मातृसत्तेचा उपासक तत्त्ववेत्ता
कन्फ्यूशियस चे शिक्षण पूर्ण झाले. त्याचा मित्र राजकुमार मित्र 'नांगोंग जिंग्सू' आपल्या राज्यात परतला. त्याला त्याच्या 'मेंग' राज्याची प्रशासकीय जबाबदारी सांभाळायची होती. कन्फ्यूशियस देखील घरी परतला. हया दोघा मित्रांच्या वाटा काही काळासाठी वेगळया झाल्या असल्या तरी ते जीवनभर सोबत असणार होते. जिंग्सू हा कन्फ्यूशियसच्या जीवनाचा मुख्य आधार म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार होता. कन्फ्यूशियस घरी गेल्यानंतर काही दिवसातच त्याची आई झेंगझाईने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आपल्या मुलाची महान कर्तबगारी पाहण्याचे सौख्य देखील हया मातेला लाभले नाही. तिचे जीवन म्हणजे केवळ संघर्ष आणि दुःख यांची गाथा ठरले. असे असले तरी कन्फ्यूशियसला त्याच्या आजोळच्या यान परिवाराने कधी अंतर पडू दिले नाही. झेंगझाईनं आपल्या मृत्यूच्या काही काळ आधीच त्याचा विवाह तिच्या 'यान' परिवारातील एका मुलीसोबत निश्चत केला होता. हया मुलीचे नाव 'जाई वो' असे होते. त्यावेळी सतरा वर्षांच्या असलेल्या कन्फ्यूशियसला शिक्षणासाठी दिलेल्या वचनानुसार राजदरबाराची नोकरी करण्याचे आणि आईने निश्चित केलेल्या मुलीसोबत विवाह करण्याचे कर्तव्य पार पाडायचे होते. आईच्या निधनानंतर कन्फ्यूशियसने ३ वर्ष शोकात घालवण्यचा निर्णय घेतला. त्याची नियोजित वधू जाई वो हिने त्याला हा काळ एक वर्षाचा ठेवण्याचा आग्रह केला. त्यावेळी कन्फ्यूशियस म्हणाला," तुझ्या माता-पित्याचे निधन झाले असते,तर रंग-बिरंगी पोषाख घालून स्वादिष्ट पक्वान्नाचा आस्वाद घेणे तुला योग्य वाटले असते का ? जर तुला असे करणे योग्य वाटत असेल,तर तसे कर मात्र कोणताही श्रेष्ठ व्यक्ती शोक करण्याच्या काळात असे करू शकणार नाही. एवढेच काय तो सुखद संगीताचा देखील आस्वाद घेणार नाही." आपल्या मातेचा अंत्यविधी सुद्धा कन्फ्यूशियसने घरातील 'कर्ता पुरुष' किंवा 'पिता' गेल्यानंतर करतात तशाच सन्मानाने केला. यासाठी त्याला खूप टिका सहन करावी लागली. कारण तत्कालीन पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेला हे सहन होणे शक्य नव्हते. कन्फ्यूशियसने कोणत्याच टिकेला भिक घातली नाही. आपली आई एवढे आपल्याला काहीही श्रेष्ठ नाही. हे त्याला समाजाला ठणकावून सांगायचे होते. अत्यंत साहसाने आपल्या मुलाचे जीवन घडवणा-या एकटया मातेला काहीच मूल्य न देणा-या पुरुषी मानसिकतेला चपराक देत,आपल्या अस्तित्वाचे व यशाचे श्रेय कन्फ्यूशियसने आपल्या आईला दिले. कोणत्याही मुलामध्ये असलेली प्रतिभा ही फक्त त्याच्या पित्याकडून आलेली असते. हया पुरुषी धारणेला देखील त्याने छेद दिला. भविष्यात याविषयी कन्फ्यूशियस म्हणाला," मी ज्ञानी म्हणून जन्माला आलो नव्हतो. मला प्राचीन ग्रंथांविषयी आवड होती आणि त्यांच्यामधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली. ग्रंथवाचनाचे संस्कार,रुची व संधी मला माझ्या मातेमुळे मिळू शकल्या." कन्फ्यूशियसच्या मृत्यूनंतर त्याचे चरित्र लेखन करणा-या लोकांच्या पुरुषी मानसिकतेने झेंगझोईचे माता म्हणून त्याच्या जीवनातील अनन्यासाधारण महत्व जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले. त्याच्या पुढे जाऊन काही चरित्रकारांनी कन्फ्यूशियसच्या प्रतिभेचे श्रेय त्याच्या पित्याच्या 'कोंग' घरण्याला देण्याचा प्रयत्न केला. कन्फ्यूशियसची माता आणि तो स्वतः एका अर्थाने बंडखोर व पुरोगामी व्यक्तिमत्वं होते. त्यामुळे त्याच्या जीवनाचा पूर्वाध त्याची आई झेंगझोईचे महत्व व वेगळेपण अधोरेखित करून शब्दबद्ध करणे. हा त्याकाळाच्या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा विचार करता त्याच्या समकालीन चरित्रकारांना शक्य झाले नसेल. तसेच त्यांच्या पुरुषी मानसिकतेच्या ही मर्यादा यामागे असू शकतात. आधुनिक काळातील चरित्रकारांनी मात्र झेंगझोईला न्याय दिलेला दिसतो. आईच्या निधनानंतर नोकरी आणि विवाह यांना तीन वर्षे स्थगिती देऊन कन्फ्यूशियसने अज्ञातवासात घालवले. त्याचा हा अज्ञातवास त्याच्या मामाच्या घरातच त्याने काढला. मात्र याकाळात वाचन व चिंतन,साधे जीवन,साधा पोषाख,साधे भोजन यांच्या माध्यमातून त्याने आपल्या आईला खरी श्रद्धांजली अर्पण केली. त्याच्यासोबत त्याच्या मामाच्या 'यान' परिवाराने देखील आपल्या मुलगी-बहिण झेंगझोईसाठी तीन वर्ष शोकात काढली. हे शोकमग्न तीन वर्ष कन्फ्यूशियसच्या जीवनात अत्यंत महत्वाचे ठरले. याकाळात त्याने स्वतःला अध्ययनात संपूर्णपणे गाडून घेतले. याबद्दल तो पुढे एकदा म्हणाला की," आमच्या वस्तीत दहा कुटुंब राहत होते. त्यामध्ये माझ्यासारखा प्रामाणिक व विश्वासू नक्कीच एखादा कोणी असेल मात्र माझ्यासारखा ज्ञानलालसेने अभ्यास करणारा कोणीही नव्हता." अखेर तीन वर्षांनी कन्फ्यूशियस कसातरी शोकातून बाहेर आला. आत तो वीस वर्षांचा झाला होता. त्याने आता ग्रंथांना बाजूला ठेवले. जीवनाच्या वास्तवाशी सामना करण्याची मानसिकता दृढ करुन तो बाहेर पडला. सर्वप्रथम त्याच्या मामांनी त्याचा विवाहाचे आयोजन केले. विवाहामुळे यान परिवार देखील शोकमग्न अवस्थेतून बाहेर पडला. धार्मिक विधी व पारंपरिक रीती-रीवाजांनुसार हा विवाह पार पडला. कन्फ्यूशियसला ही सोंग-ढोंग अमान्य होती. त्याने आपल्या तत्त्वज्ञानात कायम याचा विरोध केला होता. त्यामुळे नाखुषीनेच हया सगळयातून गेला असावा. कन्फ्यूशियसचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकले नाही. विवाहाच्या चार वर्षांतच तो आणि त्याची पत्नी विभक्त झाले. त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर पती-पत्नीने विभिक्त होणे, म्हणजे अंचबित करणारी घटना होती. हा सामाजिक वादाचा व चर्चेचा विषय होता. मात्र कायमच बंडखोर राहिलेला कन्फ्यूशियसने येथेही आपली बंडखोरी दाखवली. त्यामुळे त्याच्या चरित्रासंदर्भातील साधनांमध्ये त्याच्या पत्नीसंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. विवाहानंतर तात्काळ कन्फ्यूशियस आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन नोकरीसाठी रवाना झाला. त्याला शासकीय धान्य भांडाराचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. धान्य भांडाराजवळच त्याला राहण्यासाठी घर देण्यात आले होते. तो आणि त्याची पत्नी निसर्गसंपन्न वातावरण असलेल्या घरातून आलेले होते. तसेच गरीबी असली तरी मानवता,सहकार्य आणि प्रेम यांची उब त्यांनी अनुभवलेली होती. त्यांना शहरातील हे नवीन घर आणि त्याच्या भोवतालचे वातावरण आवडणे अशक्य होते. खेडयातून शहराकडे जाणारा प्रत्येक माणूस हयाची अनुभूती घेत असतो. स्वतःचे खेडं सुटलेला प्रत्येक माणूस गावासाठी झुरतांना दिसतो. यावरूनच कन्फ्यूशियसने एके ठिकाणी विधान केले की," कोणत्याही लोकवस्तीचे सौंदर्य त्याच्यातील मानवतेने वृद्धिंगत होत असते. मानवता नसलेली लोकवस्ती दिसायला किती ही सुंदर असली तरी तेथे कोणीही स्वतःच्या ज्ञानाचा विकास करू शकत नाही." कन्फ्यूशियस आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य अत्यंत समरसून आणि समर्पण भावाने करत असे. इतरांनी देखील अशाच प्रकारे कर्तव्य पालन करावे असे त्याचे मत होते. त्यामुळे नोकरी करतांना आपण सरकारी नोकरी करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. याची त्याला पूर्ण जाणीव असून देखील त्याने नोकरीतील प्रत्येक जबाबदारी पार पाडतांना कोणतीही तक्रार केली नाही. त्यामुळेच माणसाच्या दिनचर्येबाबत विचार व्यक्त करतांना तो म्हणतो," रोज सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने भेटा की तुम्ही एका अत्यंत मोठया व महत्वाच्या अतिथीचे स्वागत करत आहात. कोणतेही काम करतांना आपण जणू काही एखाद्या मोठया समारंभामध्ये सहभागी होत आहोत. असे भाव मनात ठेवा. तसेच असंतोषाशिवाय जीवन जगण्याचा प्रयत्न करा." कन्फ्यूशियसच्या अशा विचारपद्धतीमुळे त्याला आपल्या नोकरीत यश मिळत होते. त्याचा हिशोब असो वा धान्याचे मोजमाप कुठेही त्रुटी राहत नव्हती. दोन वर्षात त्याला त्याचे काम पाहून पदोन्नती मिळाली. आता त्याला वेतन म्हणून वर्षाला १५० टोक-या धान्य मिळणार होते. त्याचे कामातील कौशल्य पाहून लवकरच त्याला 'पशुधन अधिकारी' म्हणून नियुक्त करण्यात आले. भविष्यात कन्फ्यूशियस जेंव्हा तत्त्ववेत्ता व गुरु म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा अनेक लोक त्याला संत अथवा सिद्ध पुरुष समजू लागले. कन्फ्यूशियसच्या व्यावहारिक दक्षतेला व कौशल्याला पाहून त्याचे प्रशंसक त्याच्या हया गुणांना संताच्या व्यक्तिमत्वात असणारे स्वाभाविक गुण समजू लागले. कन्फ्यूशियसला मात्र त्याला कोणी संत अथवा चमत्कारी पुरुष मानने आवडत नव्हते. याबद्दल तो नेहमी म्हणत असे की," मी माझ्या तरूणपणी ज्या छोटया पदांवर नोक-या केल्या. त्यांच्यामुळे माझ्यात काही कौशल्य निर्माण झाले असतील. मात्र याचा अर्थ संत होण्यासाठी व्यावहारिक दक्षता व कौशल्याल यांची काहीच आवश्यकता नाही." पशुधन अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम करतांना कन्फ्यूशियसच्या मनात काही प्रश्न आता रुंजी घालू लागले होते. ते म्हणजे आपला जन्म या कामासाठी झाला आहे का ? आपण आयुष्यभर ढोरं मोजत बसणार आहे का ? हे प्रश्न जरी त्याला पडत असले तरी त्याच्या मनात आपल्या कामाविषयी असंतोष अजिबात नव्हता. आपल्यातील महानतेची जाणीव त्याला होऊ लागली होती. एवढे मात्र खरे. भावी आयुष्यात ही त्याने आपल्या नोक-यांबद्दल मनात कटू भाव ठेवला नाही. त्याने तो जीवनाचा एक टप्पा समजला. मात्र नोकरदार कन्फ्यूशियसपासून महान तत्त्ववेत्ता कन्फ्यूशियसकडे होणा-या त्याच्या आयुष्यातील वाटचालीची ही चाहूल होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
खूपच सुंदर विवेचन👍💐
ReplyDelete