'लू' मधील घडामोडींची माहिती मिळाली. 'सामंत जी' चे निधन झाले होते आणि 'जी कांगजी' नवा सामंत झाला होता. त्याला त्याच्या पित्याप्रमाणेच राज्याचे पंतप्रधान पद बहाल करण्यात आले होते. कांग जी हा कन्फ्यूशियसचा शिष्योत्तम व समर्थक होता. त्यामुळे घरवापसीची कन्फ्यूशियसची आशा पल्लवीत होणे स्वाभाविकच होते. पंतप्रधान कांग जी ने आपल्या गुरुच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न सुरु केले होते;परंतु सामंत जी घरण्याचे सामर्थ्य अत्यंत क्षीण झालेले असल्याने पुर्नवसनात अनेक अडथळे येत होते. कन्फ्यूशियस परत आल्यास आम्ही बंड करू अशी धमकी इतर सामंत घराण्यांनी व जमिनदारांनी दिली. त्यामुळे कांग जी अत्यंत सावध पावले उचलत होता. कन्फ्यूशियसचा दुसरा शिष्य 'क्यू' आता 'जी' घराण्याचा सेनापती बनला होता. त्याच्याशी जिगोंगने लूमध्ये जाऊन चर्चा केली. वर्तमान परिस्थितीत असे होणे असंभव आहे. असे क्यूने स्पष्ट केले/ जिगोंग हा निरोप घेऊन आल्यानंतर हताश कन्फ्यूशियस एवढंच म्हणाला,"मी घरी परत जाऊ ईच्छितो." घरवापसीसाठी त्याला अजून सात वर्षे प्रतिक्षा करावी लागणार होती. त्याचे शिष्य पुन्हा त्याच्यासाठी नवे आश्रय स्थान शोधू लागले. इसवी सन पूर्व ४८९ मध्ये 'चू' राज्याचा शासक झाओ याने कन्फ्यूशियसला आपला सल्लागार म्हणून ७०० वर्ग मैल क्षेत्राची जमिनदारी देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार चू राज्यात गेलेल्या कन्फ्यूशियसचे भव्य स्वागत करण्यात आले. दुर्दैव मात्र त्याची पाठ सोडण्यास तयार नव्हते. चू दरबारातील मंत्री-अधिकारी यांनी राजा झाऔला कन्फ्यूशियस विरोधात भडकवले. त्यामुळे कन्फ्यूशियस आणि त्याचा शिष्य परिवार यांना चू राज्यातून निराश मनाने परतावे लागले. कन्फ्यूशियस आत ६३ वर्षांचा झाला होता. वयामुळे त्याचे धैर्य त्याची साथ सोडण्याच्या विचार करू लागले होते. त्याच्या समकालीन सत्ताधा-यांना त्याचे विचार आणि आदर्श प्रभावीत करू शकले नव्हते. असे असले तरी त्याचे चिरंतन तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांमध्ये झिरपू लागले होते. सामान्य जनतेत त्याची लोकप्रियता नकळतपणे वाढू लागली होती. युद्धज्वरात सत्ताधा-यांच्या नादी लागून केलेल्या उन्मादाची किंमत कदाचित चूकवण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली असावी. भविष्यात आपल्या तत्त्वज्ञानाला धर्म म्हणून स्वीकारण्यात येईल याची कल्पना देखील कन्फ्यूशियसने केली नसेल. कारण त्याचा उपेक्षित वर्तमान एवढा दाहक व विदारक होता. सत्ताधा-यांच्या डोक्यातून 'उतरलेला' कन्फ्यूशियस सर्वसामान्यांच्या डोक्यात 'उतरण्यास' प्रारंभ झाला होता. अगणित सत्ताधा-यांनी त्याच्या तत्त्वज्ञानाला नष्ट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. मात्र कोणलाच अंतिम यश मिळवता आले. त्यांच्या असल्या द्वेषयुक्त प्रयत्नांमुळे कन्फ्यूशियसच्या तत्त्वज्ञानाला अधिकाधिक झळाळी येत गेली. म्हणतात ना सोनं जेवढं आगीत जळाले जाते तेवढं ते चकाकते. जगाचा इतिहास पाहिल्यास ज्यांना मनापासून लोकांनी स्वीकारले त्या तत्तवज्ञानाला आणि महापुरुषांना गाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना नवे धुमारे फुटणे होय. त्यामुळे ज्यांनी कन्फ्यूशियसच्या जीवनाची माती केली. त्याच मातीत त्याचे जीवनाचे सोनं होणार होते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Very nice sir!
ReplyDelete