प्रसिद्धीचे आयुष्य १५ मिनिटं !
"मला लोक ओळखत नाहीत ही चिंता मला कधीच सतावत नाही. यापेक्षा माझी योग्यता कोणत्याही प्रकारे कमी होता कामा नये. याविषयी मात्र मी कायम चिंतित असतो."असे विधान करणारा कन्फ्यूशियस प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा स्वतःच्या योग्यतेला महत्व देतांना दिसतो. प्रसिद्धीसाठी लोक हल्ली काहीही करायला तयार आहेत. प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे,मग त्यासाठी काय पण. अशी मानसिकता जणू काही आजचा युगधर्म बनला आहे. समाज माध्यमांनी प्रसिद्ध होण्याच्या प्रत्येकाच्या ईच्छेला अत्यंत 'स्वस्त-सहज-सुगम' व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले दिसते. सध्या आपल्याला व्हॉट्सअप,इंस्टाग्राम,फेसबूक इत्यादी कोणत्याही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आपला 'सेल्फी' व्हायरल करण्यासाठी नको ते धाडस करुन जीव गमावणारे दिसतात. तसेच आत्महत्येचे थेट प्रसारण करणारे देखील दिसतात. यामागे प्रसिद्धीसाठी हपापलेले समाज मानस दडलेले आहे. प्रसिद्धीच्या महामारीने अखिल जगाला ग्रासलेला हा काळ आपण अनुभवत आहोत. या आजाराचे नेमके निदान कन्फ्यूशियसप्रमाणेच आधुनिक काळातील ॲडी वॉरहोल हया जागतिक कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाने केलेले दिसते. ॲडी वॉरहोल म्हणतात," भविष्यात प्रत्येक व्यक्तीच्या प्रसिद्धीचे आयुष्य १५ मिनिटं असणार आहे." प्राचीन काळातील कन्फ्यूशियस आणि आजचा ॲडी वॉरहोल यांच्या विधानांचा एकत्रित सार सांगावयाचा झाल्यास सुमारांच्या भाऊ गर्दीत प्रतिभावंत लोपले जाण्याचा हा काळ आहे. आपली योग्यता,तिच्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या आणि संयम ही तत्वे चिरंतन असली, तरी आज पूर्णपणे दुर्लक्षित झालेली आहेत. हया रोगावर कन्फ्यूशियने एक उपचार सुचवला होता. तो म्हणजे 'जेन'. ज्याचा अर्थ 'सदाचार' असा होतो. कन्फ्यूशियच्या मतानुसार," पद-पुरस्कारांची मी चिंता करत नाही. मी पद-पुरस्कार प्राप्त करण्याच्या साधनांविषयी अथवा मार्गाविषयी चिंतित असतो. मी जगाच्या दृष्टीने अज्ञात राहिलो, तरी मला चिंता वाटत नाही. मात्र योग्य वा वैध मार्गाने मी समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करू ईच्छितो." याचा अर्थ लाओत्सेप्रमाणे माणसाने कायम अज्ञात रहावे. अशा मताचा कन्फ्यूशियस कदापि नव्हता प्रत्येक व्यक्तिने जीवनात धन व यश प्राप्त करण्यास त्याची हरकत नव्हती. धन व यशाशिवाय जीवन सफल होत नाही. हे त्याचे मत होते;परंतु त्यासाठी त्याने आणखी एक तिसरे तत्त्व महत्वाचे मानले. हे तत्त्व म्हणजे 'जेन' म्हणजेच 'सदाचार'. एका अर्थाने सदाचार हा कन्फ्यूशियच्या एकूण तत्त्वज्ञानाचा पाया आहे. आपल्या पशुधन अधिकारी म्हणून तत्कालीन सामान्य माणसासाठी अत्यंत चांगल्या असणा-या नोकरीत समाधानी असलेल्या कन्फ्यूशियला एव्हाना आपल्या श्रेष्ठतेची जाणीव होऊ लागली होती. वर्षाला २०० टोक-या धान्य वेतन म्हणून घेऊन चाकरमान्याचे आयुष्य जगण्यासाठी आपले आयुष्य नाही, ही जाणीव त्याच्या मनात प्रबळ होत होती. असे असले तरी त्याच्या मते," सदाचाराला तीलांजली देऊन मिळणा-या धनाचा व यशाचा माणसाने त्याग केला पाहिजे. जगत असतांना प्रत्येक व्यक्तीला धन आणि सामाजिक प्रतिष्ठा यांची आस असणे स्वाभाविक आहे;परंतु सदाचाराचा त्याग करुन धनवान व यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे चूकीचे आहे." त्यामुळे कन्फ्यूशियला जीवनात मोठे कार्य करायचे असले, तरी तो सदाचाराचे मूल्य चूकवण्यास तयार नव्हता. कन्फ्यूशियस त्याच्या समकालिन समाजातील संपत्ती व यश प्राप्तीसाठी चाललेल्या धडपडीत असलेला अंतरविरोध आणि अस्वस्थता पाहून म्हणतो," मला हे लोक अत्यंत दयनीय वाटतात. त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही. जेंव्हा यांच्याजवळ काही नसते तेंव्हा जगासमोर स्वतःचा तमाशा करुन हे त्यांना हवे ते प्राप्त करुन घेतात. हवे असलेले प्राप्त झाल्यानंतर यांना ते गमवण्याची भिती सतावू लागते. मग कमावलेले गमावण्याच्या भयापोटी हे लोक काहीही करण्यास तयार होतात." कन्फ्यूशियस हे इसवी सन पूर्व ५ व्या शतकातील समाजाविषयी बोलत होता की आज आपण लोक जगत आहोत त्या वर्तमानकाळाविषयी हेच समजत नाही. त्याचे समाजात यशस्वी म्हणून मिरवणा-या लोकांच्या मानसिकेतेविषयीचे हे सखोल मानसशास्त्रीय निरिक्षण कोणत्याही काळात तंतोतंत लागू पडणारे आहे. यालाच म्हणतात महापुरुषांच्या विधानांमधील त्रिकालाबाधितता. कन्फ्यूशियस भौतिक यशाच्या विरोधात कधीच नव्हता. फक्त यश प्राप्त करण्याच्या साधनांच्या शुद्धतेबद्दल तो अत्यंत कर्मठ भूमिका स्वीकारतो. कन्फ्यूशियला तत्कालीन चिनी समाजात पौरोहित्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान घेणे महत्वाचे वाटू लागले. कारण त्याला स्वतःच्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीसाठी आणि प्रचार-प्रसारासाठी स्वतःचे गुरुकुल स्थापन करणे आवश्यक होते. त्याशिवाय 'आचार्य' म्हणून त्याला मान्यता मिळणे शक्य नव्हते. कर्मकांड अथवा अनुष्ठांनाचा अधिकारी पुरोहित म्हणून तो त्याच्या काळातील राजा आणि इतर सामंत लोकांच्या जवळ पोहचू शकणार होता आणि त्याला गुरु म्हणून मान्यता मिळू शकणार होती. अनुष्ठांनांचा ग्रंथ त्याने मुखोद्गत केलेला होता. असे असले तरी तो पशुधन अधिकारी असल्यामुळे त्याला 'गुरु' चा म्हणजेच चिनी भाषेत 'जी' चा दर्जा मिळणे अशक्य होते. सहज गंमत म्हणून विचार केल्यास आपल्याकडील 'गुरुजी' शब्दात हे दोन्ही शब्द त्यांच्या अर्थासह सामावलेले दिसतात. कन्फ्यूशियसला अनुष्ठांनाचे सखोल अध्ययन करण्यासाठी 'लोचांग' शहरात जाणे आवश्यक होते. झाऊ राजघराण्याच्या सत्तेखाली येणा-या पूर्व चीनमधील एका प्रांतात लोचांग शहर होते. हे शहर तत्कालिन चिनची धार्मिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात असे. एके काळी ती झाऊ राजसत्तेची राजधानी देखील होती. लोचांग शहरात तत्कालिन चीनमधील सर्वात मोठे मंदिर व धर्मपीठ होते. हया मंदिराच्या धर्मपीठाकडून विविध कर्मकांड अथवा अनुष्ठान यांच्याबाबत वेळोवेळी नियमावली घोषित केली जात असे. आजच्या मराठीत त्याला 'जारी' करणे म्हणतात ('जारी' हया हिंदी शब्दाचा वापर सध्याच्या मराठी प्रसार माध्यमांमध्ये सर्रास केला जात आहे. ) लोचांगचे हे मंदिर 'कर्मकांड' किंवा 'अनुष्ठान स्पेशालिस्ट' बनवणारे एक प्रकारचे विद्यापीठ देखील होते. येथून कर्मकांडात डिग्री घेतलेले स्नातक 'कर्मकांड स्पेशालिस्ट' म्हणून देशभरात सशुल्क सेवा देऊन आपले उदरभरण करू शकतं. कन्फ्यूशियच्या तत्त्वज्ञानात कर्मकांडाला कोणतेही स्थान नाही. त्याला आपल्या सिद्धांतांशी कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नव्हती. असे असले तरी कर्मकांड किंवा अनुष्ठान स्पेशालिस्ट म्हणून मान्यता मिळवल्याशिवाय त्याला 'गुरुजी' अथवा 'आचार्य' म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करणे अशक्य होते. तसेच एक तत्त्वज्ञ म्हणून त्याला मान्यता देखील मिळू शकत नव्हती. आपले उदरभरण करणारी नोकरी सोडून लोचांगला जाणे आर्थिकदृष्टया आपल्याला अशक्य आहे. याची संपूर्ण जाणीव कन्फ्यूशियला होती. अशा परिस्थितीत त्याला एकच व्यक्ती सहकार्य करू शकत होता तो म्हणजे 'नांगोंग जिंगसू'. त्याचा हा सत्ताधारी सामंत मेंग घराण्यातील मित्रच त्याला लोचांग नगरीत पोहचवू शकणार होता. कन्फ्यूशियने मात्र त्याच्याकडे देखील सहकार्य मागितले नाही. नांगोंग जिंगसूला कर्मकांड अथवा अनुष्ठानाचे शिक्षण घेण्यात विशेष रस होता. त्याने आपला पिता सामंत मेंग याच्याकडे त्यासाठी लोचांग येथे जाण्याची ईच्छा व्यक्त केली. त्याने आपल्या पित्याला समजावले की आपल्या घराण्यातील कोणी तरी व्यक्ती अनुष्ठान स्पेशालिस्ट असणे गरजेचे आहे. माझ्या कोणत्याच भावाला यामध्ये रुची नाही. मला त्याची रुची आहे. आपण मला लोचांग येथे त्यासाठी पाठवावे. त्याचा पिता मेंग एक अत्यंत सत्तालोलुप माणूस होता. त्याला आपल्या मुलाच्या शिक्षणात देखील स्वार्थ दिसला. आपल्या घराण्यातील एखादी व्यक्ती कर्मकांडात निपुण झाली तर आपल्या प्रजेवर प्रभाव टाकण्यसाठी त्याचा लाभ होऊ शकतो. हे मेंगच्या लक्षात आले. त्याने तात्काळ जिंगसूला लोचांगला अध्ययनासाठी जाण्याची परवानगी दिली . ईकडे कन्फ्यूशियस लोचांगला जाण्याच्या विचाराने अस्वस्थ होता. मात्र परिस्थितीसमोर तो हतबल होता. आपण लोचांगला जाणार हे सांगण्यासाठी जिंगसू त्याच्याकडे आला. त्याने कन्फ्यूशियला ही गोष्ट सांगितल्यावर कन्फ्यूशियला पुन्हा एकदा आपल्या मर्यादेची आणि जिंगसूच्या क्षमतेची जाणीव झाली. जिंगसूचे त्याच्यावर असीम प्रेम होते. त्याने शब्द टाकण्याचा उशीर की जिंगसू त्याला आपल्या समवेत लोचांगला घेऊन गेला असता. कन्फ्यूशियने असे काही केले नाही. त्याने आपल्या मित्राला लोचांगला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिंगसू एकदम उसळून म्हणाला," अरे मित्रा ! मी तूला केवळ हे सांगण्यासाठी आणि तुझ्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेलो नाही. मी तुला माझ्यासोबत लोचांगला घेऊन जाण्यासाठी आलो आहे." जिंगसू बोलत होता. कन्फ्यूशियला मात्र आपण स्वप्नात आहोत आणि लोचांगला जाण्याची संधी आपल्याला मिळत आहे. असे कोणी तरी म्हणत आहे. असे वाटत होते. त्याच्या कानावर त्याचा विश्वास बसत नव्हता. मनाने आधीच लोचांगला पोहचलेला कन्फ्यूशियस आता फक्त शरीराने तेथे पोहचण्याचा बाकी राहिला होता. कन्फ्यूशियप्रमाणे लोचांग नगरी देखील त्याची प्रतिक्षा करत होती. कारण त्या नगरीतून मान्यता मिळवून बाहेर पडणारा कन्फ्यूशियस जगातील एक श्रेष्ठ तत्त्ववेत्ता म्हणून अजरामर होणार होता
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Means and ends ...
ReplyDeleteNice article
बोधप्रद
ReplyDelete