काजव्यांच्या प्रकाशात लपलेला सूर्य
अनेक अडचणींचा सामना करत 'क्वी' राज्याच्या सीमेवर कन्फ्यूशियसची बैलगाडी येऊन थांबली. त्याच्यासोबत त्याचे शिष्य जिलू,जिगोंग आणि यान देखील होते. 'क्वी' चा राजा जिंगकडे कन्फ्यूशियस मोठया आशेनं आला होता. आपला शिष्य राजा जिंग नक्कीच आपल्याला स्वीकारेल याची त्याला खात्री होती. सीमेवर पोहचल्यानंतर कन्फ्यूशियला सत्ताधा-यांच्या वास्तव चेहरा पाहण्याची संधी मिळाली. त्याची बैलगाडी सीमेवर थांबवण्यात आली आणि त्याला 'क्वी' राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. राजा जिंग हा अत्यंत धोरणी आणि कावेबाज शासक होता. कन्फ्यूशियसचा 'लू' राज्यातील निःशस्त्रीकरणाचा प्रयोग आणि त्याचा परिणाम यासंदर्भात त्याला संपूर्ण माहिती मिळाली होती. आपल्या राज्यात हा आदर्श प्रयोग करुन आपले सिंहासन धोक्यात आणण्याचा मुर्खपणा त्याला करायाचा नव्हता. कन्फ्यूशियससारख्या तत्त्वज्ञाला आपल्या राज्यात प्रवेश देणे म्हणजे त्याला आदर्श राज्याच्या संकल्पनेतील प्रयोगांना प्रयोगशाळा उपलब्ध करुन देणे आणि स्वतःच्या सत्तेला ग्रहण लावणे. हे त्याला नेमके माहित होते. कोणत्याही राज्यकर्त्याला आदर्श राज्यापेक्षा स्वतःची सत्ता प्रिय असते. फरक असतो तो फक्त जनकल्याणाच्या भूमिकेतील कमी-अधिक प्रमाणाचा. ज्या सत्ताधा-यामध्ये ही भावना इतरांपेक्षा अधिक असते तो जनतेच्या दृष्टिकोनात चांगला अथवा महान शासक म्हणून गणला जातो. एवढे मात्र खरे की जनकल्याण हा कोणत्याही सत्ताधा-याचे प्रधान ध्येय नसते. जिंगने आपल्या सत्तेला प्राधान्य दिले आणि कन्फ्यूशियसला नाकारले. हया दाहक अनुभवाने हताश आपल्या गुरुला जिलूने सल्ला दिला की,"आपण पश्चिमेकडील वेई राज्यात जाणे योग्य ठरेल. 'वेई' चा राजा लिंग हा तुम्हाला निश्चितच एखादे पद देऊ शकतो." जिलू हे ठामपणे म्हणू शकला कारण त्याचा मेहूणा 'वेई' च्या दरबारात नोकरीला होता. त्याच्या सहकार्यानं परराज्यात गेल्यावर आवश्यक निवासाची सोय देखील होऊ शकणार होती. कन्फ्यूशियसने जिलूचे मत मान्य केले. वेई राज्यात जाण्यासाठी त्यांना नदी पार करावी लागली. तसेच सीमेवरील सुरक्षा रक्षकांना आपली ओळख लपवून राज्यात प्रवेश घ्यावा लागला. जिलूच्या मेहूण्याच्या घरीच त्यांनी सुरवातीला आश्रय घेतला. त्यानेच कन्फ्यूशियसला 'राजा लिंग' याची भेट घडवून दिली. राजा लिंग याला एका उत्तम संरक्षण तज्ज्ञाची आवश्यकता होती. कन्फ्यूशियसने आपण संरक्षण तज्ज्ञ नाही,असे सांगितल्यावर तो निराश झाला. त्याकाळात अनेक फिरस्ते विद्वान संरक्षण व सैन्य संचालन यासंदर्भात विविध राज्यांना मार्गदर्शन देत असतं. राजा लिंग याला ईच्छित सेवा कन्फ्यूशियसकडून मिळाली नसली तरी त्याला आपल्या राजदरबारात ठेवून दरबाराची शान वाढवण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे वार्षिक ६० हजार टोक-या धान्यरुपी वेतनावर त्याने कन्फ्यूशियसला 'अनुष्ठान तज्ज्ञ' म्हणून नियुक्त केले. कन्फ्यूशियसला नोकरी मिळाली होती;परंतु तिच्याबद्दल त्याच्या शिष्यांमध्ये मतभेद होते. काहिंना ही नोकरी आपल्या आचार्यांच्या योग्यतेची वाटत नव्हती,तर काहिंना राजा लिंगसारख्या दुष्ट शासकाची नोकरी करणेच मान्य नव्हते. राजा लिंग याने स्वतःच्या भावाची हत्या करुन सत्ता मिळवली होती. सदैव भोग-विलासात रमलेल्या हया राजाचा कारभार त्याचे तीन भ्रष्ट आणि स्वार्थी अधिकारी चालवत होते. लिंग अधूनमधून कन्फ्यूशियसकडून मार्गदर्शन घेत होता. मात्र त्यानुसार मार्गक्रमण करण्याची त्याला आवश्यकता वाटत नव्हती. कन्फ्यूशियस राजमहालात चालणा-या अनुष्ठांनावर देखरेख ठेवत होता आणि आपल्या शिष्यांना ज्ञानदान करत होता. याकाळात त्याचा शिष्य यान याचा विलक्षण ज्ञानात्मक विकास झाला. असे असतांना दुर्भाग्य कन्फ्यूशियसची साथ सोडत नव्हते. काही महिन्यातच राजा लिंगच्या दरबारातील लोकांना त्याचा वाढता प्रभाव सहन होईनासा झाला. तसेच त्याला एवढे वेतन देणे देखील त्यांना बोचू लागले. राजा लिंगने कन्फ्यूशियसवर नजर ठेवण्यासाठी एका हेराची नियुक्ती केली. कन्फ्यूशियसच्या प्राणाला येथे ही धोका निर्माण झाला होता. एव्हाना 'लू' राज्यातून त्याला निर्वासित करण्यात आले आहे. त्याच्यी हत्या करणा-याला ईनाम घोषित करण्यात आले होते. ही वार्ता 'वेई' राज्यात पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कन्फ्यूशियसने आपल्या दोन शिष्यांसह वेई दरबारातील नोकरी सोडण्याचा आणि तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. 'चेन' नावाच्या एका छोटया राज्यात जाऊन राहण्यासाठी तो आपले शिष्य यान व हूई यांच्यासोबत निघाला. त्यांचा प्रवास वेई राज्याच्या 'कुआंग' नावाच्या जिल्हयातून सुरू असतांना. तेथील स्थानिक वतनदाराच्या सैनिकांनी त्यांची बैलगाडी अडवली. पायी चालणारा त्याचा शिष्य हूई रस्त्यात मागे राहून गेला होता. सैनिकांनी कन्फ्यूशियस आणि यान यांना अटक केली. त्यांच्यावर हत्या,दरोडे आणि लूटपाट यांचा गुन्हा दाखला करण्यात आला. कन्फ्यूशियसचे शिष्य सैनिकांना परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सैनिक म्हणत होत की,"तुम्ही ज्याला आचार्य कन्फ्यूशियस सांगत आहात. तो कुख्यात दरोडेखोर 'यांग हुओ' आहे." आता सर्व घोटाळा लक्षात येऊ लागला होता. 'लू' राज्याचा सेनापती यांग हुओ ज्याने ४ वर्षे लू राज्यात आपली हुकुमशाही चालवली त्याचा चेहरामोहरा कन्फ्यूशियससारखा होता. त्याच्या सत्तेचे पतन झाल्यानंतर तो दरोडेखोर बनला होता. कन्फ्यूशियस आणि त्याच्यात असलेल्या दिसण्याच्या साधर्म्यावरून हे कन्फ्यूशियसला यांग हुओ समजले होते. त्यांनी त्याला कारागृहात बंद केले. कन्फ्यूशियसनं आपल्या शिष्यांना सांगितले घाबरण्याचे काही कारण नाही. त्याने सांगितल्यानुसार त्याचा शिष्य जिगोंग याने आपल्या जवळील एक हिरा विकला आणि एक घोडा खरेदी केला. त्याच्या साहयाने तो वेईच्या राजधानीत पोहचला. त्याने दरबारातील काही अधिका-यांना त्याच्या सोबत कुआंगला येऊन साक्ष देण्याची विनंती केली. अखेर त्याचा एक व्यापारी मित्र कुंग लियांग जू त्याच्यासोबत आला. कुंगने साक्ष दिल्यानंतर कन्फ्यूशियसची सुटका करण्यात आली. शेवटी कन्फ्यूशियस आणि त्याचे शिष्य 'चेन' राज्यात जाऊ शकले नाहीत. त्यांना वेईच्या राजधानीत परतावे लागले. वेईच्या राजधानीत आल्यानंतर कन्फ्यूशियसने जिलूच्या मेहूण्याला त्रास होऊ नये म्हणून भाडयाच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. तसेच उपजिविकेसाठी अध्यापन करू लागला. भाडयाच्या छोटया घराच्या बाहेर एका वाद्यावर अत्यंयात्रेच्या प्रसंगी वाजवली जाणारी धून वाजवत असतांना एका सामान्य माणसाने त्याला भानावर आणले. अशिक्षित माणसाचे मोलाचे बोल त्याला एक नवी उमेद देऊन गेले. गैरसमज आणि उपेक्षा त्याची पाठ सोडत नव्हते. हया जगात सत्य सांगणा-या,श्रेष्ठ मूल्याधारीत जीवनाची कल्पना करणा-या आणि अन्यायाविरूद्ध लढणा-या माणसांच्या आयुष्यात याशिवाय दुसरे काहीच येत नसते. यशस्वी दिव्यांखालील अंधारात दडलेल्या तडजोडी,लांगुलचालन,स्वार्थ,भ्रष्टता इत्यादी गोष्टी बहुतेकांना दिसत नाहीत. ज्यांना दिसतात ते एकतर सांगत नाहीत. एखादयाने सांगितलेच तर कोणी ऐकत नाही. 'चमत्काराला नमस्कार' हा देखील मानवी समाजाचा अंगभूत धर्मच आहे. असे वाटून गेल्याशिवाय राहत नाही. वटवाघळांच्या वस्तीत स्वतः सूर्य अंधारात असतो. तर माणसांच्या वस्तीत काजवेच सूर्य म्हणून मिरवत असतात. अशाच काजव्यांच्या प्रकाशात रमलेल्या राजा लिंग याने कन्फ्यूशियससारख्या महान तत्त्वज्ञाची कोणतीच देखल घेतली नाही. तो केवळ स्वतःच्या भूषणसाठी सार्वजनिक जीवनात कन्फ्यूशियसला सोबत घेऊन फिरायचा. एकदिवस राजा लिंगने त्याला एका खेडयावर आपल्यासोबत फेरफटका मारण्यासाठी आमंत्रित केले. राजा स्वतःच्या बैलगाडीत आपल्याला शेजारी बसवेल. अशी वेडी आशा कन्फ्यूशियसला वाटली. मात्र त्याला मागच्या बैलगाडीत बसण्यास सांगण्यात आले. कारण राजा लिंगच्या बैलगाडीत त्याच्यासोबत त्याच्या रखेल्या त्याच्यासोबत विविध चाळे करत अत्यंत सन्मानपूर्वक बसलेल्या होत्या. मागच्या गाडीतून त्यांचे 'चाळे' बघण्याशिवाय जगातील महान तत्त्ववेत्ता कन्फ्यूशियसकडे दुसरा उपाय नव्हता. येथे अनेकांना चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' चित्रपट डोळयासमोर येऊ शकतो. अनेकांच्या नजरा आपल्या सभोवतालच्या समाजात कशाचा तरी शोध घेऊ शकतात. येथे कन्फ्यूशियसला देखील त्याच्याकडे असलेली भगवान बुद्ध,महावीर,लाओत्से इत्यादींच्या विचारधनाची त्याच्याकडे कमतरता जाणवलीच असणार. राजा लिंगसोबत गावशीवार पाहून आलेला कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना एवढेच म्हणाला की ,"आजवरच्या माझ्या आयुष्यात मला असा एकही राज्यकर्ता भेटला नाही. जो सौंदर्यापेक्षा आपल्या सिद्धांतावर अथवा मूल्यांवर प्रेम करतो." अखेर वेई सोडण्याचा निर्णय कन्फ्यूशियसने घेतला. बेरोजगार कन्फ्यूशियसकडे आणि त्याच्या शिष्यांकडे आता न धन होते ना नोकरी. घरमालकाने भाडयासाठी तगादा लावला होता. समाधान एवढेच होते की वेई सोडतांना त्याला काही गमवण्याचे दुःख नव्हते. त्याचा शिष्य यान बैलगाडी हाकत होता आणि मंद गतीने गाडी वेईच्या सीमेबाहेर चालली होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment