अभिनव शिक्षणाची प्रयोगशाळा...

''कोणी विद्यार्थी जिज्ञासू नसेल तर मी त्याला शिकवू शकत नाही."  एक गुरु म्हणून कन्फ्यूशियसची ही पहिली अट होती.  खरं पाहिले तर ती प्रत्येक शिक्षकाची अट असते.  कन्फ्यूशियसच्या विद्यालयात अत्यंत नाममात्र दक्षिणेत विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहणाची संधी मिळत होती.  त्यामुळे ते विद्यालय एका हाडाच्या शिक्षकाच्या हया एकमेव शर्तीवर चालणार यात कोणतीच शंका नाही.  असे असले तरी समाजात असे काही विद्यार्थी असतात की त्यांच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची इच्छा अफाट असली तरी बौद्धिक क्षमतेचा अभाव असतो.  अशा काही विद्यार्थ्यांनी कन्फ्यूशियसच्या विद्यालयात प्रवेश घेतला होता.  प्रत्यक्ष अध्यापन-अध्ययन प्रक्रिया प्रारंभ झाल्याशिवाय कोणताही शिक्षक विद्यार्थ्याचे मूल्यमापन करू शकत नाही.  अशावेळी कन्फ्यूशियसच्या विद्यालयातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना आपला गुरु अशा र्निबुद्धांवर आपला वेळ,उर्जा व ज्ञान यांचा व्यय करत आहे.  त्याने शिष्य निवडतांना सावधानी बाळगली पाहिजे.  याची खंत वाटत असे.  ते याबद्दल कन्फ्यूशियसकडे तक्रार देखील करत.  मात्र तो त्यांच्याशी कदापि सहमत नव्हता. अशावेळी कन्फ्यूशियसचे उत्तर असायचे की," कोणत्याही विद्यार्थ्याला वा व्यक्तीला तो जसा आहे तसा स्वीकारायला हवे.  त्याबाबत कठोर धोरण अवलंबने योग्य नाही.  कारण कोणताही श्रेष्ठ व्यक्ती गुणी व सक्षम व्यक्तिंची कदर करत असला तरी त्यासोबतच अक्षम व अवगुणी लोकांचा ही त्याला स्वीकार करता आला पाहिजे.  त्यामुळे एखादयाच्या बुद्धिमत्तेवरून मी त्याला फटकारू शकत नाही किंवा त्याच्याशी कठोर वर्तन करू शकत नाही."  अशाप्रकारे 'एनालेक्ट्स' ग्रंथात कन्फ्यूशियसच्या अध्यापन शैली व शिक्षण प्रणाली संदर्भातील विचारांची माहिती मिळते.  त्याचसोबत त्याच्या शिष्यांच्या यासंदर्भातील स्मृती देखील आढळतात.  कन्फ्यूशियसने आपल्या विद्यालयाच्या पाठ्यक्रमात चीनमधील प्राचीन ५ पुस्तकांपैकी कवितेचे पुस्तक,अनुष्ठानांचे पुस्तक आणि इतिहासाचे पुस्तक अशा ३ पुस्तकांचा समावेश केलेला होता.  खरे पाहिले तरी त्याच्या काळातील शिक्षण प्रणाली वेगळी आणि रुक्ष होती.  कन्फ्यूशियसने संगीत व नृत्याला शिक्षणाचा अविभाज्य भाग बनवले.  त्यामुळे त्याच्या समकालीन शिक्षण प्रणालीपेक्षा त्याच्या शिक्षण प्रणालीचे वेगळेपण सिद्ध होऊ लागले.  कन्फ्यूशियस आपल्या दिवसभराच्या ज्ञानसत्राचा समारोप कायम सामूहिक गायन व नृत्यानं करीत असे.  तो स्वतः चीनी सतार वाजवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचा आणि त्यांच्यावरील बौद्धिक ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करायचा.  यासोबतच आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे वाद्य वाजवायला प्रेरित करायचा.  संगीताची देण त्याला त्याच्या आईकडून मिळाली असली तरी राजपरिवारातील शिक्षणात त्याला शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी मिळाली होती.  कन्फ्यूशियसच्या मते संगीताच्या साहयाने आपण शिक्षणाला पूर्णत्व देऊ शकतो.  याचाच अर्थ संगीत-नृत्यादी कला माणसाच्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व बहाल करू शकतात.  त्याच्या या संगीतमय शिक्षण तत्त्वाचा परिणाम त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये जाणवू लागला होता.  त्याचे अनेक विद्यार्थी समाजाच्या तळातील स्तरातून आलेले होते.  त्यामुळे समाजातील सर्वोच स्तरातील शिष्टाचार त्यांच्या गावी देखील नव्हते.  कन्फ्यूशियस त्यांना अशा प्रकारे प्रशिक्षित करायचा की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अत्यंत निर्धन स्तरातून आलेला त्याचा विद्यार्थी देखील प्रतिष्ठित लोकांच्या समूदायात सहज आचरण करण्यास पात्र होत असे.  त्यामुळे एखाद्या शेतक-याचा मुलगा देखील कन्फ्यूशियसच्या विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर सामंत परिवारांच्या प्रशासनात नोकरी मिळवण्यास पात्र ठरत होता.  शिक्षणाला अधिकाधिक मानवी व कलात्मक बनवण्याच्या कन्फ्यूशियसच्या शिक्षण प्रणालीमुळे त्याचे विद्यालय आणि त्यात शिकवला जाणारा पाठ्यक्रम लोकप्रिय सिद्ध होऊ लागला.  गरीब शेतक-यांपासून ते श्रीमंत शेतक-यापर्यंत आणि व्यापा-यांपासून ते सामंतांपर्यंत प्रत्येक स्तरातील पालक त्याच्या विद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक होता.  कन्फ्यूशियसचे विद्यालय म्हणजे भावी यशस्वी जीवनाचा राजमार्ग असे समिकरण बनले होते.  विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यास कन्फ्यूशियसचा विरोध होता.  अध्यापन करतांना काव्याचा वापर केल्यास विद्यार्थ्यांची बुद्धी    ज्ञानग्रहणास ताजीतवानी होते असे त्याचे ठाम मत होते.  त्यामुळे कवितेच्या पुस्तकातील एखादया भागाचे वाचन केल्यानंतर तो अध्यापनाला सुरवात करत असे.  संगणकाच्या भाषेत सांगयचे झाल्यास रिफ्रेश कंमाड दिल्यावर संगणाकाच्या कामाची गती वाढते,त्याचप्रमाणे कन्फ्यूशियसचे तत्त्व होते.  आजकाल वेगवेगळया शाखांमधील प्रवेशसासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा क्रॅक करुन  देण्यासाठी बारा-बारा तास क्लास घेणारे द्रोणाचार्य आणि परीक्षारुपी माशाच्या डोळयावर नेम धरून शिकणारे अर्जुन बघितले तर ही माणसं आहेत की यंत्र अशी शंका येते.  हे सर्व झापडं बांधलेले आणि रसहीन शिक्षण बघून समाजाच्या भविष्याची चिंता सतावते.  त्यामुळेच जीवनात पोटभरण्याच्या क्षेत्रात सफल आणि इतर क्षेत्रात असफल माणसांची वाढती संख्या भयभीत करून जाते.  आपण मुलांना केवळ पोटभरण्याचे कोणते तरी एक तंत्र देऊन त्यांना जगात जिवंत राहण्यास सक्षम करत आहोत. परंतु परिपूर्ण माणूस किंवा परिपूर्णतेच्या जवळपास जाणारा माणूस म्हणून घडवू शकण्यास अक्षम ठरत आहोत.  अभियांत्रिकी शाखा यामध्ये सर्वात आघाडीवर असलेली दिसते.  तेथून निर्माण होणारं उत्पादन पाहून मनात मानवी समाजाच्या भविष्यावर प्रश्नचिन्हं उभं राहते.  हे सर्व अभियंते आपल्या आवतीभोवती असूनही कोणत्या तरी वेगळया जगात जगत आहेत किंवा त्यांना पाहून आपणच चूकीच्या जगात वावरत आहोत.  असा संभ्रम निर्माण होतो.  आई-बाप त्यांना इंजिनियर करुन  मोठं पॅकेज मिळण्यास पात्र करण्यात यशस्वी ठरत आहेत;परंतु माणूस म्हणून सामाजिक-वैचारिक-सांस्कृतिक वारसा देण्यात अपयशी ठरत आहेत.  पॅकेजच्या मृगजळामागे धावणारी ही बिनचेह-याची गर्दी बघून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा येतो.  कन्फ्यूशियसला शिक्षणातून यंत्रमानव नाही,तर मानव घडवणे महत्वाचे वाटत होते.  आज आपल्या शिक्षणातच काय तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असहमतीला आपण जागाच ठेवली नाही.  तशी ही आपल्या जीवनात असहमती म्हणजे 'द्रोह' ही भावना बळावण्यात आलेली आहे.  खरे पाहिले तर असहमती नव्या व परिपूर्ण विचाराला चालना देत असते.  विचारपूर्वक, आदरपूर्वक व योग्याचा स्वीकार करणारी असहमतीच ख-या अर्थाने विकासाची दिशा व गती निश्चित करत असते.  कन्फ्यूशियसने आपल्या शिष्यांना गुरु म्हणून त्याच्याशी असहमत होण्यास कायम प्रोत्साहित केले.  त्यांचे असहमतीचे स्वातंत्र्य मान्य केले आणि त्यांना प्रदान केले.  त्याच्या मते,"शिष्यांनी निष्क्रिय किंवा अंध होऊन गुरूच्या चरणांमध्ये बसणे म्हणजे शिक्षण नव्हे.  शिष्याने गुरूच्या प्रत्येक गोष्टीला धर्म वाक्य समजून स्वीकार करता कामा नये.  जर शिष्याला वाटत असले की आपला गुरु चूकीचे मूल्यं अथवा तथ्यं प्रतिपादन करत आहे,तर त्याने गुरुशी असहमतच असले पाहिजे."  यासाठी त्याचा शिष्य आणि वैचारिक वारस 'जिलू'चे उदाहरण अत्यंत सर्मपक ठरते.  जिलूला जेंव्हा जाणवत असे की आपले आचार्य स्वतःच्या एखाद्या मूल्याशी अथवा सिद्धांताशी तडजोड करणार आहेत.  त्यावेळी तो त्यांना याबद्दल सावधान करत असे.  आचार्य कन्फ्यूशियस आपल्या हया प्रिय शिष्याच्या मताला महत्व देत असत.  केवळ आदर्श आचार्य म्हणूनच नव्हे तर एक महान तत्त्ववेत्ता म्हणून कन्फ्यूशियसला तावून-सलाखून निघण्यास जिलूचे योगदान अनन्यसाधारण ठरले.  ज्याप्रमाणे शिष्य म्हणून कन्फ्यूशियसने जिलूला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गुरु व तत्त्ववेत्ता म्हणून कन्फ्यूशियसला परिपूर्ण करण्याचे काम जिलूने केले.  हे सर्व तेंव्हा घडू शकते जेंव्हा अध्यापन-अध्ययन प्रक्रिया एकतर्फी न राहता दुतर्फी असते.  यासाठी केवळ भव्य-दिव्य व चकचकीत म्हणजेच 'पॉश' शाळां असून चालत नाही.  त्यासाठी ती शाळा आणि तिचे वर्ग जीवंत,रसदार,उत्साहाने ओसांडून वाहत असले पाहिजेत.  अशीच होती कन्फ्यूशियसची शाळा.  त्याने शिकवलेले विद्यार्थ्याने आत्मसात करावे आणि स्मरणात ठेवावे याचा आग्रह धरला.  मात्र घोकंपट्टीला शिक्षण मानले नाही.  यासाठी अध्ययन व मनन हया दोन्ही गोष्टींना समान महत्व दिले.  कन्फ्यूशियसच्या मते विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आपल्या विषयाचा जाणकार बनत नाही. तोपर्यंत त्याच्यामध्ये नवे आणि कुतुहलपूर्ण विचारांचा विकास होऊ शकत नाही.  त्याच्या मते केवळ ढोर मेहनत करुन  अभ्यास  करणे म्हणजे शिक्षण नाही.  तो बिनडोकपणा ठरतो.  आपण जे शिकत आहोत त्याचे मनन-चिंतन करणे अत्यंत महत्वाचे ठरते.  कारण त्यामुळे मिळालेल्या शिक्षणाचे चिरंतन ज्ञानात रुपांतर होत असते.  कन्फ्यूशियसने यासाठीच सांगितले की," जे अध्ययन केले त्याचे मनन केले नाही तर तो केवळ वेळेचा अपव्यय असतो.  तसेच अध्ययन न करता फक्त  मनन करत बसणे दिवास्वप्न पाहण्यासारखे धोकादायक असते.  याचाच अर्थ ज्ञानाजर्नाच्या संदर्भात 'पढत पंडित' आणि 'शेखचिल्ली' अशा दोन्ही प्रवृत्तीं घातक असतात.  एका अर्थाने कन्फ्यूशियसचे विद्यालय म्हणजे अभिनव शिक्षण प्रणालीची प्रयोगशाळाच होती.  त्यामुळेच कन्फ्यूशियसच्या अध्यापन शैलीचा आणि त्यानी विकसित केलेल्या शिक्षण प्रणालीचा वर्तमानकाळाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. 
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                       

 

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !