'मुळं' शोधण्याची अस्वस्थ धडपड
८ मार्च १८४६ रोजी 'न्यू फ्लोरिडा मेल' नावाच्या अमेरिकन वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध होते. जाहिरातीत सांगितले जाते कि," १९ वर्षांची गर्भावस्थेच्या प्राथमिक अवस्थेत असणारी. एक सुंदर नीग्रो युवतीला कोणी तरी चोरून नेले आहे किंवा ती पळून गेली आहे. तिला पकडून आणणा-याला ५० डॉलरचे रोख बक्षिस देण्यात येईल." वृत्तपत्राच्या हया ४-५ सेंटिमिटरची अशा जाहिराती अनेक वेळा इतिहासातील परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी पुरेशा ठरतात. वृत्तपत्र हया जगातील पहिल्या प्रसार माध्यमापासून आजच्या समाज माध्यमांपर्यंतच्या जाहिराती नकळतपणे त्या-त्या काळाचा युगधर्म सांगत असतात. 'न्यू फ्लोरिडा मेल' मध्ये प्रकाशित झालेली ही जाहिरात पाहून आज आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहत नाही' असे असले तरी आजपासून २०० वर्षांपर्वी अमेरिकन वृत्तपत्रात अशा जाहिराती प्रकाशित होणे, ही एक अत्यंत सामान्य गोष्ट होती. अमेरिकन वृत्तपत्रातील असे अनेक कात्रणे याची साक्ष देतात. चोरून नेण्यात आलेल्या किंवा पळून गेलेल्या नीग्रो युवतीच्या अनुषंगाने आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठल्याशिवाय राहत नाही. गुलाम असलेली १९ वर्षाची नीग्रो युवतीने पलायन करावे असे काय घडले असावे ? ती गर्भवती कशी झाली ? तीच्यावर कशाप्रकारचे अत्याचार झाले असावेत ? इत्यादी इत्यादी. 'अंकल टॉम्स केबीन' सारख्या द्विखंडात्मक कांदबरीपेक्षा मोठा आशय हया छोटयशा टिचभर जाहिरातीत सामावलेला दिसतो. अशा जाहिरातींमधून नीग्रो गुलामांच्या जीवनाची लक्तरे दिसून येतात. पळून गेलेले अथवा पळवून नेण्यात आलेल्या गुलामांना शोधून आणण्यासाठी त्यांचे पुरुष असणे आणि त्यांचे वय यावर बक्षिसाची रक्कम होत असे. अगदी दहा किंवा वीस डॉलरचे बक्षिस असलेल्या जाहिराती देखील वृत्तपत्रात छापून येत असत. एवढेच नाही तर आमच्याकडे गुलामांची खरेदी-विक्री केली जाते किंवा नीग्रो गुलामांच्या खरेदी-विक्रिचे कमिशन एजंट. असे फलक असलेले अधिकृत दुकानं अमेरिकन बाजारपेठाचा अविभाज्य भाग होते. आफ्रिकेच्या भूमिपूत्राला अमेरिकेच्या धरतीवर नुसता गुलामच नाही, तर जनावरापेक्षा खालच्या पातळीवर जगण्याची वेळ कशी आली. याचा शोध घेतांना आपण 'कुंटा किंटे' पर्यंत जाऊन पोहचतो. १७६६-६७ दरम्यान आफ्रिकेतील 'गॅम्बिया' नदीच्या पात्रातून ३० जहाजे तंबाखू,कापूस,हस्तिदंत आणि ९८ नीग्रोंना घेऊन अमेरिकेकडे निघाली. प्रवासा दरम्यान ४२ नीग्रोंचा मृत्यू झाला. २९ जुलै १७६७ रोजी त्यातील 'लॉर्ड लिगोनीयर' हे जहाज अमरिकेच्या 'ॲनापोलिस' बंदरात पोहचले. जगलेल्या ५६ नीग्रोपैकी एक होता कुंटा किंटे. बंदरातील गुलाम बाजारात सर्व नीग्रोंचा लिलाव झाला. एका गो-या मालकाने कुंटा किंटेला विकत घेतला. स्वतःच्या सोयीसाठी त्याचा मालक विल्यम वॉलरने त्याचे 'टॉबी' असे नामकरण केले कुंटा किंटेची अवस्था मुक्या जनावराप्रमाणे होती' त्याची 'मंडिंका' भाषा त्याचा मालकाला समजणे शक्य नव्हते आणि मालकाची भाषा त्याला समजणे शक्य नव्हते. त्यामुळे माझं नावं कुंटा किंटे आहे,असे तो सांगू शकला नाही. तसेच त्याच्या गो-या मालकाला लॉर्ड लिगोनीयर जहाज आफ्रिकेचा किनारा सोडण्यापूवी तो ही एक माणूस होता. त्याला त्याचे कुटुंब,गाव,भाषा,संस्कृती सगळं काही होतं. त्याला त्याची ओळख होती. असल्या त्याच्या दृष्टीने फालतू गोष्टींशी काही घेणे-देणे नव्हते. त्याच्यासाठी बैल,घोडा,कुत्रा अशा पाळीव प्राण्यांपेक्षा कुंटाचे मोल अधिक नव्हते. कुंटा किंटेचा माणूस म्हणून भूतलावरची ओळख त्याच्या नावासह पुसल्या गेली. आता तो फक्त गुलाम टॉबी होता. भविष्यात टॉबीला मालकाची भाषा शिकावीच लागली. मालकाला त्याची भाषा शिकण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मालक टॉबीच्या श्रमावर-रक्तावर 'पोसणार' होता, तर टॉबी मालकाच्या कृपेवर 'जगणार' होता. अखेर पोसण्यापेक्षा जगण्याची हतबलता अधिक असते. आपण आपल्या छोटयाश्या गावाच्या बाहेर जंगलात लाकूड तोडायला गेलो आणि येथे पोहचलो. एवढेच आता टॉबीला आठवत होते. भविष्यातील त्याच्या पिढयांकडे एवढी देखील स्वतःची ओळख शिल्लक राहणार नव्हती. १९७० साली त्याचा सहाव्या पिढीतील वंशज ॲलेक्स हॅले त्याचा शोध घेत 'गॅबिया' तील त्याच्या 'जफुरे' नावाच्या गावात पोहचणार होता. जफुरे गावातील काळकभीन्न लोक कुंटा कुंटेच्या हया अमेरिकन मातीमुळे म्हणा अथवा वर्ण संकरामुळे पिवळट पडलेल्या वंशजाकडे अमेरिकन नीग्रो म्हणून पाहणार होते. त्यातील एका वयोवृद्धानुसार," राजाचे सैन्य आले तेंव्हा तुझा पूर्वज कुंटा किंटे याला त्यांनी पकडून नेले." असे सांगत असतांना ॲलेक्स हॅलेच्या डोक्यात प्रकाश पडला. नेमके याच काळात म्हणजे १७५०-६० च्या दरम्यान आफ्रिकेत युरोपियन देशांनी वसाहती करण्यास सुरवात केली. हे वसाहतवादी युरोपियन आणि त्यांना सामिल झालेले आफ्रिकन वंशाचे काही नीग्रो यांचे महापातक म्हणजे अमेरिकेतील नीग्रो गुलामगिरी. अमेरिकन सैन्यात नोकरी केलेले ॲलेक्स हॅले यांना आपली आजी आणि आई सांगायच्या की," आपले पूर्वज आकाशातून आपल्यावर नजर ठेवतात." यामुळे ॲलेक्स आणि त्याच्या भांवडांच्या मनात आपल्या पूर्वजांविषयी अपार आदराची भावना निर्माण होत गेली. ॲलेक्सची आजी 'सिंथिया' आपल्या पूर्वजांबद्दल अतिशय संवेदनशील होती. सिंथिया आपल्या नातवांना सांगायची," तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात याची काळजी घेत नसाल,तर मलाच ती घ्यावी लागेल." जणू काही 'आफ्रिका' तिच्या मनाच्या अवकाशात चंद्र म्हणून चिरंतन लोबंकळत होता. आपल्या आजीमुळे आपल्या मुळांचा शोध घेण्याची दुर्दम ईच्छा आणि आस ॲलक्सच्या मनात निर्माण होत गेली. अमेरिकेत आलेला त्याचा पहिला पूर्वज त्याला शोधायचा होता. ॲलेक्स हॅले बर्था जॉर्ज व सायमन ॲलेक्सचा पहिला मुलगा. त्याचे आई-वडिल हे नुकतेच स्वतंत्र झालेले नीग्रो गुलाम होते. बार्था संगीत शास्त्रातील पदवीधर आणि सायमन कृषितज्ज्ञ असल्यामुळे ॲलेक्सला उच्च शिक्षण घेता आले. त्याला गुलामीचे चटके सहन करावे लागले नाहीत. स्वातंत्र्य मिळताच नीग्रो समाजाला जगण्याच्या नव्या आशेचे पंख फुटले. ॲलेक्स सैन्यात गेला. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याने हा शोध हाती घेतला. अमेरिकन नीग्रोंच्या नावांमधील 'क' वर्णाचा अधिक वापर हा एक धागा पकडून तो 'कुंटा किंटे' नावापर्यत पोहचला. सुमारे १२ वर्षे म्हणजे एक तपानंतर त्याची संशोधन यात्रा गॅम्बिया नदीच्या उगमाकडे म्हणजे आपला पूर्वज कुंटा किंटेच्या मूळ भूमीकडे पोहचली. एखादयाने नदी समुद्राला मिळते त्या नदी मुखापासून तिच्या उगमाचा शोध घेत जावा. असचा ॲलेक्सचा हा प्रवास. गॅम्बियाच्या जफुरे गावात जाऊन पोहचला. असे असले तरी त्याचा हा प्रवास तसे पाहिले तर आपल्या आईकडून असलेल्या कुंटा कुंटे हया पूर्वजापर्यंतचा म्हणजे एकांगीच होता. आपले वडिल सायमन यांच्या पूर्वजांचा शोध तो घेऊ शकला नाही. याचाच अर्थ मी कोण आहे ? हया प्रश्नाचे अर्धेच उत्तर म्हणजे कुंटा कुंटे व जफुरे गाव त्याला सापडू शकले. हया अर्ध्या उत्तराची शोधयात्रा त्याने 'रूटस्' (Roots: The Saga of an American Family) या कादंबरीच्या माध्यमातून १९७६ साली मांडली. कोलंबसला अमेरिकेचा शोध घेण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागले. जे दुर्दम्य साहस दाखवावे लागले. तसेच ॲलेक्स हॅले यांना कोलंबसने शोधलेल्या अमेरिकेत पकडून आणलेल्या आपल्या पहिल्या पूर्वजाला शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागले आणि साहस दाखवावे लागले. गॅम्बियात गेल्यानंतर त्याला आपला नीग्रो समाज त्याची संपन्न मातृसत्ताक कुटुंब व समाज पद्धती यांचा परिचय झाला. याच्यावरून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाच्या सर्व समस्यांचे मूळ असलेला 'पितृसत्ताक' समाज ही युरोपियन लोकांची जगाला देणं आहे. भारतात देखील जेंव्हा येथील मुळची 'मातृसत्ताक' समाज पद्धती नष्ट करण्यात आली. त्यानंतरच जन्माधारित वर्ण व जातीव्यवस्था निर्माण झाली. ज्यामुळे हजारो वर्षे एका मोठया समाजाला जन्मजात गुलामीचे जोखड मानेवर घेऊन मरावं लागले. भारतासारखी धर्माच्या नावाखाली हजारो वर्षे अत्यंत बेमालूम पद्धतीने राबवण्यात आलेली गुलामगिरी जगाच्या पाठीवर कुठे ही सापडणार नाही. मोझेसच्या पूर्वीपासून असलेली ज्यूंची गुलामगिरी असो किंवा १७ व्या शतकात सुरू झालेली नीग्रो गुलामगिरी असो हया लोकांना आपण गुलाम आहोत,हे लवकरच समजले होते. भारतात मात्र हजारो वर्षे समजले नाही. हा हया गुलामगिरींमधला फरक सांगता येतो. ॲलेक्स हॅलेच्या 'रूटस्' ने अमेरिकेतील प्रत्येक नीग्रो कुटुंबाला अंर्तमुख केले. आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची इच्छा प्रत्येक नीग्रोच्या मनात व समाजात निर्माण झाली. गेल्या सुमारे तीन हजार वर्षांपासून आपल्या मातृभूमीतून उखडून फेकलेले काही ज्यू इतर युरोपियन देशांप्रमाणे अमेरिकेत देखील होते. हे अमेरिकन ज्यू देखील 'रूटस्' ने अस्वस्थ झाले. १८४८ साली त्यांना त्यांची मातृभूमी इझराईल मिळाली होती. ॲलेक्स हॅलेसारखा आपली मुळं शोधण्यात यशस्वी झालेला एखादं दुसरा सोडला तर इतर नीग्रोंकडे त्यांची 'काळी कातडी' वगळता आपली मातृभूमी आफ्रिकेशी नातं सांगणारे कोणतेच संचित शिल्लक नव्हते.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment