'सम्यक' गुरुकुलाचा कुलगुरु

"समाजातील उच्च पदांवर विराजमान असलेले लोक संकिर्ण मानसितकतेचे झाले आहेत. कोणतही काम असो वा व्यापार प्रामाणिकता व पारदर्शकता वगळूनच होत आहेत.  शोकविहिन अत्यंविधी केले जात आहेत.  अशा सर्व परिस्थितीत मी केवळ एक मुक साक्षीदार बनून राहू शकत नाही."  असा विचार लोचांगवरून परतत असलेला तीस वर्षीय कन्फ्यूशियस सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहून करत होता.  आज ज्या वर्तमानात आपण लोक जगत आहोत,त्यापेक्षा इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील वर्तमान वेगळे नव्हते.  हेच यावरून स्पष्ट होते.  तुकोबांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "मोले घातले रडावया।नाही आसू नाही माया।।" अथवा "भूके नाही अन्न।मेल्यावरी पिंडदान।।" हेच मानवी समाजाचे भूत आणि वर्तमान असलेले दिसते.  आपल्याकडे भूतकाळ म्हणजे एकदम 'सुवर्णकाळ' होता किंवा 'सतयुग' होते.  अशा भ्रामक गोष्टी पसरवण्याचे काम कायमच जोरदार चालू असलेले दिसते.  मानवी प्रवृत्ती हया सदासर्वकाळ सारख्याच आहेत.  हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  भूतकाळ एवढा साजरा असता तर भगवान बुद्ध,भगवान महावीर,येशू ख्रिस्त,महंमद पैगंबर,नानकदेव,कबिर,तुकोबा असे सर्व महात्मे कोणाला सुधारण्याचा मार्ग सांगत होते.  लाओत्से आणि कन्फ्यूशियस यांनी देखील त्याकाळात हेच कार्य आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून केले.  आपल्या समकालीन समाजाची ही अवनिती कन्फ्यूशियसला अस्वस्थ करत होती.  यामधून त्याचा मनात 'सद्' मार्गावर चालण्याचा लोकांनी संकल्प केला पाहिजे आणि मानवी मूल्यांची समीक्षा होऊन त्यांची कालसुसंगत अशी पुनर्ररचना व्हायला हवी,असा विचार बळावत होता.  कोणाला तरी ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल.  लोचांगमध्ये असतांना ताओवादाशी झालेल्या परिचयातून त्याला असे वाटू लागले होते की ताओवादाने समाजाचे कल्याण होणे अशक्य आहे.  अखेर त्याने स्वतःनेच समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचा संकल्प केला.  समाज परिवर्तनाचा संकल्प केलेला कन्फ्यूशियस त्याच्या 'लू' राज्याच्या 'चुंगडू' हया राजधानीच्या शहरापासून दूर आपल्या पशुधन अधिकारीच्या नोकरीचे कर्तव्यपालन करण्यासाठी पुन्हा रूजू झाला.  त्याला आपला संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य संधीची प्रतिक्षा होती.  त्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरण्यासाठीची संधी घेऊन पुन्हा एकदा त्याचा जीवलग मित्र नांगोंग जिंग्सू अवतरला.  त्याच्या भावांना धार्मिक विधिंचे शिक्षण देण्यासाठी एका 'गुरु' म्हणजे 'जी' ची आवश्यकता होती.  त्यासाठी त्याने आपला पिता सामंत 'मेंग' याच्याकडे कन्फ्यूशियसची शिफारस केली होती.  त्याच्या पित्यानंतर त्याचा मोठा भाऊ 'मेंग यी' हा सामंत पदाचा उत्तराधिकारी होता.  कन्फ्यूशियस ज्या 'लू' राज्याच्या राजा 'जी' याचा कर्मचारी होता.  त्याची आणि सामंत मेंग याची चांगली मैत्री होती.  त्याने कन्फ्यूशियसला मेंगकडे पाठवण्यास आणि त्याचे संपूर्ण वेतन स्वतःच अदा करण्यास अनुमती दिली.  कन्फ्यूशियसला रातोरात 'शिक्षक' बनण्याची संधी मिळाली.  आपले तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यासाठी तो या संधीची प्रतिक्षा करत होता.  सामंत मेंगचे पुत्र आणि नांगोंग जिंग्सूचे भाऊ आपल्या हया नव्या शिक्षकामुळे अत्यंत प्रभावीत झाले होते.  कन्फ्यूशियसची केवळ व्याख्यान देण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांशी उत्स्फूर्त व जीवंत  संवाद साधणारी अध्यापन शैली अत्यंत आकर्षक होती.  कदाचित त्याच वेळी अथेन्समध्ये 'सॉक्रेटिस' हयाच शैलीचा वापर करत असावा.  त्यामुळे या सामंत पुत्रांनी आपला पिता मेंग याच्याकडे त्याची प्रशंसा केली.  जिंग्सूने कन्फ्यूशियसला उच्च वर्गातील आणखी काही विद्यार्थी मिळवून दिले होते.  त्याच बरोबर जिंग्सूने त्याला विश्वास दिला की," आता तुला परत पशुधन अधिकारी म्हणून पुन्हा काम करावे लागणार नाही."  एक आगळा-वेगळा आणि लोकप्रिय अध्यापक म्हणून कन्फ्यूशियसची ख्याती आता सर्वदूर होऊ लागली.  त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली.  अखेर राजाला देखील त्याची दखल घ्यावी लागली.  झाऊ राज्याचा राजाने कन्फ्यूशियसला आपली राजधानी चुंगडू येथे बोलावले आणि त्याला झाऊ राजपरिवारातील राजकुमारांच्या अध्यापनाची जबाबदारी सोपवली.  एक तत्त्ववेत्ता म्हणून स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याचा राजमार्ग कन्फ्यूशियससाठी आता खुला झाला होता.  कोणत्याही माणसाकडे कितीही पात्रता असली तरी त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावाच लागतो.  हाच काळ खरा कसोटीचा असतो.  अनेक लोक याच काळात कच खातात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी व सन्मान मिळत नाही.  या उलट काही लोकांकडे काहीच पात्रता नसते. मात्र अथक संघर्ष करण्याची जिद्द असते.  असे लोक अनेक वेळा संधी व सन्मानाचे धनी होतात.  याचाच अर्थ पात्रते सोबतच संघर्षात यश मिळेपर्यंत टिकण्याचा संयम व धैर्य अत्यंत महत्वाचे असते.  संघर्षाच्या अंतिम टोकापर्यंत जो माणूस संयम ठेवतो आणि तावून-सलाखून निघातो. अखेर एक दिवस संधी त्याच्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या दिसतात.  कन्फ्यूशियसच्या बाबतीत हेच घडले.  इाऊ राजघराण्यातील राजपुत्रांना ज्ञानदान करत असतांना एक अत्यंत मोठी संधी त्याच्या समोर चालून आली.  'लू 'राज्यापेक्षा मोठं आणि शक्तिमान असलेल्या 'क्वी' राज्याचा शासक 'जिंग' राजकीय दौ-यावर लू राज्यात आला.  लू राज्य हे एक प्रकारे क्वी राज्याचे मांडलिक होते.  त्यामुळे त्याला खूश करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न लू राज्याचा राजा करत असे.  क्वी राज्याचा राजा जिंग याच्या कानावर कन्फ्यूशियसची ख्याती गेलेली होती.  राजा जिंग देखील लोचांग येथे जाऊन धार्मिक विधी शिकण्याची ईच्छा होती;परंतु झाऊ राज्यात गृहयुद्ध पेटलेले असल्याने त्याला आपला बेत रद्द करावा लागला.  मात्र लू राज्याच्या राजदरबारात कन्फ्यूशियस असल्यामुळे त्याची ही ईच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली.  राजा जिंगने लू राज्याच्या राजाला सांगून कन्फ्यूशियसला भेटीला बोलावले.  लू च्या राजदरबा-यांनी त्याला अत्यंत उंची वस्त्र परिधान करण्यास दिले आणि त्याला राजा जिंग समोर सादर केले.  कन्फ्यूशियसने लू राज्याच्या झाऊ राजघराण्याच्या खानदानी मंदिरात राजा जिंगला अनुष्ठानांचे शिक्षण दिले राजा जिंग आणि कन्फ्यूशियस दोघेही एकमेकांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले.  कन्फ्यूशियसचे शिक्षण राजपरिवारातील विद्यार्थ्यांसोबत झालेले असल्यामुळे राजदरबारातील व राजघराण्यातील सर्व शिष्टाचारांविषयी त्याला सखोल ज्ञान होते.  त्यामुळे राजा जिंग त्याच्यासारख्या विद्वानाचे आदबशीर व शिष्ट वर्तन पाहून त्याचा चाहता झाला.  चीनी शास्त्रीय संगीतात दोघांना असलेले गती व आवड हा त्यांचे संबंध करणारा एक महत्वाच दुवा ठरला.  राजा जिंग कन्फ्यूशियसपेक्षा दहा वर्षांनी मोठा असला तरी त्यांच्यात नकळतपणे एक मैत्र भाव निर्माण झाला.  आपल्या आईकडून  चीनी 'सितार' वाजवण्याची मिळालेली कला कन्फ्यूशियसने यावेळी जिंगसमोर सादर केली.  जणू काही त्याची आईच त्याच्या  ज्ञानयुक्त शब्दांमधून बोलत होती आणि अप्रतिम सितार वादनातून स्वर्गिय सुरांच्या रूपाने पुन्हा धरतीवर अवतरत होती.   राजा जिंग आणि कन्फ्यूशियस यांच्यात झालेल्या चर्चेत जिंगने समाज कल्याणासंदर्भात त्याच्या मनात असलेली कल्पना कन्प‹यूशियसला विषद केली.  पुढे भविष्यात कन्फ्यूशियस आणि जिंग यांच्यात अशा अनेक चर्चा घडून आल्या त्यामध्ये कन्फ्यूशियसने राजनिती आणि शासन व्यवस्था याविषयी अनेक अनमोल सिद्धांतांचे प्रतिपादन केले.  अनुष्ठांनांच्या अध्यापन सत्राच्या समारोप प्रसंगी राजा जिंगचे मन कन्फ्यूशियस विषयी अत्यंत स्नेहाने व आदराने भरून आले.  त्याने कन्फ्यूशियसला आपली राजधानी 'लिंजी' येथे येण्याचे निमंत्रण दिले.  तसेच आपल्या राजदरबाराची द्वारे त्याच्यासाठी सदैव खुली असून,तो कधीही आपल्या राजदरबारात मंत्री म्हणून रूजू होऊ शकतो,असं सांगितले.  कन्फ्यूशियससच्या मनात मात्र वेगळेच स्वप्न रुंजी घालत होते.  त्याला स्वतःचे विद्यालय अथवा गुरुकुल सुरू करायचे वेध लागले होते.  याकाळात कन्फ्यूशियस राजाला शिक्षण देणारा शिक्षक म्हणून 'कोंग फू जी' नावाने प्रसिद्ध झाला होता.  आता एक गुरु म्हणून त्याची ख्याती सर्वदूर झाल्याने आपोआपच त्याच्या पशुधन अधिका-याच्या नोकरीतून मुक्ती मिळाली होती.  नांगोंग जिंग्सूने गुरुकुलासाठी आर्थिक निधी मिळवला आणि त्याला नोकरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले,तसेच 'लू' चा राजा जी याच्याकडून वेतन मिळत राहिल अशी सोय देखील करुन घेतली.  जिंग्सूने गुरु म्हणून आपल्या मित्राची प्रतिष्ठा व सन्मान वाढवण्यावण्यासाठी स्वतःची अत्यंत आकर्षक बैलगाडी चालकासह कन्फ्यूशियसला दिली.  आजच्या काळानुसार कारसह ड्रायव्हर दिला.  कन्फ्यूशियसने देखील आजीवन हयाच बैलगाडीचा वापर केला.  नोकरी सोडतांना तो राज जी ला भेटण्यासाठी गेला असता,त्याला राजाने विचारेल की,"गुरुकुल स्थापन करण्यामागे तुझा उद्देश्य काय आहे?"  यावर कन्फ्यूशियसने उत्तर दिले," प्रत्येकाला शिक्षणाचा व ज्ञानार्जनाचा समान हक्क व संधी देणे.  ज्ञानलालसा हीच माझ्या गुरुकुलात प्रवेश घेण्याची कोणत्याही विद्यार्थ्याची पहिली पात्रता असेल. संपत्ती,वर्ण,वंश,घराणं अशा कोणत्याही कारणावरून त्याला प्रवेश नाकारला जाणार नाही किंवा दिला ही जाणार नाही."  भविष्यात शिक्षणाची गंगा समाजातील प्रत्येक स्तरातील होतकरू विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी कन्फ्यूशियसचे हे 'सम्यक' गुरुकुल कार्य करणार होते आणि कन्फ्यूशियस त्याचा कुलगुरु असणार होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                   


Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !