एका लोकशिक्षकाचा जन्म

इसवी सन पूर्व ५२३ मध्ये कन्फ्यूशियस आपला मित्र नांगोंग चिंग्सू याच्यासमवेत 'लोचांग' शहराकडे रवाना झाला.  लोचांग शहरात तो आणि चिंग्सू कर्मकांड अथवा अनुष्ठानात पारंगत होण्यासाठी आले होते.  असे असले तरी याठिकाणी भविष्यात चीनी समाजावर सखोल प्रभाव टाकणा-या दोन जीवन तत्त्वज्ञानांचा परिचय होणार होता.  हा परिचय त्यांना एकमेकांपासून कायमचे विभक्त राहण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार होता.  एका कथेनुसार कन्फ्यूशियस लोचांगच्या मुख्य ग्रंथालयात आपले स्वरचित साहित्य जमा करण्यासाठी गेला.  तेंव्हा त्याला समजले की हया ग्रंथालयाचा प्रमुख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होता.  त्याने आता निवृत्ती घेतली आहे.  जर तुला तुझे साहित्य हया ग्रंथालयात जतन करुन ठेवावे असे वाटत असेल तर तू लाओत्सेची मदत यासंदर्भात घेऊ शकतो.  म्हणजेच लाओत्सेने शिफारस केल्यास हे काम होऊ शकते . त्यानंतर लाओत्से-कन्फ्यूशियस यांची भेट झाली.  हया घटनेचा उल्लेख ताओवादी आणि कन्फ्यूशियसवादी अशा दोन्ही साहित्यात आलेला आहे.  यातून एक गोष्ट स्पष्ट होते की लाओत्से आणि कन्प‹यूशियस यांची भेट झाली होती.  असा दावा दोन्ही विचारधारांमधील लेखकांना करायचा आहे.  ताओवादी साहित्यात कन्फ्यूशियस आणि त्याच्या तत्त्वज्ञानावर टिकाच करण्यात आली आहे.  ताओवादी साहित्यातील एक प्रमुख लेखक 'जुआंगजी' याने तर कन्फ्यूशियस संदर्भात अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे.  पारंपरिक मान्यतेनुसार कन्फ्यूशियसने लाओत्सेकडूनच अनुष्ठानाचे प्रशिक्षण घेतले.  काही इतिहासकार हया दोन्ही घटनाच नव्हे, तर लाओत्से नामक व्यक्तीच्या अस्तित्वावर प्रश्नच उभे करतात.  हा वेगळया सविस्तर चर्चेचा विषय आहे.  हे मात्र खरं की लाओत्से प्रणित ताओवाद आणि कन्फ्यूशियसवाद हे दोन्ही परस्पर विरोधी ध्रुवांवर उभे असलेले तत्त्वज्ञानं आहेत.  ताओवाद माणसाच्या अंतरंगाचा विचार आहे,तर कन्फ्यूशियसवाद बहिररंगाचा.  कन्फ्यूशियसच्या तत्त्वज्ञानात विशुद्ध सामाजिक आचारण महत्वाचे आहे.  ताओवाद म्हणजे समाजविन्मुख होऊन अज्ञातात राहून अथांग परमतत्त्वाचा कितीही चाललो तरी अपूर्ण राहणारा प्रवास आहे.  लोचांग शहरात कन्फ्यूशियसचा ताओवादाशी परिचय झाला असला तरी तो आजन्म त्याचा विरोधकच राहिला.  ताओवादामुळे तत्कालीन चीनमध्ये अनेक लोक आपल्या कर्तव्याकडे पाठ करुन गिरीवनांमध्ये भटकत आहेत.  असे त्याचे स्पष्ट मत होते.  अखेर चीनमध्ये कन्फ्यूशियसवाद लोकप्रिय झाला. असे असले तरी भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी नैसर्गिक युती केलेला ताओवादच चीनमध्ये धर्म म्हणून मान्यता पावला.  आजही जगभरात सव्वा कोटी लोक या ताओ धर्माचे पालन करतात.  ताओवाद आणि कन्फ्यूशियसवाद यांच्यातील संघर्षाचा मोठा इतिहास आहे.  धार्मिक कारणांवरून निर्माण झालेल्या तणावांच्या काळात ज्याप्रमाणे माणसाला आपला धर्म आवर्जून सांगावा लागतो.  तशीच अवस्था चीनमध्ये झाली होती.  प्रारंभीच्या काळात चीनी लोक दोन्ही तत्त्वज्ञानांना प्रमाण मानत होते.  अथवा दोन्ही धर्मांचे पालन करत होते.  ही स्थिती कन्फ्यूशियसच्या मृत्यूनंतर सुमारे एक शतकभर होती.  त्याकाळातील काही समाध्यांमध्ये दोन्ही तत्त्वज्ञानांशी निगडित हस्तलिखितं प्राप्त झाली आहेत.  यावरून असे सिद्ध होते की लोकं दोन्ही तत्त्वज्ञानांना आपल्या जीवनासाठी उपयुक्त समजत होते.  पुरातत्त्व संशोधकांना ईसवी सन पूर्व ४ व्या शतकातील 'चू' नावाच्या राजाचा शिक्षक असलेल्या एका व्यक्तीच्या समाधीत देखील दोन्ही तत्त्वज्ञानांशी निगडित हस्तलिखितं प्राप्त झाली आहेत.  यावरून असे सिद्ध होती की या दोन तत्त्वज्ञानांमध्ये कन्फ्यूशियसनंतर दोन-तीन शतकांनंतर संघर्ष निर्माण झाला असावा.  तो काळाच्या ओघात अधिक टोकदार होत गेला.  मात्र यामागे राजकीय कारणं होती.  असे अभ्यासक मानतात.  हया दोन्ही तत्त्वज्ञानांचे ठेकेदार बनलेल्या लोकांना जेंव्हा राजसत्तेवर आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव व अंकुश असावा असे वाटू लागले तेंव्हा ही तत्त्वज्ञानं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली.  यावरून हेच सिद्ध होते की धर्म असो वा तत्त्वज्ञान हे त्यांच्या मुलभूत स्वरुपात कधीच एकमेकांविरोधात उभे नसतात.  मात्र त्यांच्या संस्थापकांनंतर अथवा निर्मिकांनंतर धर्माच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या जीवावर जगणारे आणि अमर्याद सुख-सुविधा-सत्ता भोगणारे स्वयंघोषित ठेकेदार त्यांना एकमेकांमध्ये झुंजवतात.  ताओवाद आणि कन्फ्यूशियसवाद यांच्यातील हा वाद वर्तमानकाळातील संशोधनाने आणि मांडणीने जवळपास संपुष्टात आला आहे.  आजच्या समतोल अभ्यासकांनी हया दोन्ही तत्त्वज्ञानांना जीवनोपयोगी सिद्ध केले आहे.  तसेच हे दोन्ही एकमेकांचे विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत.  अशी मांडणी केली आहे.  हे दोन्ही तत्त्वज्ञानं मानवतेला केंद्रिभूत मानून मानवतेच्या संदर्भात विविध संस्कार देतात,हे आता मान्य करण्यात आले आहे.  ताओवाद माणसाच्या सामाजिक जीवनासंदर्भात कोणतेही भाष्य करत नाही.  तसेच कन्फ्यूशियसवाद परमसत्ता,ब्रम्हांडाची निर्मिती,माणसाच्या जन्माचे कारणं इत्यादी संदर्भात काहीच चर्चा करत नाही.  कन्फ्यूशियसचे तत्त्वज्ञान संग्रहित असणा-या 'एनालेक्ट्स' नावाच्या ग्रंथाचे अध्ययन करून अनेक राजकीय नेत्यांनी,व्यावसायिकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतलेली दिसते.  सदाचारयुक्त सामाजिक आचरण समजण्यासाठी एनालेक्ट्सचा उपयोग होतो.  दुस-या बाजूला स्टीप‹Šन हॉकिंगसारखे आधुनिक काळातील महान शास्त्रज्ञ विश्व निर्मितीच्या मागील रहस्यांचा वेध घेतांना नकळतपणे ताओवादाचाच विचार मांडतांना दिसतात.  स्टीप‹Šन हॉकिंग यांनी यासंदर्भात म्हंटले आहे की," या ब्रम्हांडातील प्रत्येक वस्तूची निर्मिती त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्या तरी वस्तूपासून किंवा अस्तित्वापासून झाली आहे.  ब्रम्हांड निर्मितीच्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या त्या वस्तूचा किंवा ते अस्तित्वाचा जन्म त्यापूर्वीच्या कोणत्या तरी वस्तूतून किंवा अस्तित्वविहीनतेतून झाला आहे.  म्हणजे ब्रम्हांड निर्मितीला कारणीभूत असलेल्या रहस्यात रहस्य लपलेले आहे.  १९१८ साली मॅक्स प्लॅक यांना त्यांच्या भौतिकशास्त्रातील शोधाबद्दल नोबल पुरस्कार मिळाला.  त्यांना क्वांटम फिजिक्स हया भौतिकशास्त्राच्या शाखेचे जनक मानले जाते.  अणू हा विश्वातील सर्वात सूक्ष्म घटक मानला जातो.  अशा अणूतील कणांच्या गतीचा अभ्यास करणारी ही शाखा आहे.  हया कणांच्या गतीचा संदर्भ घेऊन विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न देखील या शाखेत केला जातो.  हया आधुनिक विज्ञानातील संशोधन ताओवादाजवळ पोहचणारे दिसते.  अखेर मानवी समाजाला ताओवाद आणि कन्फ्यूशियसवाद हया दोहोंची आवश्यकता आहे हे मान्य करावे लागते.  आपल्याला ब्रम्हांड व विश्व निर्मितीसंदर्भातील गूढाचा शोध घ्यावा वाटतो तेंव्हा आपण ताओवादाचा ही आधार घेऊ शकतो.  तर सामाजिक जीवनात जगतांना कसे जगावे अथवा वागावे असा प्रश्न पडतो तेंव्हा कन्फ्यूशियसवाद आपल्याला अहंकार मुक्त होऊन विनम्रतेचा स्वीकार करून आपले जीवन सुलभ व प्रभावी होऊ शकते,याचे मार्गदर्शन करतो.  इसवी सन पूर्व ६ व्या शतकात जगाच्या पाठीवर एकाच वेळी भगवान बुद्ध,भगवान महावीर,सॉक्रेटिस,झरतुष्ट्र इत्यादी महात्म्यांसोबतच लाओत्से व कन्फ्यूशियस वावरले.  ही मोठी विलक्षण गोष्ट आहे.  कारण एकाच शतकात एवढे चिरंतन विचारधन जगाला मिळाले,यावर विश्वासच बसत नाही.  लोचांगमध्ये कन्फ्यूशियसने ज्ञानाचे यथेच्छ अमृतपान केले.  आपला मित्र नांगोंग चिंग्सू समवेत काही काळ ज्ञानसाधनेत व्यतीत केल्यानंतर त्याने लोचांगचा निरोप घेतला.  तत्कालीन चीनचे सांस्कृतिक व धार्मिक राजधानी असलेल्या हया शहराने कन्फ्यूशियसला ज्ञानासोबतच एक नवा आत्मविश्वास दिला होता.  त्याने आणि चिंग्सूने आपल्या बैलगाडीतून एकवार शहराकडे वळून पाहिले. कन्फ्यूशियसला या शहरात प्राचीन ज्ञान आणि तत्त्वज्ञानासंदर्भात संशोधनाची संधी मिळाली होती.  असे असले तरी त्याचे मन त्याला सांगत होते की आपला जन्म संशोधनात रमण्यासाठी झालेला नाही.  हे भाग्य आपल्या भाळी नाही.  आपल्याला परत जाऊन पशुधन अधिकारी म्हणून ढोरं मोजत बसावे लागणार आहे.  लोचांगला अखेरचे डोळयात साठवून घेतांना,हा विचार त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण करुन गेला.  आपल्या मित्राच्या मनातील घालमेल चिंग्सूच्या नजरेतून सुटली नाही.  त्याने कन्फ्यूशियसच्या खांदयावर हात ठेवला आणि म्हणाला," तूला चिंता करण्याची गरज नाही.  आपण लोचांगला येऊन सर्वात मोठया मंदिरातून अनुष्ठानांमध्ये पारंगत होण्याचा आपला उद्देश साध्य केला आहे.  आता तू पशुधन अधिकारी म्हणून काम करणार नाहीस. तू आता 'जी' म्हणजे 'गुरु' होण्याची योग्यता प्राप्त केली आहे."  चिंग्सूच्या आश्वासक शब्दांनी कन्फ्यूशियसच्या मनाला एक आनंदाची व सुखाची आल्हाददायक झुळुक स्पर्श करुन  गेली.  आपल्या मित्राबद्दलची कृतज्ञता देखील त्याच्या मनात दाटून आली.  त्याने लोचांगला मनोभावे वंदन केले.  आता तो आपल्या शहरात नुसता 'कोंग' नव्हे तर 'कोंग जी' म्हणून प्रवेश करणार होता.  लोचांग शहराने त्याला त्याच्या जीवनाचे ध्येय प्रदान केले होते.  कन्फ्यूशियस एक गुरु किंवा शिक्षक म्हणून केवळ उदरभरण करणार नव्हता,तर लोकशिक्षक म्हणून त्याला एक नवा समाज घडवायचा होता.  कन्फ्यूशियसच्या रुपाने जगाला चिरंतन पुरणारा एक लोकशिक्षक जन्माला आला होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                              
                                     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !